आपण नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध नांदूरमध्यमेश्वर येथील समृद्ध पाणथळ जागेची माहिती घेतली. हा बंधारा उथळ जागेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच येथे जैविक वैविध्य आपणास अधिक प्रमाणात आढळते. आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिले की, नाशिक जिल्ह्यात मोठी धरणे, मध्यम तशीच लहान धरणे आहेत. काही छोटे तलावही आहेत. आता आपण मध्यम धरणांच्या जैवविविधतेबद्दल माहिती घेऊ या. आळंदी, वाघाड, कश्यपी या सारखी मध्यम आकाराची धरणे पण गेल्या काही वर्षात जैवविविधतेची ग्रीन स्पॉट्स बनत आहेत.
आळंदी धरण नाशिकच्या उत्तर पश्चिमेस २० किमी अंतरावर आळंदी नदीवर आहे. याच्या आजूबाजूस खूप शेतीवाडी आहे. समोरच भोरगड डोंगर आहे. हे धरण चक्रवाक, थापट्या, वारकरी, गढवाल, हळदी कुंकू या बदकांचे आवडते ठिकाण आहे. तसेच मोठा बगळा, वंचक, गाय बगळा, राखी बगळा हे बगळे पण आपणास हमखास दिसतात. काही वर्षापर्यंत फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी पण हे पसंतीचे ठिकाण होते. बराचसा भाग उथळ असल्यामुळे आणि काही ठिकाणी बेटं तयार झाल्यामुळे येथे पक्ष्यांची खूप आवक-जावक हिवाळ्यात होताना दिसते.
तुतवार, चिलखा, मालगोजा आणि इतर काठावरील पक्षी पण आपणास बारकाईने दिसतात. माळरानावरील अनेक पक्षी येथे कमी अधिक प्रमाणात दिसतात. एकेवर्षी Common Cuckoo ह्या पक्ष्याच्या मादीचे, Rufous Morph म्हणजेच लालसर रंगात दर्शन झाले. थोडा अधिक अभ्यास केल्यावर हे लक्षात आले की, जवळच असलेल्या भोरगड डोंगरावरील जंगलामुळे येथे पक्षी वैविध्य अजून जास्त आहे.
वाघाड धरण हे नाशिकच्या उत्तरेस पेठ रोडवर आहे. रामशेज आणि भोरगड किल्लांच्या रांगेतून आपण जेव्हा पलीकडे जातो, तेव्हा खुरटी माळराने दिसायला सुरुवात होते आणि अर्ध वाळवंटाची सुरुवात होते. याच भागात हे धरण आहे, कळवण नदीवर आहे. आजूबाजूस गव्हाची शेती, कांदा पिकवला जातो. जेव्हा गव्हाला ओंब्या लागतात तेव्हा हे ठिकाण करकोच्यांसाठी आकर्षण बनते. कॉमन क्रेन, डेमोझोल क्रेन या सारखे करकोचे येथे ठाण मांडून बसतात. त्याचप्रमाणे इतर पाणथळ पक्षी पण तुरळक प्रमाणात येथे दिसतात.
पक्षी निरीक्षकांचे अजून एक आवडते ठिकाण नाशिकच्या पश्चिमेस असलेल्या आणि गंगापूर धरणाच्या मागे स्थित असलेले कश्यपी धरण आहे. कश्यपी नदीवरील हे धरण गंगापूर धरणाचे एक्स्टेंशन म्हणता येईल. कॉमन पोचार्ड म्हणजेच छोटी लालसरी या पक्ष्यांचे हे आवडते ठिकाण आहे. ही बदके प्रामुख्याने शांत वातावरणात, मनुष्याचा उपद्रव कमी असलेली ठिकाणे निवडतात. व स्वच्छ पाण्याची निवड करतात. या धरणाच्या कडेकडेने रस्ता वाघेरे या गावाला जातो. त्यामुळे बराच काळ आपण धरणाच्या बॅकवॉटरचे निरीक्षण करू शकतो.
नाशिकच्या जवळचे आणि नांदूरमध्यमेश्वरच्या नंतरचे सर्वात जास्त पक्षी वैविध्य आपणास गंगापूर धरणाच्या बॅकवाटर्सला दिसते. पूर्वीपासून हा भाग शांत आणि निरीक्षणासाठी चांगला होता. गंगापूर धरणाचे अथांग पाणी आणि येथे येणाऱ्या रोहित पक्ष्यांच्या झुंडी बघायला खूप मजा यायची. परंतु आता बोट क्लब, बाजूस असणाऱ्या वायनरीज यामुळे या भागात पर्यटकांची संख्या वाढत जात आहे आणि काही प्रमाणात उपद्रव सुरू झाला आहे. तरी येथे चालू होणाऱ्या Sea Plane ला मात्र स्थगिती मिळवण्यात पक्षी निरीक्षकांना यश आले आहे.
