दूर झाली मरगळ, झळाळली बाजारपेठ
अर्थव्यवस्थेला कोरोनाने लावलेली नजर विविध सण-उत्सवांमुळे हळूहळू दूर होत आहे. नव्या उत्साहाने पुनर्निर्माण करण्याची जिद्द दिसून येत आहे. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. उद्योग, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिकसह विविध क्षेत्राने पुन्हा पकडलेला गिअर सारी मरगळ झटकल्याचेच द्योतक आहे. दिवाळीने तर या उत्साहाला चार चाँद लागणार आहेत.
कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी सरकारने लावलेले निर्बंध शाळेचा अपवाद सोडता आता जवळपास उठले आहेत. त्यामुळे आता पुन्हा व्यवहार पूर्ववत सुरु झाले आहेत. गेल्या काही महिन्यात या महामारीमुळे सर्वच ठप्प झाले होते. ते पुन्हा केव्हा सुरळीत होईल याचा अंदाजही येत नव्हता. या काळात अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले तर अनेकांचा रोजगार गेला. हातावर पोट भरणाऱ्यांसाठी तर हा सर्वात कठीण काळ ठरला. त्यामुळे हे संकट तूर्त तरी काही प्रमाणात दूर झाले असले तरी पूर्णपणे टळले नाही. त्यामुळे यापुढील काळात सावधानता बाळगणेही तितकेच गरजेचे आहे.
या सर्व संकट काळात कोणाचे किती नुकसान झाले. किती रोजगार गेला. याचे सर्व आकडे आता हळूहळू बाहेर येतीलच. त्याचवेळी त्याची दाहकता लक्षात येईल. पण, संकटावर मात करुन पुढे जाणे हेच आपल्या हातात आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असतांनाच फेस्टीव्हल सिझन सुरु झाल्यामुळे व्यापार, उद्योगांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहे.
गेल्या काही दिवसात सरकार व औद्योगिक कंपन्यांनी जाहीर केलेल्या बोनसमुळेही दिलासा मिळाला आहे. कंपन्या बंद असल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. तर काही कंपन्यांनी या काळात आपल्या कामगारांना आधार दिला. त्यात बोनसही जाहीर केला. त्यामुळे तो कामगारांना आधार ठरला आहे. पण, रोजगार गेलेल्या सर्वच कामगारांना अद्याप रोजगार मिळालेला नाही. सात दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे या काळात बाजारपेठ अधिक फुललेल्या दिसणार आहेत. त्या सिझन संपल्यानंतरही तशाच सुरु राहतील, असा अंदाज आहे.
या काळात आपले नुकसान भरुन निघावे यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. अनेक कंपन्यांनी व व्यावसायिकांनी स्किम जाहीर करत सवलती देणे सुरु केले आहे. तर काहींनी या काळात नुकसान भरुन काढण्यासाठी आपले दरही वाढवले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना या काळात डबल मार बसला आहे. त्यामुळे त्यांनी घर विकावे म्हणून सवलतींचा मारा सुरु केला आहे. त्यामुळे या व्यवसायाला बूस्ट मिळत आहे. तर वाहन उद्योग कोरोना नंतरच्या काळात तेजीत आला आहे. त्यात चारचाकी वाहनांची मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसात तर या वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली आहे. म्हणूनच अनेक कारला दीर्घ प्रतिक्षा ग्राहकांना करावी लागत आहे. पर्यटन व्यवसायाला तर या काळात सर्वाधिक फटका बसला आहे. पण, घरात घरात कंटाळलेली माणसे आता पर्यटनाला जावू लागली आहेत. त्यामुळे काही दिवसात या व्यवसाय तेजी येणार आहे. या प्रमुख व्यवसायाबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायाला गती मिळेल, हे निश्चित.
जिल्ह्यात व्यापार व उद्योगाबरोबरच शेतीचे गणितही तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पिकणा-या कांद्याला चांगला भाव मिळत होता. पण, केंद्र सरकारने लावलेल्या विविध निर्बंधामुळे ते कोसळायला सुरुवात झाली. तरी सुद्धा या संकट काळात मिळणारे पैसे त्यांना दिलासा देणारेच ठरले आहे. या सर्व काळात पावासाने सर्वांना दिलासा दिला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला ही निश्चितच आनंद देणारी गोष्ट ठरली आहे.
रेल्वे सेवा, विमान सेवा, बस या सार्वजनिक सेवा सेवा सुरु झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. शाळा व धार्मिक स्थळे अजूनही बंद आहे. त्यामुळे ते जेव्हा सुरु होतील. त्यावेळेस त्यातूनही दिलासा मिळणार आहे. सरकारने नुकतीच सिनेमागृह, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिली. तशीच ती काही काळानंतर शाळा व धार्मिक स्थळांना मिळेल.
कोरोना काळात झालेल्या नुकसानीचा आकडा अंदाजे २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५ लाख कोटींच्या आसपास होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात तर एकट्या मुंबईचे व्यवहार ठप्प असल्यामुळे रोज ५०० कोटीचे रोज नुकसान झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे एकूण बंद दिवसाची संख्या काढल्यास हाच आकडा मोठा ठरणार आहे. सरकारला या सर्व नुकसानीतून बाहरे पडणे इतके सोपे नाही. त्यामुळे विकासकामांना काही काळ ब्रेक लागले. पण, ती हळूहळू सुरु होईल.
व्यापार, व्यवसाय, रोजगार यापेक्षाही या संकट काळात माणसांमध्ये वाढलेला दूरावा होता. पण, आता तो कमी झाला ही आनंददायी गोष्ट आहे. कोणत्याही संकट काळात शेजारी धावून जात होता. पण, या काळात भीती पोटी त्यांनी राखलेले अंतर सर्वांनाच वेदनादायी ठरले. आता हा दूरावा संपला तसा कोरोनाही संपेल ही आशा करु या…