शाश्वत विकासयात्री
शाश्वत विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, असा प्रश्न अनेक जण विचारतात. त्याचं चोख उत्तर दिलं आहे डेहराडूनच्या सौम्या प्रसाद यांनी. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार नक्की काय असतो, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. शाश्वत विकासयात्री असलेल्या सौम्या या महिलेची नवरात्रीच्या पहिल्या माळेच्या निमित्ताने ही ओळख…
गेल्या ३ वर्षांपासून त्यांना पाण्याचं किंवा लाईटचं बील येत नाही…. भाजीपाला खरेदीसाठी त्यांना एक रुपयाही खर्च करावा लागत नाही….. ते कार चालवतात पण त्याचा खर्च शून्य असतो…..
हे असे सारे कुणी सांगितले तर आपला विश्वास बसेल का? नक्कीच नाही. अशा प्रकारची व्यक्ती फार फार तर शेतकरी असेल किंवा कुणी तरी आदिवासी भागात राहणारी, असेल असे कुणालाही वाटेल. पण, उच्चविद्याविभूषित आणि शहरातच राहणारी ही व्यक्ती असेल तर? फार उत्सुकता न ताणता अखेर आज आपण सौम्या प्रसाद यांना आणि त्यांच्या अनोख्या कार्याला सलाम करणार आहोत.
पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे, त्यासाठी काही तरी करायला हवे, सरकारने हे करावे, ते करावे असे सांगणारेही एसी हॉलमध्ये बसून गप्पा मारतात. तर, काही जण सरकार किंवा अन्य जणांवर खापर फोडून मन मोकळे करतात. काहींना तर आपण किती मोठे पर्यावरण तज्ज्ञ आहोत हे सांगण्यासाठी वारंवार ‘मनाचे श्लोक’ सांगावे लागतात. या साऱ्याला सौम्या प्रसाद या अपवाद आहेत. खऱ्या अर्थाने इकॉलॉजिस्ट म्हणूनही त्यांची ओळख करुन देता येईल.
पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे नक्की काय. याचे उत्तर हवे असेल तर एकदा तरी सौम्या यांना भेटायला हवे. त्यांच्या जीवनाविषयी जाणून घ्यायला हवे. दिल्लीत प्राध्यापकाचे काम करणाऱ्या सौम्या यांना तेथील प्रदूषणाविषयी चांगलीच माहिती होती. केवळ सरकार किंवा अन्य कुणाला दुषणे देऊन प्रदूषण किंवा पर्यावरणाचा प्रश्न सुटणार नाही, हे त्यांना चांगले ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी डेहराडूनला येताच शाश्वत विकासाची वाट चोखाळली आहे.
डेहराडून शहरात त्यांचे मूळ घर होते. पण, ते पाडून नवे सिमेंटचे घर त्यांना उभारायचे नव्हते. म्हणूनच त्यांनी आपली मैत्रिण स्वाती नेगी या आर्किटेक्टची मदत घेतली. जुन्या घराचा जो कचरा निघाला तोही या नवनिर्मितीत वापरला गेला. बांबू आणि अनेक पर्यावरण पूरक बाबींच्या आधारे त्यांनी त्यांचं हे घर साकारलं. अतिशय देखणं आणि पर्यावरणाशी जवळीक साधणारं. दिवसभर हवा आणि प्रकाश खेळता राहिल अशी योजना केली. त्यामुळे सहाजिकच वीजेचा वापर घटला. वीज ही अपरिहार्य असल्याने त्यांनी मग सौर ऊर्जेचा स्विकार केला. जवळपास ४ लाख रुपये खर्चून त्यांनी छतावर सौर पॅनल्स बसविले. त्यातून जी वीज निर्माण होते त्याद्वारे त्यांच्या पूर्ण गरजा भागतात. आणि हो उरलेली वीज ते सरकारलाच मोफत देतात. अवघ्या काही वर्षातच त्यांची ही गुंतवणूक वसूल झाली. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात त्यांना लाईट बील आलेलं नाही, ते भरण्याचा प्रश्न नाही आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटकटही.