गंगापूर धरण स्वातंत्र्यानंतरचे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. गोदावरीचे समृद्ध पाणी, पाठीमागे अंजनेरी, त्र्यंबकेश्वर परिसर आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या धरणामुळे अनेक फायदे मानवाला तसेच निसर्ग वाढीला झाले आहेत. धरणाच्या आजूबाजूस गाळ पेऱ्याची जमीन आहे, येथे गहू, भाजीपाला, तांदूळ, नाचणी यासारखी शेती केली जाते. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी हे तर एक महत्वाचे विश्रांतीसाठीचे ठिकाण आहे.
गुजरातमधील कच्छ परिसरातून येणाऱ्या या पक्ष्याला पुढे मुंबईतील शिवडीच्या खाडीत जायचे असते. हा पक्षी इतर पक्ष्यांसारखा मोठा प्रवास करत नाही. या प्रवासात नाशिक जिल्ह्यातील पाणथळ जागा ह्या खूप महत्वाच्या आहेत. यापैकी गंगापूर धरण ही एक महत्वाची जागा आहे. सर्व प्रकारची बदके येथे विहार करताना दिसतात. पाणी अथांग असल्याने जेव्हा ती किनाऱ्याजवळ येतात तेव्हा निरीक्षणासाठी योग्य दिसतात.
गेल्या आठवड्यात BNHS च्या निरीक्षकांनी शाही चक्रवाक या बदकांचीही येथे नोंद केली, जो ह्या शतकात प्रथमच या भागात दिसला. हा पक्षी युरोप मधून स्थलांतरित होताना दिसतो. याशिवाय बूटेड ईगल, पेरीग्रीन फालकन, युरेशियन मार्श हॅरीअर, स्पॅरोहॉक, क्रेस्टेड सरपंट ईगल, ग्रेटर स्पॉटेड ईगल या सारख्या शिकारी पक्ष्यांची पण येथे वारंवार नोंद होत असते. त्याचप्रमाणे फॅन थ्रोटेड लिझ्झर्ड या अत्यंत सुरेख दिसणाऱ्या सरड्याचे येथे ब्रीडिंग होताना दिसते. पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने गोदावरीचे खोरे विस्तीर्ण आहे, यामुळे मोठ्या प्रमाणावर हिरव्या माळरानतील पक्षी येथे दिसतात.
माळरान टिटवी, लालगालाची टिटवी, धोबी पक्ष्यांचे सर्व प्रकार, तित्तर पक्ष्यांचे सर्व प्रकार, स्वर्गीय नर्तक, सुर्य पक्ष्यांचे सर्व प्रकार आणि इतर अनेक जातींच्या माळरान पक्षी येथे आढळतात. नाशिक मधून जर आपण पाहिले असेल की सकाळी किंवा संध्याकाळी पाणकावळ्यांची रांग उडत जाताना व येताना दिसते. हे सर्व पाणकावळे गंगापूर धरणात दररोज मासे शिकारीसाठी जातात. कमीतकमी ५ ते ७ हजार पाणकावळे येथे येतात. अजूनही गंगापूर धरणावर लिहिता येईल. याच परिसरातून बिबट्यांची पण वाटचाल नाशिक शहराकडे होताना दिसते.
अंजनेरी जवळ असणाऱ्या खंबाळे गावाच्या सान्निध्यात तळे आणि दिंडोरी रस्त्यावरील रणथळे हे दोन्ही तलाव छोट्या छोट्या पाणपक्ष्यासाठीची आवडती ठिकाणे आहेत. दुर्दैवाने मानवी उपद्रवामुळे आता या परिसरात फारसे पक्षी दिसत नाहीत. तलाव छोटे असल्याने पक्षी निरीक्षकांना छायाचित्रणासाठी हे तलाव महत्वाचे आहेत. असो, स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण केल्यास परत हे गतवैभव आपण आणू शकतो. येथे मी नाशिक जिल्ह्यातील पाणथळ जैव विविधतेबद्दल थांबतो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!