पोलिसांच्या वसुलीचा ‘प्रताप’
जोतीबा फार लिहून झालं.. फार बोलून झालं……
पण, आमच्या पोटाचा पीळं कोणी सोडला नाही…..
राबणारा राबत गेला….. कमरेला माती लागेपर्यंत……
आणा दाबला गेला मातीत…. उभा आडवा डोळ्यादेखत…..
त्याची कुणाला खंत नाही……
ही प्रकाश होळकर यांची शेतक-यांचे दु:ख सांगणारी कविता तशी बोलकी आहे. पण, शेतक-यांच्या या दु:खावर थोडीशी फुंकर घालून ते हलके करण्याचे काम नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी केले आहे. अवघ्या एक महिन्यात शेतक-यांची फसवणूक करणा-या व्यापा-यांकडून २ कोटी ७४ लाख वसूल करण्याचा ‘प्रताप’ त्यांनी नावाप्रमाणे केला आहे.
शेतक-यांची फसवणूक फक्त व्यापारीच करतो असे नाही. त्यांची ठिकठिकाणी फसवणूक होत असते. कधी निसर्ग फसवतो, तर कधी राजकारणी त्याला मोठ मोठी आश्वासने देऊन फसवतो. अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करत तो संकटे झेलतो. चांगले पीक आले तर भाव नाही व भाव असले तर पीक नाही. अशी विचित्र स्थिती त्याच्या वाट्याला नेहमी येत असते. या शेतक-यांचा विचार कधीच गांभीर्याने आजपर्यंत केला गेला नाही. पण, शेतक-यांच्याच पोटी जन्माला आलेल्या डॉ. प्रताप दिघावकर यांनी आपला पदभार घेताच शेतक-यांची फसवणूक करणा-यांचा विषय रडारवर घेतला. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात उत्तर महाराष्ट्रामध्ये तब्बल ५ हजार शेतक-यांची फसणूक झाल्याची बाब पुढे आली. त्याची दखल घेऊन त्यांनी या फसवणा-या व्यापा-यांकडून कायदेशीर वसुली सुरु केली. त्यातून २ कोटी ७४ लाख रुपये शेतक-यांना मिळाले. तर ३ कोटी ६५ लाख रुपये मिळण्याची हमी मिळाली आहे. अजूनही शेतक-यांचे पैसे बाकी आहेत. पण, दिघावकर आता थांबणार नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या आशा बळावल्या आहेत.
खरं तर पोलिसांची वसुली ही वेगळ्या अर्थाने चर्चिली जाते. पण, डॉ. दिघावकर यांनी कायद्याच्या चौकटीत ही वसुली सुरू करुन फसवणूक करणा-या व्यापा-यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील शेतक-यांच्या फसवणुकीचे तब्बल ५९३ गुन्हे त्यामुळे समोर आले. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ५५९ प्रकरणात शेतकरी फसला गेल्याचे उघड झाले. नाशिकमध्ये द्राक्षे, कांदा, भाजीपाला यासह इतर पिकेही मोठ्या प्रमाणात पिकवली जातात. त्यामुळे देशभरातील व्यापा-यांचे लक्ष नाशिकवर असते. त्यातून अनेक परप्रांतीय व्यापारी शेतक-यांना गंडा घालतात. तर काही आपलेच व्यापारी गुंगा देतात. कष्टाने उगवलेल्या पिकांचे जर मोल मिळणार नसेल तर शेतक-यांची काय अवस्था असेल, ही कल्पना करणे सुध्दा मनाला वेदना देते. पण, ही वेदना डॉ. दिघावकर यांनी हेरली व त्यासाठी विशेष मोहिमच उघडली. त्यातून ९१ व्यापा-यांवर गुन्हे दाखल केले. या मोहिमेसाठी १० विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात यातून वसुली तर होईलच पण, शेतक-यांची फसवणूक करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.
हे सर्व शक्य झाले ते डॉ. दिघावकर यांच्या मुळेच. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांनी शेतक-यांची व्यथा जवळून बघितली आहे. शेतात ते राबले आहेत. त्यामुळे त्यांनी पदभार स्विकारताच हे पाऊल उचलले. बागलाण तालुक्याचे ते भूमिपुत्र असल्यामुळे त्यांच्याकडे शेतक-यांनी या व्यथा मांडल्या व त्यानंतर त्यांनी मोहिम सुरु केली. खरं तर हे सर्वच पोलिस अधिका-यांना अगोदर करता आले असते. पण, तसे झाले नाही. त्यामुळे डॉ. दिघावकरांना हा ‘प्रताप’ करावा लागला.
बागलाण तालुक्याने या भूमीपूत्राचा गौरव करण्यासाठी नागरी सत्काराचे आयोजन केले. या सोहळ्यात दिघावकर यांनी मोठी घोषणा केली. २५ कोटी रुपयांच्या निधीतून तालुक्यात ६०० भूमीगत बंधारे बांधण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ही एकप्रकारे आपल्या गावा आणि भूमीविषयीची कृतज्ञताच आहे. हा संकल्प खरा झाला तर बागलाण तालुक्यात जणू क्रांतीच घडणार आहे. लोकसहभागाद्वारे ते यशस्वी होऊ शकते. तसेच, याच समारंभात दिघावकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. अनेक शंकांचे निरसन केले. तेथील हा अनुभव लक्षात घेऊन जिथे जाहीर कार्यक्रम, सत्कार किंवा दौरा होत आहे तिथे ते आता शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. यानिमित्ताने आपले कुणीतरी ऐकून घेते आहे, हा विश्वासही शेतकऱ्यांमध्ये बळावला आहे. ही बाब आगामी काळात अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्रातील सर्व पोलिसांमध्येही वचक निर्माण होईल की एखादा शेतकरी आपली तक्रार तर दिघावकर यांच्याकडे करणार नाही. म्हणजेच, पोलिस हे आता शेतकऱ्यांचे मित्र होतील.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे पद तसे मोठे असले तरी ते प्रशासकीय आहे. या पदावर असणारे अधिकारी ग्राऊंडवर फारसे दिसत नाहीत. सामान्य माणसांचा थेट त्यांच्याशी संबधही येत नाही. त्यामुळे आतापर्यंत या पदावर आलेल्या कित्येक अधिका-यांची नावे सुद्धा सामान्यांना माहित नव्हते. पण, दिघावकर यांनी या पदाची प्रतिमाही बदलली. ते थेट ग्राऊंडवर उतरले. सामान्य माणसांना थेट आपला मोबाईल क्रमांकही दिला. त्यामुळे पोलिसांवरील विश्वासही वाढला. २२ व्या वर्षी पोलिस अधिक्षक आणि २००० साली आयपीएस झालेल्या दिघावकर यांची नाशिकची सुरुवातीच कारकिर्द लक्षवेधी ठरली आहे. ती शेतक-यांच्या स्मरणातही दीर्घकाळ राहणार आहे. सामान्यांच्या मनातही या वसुलीमुळे घर केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुध्दा त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे त्यांचे हे ‘प्रताप’ चर्चिले तर जातीलच. पण, सर्वच पोलिसांना दिशा देणारे सुध्दा ठरतील, यात तीळमात्र शंका नाही.
छानच????????????????????