हवा नाविन्याचा ध्यास!
गेल्या आठवड्याचे हिरो कोण असे विचारले तर निःसंशय मी गीतांजली राव आणि रणजितसिंह डिसले यांची नावे घेता येतील. या दोघांचे कार्य अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि संपूर्ण जगालाच मार्गदर्शन करणारे आहे.
गीतांजली अमेरिकेतील कोलोरॅडोमधील डेन्व्हर या शहरातील भारतीय – अमेरिकन मुलगी. वय वर्ष १५. अमेरिकेतील ‘यंग सायंटिस्ट’ पुरस्कार, ‘फोर्ब्स’ मासिकाची टॉप ‘३० अंडर ३० ” (३० वर्षांखालील टॉप ३० तरुण /तरुणी) , सहा संशोधने नावावर, टाइम साप्ताहिकाने केलेल्या ‘किड ऑफ द इयर ‘साठी पाच हजार अमेरिकन मुलांमधून पहिली …हे सगळे या मुलीने वय वर्ष १५ व्य वर्षीच स्वतःच्या नावावर केले आहे. नंतरच्या आयुष्यात काय करील माहीत नाही. पण तेही असेच भव्यदिव्य असेल असे आताच वाटते आहे. ती सध्या विद्यार्थिनी आहे, तर भारतात सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडीमध्ये राहणारे रणजितसिंह डिसले हे शिक्षक. दोघांचाही ध्यास एकाच. काहीतरी नाविन्यपूर्ण करून शिक्षण सोपे सुलभ व सगळ्यांपर्यंत जाईल असे काम करायचे. गीतांजली आणि डिसले याना उपलब्ध असलेली साधने , सुविधा या मात्र जमीनअस्मानाचा फरक असलेल्या.
डिसले म्हणतात, ”परदेशात १८ ते २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे प्रमाण असते, तर भारतात हेच प्रमाण ५० ते ६० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे आहे. आर्थिक कारणामुळे आपल्याकडे परदेशाप्रमाणे १८ विद्यार्थ्यांमगे एक शिक्षक नियुक्त करणे कठीण आहे; परंतु अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे आपण सहज पूर्ण करू शकतो.” सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. त्याचे तोटे बरेच असले तरी त्याद्वारे साधारण ६० टक्के मुलांचे शिक्षण चालू आहे. बाकीचे एक अर्थाने शिक्षणबाह्य ठरले आहेत, असे म्हणत येईल. . अशावेळी उत्तम तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे केवळ स्मार्टफोन अथवा लॅपटॉप असे मला सुचवायचे नाही, तर डिसले यांनी ज्या पद्धतीने शिकवले अथवा गीतांजलीने जो मार्ग स्वीकारला तशा पद्धतीने शिक्षण हवे. त्यासाठी, ”शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. केवळ पाठ्यक्रम पूर्ण करण्यापुरतेच शिक्षकांचे काम नसावे, तर उद्दिष्टे पूर्ण करताना शिक्षकांना जे प्रयोग किंवा उपक्रम राबवायचे आहेत, त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे”, असेही मत डिसले व्यक्त करतात. हाच मुद्दा महत्वाचा आहे.
गीतांजली किंवा तिच्यासारख्या विद्यार्थी / विद्यार्थिनी प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळा विचार करू शकतात आणि हे फक्त अमेरिकेतच घडू शकते असे नाही. हा विचार कोणत्याही देशापुरता मर्यादेत नाही. हेच डिसले यांनी सिद्ध केले आहे. आज आपल्याला क्यू आर कोड ही किती साधी बाब वाटते! परंतु पाच वर्षांपूर्वी याच वापर करून ग्रामीण भागातल्या आणि सुपरफास्ट ब्रॉडबँड उपलब्ध नसणाऱ्या भागात विद्यार्थ्यांना शिकवायचे ही कल्पना त्यांनी मांडली आणि केवळ मांडली नाही तर ती अमलातही आणली. गीतांजली आणि डिसले या दोघांबद्दलही गेल्या चार दिवसात खूप काही छापून आले आहे. ते वाचून एकच लक्षात येते – शिक्षणातील वेगळा विचार, तंत्रज्ञानाची जोड आणि भविष्याचा विचार ! आपल्या शिक्षण व्यवस्थेला आज ज्याची गरज आहे त्याच या गोष्टी.
