खडसे अन् उत्तर महाराष्ट्र
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपकडून सहाजिकच काही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. पण, खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. त्याची झलक नजिकच्या काळात दिसणार आहे.
खडसे हे भाजपचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का तर बसला आहेच. पण, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्यही त्यामुळे खचले आहे. उत्तर महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात खान्देशचे राजकारण वेगळे आहे. खान्देशमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबारचा समावेश आहे. तर नाशिक जिल्हा हा स्वतंत्र आहे. नगरमध्ये पक्षापेक्षा व्यक्तीनिहाय राजकारणाला महत्त्व आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यात खडसे यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला काय फायदा होईल, हे महत्त्वाचे आहे. खडसे यांचा सर्वात जास्त दबदबा हा जळगावमध्ये आहे. त्यामुळे येथील राजकारणात त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. एकेकाळी येथे काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. पण, खडसे यांनी हे वर्चस्व मोडून काढले. त्यामुळे राष्ट्रवादीची या जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली होती. पण, आता खडसे यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. त्यात धुळे व नंदुरबार मध्ये राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. नाशिक व नगरमध्ये राष्ट्रवादीची स्थिती बरी आहे. येथे खडसेंमुळे त्यात भर पडणार आहे.
खडसे अभ्यासू असून ते फर्डे वक्ते आहेत. त्यांचे बोलणे सुद्धा बेधडक आहे. कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या सर्व गोष्टींचा फायदा उत्तर महाराष्ट्रात निश्चितच राष्ट्रवादीला होईल. खडसे यांच्या नेतृत्वाखालीच उत्तर महाराष्ट्रात २०१४ ची निवडणूक लढवली गेली. त्यावेळेस भाजपला सर्वाधिक यश या भागातून मिळाले होते. त्यात खडसे यांचा वाटा निश्चित मोठा होता. विरोधी पक्ष नेते व मंत्रिपदावर असतांना त्यांनी अनेक कामे या भागात केली. त्यामुळे त्याचा उपयोगही आता होणार आहे.
भाजपची राज्यात सत्ता असतांना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे खच्चीकरण झाले. तीच चाल आता राष्ट्रवादीने सुरु केली आहे. त्यात पहिला प्रवेश खडसे यांचा झाला आहे. आता यापुढे असे अनेक प्रयोग नजिकच्या काळात राष्ट्रवादी करेल व आपले उट्टे काढेल. पण, राष्ट्रवादीला हे मोठे नेते आपल्या पक्षात घेऊन पक्ष चालवणे वाटते तितके सोपे नाही. खडसे महत्वाकांक्षी नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांना त्यांची खडसेशाही सुद्धा सहन करावी लागणार आहे.
खडसे यांनी अनेक चुका केल्या आहेत. त्यांनी दोन वेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्षपद नाकारले. त्यामुळे त्यांची पुढील संधी गेली. पहिल्या वेळेस त्यांनी हे पद नाकारले त्यावेळेस नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर ते केंद्राच्या राजकाराणात व मंत्री सुद्धा झाले. दुस-यांदा जेव्हा नाकारले तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले व पुढे ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांचा अभ्यासूपणा, ज्येष्ठपणा त्यांना आडवा आला. येथून त्यांचे खच्चीकरण भाजपने केले. पण, थांबतील यातले खडसे नाहीत. त्यांनी हे सहन केले असले तरी ते त्याचा बदला जरुर घेतील, असे त्यांना ओळखणारे नेहमी चर्चेत सांगतात. त्यामुळे त्यांनी सत्ता पक्षात जाणे पसंत केले. केंद्र सरकारचा वापर करुन आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सुनेला तूर्त भाजपमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे खडसे कोणाचा सूड आता कशा पध्दतीने घेतील, हे सुध्दा पुढे दिसेल. यात पहिले उत्तर महाराष्ट्राचे काही नेते असतील हे नक्की.
खडसे यांच्या जाण्याने भाजपला जसे नुकसान झाले. तसा फायदा सुद्धा होणार आहे. खडसे यांच्या ज्येष्ठपणामुळे त्यांच्या आरोपाला थेट उत्तर भाजपच्या नेत्यांना देता येत नव्हते. त्यात शिस्तप्रिय असलेल्या भाजपला त्यांचे बोलणेही मुकाट्याने सहन करावे लागत होते. आता तसे होणार नाही. भाजपही खडसेंच्या आरोपाला सडेतोड उत्तर देईल. पण, खडसेंचे प्रत्त्युतरही त्यांना सहन करावे लागेल. उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांना आता नेतृत्व करण्याची संधी मिळेल. ते आता भाजपचे ज्येष्ठ नेते असतील.
खडसेंच्या जाण्याने जसा भाजपला फटका बसणार आहे. तसा तो शिवसेनेलाही असणार आहे. त्यांच्या मतदारसंघात तर शिवसेनेचे आमदार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे खडसे यांचा प्रवेश त्यांच्यासाठी सुद्धा डोकेदुखी आहे. खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जसा सुप्त वाद आहे. तसा तो शिवसेनेचे नेते सुरेश जैन, गुलाबराव पाटील यांच्याबरोबर उघड आहे. त्यामुळे हा वाद बाजूला ठेऊन त्यांना भाजपवर नेम धरावा लागणार आहे. त्यात शिवसेनेचा बाण अंगावर येऊ नये, याची काळजी सुद्धा त्यांना घ्यावी लागेल
एकूणच खडसे यांच्या जाण्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलेल. त्यामुळे त्याचा काय फायदा झाला किंवा नुकसान यासाठी आता तरी पुढील निवडणुकीची वाट पहावी लागेल. तूर्त तरी खडसे अजून काय शाब्दिक हल्ले करतात व भाजप त्याला कसे परतवून लावते, हेच बघणे आपल्या हातात आहे.