नांदूरमध्यमेश्वर (महाराष्ट्राचे भरतपूर)
नांदूरमध्यमेश्वर येथील बंधाऱ्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याने येथे स्थानिक पक्ष्यांच्या कित्येक पिढ्या तसेच स्थलांतरीत पक्ष्यांचा येथे राबता तयार झाला आहे. या सर्वामुळे येथे पक्षीवैविध्य आणि संख्येत सतत वाढ होत आहे. येथे सर्वसाधारणपणे २०ते ४० हजार पाणपक्ष्यांची गणना झाली आहे.
यंदा २ फेब्रुवारी रोजी रामसर संघटनेच्या स्थापनेला तब्बल ५० वर्ष पूर्ण झाली. या पन्नास वर्षात जगात २३०० हून अधिक तर भारतात केवळ ४३ पाणथळ जागा या रामसर जागा म्हणून संरक्षित घोषित झाल्या आहेत. गेल्या पन्नास वर्षात पृथ्वीवर अनेक पर्यावरणीय संकटे आली. तापमान वाढ, दुष्काळ,ओला दुष्काळ, जंगलांना लागलेल्या मोठ्या आगी, वादळे, अति बर्फवृष्टी आणि अनेक. पाणथळ जागा असण्याने यातील बऱ्याचश्या जलीय आपत्तींना आपण सामावू शकतो. नांदूरमध्यमेश्वरचे महत्वही फार मोठे आहे. ते आपण जाणून घ्यायला हवे.
पाऊस जेव्हा सर्व दूर यथा योग्य पडतो, तेव्हा येथील पक्षी संख्या रोडावलेली दिसते. तसेच जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा मात्र येथील पक्षी संख्या वाढलेली दिसते. येथे आत्तापर्यंत २६५ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झालेली आढळते. यातील कमीतकमी ९० % पक्षी दरवर्षी हजेरी लावताना दिसतात. आता विविध ठिकाणचे पक्षी निरीक्षक, अभ्यासक येथे येऊ लागल्याने एखाद दोन नवीन पक्ष्यांची भर पडताना दिसते. माझ्या मते आता विशिष्ठ जातींच्या पक्ष्यांची वारंवार निरीक्षणे केल्यास अजूनही बरेचसे पक्षी वैविध्य आपणास मिळू शकेल.
ढोबळ मानाने १०० प्रकारचे पाणपक्षी (wetland birds), ८० ते ९० प्रकारचे माळरान पक्षी (Grassland birds) आणि ६० ते ६५ प्रकारचे जंगलातील व शिकारी पक्षी (Forest birds,Predetory birds) अशी वर्गवारी होऊ शकते. यातील बहुसंख्य पक्ष्यांची, आपण माहिती घेऊया.
सर्वात जास्त संख्येने आणि जास्त प्रकारचे पक्षी ऍनाटीडी (Anatidae) या फॅमिली मध्ये आढळतात. यामध्ये बदके (Ducks) व मोठी बदके (Geese) यांचा समावेश होतो. शाम कादंब, पट्ट कादंब, चक्रवाक, शाही चक्रवाक, तलवार बदक, नकटा बदक, थापट्या, भिवई बदक, हळदीकुंकू, अडई, गढवाल, चक्रांग, छोटी लालसरी, नयनसरी, मोठी लालसरी, शेंडी बदक, तरंग, छोटे मराल बदक, कापशी बदक असे अनेक पक्षी यामध्ये दिसतात. याचबरोबर छोट्या जलपक्ष्यांमध्ये टिबुकली, वारकरी, कमलपक्षी, काळी व जांभळी पाणकोंबडी यांचा समावेश आहे.
जे पक्षी काठावर उभे राहून छोट्या जलचरांची शिकार करतात त्यांना Wader म्हणतात. यामध्ये शेकाट्या, कला व पांढरा शराटी, तुतवार पक्ष्यांच्या जाती, टिवला, टिटवी, चिलखा, आरली, मालगोजा, सुरय, पाणशिटी, फटाकडी, पाणलावा या सारखे पक्षी आपणास दिसतात. काही पक्षी पाण्यात सूर मारून माशांची शिकार करताना शरीराच्या आकर्षक हालचाली करताना दिसतात. छोटा खंड्या, पांढऱ्या छातीचा खंड्या, बंड्या, पाणकावळे, सर्प पक्षी (Darter) हे पक्षी पाण्यात सूर मारून शिकार पकडतात.