गीतांजलीच्या आई वडिलांनी तिचे प्रत्येक गोष्टीतले कुतूहल योग्य मार्गदर्शन करून शमविण्याचा प्रयत्न केला. तरीही वयाच्या दहाव्या वर्षी तिने ”मला कार्बोन नॅनोट्यूब तंत्रज्ञान शिकायला डेन्व्हर वॉटर क्वालिटी रिसर्च सेंटर ‘मध्ये जायचे आहे, असे सांगितले तेव्हा हेच पालक बुचकळ्यात आणि काळजीतही पडले होते. नंतर त्यांनी तिला प्रोत्साहन दिले हा भाग वेगळा. अशा प्रकारची विद्वत्ता किंवा हुशारी भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यात नाही असे मानणाऱ्यांपैकी मी नाही. प्रश्न आहे तो या विद्यार्थ्यांना तशा सुविधा उपलब्ध आहेत की नाही, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिकवायला व शिकायला शिक्षक व विद्यार्थ्यांची तयारी आहे का आणि असल्यास पालकांची त्यास संमती आहे का , हा प्रश्न सतत उभा राहतो. त्यावर काही अंशी तोडगा म्हणून भारतात काही राज्यांमध्ये विशेष शाळा, गुरुकुलसारखे प्रयोग झाले हे खरे आहे, परंतु त्यातून किती विद्यार्थी पुढे आले, कोणी देशाच्या / जगाच्या पातळीवर देदीप्यवान काम केले हे पुढे आले नाही.
याचा दोष मी विद्यार्थी व शिक्षक याना देणार नाही. विद्यादान हे शिक्षकांचे मुख्य काम आहे हे सरकारच विसरले आहे. त्यांना इतक्या शाळाबाह्य कामांमध्ये अडकवले आहे की काहीवेळा शाळेत फक्त विद्यार्थी येतात आणि शिक्षक सरकारने लादलेल्या कामांच्या मागे असतात. शिक्षकांना शाळेपुरते मर्यादित ठेवले तर शिक्षणाचा दर्जा आपोआप सुधारेल. आपल्याला फक्त शैक्षणिक काम करायचे आहे याची खात्री शिक्षकाना वाटली तरच ते विद्यार्थ्यांकडे पूर्ण लक्ष देऊ शकतील. आजही आपल्याकडे शालेय वयात वेगळा विचार करणारी मुले आहेत. सध्याची शिक्षण व्यवस्था त्यांचे कुतूहल जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करते का, हा प्रश्न आहे. इथेच डिसले यांचे महत्व जास्त वाटते. आपण ज्या शिक्षणयंत्रणेला दोष देतो, त्याच यंत्रणेत काम करून वेगळी कल्पना राबवून खूप चांगले काम करून दाखवले. ते काम सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर अवघ्या जगापर्यंत गेले. जे त्यांना जमले तेच इतरांना जमणार नाही, असे नाही, परंतु वेगळे काही करण्याची इच्छाशक्ती शिक्षकांमध्ये असली तरी यंत्रणेत आहे का हा विचार अनेक वेळा सतावतो.
गुगलसारख्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्याच्या कामकाजाच्या वेळेत शेवटचा एक तास वेगळ्या कारणासाठी वापरला जातो असे ऐकले होते. त्या एक तासात कर्मचाऱ्याने त्याला वाटेल ते काहीतरी नाविन्यपूर्ण काम करावे, नवीन अँप तयार करावे अथवा नवीन सॉफ्टवेअर तयार करावे अथवा कोणत्या तरी नवीन कल्पनेवर काम करावे असे अपेक्षित असते. अशा पद्धतीने काही नवे तयार झाल्यास ते काम त्या कर्मचाऱ्याकडून गूगल विकत घेते . यामुळे गूगल आणि तो कर्मचारी दोघांचाही फायदा होतो. अशीच पद्धत कदाचित इतर अनेक कंपन्यांमध्ये असेलही. तशीच पद्धत काही शाळांमध्ये सुरु करता येईल का ? विद्यार्थ्यांची जिज्ञासा, हुशारी मार्गी लागेल असे काही करता येईल का ?
सध्या शाळांमध्ये विज्ञान स्पर्धा होतात, विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगांची प्रदर्शने भरवली जातात. त्यात विशेष प्राविण्य असणाऱ्या मुलांकडे शाळा फार तर दहावी इयत्तेपर्यंत लक्ष देऊ शकते. पुढे काय ? आज दहावीनंतर प्रचलित वाट न चोखाळता नव्या वाटेवर चालणारे विद्यार्थी नाहीत असा दावा मी अजिबात करणार नाही, तरीही एकूण विद्यार्थ्यांपैकी हा टक्का खूप कमी आहे हे मान्य केले पाहिजे. तो कसा वाढवता येईल हे पाहिले पाहिजे. पुढच्या वर्षीपासून आपल्याकडे नवीन शैक्षणिक धोरण अमलात येत आहे. त्यातील बरीच तरतुदी स्वागतार्ह आहेत. त्यांची अंमलबजावणी नीट झाली की शिक्षणाचे चित्र बदलू शकेल .
भारतातही अनेक गीतांजली किंवा डिसले सर आहेत. प्रश्न आहे तो त्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि वेगळा शैक्षणिक विचार राबविण्याचा ! या दोघांच्याही यशापासून आपण हा धडा घेतला तरी पुरे आहे.