हेरगिरीची पाळंमुळं!
‘एचएएल’मधील गोपनीय माहिती थेट पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेला देण्याचे धाडस काही ऐकाएकी घडलेले नाही. यापूर्वी नाशिकमध्येच सापडलेला बिलाल हा दहशतवादी थेट लष्कर ए तोयबाशी संबंधित होता. काही दिवसांपूर्वीच देवळाली लष्करी छावणीतील फोटो थेट पाकिस्तानात पाठविणाराही जेरबंद झाला आणि आता शिरसाठ. हेरगिरीची ही पाळंमुळं नाशकात खोलवर रुजल्याचा मोठा संशय आहे.
भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमेवर सध्या मोठा तणाव आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी सीमेवरही धूसफूस सुरू आहे. म्हणजे, देशाच्या उत्तरेतील सीमांवर हे सारे घडत असताना नाशिकसारख्या शहरात हेरगिरीचा प्रकार बिनबोभाट सुरु असणे हे काही अचानक घडलेले नाही. ही बाब देश हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असली तरी प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तहेर संघटनांच्या डुलकीचाच हा परिणाम म्हणावा लागेल.
हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या ओझर येथील कारखान्यात लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते. हीच विमाने भारतीय हवाई दलाला सूपूर्द केली जातात. याच विमानांद्वारे देशाच्या हवाई सीमांचे रक्षण होते. आजवर एचएएलच्या कारखान्यात मिग आणि सुखोई या रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांची निर्मिती झाली आहे. आता तर स्वदेशी बनावटीच्या सुखोई ३० एमकेआय या विमानाची निर्मिती होत आहे. याच कारखान्यात दीपक शिरसाठ नावाचा एक कर्मचारी थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स) याच्या संपर्कात होता आणि सुखोई या लढाऊ विमानाशी संबंधित अतिशय गोपनीय माहिती तो आयएसआयला पुरवित असल्याचे उघड झाले आहे. ही बाब देशहिताच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. तसेच गंभीर सुद्धा. यापूर्वीही नाशिकचा आणि हेरगिरीचा संबंध राहिला आहे. तो आधी लक्षात घेणे आवश्यक आहे.
बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०१० मध्ये एक धक्कादायक बाब उजेडात आली होती. ती म्हणजे, लष्कर ए तोयबाशी संबंधित लालबाबा फरीद उर्फ बिलाल आणि हिमायत बेग या दोन हेरांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडे महाराष्ट्र पोलिस अकादमीचे काही फोटो होते. तसेच, त्यांच्या नाशिकमधील घरी स्फोटके सापडली होती. या स्फोटकांवर लष्कर ए तोयबाची नावे होती. म्हणजेच, पोलिस अकादमीची रेकी करुन त्यांना ही अकादमीच उडवून द्यायची होती, असा संशय होता. या साऱ्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. चौकशी होऊन प्रकरण न्यायालयात गेले. अद्यापही हा खटला सुरु आहे. म्हणजेच, १० वर्षांनंतरही देशाच्या हेरगिरीचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेतच असल्याचे दिसून येते. अर्थात या न्यायालयात निकाल लागला तरी वरच्या आणि त्यानंतर त्याच्याही वरच्या न्यायालयात जाण्याचा पर्याय कायद्याने दिला आहेच. म्हणजेच, दहशतवादी त्याची हयातच न्यायालयीन प्रक्रियेत घालवू शकतो, अशी ही व्यवस्था असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. अर्थात त्यात गैर काहीच नाही. असो.
गेल्याच आठवड्यात देवळाली कॅम्प परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कामगाराने लष्करी छावणी परिसरातील काही फोटो काढले आणि ते व्हॉटसअॅपद्वारे थेट पाकिस्तानला पाठविल्याची बाब उघड झाली. त्याला अटक करुन त्याची सध्या चौकशी सुरु आहे. पाण्याच्या टाकीचे काम करणारा हा परप्रांतीय २१ वर्षांचा कामगार आहे. त्याच्या मोबाईल मध्ये सेल्फी आणि अन्य काही फोटो आढळून आले. गंभीर हे की त्याने ते पाकिस्तानमधील कुणाला तरी पाठविले. पोलिस तपास सध्या सुरू असून या कामगाराने भारतात जिथे जिथे काम केले तिथे तिथे पथके पाठवून त्याचा तपास केला जात आहे. त्याचा इतिहास जाणूनच त्याची कार्यशैली आणि अन्य बाबी उजेडात येणार आहेत. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. चौकशीअंती अन्य काही बाबी लवकरच उघड होतील.
