भौगोलिक स्थिती आणि अधिवास
गेल्या लेखात आपण नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक महत्व पाहिले. हवामान आणि डोंगर-रांगा या बद्दल माहिती घेतली. पण खऱ्या अर्थाने जैवविविधतेची ओळख त्या परिसरात असलेल्या जलसंपत्ती, जंगले, माळराने, खडकाळ तसेच सपाट पठारे, पाणथळ जागा, सुपिक जमिनी यामुळे होत असते. आज आपण या पैलूवर प्रकाश टाकणार आहोत.
नाशिक जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार मिलीमीटरच्या दरम्यान आहे, तर मागच्यावर्षी १६०० मिमी पर्जन्यवृष्टी झाली. पश्चिमेच्या सह्याद्री आणि त्या पलीकडे जवळच असलेल्या अरबी समुद्रामुळे नाशिक जिल्ह्यात मॉन्सूनचे वारे जोरदार वाहतात आणि चांगली पर्जन्यवृष्टी पाहायला मिळते.
गोदावरी, दारणा, कादवा, नंदिनी या नद्यांनी नाशिक जिल्ह्याचा दक्षिण-मध्य भाग व्यापलेला आहे तर उत्तरेला गिरणा, मौसम, पार या प्रमुख नद्या आहेत. एकूण धरणांची संख्या २९ आहे. त्यातील २१ धरणे ही मध्यम ते मोठ्या स्वरूपाची म्हणता येतील. एवढी अफाट जलसंपदा नाशिक जिल्ह्याला नैसर्गिक आणि मानवाच्या प्रयत्नाने लाभली आहे. स्वातंत्र्यानंतरचे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून गंगापूर धरणाची ओळख आहे. दारणा धरण हे इंग्रज राजवटीत बांधलेले मोठे धरण आहे.
धरणांच्या बॅकवॉटरला किंवा पाणलोट क्षेत्रात, पाणथळ जागांची निर्मिती होत असते. पाणथळ जागा निर्माण होणे किंवा करण्याने जैवविविधता वाढीस लागते. जमीन आणि उथळ पाणी या दोन्ही गोष्टी सूक्ष्मजीव, सूक्ष्म वनस्पती यांच्या वाढीस पोषक ठरतात. उथळ पाण्यामुळे सूर्यप्रकाश पाण्यातील असलेल्या वनस्पतींच्या मुळापर्यंत पोहोचतो व माफक प्रमाणात ऊर्जा मिळते. ज्याची गरज जैविक वाढीस उपयुक्त ठरते. जगातील सूप्रसिद्ध अमेझॉन नदीचे खोरे हे पाणथळ जैविकता तसेच घनदाट जंगलांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. कोणे एकेकाळी दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्याला गोदावरी नदी आणि तिच्या खोऱ्यामुळे हे महत्व प्राप्त झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अशा या पाणथळ जागा असणे, जैविविधतेच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे आपण पाहिले. आणि नाशिक जिल्ह्यामधील असलेल्या धरणांमुळे खूपशा पाणथळ जागांची निर्मिती झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतु मानवाच्या उपद्रवामुळे किंवा अतिवापरामुळे या पाणथळ जागा धोक्यात येतात आणि जैवविविधतेचा ऱ्हास सुरू होतो. नेमके याच गोष्टीकडे आपले दुर्लक्ष्य होते आणि वारंवार जनजागृती आंदोलने करावी लागतात, असो. पाणथळ जागांच्या संदर्भात आपण पुढील लेखामध्ये अधिक माहिती घेणारच आहोत.
नाशिक जिल्ह्याची पश्चिम बाजू ही डोंगराळ व कोकणसदृश्य तर पूर्व आणि दक्षिणेला दख्खनचे पठार आणि उत्तरेकडे अर्धवळवंटाची सुरवात असल्याने तिन्ही ठिकाणची जैविक सामग्री आपणास अनुभवायला मिळते. पश्चिमेस डोंगरी जंगले, पूर्व आणि दक्षिणेस पाणथळ जागा आणि उत्तरेस हिरवी माळराने, खुरटी माळराने पसरलेली आहेत. पाणथळ जागांप्रमाणेच माळराने ही देखील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठिकाणे आहेत व ती जपणे महत्वाचे आहे.
नाशिकच्या उत्तरपूर्वेला ओझरचे माळरान एकेकाळी माळढोक या पक्ष्यांच्या अधिवासाने प्रसिद्ध होते. २०व्या शतकाच्या प्रारंभी येथे १० ते १५ माळढोक नांदत असल्याच्या नोंदी आहेत. पण दुर्दैवाने मानवाच्या अतिक्रमणामुळे हा अधिवास इतिहास जमा झाला. सिन्नर, येवला आणि थोडाफार निफाड तालुक्यातील माळराने अजून शिल्लक आहेत. त्या बद्दल जागरूकता दाखवून विकास होणे गरजेचे आहे.
पश्चिम नाशिक जिल्हा हा भरपूर पाऊस पडणारा, डोंगर कड्यांनी भरलेला व डोंगरी जंगलांनी युक्त आहे. त्र्यंबकेश्वर तालुका, वाघेरे, हरसूल, सुरगाणा, पे ठ या भागात चांगली जंगलसंपदा उपलब्ध आहे. या भागाला लागूनच गुजरात प्रांतातील डांगचा परिसर लागतो. या भागात सह्याद्रीची उंची त्यामानाने कमी आहे. काही ठिकाणी २००० ते ३००० फूट समुद्रसपाटीपासून उंची आहे.
नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक महत्व व त्यानुसार उपलब्ध होणाऱ्या जैविक अधिवासांची माहिती आपण पहिल्या दोन लेखांमध्ये घेतली. आता आपण या अधिवासांची विस्तृत माहिती आणि येथे असणाऱ्या वनस्पती, कीटक, पशु, पक्षी आणि इतर गोष्टींची माहिती आपण पुढील काही लेखांमध्ये बघणार आहोत.