हिरवी माळराने
पाणथळ जागा जशा महत्वाच्या आहेत, तश्याच माळरान जागा किंवा गवतीमाळ या जागा पण जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. किंबहूना जमिनीवर पाणथळ जागा आणि डोंगराळ भागांपेक्षा माळरान जागा जास्त मोठ्या आहेत. आणि त्यामुळे त्यांचा वापर वन्यजीव आणि माणसे दोघेही आपल्या उदरनिर्वाहासाठी करतात. माळरान जागांची मी दोन प्रकारात विभागणी करतो. एक म्हणजे हिरवी माळराने आणि दुसरी म्हणजे सुकी माळराने. आज आपण हिरव्या माळरानांविषयी बघू या….
हिरवी माळराने ही पाणथळ जागांच्या जवळ असतात. त्यामुळे तेथील गवत सुकत नाही. नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रालगत अशी अनेक ठिकाणे आहेत. गंगापूर धरणालगत, नांदूरमध्यमेश्वर धरणालगत, वाघाड धरणालगत, गिरणा धरणालगतच्या पठारी प्रदेशात अशी हिरवी माळराने बरीच प्रसिद्ध आहेत.
माळरान परिसंस्था किंवा Grassland Ecosystem अंतर्गत विविध प्रकारचे गवत हे उत्पादकचे कार्य करतात, तर गवत खाणारे छोटे किडे, प्राणी हे प्रथम भक्षक असतात. किडे, नाकतोडा, उंदीर, ससा हे प्रथम भक्षक आहेत. द्वितीय भक्षक, प्रथम भक्षकांना खातात. बेडूक, सरडे हे किडे खातात. तर सर्प, पक्षी हे बेडूक, उंदीर, ससा यांचा आहार करतात. जंगली श्वापदे, गरुडासारखे शिकारी पक्षी, मनुष्य हे त्रितीय भक्षकाची भूमिका निभावतात. अशा प्रकारे अन्न साखळी पूर्ण होते.
मी स्वतः गंगापूर धरणाच्या बॅकवाटर्सला जैवविविधतेच्या अभ्यासासाठी अनेक वेळेस जातो. माळ टिटवी या पक्ष्याचे प्रजनन काळात फेब्रुवारी/मार्च महिन्यात घरट्यांचे परीक्षण केले होते. माळ टिटवी हा प्रामुख्याने माळरानावर राहणारा पक्षी आहे. ह्याचे घरटे कोरड्या जमिनीवर, छोट्याश्या खळग्यात असते. पिल्लांना जन्म झाल्यावर इतर पशु, पक्षी, मानवापासून खूप धोका असतो. म्हणूनच त्यांचा रंग जमीन आणि गवताशी मिळता जुळता असतो.
घार, सर्प, कुत्री यापासून त्यांना धोका सर्वाधिक असतो. अशी मी एकेकाळी १६ घरटी शोधली. त्यात जवळपास ४० अंडी होती, पण प्रत्यक्षात १५च पिल्ले आकाशात उडाली. बाकीची एकतर शत्रूपक्षाने खाल्ली असावीत किंवा फुटली असावीत. माळ टिटवी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी खूप क्लृप्त्या करते. कुठल्याही संभाव्य धोक्याची कल्पना “टी टी ट्यू इट” असे ओरडून ती देत असते. तिचा आवाज उंच आणि भेदक असतो. त्यामुळे इतर पशु-पक्ष्यांनाही सावधानतेचा इशारा मिळतो.
सर्प जवळ आल्यास त्याला हुसकावून लावण्यासाठी एकत्रितपणे त्याच्याशी सामना करतात. कुत्री, मांजर कुळातील प्राणी जेव्हा, घरट्याच्या किंवा पिल्लांच्या जवळ येतात, तेव्हा त्यांचे लक्ष्य विचलित करून माळ टिटवी स्वतःचा पंख वाकडा करून जखमी झाल्याची नक्कल करते. सोप्या शिकारीच्या लालचेने प्राण्यांना दूर घेऊन जाते. अश्या प्रकारची क्लृप्ती बहुदा फक्त माळ टिटवी या पक्ष्यांच्यातच आढळते.
विविध प्रकारचे किडे, नाकतोडे, चतुर, पतंग, फुलपा खरे, बीटल (उडणारे किडे), मुंग्यांची वारुळे, विवीध प्रकारचे सरडे, सापसुरळी, धामण, नाग, घोणस यासारखे मोठे सर्प, तसेच माळ रानावर गुजराण करणारे विविध पक्षी, प्राणी यांचा वावर हे माळ रानाचे वैशिष्ट्य आहे.
टिटवी, धोबी, धावीक, कोंबडी, मोर, गप्पीदास, तित्तर, लावरी, वटवट्या, मैना, सातभाई, चिमण्या, कालशीर्ष भारीट, युवराज यासारखे आणि अनेक पक्षी आपणास माळरानावर सहजतेने दिसतात. गवत वाढल्यानंतर त्यावर धान्यांच्या ओंब्या लागतात. हुरड्याचा पण हाच मोसम असतो.
ठिपक्यांची मुनिया, लाल मुनिया, काळ्या डोक्याची मुनिया, गवत वटवट्या यासारख्या छोट्या छोट्या पक्ष्यांसाठी ही मोठी खैरात असते. फेब्रुवारी, मार्च दरम्यान गव्हाच्या ओंब्या मोठ्या होतात, यांच्यावर करकोच्यांची थव्याने झडप पडते. हिरव्या माळरान, शेतरान ही पाणथळ जागांच्या आजूबाजूस असल्याने करकोच्यासाठी ही ठिकाणे अतिशय पसंदीची ठरतात.
हजारो मैलांवरून स्थलांतर करून येणाऱ्या या कॉमन क्रेन ( करकोचे),डेमोझोल क्रेन चे थवे बघण्यासाठी पर्यटक, पक्षीनिरीक्षक यांना सुवर्ण संधी मिळते. गंगापूर, वाघाड, नांदूरमध्यमेश्वरच्या लगतची माळराने ही ह्या पक्ष्यांसाठी आकर्षणे ठरतात.