हिरवीकंच समृद्धी
नाशिक जिल्हा तसा नशीबवानच. जिल्ह्यात लहान-मोठी तब्बल २७ धरणे आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम जोरात असतो. मागील लेखामध्ये धरण पाणलोट क्षेत्रातील हिरवी माळराने आणि तेथील जैव विविधतेबद्दल माहिती घेतली. आता हिरव्या शेतीवाडी संलग्न असलेल्या जैव विविधतेबद्दल आढावा घेऊया…

(ज्येष्ठ पक्षी निरीक्षक व पर्यावरणप्रेमी)
मो. 9822059992
नाशिक जिल्ह्यात गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांबरोबर भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर पिकतो. गोदावरी लगतच्या तालुक्यांमध्ये द्राक्ष लागवड भरपूर प्रमाण केली जाते. फळबाग लागवड दिवसेंदिवस वाढतच आहे. द्राक्षापासून बनणाऱ्या वाईन उद्योगाने नाशिकची जगाच्या पाठीवर वेगळी ओळख करून दिली आहे.
गहू, ज्वारी, हरभरा यांच्या पाणथळ जागेच्या जवळ असलेल्या शेतांना जानेवारी ते मार्च ह्या महिन्यात कॉमन क्रेन, डेमॉझोल क्रेन या सारख्या आकाराने मोठ्या आणि संख्येने जास्त येणाऱ्या पक्ष्यांकडून त्रास होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागते. पण खरी दहशत मात्र ऊसाच्या शेतात वावरणाऱ्या संभाव्य बिबट्यांच्या आढळण्याने होते.
बिबट्या आणि मानव संघर्ष हा तर मोठा आणि जुना विषय आहे. परंतु नाशिक जिल्ह्यात हा एक ज्वलंत विषय होऊन बसला आहे. भारतातील एकूण बिबट्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक नंतर तिसरा क्रमांक लागतो. त्यामध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. अभ्यास करता असे लक्षात येते की, ह्या तिन्ही जिल्ह्यात रब्बी आणि ऊस लागवड जास्त प्रमाणात आहे.
या विषयातील काही तज्ञ मंडळींचे आकडे असे सांगतात की, बिबट्यांची संख्या ऊस लागवडी प्रमाणे वाढत चालली आहे. ऊसाच्या शेतात ब्रीडिंग करून आपली पिलावळ जपण्यासाठी, लपण्याच्या जागा त्यांना येथे मिळतात. शिवाय कोल्हे, कुत्री, ससे, मुंगूस, कों बड्या, पाळीव जनावरे, वासरे ही शिकार त्यांना जास्त परिश्रम न घेता मानवी वस्तीच्या जवळ मिळते.
बिबट्या एक रात्रीत (३ ते ४ तासात) ७५ ते १०० किलोमीटर अंतर पार करु शकतो. शिकार करताना अत्यंत धूर्तपणे शिकार करतो. जास्त गोंगाट व्हायच्या आत तिथून सटकून जातो. उंच उडी, लांब उडी, झाडावर चढून बसणे, मोठी छलांग मारणे, पंज्याची ताकद ह्या त्याच्या काही जमेच्या बाजू आहेत.
बिबट्याच्या मानवी वस्तीत होणाऱ्या जवळकीमुळे सद्यस्थितीत त्याचा मानवाला धोका अधिक वाटतो आहे. मानव आणि बिबट्या संघर्ष ह्या विषयांवर Phd करणाऱ्या माझ्या एक मित्राने सांगितले की, जंगली बिबट्या आणि ऊसाच्या शेतातील बिबट्या यांच्यात आकारमानाने बदल असतो.
जंगली बिबटे आकाराने लहान व अधिक चपळ असतात. जंगलातील शिकार गवसण्यासाठी त्यांची ठेवण तशी असते. तर ऊसाच्या शेतातील बिबट्या आकाराने आणि वजनाने मोठा असतो. त्यामुळे कमी श्रमाने मिळणाऱ्या शिकारीकडे तो आकृष्ट होताना दिसतो.
बिबट्या हा प्राणी मुळातच परिस्थितीशी जुळवून घेणारा (Adoptable Big Cat) आहे. सिंह, वाघ ह्या प्राण्यांना विशिष्ठ अधिवासात राहायला आवडते. आणि तो अधिवास नसेल तर त्यांच्या संख्येत घट होताना दिसते. बिबट्याच्या शिकारीमध्ये अगदी छोटे पाल, घोरपड, उंदीर, घूस, सर्प या प्राण्यांपासून ते भेकर, हरीण या सारख्या प्राण्यांपर्यंत १०० च्या वर शिकारीचा आकडा असेल. त्यामुळे त्याला खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. माणसाची शिकार तो खाण्यासाठी न करता बहुतांश वेळेस घाबरून किंवा बचावासाठी करतो. नरभक्षक वाघ जेवढ्या प्रमाणात आढळतात, तेवढा नरभक्षक बिबट्या मात्र क्वचितच आढळतो.
गेल्या १० वर्षात ,नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा मानवी वस्तीवर खूप वेळेस हल्ला झाला आहे. दिवसेंदिवस तो वाढतच आहे. १० ते १२ हल्ले प्रतिवर्ष हे सध्याचे अधिकृत प्रमाण आहे. त्यात वाढ सुरूच आहे. आजकाल नाशिक शहरात पण बिबट्याचा संचार होताना दिसत आहे.