आपल्याला जगण्यासाठी जो दैनंदिन भाजीपाला लागतो तो सुद्धा घरच्या घरीच कसा उपलब्ध करायचा यासाठी सौम्या यांनी घराच्या परसातच, गच्चीत, बाल्कनीत रोपे लावली. छोट्या कुंड्यांपासून मोठ्या रोपांनी हे सारे बहरले. यातूनच भाजीपाला, फळे आणि अन्य बाबी सहजगत्या मिळू लागल्या. वीज आणि भाजीपाल्याचा प्रश्न सुटला. याचबरोबर त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना राबविली. घराच्याठिकाणी पावसाचे जे पाणी पडते त्याचा थेंब न थेंब वाचविण्याचे त्यांनी अचूक नियोजन केले. त्यासाठी जमिनीत त्यांनी पाण्याची टाकी साकारली. २० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी आहे. यातीलच पाणी ते वर्षभर वापरतात. हो अगदी पिण्यासाठीही. त्यासाठी त्यांनी छोटेखानी शुद्धीकरण यंत्र बसविले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सरकारी नळाचे कनेक्शन सुद्धा नाही. त्यामुळे त्याचे मासिक बिल अदा करण्याचेही औचित्य राहत नाही.
पावसाचे माहेरघर म्हणून डेहराडूनची ओळख आहे. मात्र, उन्हाळ्यात या भागात पिण्याचे पाणी मिळण्याचेही वांधे व्हायचे. तब्बल १५ दिवस पाणी पुरवठा नसायचा. तसेच, सांडपाणी मिसळलेले किंवा गढूळ पाणीही नळातून यायचे. सौम्या यांनी या साऱ्यावर चपखल तोडगा काढला. पाणी, वीज आणि भाजीपाला याबाबतीत त्या स्वयंपूर्ण झाल्या. सौम्या यांचे पती डॉ रमण कुमार आणि त्यांची कन्या असे हे त्रिकोणी कुटुंब. दोघेही उच्च विद्याविभूषित. त्यामुळेच त्यांनी ही अशी जीवनशैली स्विकारली आहे.
घराबाहेर पडायचे आणि कुठे जायचे असेल तर वाहन लागतेच. हेच वाहन प्रदूषणकारी असते कारण त्यासाठी इंधन लागते आणि त्याचे ज्वलन होते. यावरही या दाम्पत्याने पर्याय शोधला. सौर ऊर्जेवर आधारीत चालणारी कार त्यांच्याकडे आहे. वीजेवर चार्जिंग करुन लागणारी ही कार ते सौर ऊर्जेवर निर्माण होणाऱ्या वीजेवरच चार्ज करतात. त्यामुळे त्याचाही त्यांना खर्च येत नाही. शहरातच कुठे जायचे असो की बाहेरगावी या कारशिवाय ते जात नाहीत. सहा लाख रुपये खर्चून घेतलेल्या या कारचे संपूर्ण पैसे केवळ पाच वर्षातच वसूल झाले आहेत. एकदा संपूर्ण चार्जिंग केले की ती १२० किलोमीटर चालते. रस्त्यात कुठे चार्जिंगची गरज पडली तर हॉटेल, ढाबा, टोलनाका किंवा दुकान अशा ठिकाणी ती चार्जिंग करता येते.
घराच्या परिसरातच तयार होणाऱ्या भाज्या आणि अन्य बाबींमुळे त्यांनी परसातच कम्पोस्टिंग प्रकल्पही साकारला आहे. त्यामुळे घरातील कचऱ्याची विल्हेवाट घरीच करता येते. झाडांचा पालापाचोळा, किचनमधील वेस्ट या साऱ्यापासून खतनिर्मिती होते. हेच खत घरातील रोपांना वापरले जाते. अतिशय शुद्ध, पवित्र आणि प्रसन्न वातावरणात आम्ही आमच्या लेकीला वाढवतो आहोत. याचे सर्वात मोठे समाधान आमच्या वाट्याला आहे. आम्ही जे काही केले आहे ते अशक्य आणि खुप काही वेगळे नाही. आपले पूर्वज जे काही करत होते तेच आम्ही करीत आहोत. आपली जीवनशैलीच पर्यावरणाची काळजी घेऊ शकते. अगदी साधे, सहज पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण, ते पाहत नाहीत किंवा नजरेआड करतो. कपडे धुण्यासाठी रिठा वापरण्यापासून असंख्य बाबी आज उपलब्ध आहेत. त्याचाच उपयोग आम्ही करीत आहोत. इतरांनीही ते करण्यास हरकत नाही. एकदा हे करुन पाहिले तर त्यातून जे समाधान मिळेल त्याचे मूल्य काही वेगळेच आहे. काही तर महागडे आणि भव्यदिव्य खरेदी करुनही जो आनंद मिळत नाही तो या जीवनशैलीतून मिळतो आहे. आपण ठरवले तर आपण नक्की करु शकतो, असे सौम्या सांगतात.
पर्यावरणाचे रक्षण करुन खऱ्या विकासाच्या वाटेवर निघालेले हे कुटुंब संपूर्ण जागासाठीच आदर्श आहे. अशी कुटुंबे जशी वाढत जातील तशा पर्यावरणाच्या समस्याही आटोक्यात येतील. खरं आहे ना!