पुन्हा साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलन नक्की कुठे होणार याबाबत सध्या खल सुरू आहे. नाशिक आणि नवी दिल्ली हे सध्या रेसमध्ये आहेत. कुणाला संधी मिळणार, याची मोठीच उत्कंठा आहे. नाशिकला दर १२ वर्षांनी कुंभमेळा होतो. पण, आता तब्बल १६ वर्षांनी साहित्य कुंभ भरण्याचा योग येण्याची चिन्हे आहेत…
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी साहित्य संमेलन होईल की नाही, किंवा झाले तर ते ऑनलाईन होईल की जाहीर स्वरुपात याबाबत साशंकता असतांना मात्र तो कोठे घ्यावा याबाबत चर्चा रंगली आहे. पण, या सर्व चर्चेचा निर्णय हा ३ जानेवारी रोजी साहित्य महामंडळाच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीत पहिले साहित्य संमेलन घ्यायचे की नाही, त्याचे स्वरुप कसे असावे यावर चर्चा होईल. तो घ्यायचे निश्चित झाल्यानंतर तो कोठे घ्यावा याबाबत निर्णय होणार आहे. पण, या अगोदरच दिल्लीत साहित्य संमेलन असावे यावर वाद व प्रतिवाद सुरु झाला आहे. त्यात माजी संमेलनाध्यक्षांनी थेट भूमिका घेऊन दिल्लीत घेण्यास काय हरकत आहे, असा मुद्दा पुढे केला आहे. त्यात लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. सदानंद मोरे, डॅा. विकास सबनीस यांचे नाव पुढे आहे.
दिल्लीत पाच लाख मराठी भाषिक आहेत. तरी त्यांना मराठीबद्दल आस्था आहे का अशी शंका महामंडळाच्या पदाधिका-यांकडून व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे अभिजात भाषेचा प्रश्न मार्गी लावणे, मराठीच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधणे, यासाठी दिल्लीत संमेलन आवश्यक असल्याचा मतप्रवाह आहे. दिल्लीत संमेलन झाल्यास त्याला अखिल भारतीय स्वरुप देता येईल, विविध भाषांमधील साहित्यिकांना समाविष्ट करता येईल, असे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांना वाटते. तर डॉ. सदानंद मोरे यांच्या मते, जानेवारी महिन्यात पानिपतच्या लढाईला २६० वर्षे पूर्ण होत आहे. या लढाईत मराठ्यांनी देशासाठी बलिदान केले या घटनेचे स्मरण दिल्लीत जाऊन करता येईल. तर डॉ. श्रीपाल सबनीस यांना वाटते की, दिल्ली ही केवळ राजधानी नसून राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र आहे. त्यामुळे दिल्लीत संमेलन घ्यावे. माजी संमेलनाध्यक्षांचे मुद्दे बरोबर असले तरी संमेलनासाठी प्रस्ताव पाठवणारे सरहद्द संस्थेचे संजय नहार यांनी हे संमेलन मार्च ऐवजी मे मध्ये घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिल्लीत संमेलन व्हावे असे माजी संमेलनाध्यक्षांना वाटत असले तरी मार्चची तारीख साहित्य महामंडळ पुढे ढकलेल असे वाटत नाही. यात बरेच तांत्रिक मुद्दे आहेत.
दिल्ली बरोबरच नाशिकचे नाव पुढे आहे. त्यात लोकहितवादी मंडळ व सार्वजनिक वाचनालयाचा प्रस्ताव आहे. गेल्या वर्षी सार्वजनिक वाचनालयाने जोरदार प्रयत्न केले. त्यावेळेस पुढील संमेलन नाशिकला मिळेल असे संकेत मिळाले होते. पण, आता नव्याने सेलू व अमळनेर येथील संस्था पुढे आल्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. नाशिकमध्ये याअगोदर १९४२ व २००५ संमेलन झाले होते. आता ते झाल्यास त्यात २०२१ ची भर पडणार आहे. पण, अगोदर झालेल्या संमेलनाची या संमेलनाला सर येईल का असा प्रश्न करोनाच्या संकटामुळे आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे संमेलन घेणे आयोजकांसाठी सुद्धा तारेवरची कसरत असणार आहे.
सावानाचे अजून संमेलन घेण्याबाबत तळ्यात मळ्यात आहे. पण, लोकहितवादी मंडळाने मात्र पूर्ण तयारी दाखवली आहे. विशेष म्हणजे सावानाचे कार्याध्यक्ष व लोकहितवादीचे अध्यक्ष हे जयप्रकाश जातेगावकर आहेत. त्यामुळे येथे वादाचा विषय फारसा नाही. केवळ संमेलन नाशिकला व्हावे हा प्रयत्न आहे. लोकहितवादी मंडळाची स्थापना १९५० साली कुसुमाग्रजांनी केली होती. या मंडळावर आता विश्वस्त म्हणून माजी आमदार हेमंत टकले, कार्याध्यक्ष मुकंद कुलकर्णी, सचिव म्हणून सुभाष पाटील आहेत. त्यामुळे या मंडळाला हे संमेलन मिळाल्यास त्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
नाशिकचा प्रवास तसा मंत्रभूमी तर तंत्रभूमीचा असा रोचक आहेच. पण, साहित्य परंपरा येथील तितकीच मोठी आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात हे संमेलन झाले तर नाशिककरांना साहित्यिक मेजवाणी मिळणार आहे. पण, त्यासाठी ३ जानेवारीची वाट बघावी लागणार आहे. त्यातही संमेलनाचे स्वरुप कसे असेल हे महत्त्वाचे असणार आहे. संमेलनाचे अर्थकारण, त्यातील रुसवे, फुगवे, वाद, चर्चा यावर मात करुन हे संमेलन करणे तसे धाडसाचे असते. पण, हे धाडस नाशिकने अगोदर दाखवले, आताही ते पुन्हा दाखवले आहे. महामंडळाने होकार दिल्यास साहित्यिकांची मांदियाळी नाशिकला दिसेल. ती तब्बल १६ वर्षांनी….