पॉवरफुल `पवार`!
राज्यातील अतिशय पॉवरफुल व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार. ८०व्या वर्षात त्यांचे पदार्पण होत असताना राज्याच्या आणि देशाच्या विविध क्षेत्रात त्यांची विशेष छाप दिसते. म्हणूनच त्यांना मानणाऱ्यांची संख्या देशपातळीवर मोठ्या प्रमाणात आहे.
राजकारणात बोटावर मोजण्या इतके नेते आहे की, त्यांचा विरोधी पक्षही आदर करतो. त्यातील शरद पवार हे एक आहेत. खरं तर प्रत्येक नेत्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. पण, शरद पवार या सर्वांपेक्षा वेगळे आहेत. सत्ताकारण व राजकारणात अंतर ठेवतात. कलेला राजाश्रय देतात व साहित्यिकांचा मान राखतात. दुसरीकडे निवडणुकीच्या रिंगणात प्रतिकूल परिस्थितीतही मैदान सोडत नाहीत. असे कितीतरी पैलू पवार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. त्यामुळेच त्यांचा ८० वर्षांचा तरुण योध्दा म्हणून अलिकडे उल्लेख व्हायला लागला. पवारांची पॉवर महाराष्ट्राला नवीन नाही. पण, देशाचे राजकारणही त्यांच्या अवती-भवती काही ना काही कारणाने फिरत असते. त्यामुळे त्यांच्या बातम्या आणि वक्तव्ये वर्तमानपत्रांचे मथळे ठरतात. तर न्यूज चॅनलमध्ये त्यांच्या विषयावरून चर्चा रंगत असते.
शरद पवारांचा उद्या ८० वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे अभीष्टचिंतन करताना त्यांच्या एकूण राजकीय कारकीर्दीचा आढावा घेणे तसे अवघड. पवारांचा पॉवर गेम अनेकांना थक्क करणारा असाच आहे. त्यांचे नाव कधी पंतप्रधान, तर कधी राष्ट्रपती म्हणून चर्चेत असते. आता तर यूपीएच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. खरं तर त्यांच्याकडे असलेल्या संख्याबळात अशा पदांसाठी चर्चा होणे हे सुद्धा कोडे आहे. ते सोडवणे अनेकांना सहज शक्य नाही. संख्याबळात पवार कमी असले तरीसुध्दा त्यांनी अनेकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा अशा मोठ्या पदांसाठी होते.
स्मरणशक्ती हे सुद्धा पवारांचे एक वेगळे वैशिष्टय आहे. अनेकांची नावे त्यांच्या कशी लक्षात राहतात हे अनेकांना अजूनही उमजले नाही. छोट्या कार्यकर्त्यांपासून मोठी माणसे त्यांच्या वर्षानुवर्षे स्मरणात असतात. त्यांची नावेही ते भराभर घेतात. त्यामुळे अनेकांना धक्काही बसतो. नाशिकला झालेल्या एका प्रकट मुलाखतीमध्ये जिल्ह्यातील दूरवर बसलेल्या अनेक नेत्यांची नावे त्यांनी भराभर घेतली. त्यानंतर अख्खे सभागृह अचंबित झाले. तसे त्यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहेच. ते या कार्यक्रमातही दिसले. स्मरणशक्ती बरोबरच पवारांनी घेतलेले धाडसी निर्णयसुध्दा त्यांची एक ओळख आहे. मराठावाडा विद्यापीठाचे नामांतर असो की, महिलांना राजकारणात आरक्षण असो अशा कितीतरी निर्णयामुळे त्यांची दूरदृष्टी दिसते.
या सर्व पैलूंचा फायदा पवारांना झाला तो २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत. ही निवडणूक प्रतिकूल परिस्थितीत लढली गेली. अनेक मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. तर काहींनी पळ काढला. अशा स्थितीत पवारांनी दिलेली झुंज व लढत सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. साता-याच्या पावसात घेतलेल्या सभेमुळे अनेकांना स्फुरण मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या निवडीत झालेले नाट्य, अजितदादांचे बंड अशा कितीतरी गोष्टी घडल्या. पण, पवारांनी मैदान सोडले नाही. त्यांनी दिलेला शब्द पाळला. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांना विराजमान केले. त्यानंतर आलेल्या संकटावरही त्यांनी सरकारला साथ दिली. त्यामुळेच पवारांचे राजकारण अनेकांना प्रेरणादायी वाटले. राजकीय मैदानावर त्यांच्यावर विरोधक टीका करत असले तरी खासगीत मात्र त्यांच्या कामाचे ते नेहमीच कौतुक करतात. त्यामुळेच पवार पॉवरफुल वाटतात. अशा नेत्याला दीर्घायुष्य मिळो, हीच सदिच्छा!