संवेदनशील मनाचा अर्धविराम!
Life on Earth (1979), The Living Planet (1984), The Trials of Life (1990), Life in the Freezer (1993), The Private Life of Plants (1995), The Life of Birds (1998), The Life of Mammals (2002–03), Life in the Undergrowth (2005), and Life in Cold Blood (2008). A Life on Our Planet (2020)….
ज्येष्ठ पर्यावरणवादी सर डेव्हिड अटेनबरो यांच्या या लाईफ मालिका खूप गाजल्या. आज वयाच्या ९४व्या वर्षीही अटेनबरो कार्यरत आहेत आणि लाखो लोकांपर्यंत त्यांचे काम जात आहे. गेल्या काही महिन्यात ते चर्चेत आले ते वेगळ्या कारणामुळे.
सर डेव्हिड अटेनबरो यांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार घेतला. तोही सध्या तरुण वर्गामध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या इंस्टाग्रामचा. ते इन्स्टावर येत आहेत म्हटल्यावर कमालीची उत्सुकता निर्माण झाली. वयाच्या नव्वदीनंतर त्यांना या समाजमाध्यमाचा आधार का घ्यावासा वाटला, त्यातून ते काय वेगळे सांगणार आहेत असे प्रश्न निर्माण झाले. ते या समाजमाध्यमांवर आल्यावर काही तासातच लाखो लोकांनी त्यांना follow केले.
सर अटेनबरो यांनी काही व्हिडिओ शेअरही केले. आणि अल्पावधीत मिळालेली (समाजमाध्यमवरची वेगळी) लोकप्रियता सोडून त्यांनी अचानक इंस्टाग्रामचा निरोपही घेतला. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी शेवटचा व्हिडिओ शेअर केला आणि ते थांबले. ‘माझा संदेश मी दिला आहे, मला काय म्हणायचे ते मी सांगून टाकले आहे, आता माझे कार्य इतरांनी पुढे न्यावे’, असे ते म्हणाले.
पुढे जाऊन ते असे म्हणाले की, ‘लोकांशी संपर्क ठेवण्याचा जुनाच प्रकार मला आवडतो. आजही मला दिवसाकाठी हाताने लिहिलेली ७० पत्रे येतात. त्या पत्राने मी उत्तरे देणे मी जास्त पसंत करतो.”. खरे तर अटेनबरो यांच्याकडे सांगण्यासारखे प्रचंड आहे. समाजमाध्यमांवर ते अधिक लोकांपर्यंत पोचूही शकले असते, परंतु या माध्यमावर मिळालेल्या लोकप्रियतेचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही. आणि त्यांनी थांबण्याचे ठरवले. आता लोक जास्त संख्येने पत्र पाठवतील, सगळ्यांना उत्तर देत बसणार का, या प्रश्नावर ते मिस्किलपणे म्हणतात – ”स्वतःचा पत्ता लिहिलेला व टपाल तिकिटे लावलेला लिफाफा बरोबर पाठवला तर जरूर उत्तर देईन’.
अटेनबरो यांच्यासारख्या माणसाला समाजमाध्यमांवर कधी थांबावे हे कळले, ते भल्याभल्याना कळत नाही. समाजमाध्यम हे दुधारी अस्त्र आहे हे आपण गेले काही दिवस बघतच आहोत. चांगली, उपयुक्त माहिती शेअर करता येते तशाच ‘फेक न्यूज’ म्हणजे धादांत खोट्या बातम्याही पसरवता येतात, या खोट्या बातम्यांचे परिणाम भीषण होऊ शकतात, हेही आपण बघितले आहे. ताजे उदाहरण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेच आहे. असो ! मुद्दा अटेनबरो यांचा आहे.
अटेनबरो यांच्या कृतीतून सगळ्यांना धडा मिळाला आहे. याचा अर्थ सगळ्यांनी समाजमाध्यमे सोडून पत्रे लिहायला घ्यावीत असे अर्थातच नाही. परंतु, समाजमाध्यमांचा उपयोग एका विशिष्ट मर्यादेतच करायला हवा, असे अटेनबरो यांचे ‘थांबणे’ सुचविते. ते जास्त भावले. पत्रलेखनामुळे माणूस फार कमी लोकांपर्यंत पोचतो. ज्याला पत्र लिहिले आहे तो आणि फार तर त्याचे कुटुंब. परंतु, अटेनबरो यांना हा पर्सनल टच जास्त आवडतो.
समाजमाध्यमानी हजारो लोकांशी एका वेळेस संपर्क साधता आला हे खरे आणि त्याचा प्रचंड फायदा होतो, हेही खरे, पण पर्सनल टच राहिला का याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. समाजमाध्यमांवर एखादी पोस्ट टाकल्यावर काही सेकंदात भराभर Likes येतात, तेव्हा ती पोस्ट खरोखरच वाचली गेली आहे का असा प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो. हा दांभिकपणा अटेनबरो याना फार लवकर कळला, असे म्हणायचे का ?
आजही , या शतकातले दुसरे दशक सुरु होत असताना बरेच जण समाजमाध्यमांचा वापर जाणूनबुजून करत नाहीत, त्यामागे हेच कारण असेल का? ही समाजमाध्यमे वाईट नाहीत, त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करणे, न करणे आपल्या हाती आहे. या समाजमाध्यमांचा अतिवापराने काय होते त्या बाबींवर अनेक वेळा चर्चा झाली आहे. यापुढेही चालू राहील. पण पर्सनल टच घालवणाऱ्या या समाजमाध्यमांकडे नव्याने पाहण्याची गरज आज वाटत नाही का?
मला कित्येक वर्षांपूर्वी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना नियमित पत्रे लिहिण्याची सवय होती. नंतर संगणक नावाचे असेच दुहेरी अस्त्र आले आणि लिहिणे सुटले. आता पेन घेऊन काही लिहिण्याची जणू सोयच नाही. न लिहिण्याने अक्षरही बिघडले आणि Whatsapp वर पाच सेकंदात खुशाली कळवता येते, मग चार दिवसांनी पोचणारे पत्र का पाठवावे, असाही प्रश्न निर्माण झाला. जसजसे दिवस जातील, जसजसे तंत्रज्ञान अधिक आधुनिक होत जाईल, तसतसा संपर्क साधण्याची पद्धतही बदलत जाईल. पण त्यात पर्सनल टच नसेल. तो नसल्यानेच कदाचित आज Whatsapp ग्रुप मधील सदस्यांची प्रत्यक्षात भेटून स्नेहसंमेलने होत आहेत.
अटेनबरो यांनी निसर्ग संरक्षण आणि जैवविविधता जपण्याबाबत नेहमीच प्रयत्न केले. या विषयांचा सतत अभ्यास करुन ते लोकांकडे येत राहिले. कधी त्यांच्या Life Series च्या माध्यमातून तर कधी अन्य कोणत्या तरी माध्यमातून. आज जगभरात वाढलेले प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, त्याचे मनुष्य प्राण्यावर होणारे दुष्परिणाम असे सारे पाहिले तर आज अटेनबरो यांच्या सारख्यांची जास्त गरज आहे हे लक्षात येते. अटेनबरो, त्यांच्यासारखेच त्यांच्या क्षेत्रात काम करणारे असंख्य तरुण/वृद्ध कार्यकर्ते अजूनही निराश न होता काम करता आहेत. त्यामुळे अटेनबरो यांचे समाज माध्यमावरील ‘थांबणे’ हा नैराश्याचा भाग नसेल असे आपण समजू या!