नजर लागावं असंच
मित्रांनो, आपण ह्या क्रमशः लेखामध्ये नाशिक जिल्ह्याच्या जैवविविधतेबद्दल माहिती घेणार आहोत. खरंतर संपूर्ण महाराष्ट्रावर सह्याद्री पर्वत रांगेमुळे हवामानात बदल होताना दिसतात. परंतु आपला नाशिक जिल्हा जरा वैशिष्टपूर्ण म्हणावा लागेल. नजर लागावी असेच हे जैववैविध्य आहे.
नाशिक जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगेतील महत्वाचा प्रदेश आहे. जिओलॉजिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या आधारे, हवामानदृष्ट्या हा प्रदेश तीन प्रकारच्या हवामानाने प्रभावित होतो. पश्चिमेकडून कोकणचे हवामान तर पूर्व-दक्षिणेकडून दख्खनचे हवामान आणि उत्तरेकडून अर्धवाळवंटी हवामान. त्यामुळे हवामानात सततच तापमान आणि आर्द्रतेत बदल होत असतो. या गोष्टीमुळे हा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपासून वेगळा आहे. तापमानाच्या चढ-उतारा मध्ये, उत्तरेकडील इतर जिल्ह्यांप्रमाणे, उन्हाळ्यात उच्चतम तापमान ४५ डिग्री तर हिवाळ्यात उत्तर प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे न्यूनतम तापमानात ५ डिग्री पर्यंत खाली उतरते. तसेच आर्द्रतेमध्ये सुद्धा उन्हाळ्यात २० RH पासून पावसाळ्यात कोकणासारखे ९५ RH पर्यंत बदल होत असतो. या हवामानामुळे नाशिक जिल्ह्यात जैवविविधता अधिक जास्त प्रमाणात आहे असे म्हणावे लागेल.
केवळ हवामान नाही तर भौगोलोकदृष्ट्याही नाशिक जिल्हा विविधतेने नटलेला आहे. पश्चिमेला इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा यासारखे सह्याद्री पर्वतरांगेला चिकटलेले तालुके तर उत्तरेकडे दिमाखाने उभी असलेली सातमाळा रांग. इगतपुरीला महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो, तर उत्तरेकडे सातमाळा रांगे पलिकडील बागलाण तालुका, सिन्नर तालुका मात्र त्यामानाने दुष्काळी प्रदेश. महाराष्ट्रातील सर्वात उंचीची दोन शिखरे नाशिकमध्ये आहेत. कळसूबाईचे शिखर जरी नगर जिल्ह्यात येत असले तरी नाशिकच्या जवळ आहे आणि साल्हेरचा किल्ला हा बागलाण तालुक्यात येतो. गड, किल्ले, सुळके यामध्ये सुद्धा नाशिक जिल्हा आघाडीवर आहे यात शंकाच नाही. सह्याद्रीच्या चार प्रमुख रांगा नाशिक जिल्ह्यामधून जातात. अलंग-मदन-कुलंग रांग, त्र्यंबक रांग, सातमाळा रांग, सेलबारी-डोलबरी रांग. त्यामुळे सह्याद्रीची छत्रछाया नाशिक जिल्ह्यावर आहे. गिर्यारोहणातील प्रमुख किल्ले आणि डोंगर नाशिक जिल्ह्यात आहेत.
कुलंग, मदन, अलंग, कळसुबाई, त्र्यंबक, अंजनेरी, हरिहर, बसगड, उतवड, साल्हेर, मुल्हेर, मांगीतुंगी, हरगड, बोरगड, रामशेज, त्रिंगलवाडी शिवाय सुळक्यांमध्ये सुप्रसिद्ध बाण सुळका, हडबीची शेंडी, डांग्या सुळका आणि कित्येक डोंगरातील उभ्या बेसॉल्टच्या दगडी भिंती हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जसजसा सह्याद्री पर्वत दक्षिणेला जातो, तसतसा त्याची उंची समुद्र सपाटीपासून कमी होत जाते व बेसॉल्टचे प्रमाण घटत जाते. याशिवाय भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या महत्वाचे म्हणजे डोंगरांच्या खडकात असलेली डाईकची रचना. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ठ प्रकारे होणाऱ्या साठण्याने किंवा थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. सातमाळा रांगेतील असलेल्या धोडप किल्ल्याच्या बालेकिल्लायवर, पिंडीचा आकार तयार झालेला दिसतो. त्याला लागून झालेल्या डाईकच्या रचनेमुळे एक नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. अशा प्रकारच्या खाचा, नेढी (दगडी भिंतीतीतील आरपार भोक), घळी नाशिकच्या आजूबाजूने आपणास दिसतात.
नाशिकच्या अशा विविधरंगी निसर्गाने नटलेल्या भूभागाची आपण थोडक्यात ओळख करून घेतली. यासारख्या आणि याहूनही असलेल्या वैविध्यामुळे, नाशिक जिल्हा हा जैविक विविधतेने पण खूप समृद्ध आहे हे मला पटायला लागले. किंबहुना या ठिकाणी अतिप्राचीन असलेल्या दंडकारण्यामुळे सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र येथे काही काळासाठी राहिले असावेत. पुढील भागात आपण जलसंपदा,जमीन,आणि पिके ई. विषयी जाणून घेऊया.
कृपया आपणास लेख कसा वाटला? काही सूचना असतील तर त्या द्याव्यात, ही विनंती.