आणि आता एचएएलमधील हेरगिरीचा प्रकार समोर आला आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. कारण, एचएएलसारख्या संरक्षण सामग्री उत्पादन करणाऱ्या कारखान्यात चक्क एक कर्मचारीच आयएसआयचा हस्तक बनतो ही बाब सुरक्षा यंत्रणांसाठी आणि एचएएलसाठीही धोकादायकच म्हणायला हवी. दीपक शिरसाठ हा इंजिनिअर नाही. तो प्रशासकीय कार्यालयात काम करतो. त्याचा थेट आयएसआयशी संपर्क असणे, त्यांना संवेदनशील माहिती पुरविणे या बाबी वाटत्या तेवढ्या सोप्या नक्कीच नाहीत. शिरसाठ हा केवळ एकटा असूच शकत नाही, अशी शंका अनेकांना आहे. कारण, ज्या कारखान्यात स्मार्ट फोन नेण्यास परवानगी नाही तेथे शिरसाठ बिनबोभाट कसा काय मोबाईल वापरत होता ? कारखान्यात त्याचे काही साथीदार आहेत का ? त्याला कोण कोण मदत करत होते? त्याच्या या कृत्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत कुणाकुणाची आहे ? तो नक्की आयएसआयशी कधी पासून संपर्कात होता ? हे यथावकाश बाहेर येईलच. दहशतवाद विरोधी पथक या साऱ्याचा छडा चौकशीतून लावेलच. पण, या साऱ्या प्रक्रियेला काहीसा वेळ लागेल.
असा प्रकार घडलाच कसा? एचएएलच्या सुरक्षा यंत्रणांना याचा सुगावा कसा लागला नाही? वरिष्ठांना हा प्रकार माहित होता की नाही? केवळ एक नाही तर ३ मोबाईल हँडसेट, ५ सिमकार्ड आणि २ मेमरी कार्ड त्याच्याकडून हस्तगत झाले आहेत. याचा अर्थ नक्की काय? मोबाईल बिनबोभाट वापरणे, तो ज्या विभागात जाऊ शकत नाही किंवा कार्यरत नाही तेथील माहिती त्याने संकलित करणे आणि ती थेट आयएसआयला देणे ही वाटते तेवढी सोपी आणि सहज बाब नक्कीच नाही. त्याला अंतर्गत कुणाची ना कुणाची मदत असण्याची दाट शक्यता आहे. एटीएसच्या चौकशीत या बाबी स्पष्ट होणार आहेतच, पण मुद्दा हा आहे की सुरक्षा यंत्रणा आणि भारतीय गुप्तचर संघटनांपासून ही बाब दूर कशी राहिली? त्यांना कसे कळले नाही? की जेव्हा कळाले तेव्हा काही उशीरच झाला होता? ही सारी प्रश्नांची मालिका थेट देशहिताशी संबंधित आहे.
