(दर बुधवारी ‘निसर्ग भेट’ हे सदर प्रसिद्ध होते. मात्र, नजरचुकीने ‘ऑर्डर ऑर्डर; हे सदर प्रसिद्ध झाले. त्यामुळे आज हे सदर प्रसिद्ध करीत आहोत. यापुढे असे होणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ – टीम इंडिया दर्पण)
महाराष्ट्राचे पहिले रामसर (नांदूरमध्यमेश्वर)
जैवविविधतेच्या दृष्टीने जितकी पाणथळ जागा उथळ असते तितके, छोट्या-मोठ्या जिवांसाठी अधिवासाचे स्थान असते. उथळ पाण्यामुळे, सूर्यप्रकाश पाण्याच्या तळाशी पोहोचतो. सूक्ष्म जीव, जलचर, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, मोठे प्राणी आणि अगदी मानव सुद्धा अशा पाणथळ जागेवर अवलंबून असतो. अशाच एका नाशिकच्या सुप्रसिद्ध आणि महाराष्ट्रातील पहिल्या रामसर स्थळ असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पाणथळ जागेविषयी आपण माहिती घेऊ या.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पाण-बंधारा हा प्रकल्प इंग्रज राजवटीत १९१३ साली बांधण्यात आला. त्यामुळे आता जवळपास १०८ वर्षांनी येथील पाणलोट क्षेत्र हे पाणथळ जागेतील पक्षी व त्यावर अवलंबून असलेल्या इतर पशु-पक्ष्यांसाठी एक नंदनवन तसेच महत्वाचा अधिवास म्हणून तयार झाले आहे. मागील वर्षी या पक्षीतीर्थाने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रामसर जागांच्या यादीत नाव मिळविले. महाराष्ट्रातील पहिले वहिले रामसर होण्याचा मान त्यामुळे मिळविला.
२ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणच्या रामसर या शहरात एक आंतरराष्ट्रीय ठराव संमत झाला,त्यास रामसर ठराव असे संबोधले जाते. हा ठराव जगातील असलेल्या पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी तयार केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन शासनाच्या मदतीने व वेळप्रसंगी आंतरराष्ट्रीय रामसर संघटनेच्या साहाय्याने पाणथळ जागेचा उचित वापर (Wise use) करावा हा उद्देश आहे. आजकालच्या जागतिक तापमान वाढीचा प्रकोप कमी होण्यासाठी व निसर्गाची हानी करण्यासाठीचा असलेला हा खटाटोप असो.
नांदूरमध्यमेश्वर हा बंधारा, कादवा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावरती स्थित आहे. साधारणपणे ८ ते ९ गावे या बंधाऱ्याच्या सान्निध्यात आहेत. याच्या अलिकडे असलेल्या सायखेडा गाव हे त्यातल्या त्यात मोठे गाव म्हणता येईल. त्याअगोदर दारणा आणि गोदावरी संगम हा पण पाण्याचा मोठा स्रोत आहे. येथील जीवसृष्टीचा मी गेले १२ वर्ष सातत्याने अभ्यास करत आहे. या तिन्ही नद्यांच्या पाण्याची क्षारता भिन्न आहे. या बंधाऱ्याचा उपयोग पुढील क्षेत्रास कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी पुरवठा म्हणून होतो. यामुळे येथे वर्षभरात बऱ्याच वेळेस पाण्याची आवक-जावक होत असते. यामुळे व उथळ पाणक्षेत्रामुळे येथे मोठ्या प्रमाणावर जल वनस्पती, दलदल, पाण्याचे साठे निर्माण झाले आहेत. त्यामुळेच येथे जैवविविधता जोमाने वाढीस लागली आहे.
शतकी वाटचालीनंतर नांदूरमध्यमेश्वरला एक समृद्ध जल परिसंस्था निर्माण झाली. जैविक आणि अजैविक घटकातील परस्पर संबंधाला परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात. ही परिसंस्था कशी कार्यरत असते ते आपण बघू या. अजैविक घटकांमध्ये रासायनिक व भौतिक घटकांचा समावेश होतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या वायूंचा प्रवेश वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरात होतो. त्यांच्या शरीर वाढीसाठी हे वायू आवश्यक आहेत. या वायूंच्या मुबलकतेमुळे आणि उपलब्ध सूर्यप्रकाशामुळे येथे वनस्पती, सूक्ष्मजीव, प्राणी, पक्षी यांची संख्या वाढीस लागली. यालाच जैविक साखळी म्हणतात.
जलवनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात व इतर जिवांना पुरवतात. अशा वनस्पतींना उत्पादक म्हणतात. प्राणी स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत, त्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत. म्हणून त्यांना भक्षक म्हणतात. भक्षणासाठी भक्षक दुसऱ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे अन्नसाखळी तयार होते. प्रथम भक्षक वनस्पतींवर अवलंबून असतो तर द्वितीय भक्षक, प्रथम भक्षकांचे भक्षण करतो, तृतीय भक्षक हे द्वितीय भक्षकांचे भक्षण करतो.
बरेचसे कीटक हे प्रथम भक्षक असतात, तर बेडूक, मासे इ. द्वितीय भक्षक असतात. सर्प, पक्षी हे तृतीय भक्षक असतात. जेव्हा वनस्पती, प्राणी मृत होतात, तेव्हा सूक्ष्मजीव त्याने या शरीराचे विघटन करून त्यांच्या शरीरातील अडकलेल्या अजैविक घटकांना पुन्हा निसर्गात सोडतात. खोलवर अभ्यास केल्याने असे लक्षात आले की, नांदूरमध्यमेश्वरला ही अन्न साखळी अविरत कार्य करीत असल्याने त्यात मानवाचा उपद्रव नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पक्षी यायला लागले आणि हे एक मोठे पक्षी अभयारण्य म्हणून नावारूपास आले. या ठिकाणी आतापर्यंत २६५ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. या बद्दलची माहिती आपण पुढील लेखात घेणार आहोत.