पाण्यात उभे राहून जलचर पक्ष्यांची शिकार करणारे पक्षी आकाराने मोठे असतात. बगळा, बलाक यासारखे पक्षी पाण्यात उभे राहून शिकार करतात. यामध्ये चित्रबलाक, मुग्धबलाक, चमचा, सर्व प्रकारचे पांढरे बगळे, जांभळा बगळा, करडा बगळा हे पक्षी असंख्य दिसतात. चित्रबलाक पक्ष्याने गेले २ वर्षांपासून येथे वस्ती केल्याचे आढळले आहे.
पर्यटकांना नांदूरमध्यमेश्वरचे खरे आकर्षण मात्र उंच पक्ष्यांच्या हजेरीमुळे होते. ग्रेटर फ्लेमिंगो, लेसर फ्लेमिंगो, म्हणजेच रोहित पक्ष्याच्या आगमनाने पाण्याचा तलाव खुलून येतो. त्यातच सैबेरिया प्रांतातून येणाऱ्या करकोच्यांची भर पडते आणि आसमंत आवाजाने आणि या पक्ष्यांच्या उड्डाणाने भरून जातो व सुखावह ठरतो.
कॉमन क्रेन, डेमोझोल क्रेन हे पक्षी तसेच फ्लेमिंगो पक्षी शाकाहार करतात. क्रेन आजूबाजूच्या गहू, ज्वारी, डाळींच्या शेतावर येऊन धान्य खातात. दुपारनंतर पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी जातात. फ्लेमिंगो पक्षी मात्र खोलवर पाण्यात उभे राहून algae म्हणजेच शेवाळे खातात आणि पाणी स्वच्छ करतात.
एवढे पाणपक्षी जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा शिकारी पक्ष्यांच्या पण घिरट्या येथे चालू होतात. यामध्ये सर्वात जास्त आघाडीवर दलदल ससाणा (Eurasian Marsh Harrier) असतो. छोट्या पाणपक्ष्यांची, बदकांची शिकार हे त्यांचे आवडते खाद्य आहे. आजकाल मछली घार (Osprey) या शिकारी पक्ष्याने लोकांचे लक्ष्य वेधले आहे. हा पक्षी हवेतून खाली येत, पाण्यातील मोठ्या माशाला पकडतो व तीरावर किंवा फांदीवर बसून शिकार खातो.
नांदूरमध्यमेश्वरला पाणथळ जागेच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात शेती आहे. गहू, हरभरा या सारख्या पिकांनी जसे करकोच्यांसारखे पक्षी आकर्षले जातात. त्याचप्रमाणे हिरव्या माळरानातील असंख्य पक्षी आपणास दिसतात. गप्पीदास, राखी डोक्याचा वटवट्या, शर वटवट्या, मुनियांचे प्रकार, मैनाचे प्रकार, वेडा राघू, पाकोळ्यांचे प्रकार, धोबींचे प्रकार, मोर, तित्तर, लावरी, कोतवाल, चास आणि अनेक प्रकारच्या माळरान पक्ष्यांची येथे रेलचेल बघावयास मिळते. त्याचप्रमाणे घार, कापशी घार, ठिपक्यांचा गरुड, सर्प गरुड, माळरान ससाणे, बहिरी ससाणा, गिधाडे या सारख्या शिकारी पक्ष्यांचे पण हे आवडते ठिकाण आहे.
ऊस तसेच द्राक्षाची शेतीही येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. मुंगूस, कोल्हे, रानमांजर, उदमांजर, बिबट्यांचा येथे वावर मोठ्या प्रमाणावर आहे. आजूबाजूच्या वाड्यांवर बरेचदा बिबट्यांची साद ऐकायला मिळते. अशा या जैवविविधतेने समृद्ध नांदूरमध्यमेश्वरच्या बंधाऱ्याला कै. डॉ. सालीम अलींनी १९८५ साली भेट दिऊन या भागास ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ असे संबोधले. शासनाकडे दाद मागून नांदूरमध्यमेश्वरला अभयारण्याचा दर्जा मिळवून दिला. आणि आता रामसरमुळे जगाच्या पाठीवर नांदूरमध्यमेश्वर गेले आहे.