हलगर्जीपणामुळेच हेरगिरीचे प्रकार घडत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे. एचएएलमध्ये सध्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्राचे सुखोईवर आरोहणही केले जाते आहे. देशाच्या सुरक्षेला बलाढ्य बनविण्यात हे क्षेपणास्त्र आणि हे लढाऊ विमान अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे. त्याचवेळी ही घटना घडली आहे. एचएएलच्या परिसरातच हवाई दलाचे केंद्र आहे. तेथे सुखोई आणि मिग या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. त्याच्याच लगत संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेचे (डीआरडीओ) केंद्र आहे. काही किलोमीटर अंतरावर कम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग (कॅट) आहे. या संस्थेत लष्करात दाखल झालेल्यांना हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण दिले जाते. त्यालाच लागून तोफखाना आहे. याच ठिकाणी तोफखान्याचे प्रशिक्षण दिले जाते. तेथेच हवाई दलाचेही केंद्र आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या चलनी नोटांचा छापखाना आणि अनेक मुद्रित सामग्री बनविणारा कारखानाही नाशिकरोड परिसरात आहे. देशाच्या विकास आणि हित असलेल्या महत्त्वपूर्ण बाबी जेथे कार्यरत आहेत तेथे अशा प्रकारची हेरगिरी होणे हे काही चांगले लक्षण नाही. नाशिक पोलिस, राज्य गुप्तहेर संघटना, देशाच्या गुप्तहेर संघटना, त्या त्या संस्थांची सुरक्षा यंत्रणा या साऱ्यांना भेदून हे सारे प्रकार घडत असणे ही बाब थेट देशाची सुरक्षा व्यवस्था भेदणारीच आहे.
शिरसाठ हा हनीट्रॅपचा शिकार आहे की अन्य काही कारणे त्यात आहेत, हे सारे लवकरच स्पष्ट होणार आहे. पण, नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात घडणाऱ्या या घटना देशाच्या संरक्षण हिताच्या दृष्टीने अतिशय गंभीर आणि चिंतानजक आहेत, असेच म्हणावे लागेल. नाशिक पोलिसांनाही यापुढील काळात अधिक सतर्क रहावे लागणार आहे. आपल्याच क्षेत्रात असलेला एखादा व्यक्ती थेट देशाच्या शत्रूशीच मिळालेला असू शकतो, या दृष्टीने आता डोळ्यात तेल घालून वावरावे लागेल. तसेच, राज्य आणि देशाच्या गुप्तहेर संघटनांनाही. आजवर नाशिक हे शांत आणि आल्हाददायक हवामानासाठी ख्यात असलेले शहर आता दहशतवादी व्यक्ती किंवा हेरगिरीच्या प्रकाराने देशाच्या संरक्षण नकाशावर येणे ही काही चांगली बाब नाही.
शिरसाठ याने कुठली आणि किती माहिती आयएसआयला पोहचवली आहे, कधीपासून दिली आहे या साऱ्यावरच हेरगिरीची पाळंमुळं अवलंबून आहेत. ती खोदून काढणे आणि यापुढील काळात असे प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेणे हे एक मोठे आव्हान आहे. पाकिस्तानला हे माहित आहे की आपण थेट युद्धात भारताला हरवू शकत नाही. म्हणूनच छुप्या पद्धतीने आणि हेरगिरीच्या रुपाने तो भारताला शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय नागरिक आणि त्यातही महाराष्ट्रीयन व्यक्तीने हेरगिरीत सामील होणे ही बाब तशी दुर्देवी आहे. पण, जे वास्तव आहे ते नाकारता येणार नाही.
भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर संघटनांसाठी सध्याचा काळ हा कसोटी पाहणारा आहे. कारण, केवळ पाकिस्तानच नाही तर ज्या देशावर जगातील अनेक देश विश्वास ठेवत नाहीत असा चीनही भारतविरोधात सक्रीय झाला आहे. पाकिस्तानच्या किती आणि कशा मर्यादा आहेत याबाबत जगभरात चर्चा झडते. पण, चीन हॅकिंग करण्यापासून तर अनेक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक आघाड्यांवर अग्रेसर आहे. या साऱ्याच प्रकारांचा तो आयुध म्हणून चपखल वापर करण्यात माहिर आहे. म्हणूनच हेरगिरीच्या या प्रकाराकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिथे हवाई, लष्करी आणि नौदल कार्यरत नाही अशा भागात सुरक्षा यंत्रणांना आपले नाक, कान आणि डोळे अधिक सजग ठेवण्याची वेळ आली आहे. तसे झाले नाही तर मोठा घातपात होणे आणि देशाच्या सुरक्षेलाच भगदाड पडल्याचे दिसून येईल. त्यासाठी नागरिकांसह सर्वांनीच सतर्क होण्याची वेळ आली आहे.