शिक्षकवर्गाला सलाम!
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. हे एक मोठे आव्हान असले तरी शिक्षकांनी त्यांचे कौशल्य पणाला लावत अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. ही बाब खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
हरयाणा राज्यातील झमरी गाव हे एरवी प्रसिद्ध असण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या संकटात मुलांना शिक्षण देण्याची जी अभिनव पद्धती इथे अवलंबण्यात आली, त्यामुळे हे गाव प्रसिद्ध झाले. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या, त्या पुन्हा कधी सुरु होतील ते माहीत नाही. अशा वेळेस मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून शिक्षकांनी बैलगाडी शाळा सुरु केली.
बैलगाडीवर ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवली. ती बैलगाडी एखाद्या वस्तीच्या मध्यभागात न्यायची आणि शिक्षकाने ध्वनिक्षेपक यंत्रणेवरून शिकवायला सुरुवात करयची. हा आवाज आल्यावर घराघरातली मुले आपापली वह्यापुस्तके काढून अभ्यासाला लागतात. रस्त्यावर येऊन गर्दी करत नाहीत, त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती नाही. घरात बसून शिकता येते. एकदोन तास शिकवून झाले की ते शिक्षक बैलगाडी घेऊन पुढील वस्तीत जातात. आळीपाळीने सगळ्या विषयांचे शिक्षक येऊन शिकवतात, त्यामुळे मुलांचा अभ्यास बुडत नाही. मुख्य म्हणजे शाळा बंद राहिल्यामुळे ही मुले शाळाबाह्य होण्याची भीती राहात नाही. घराच्या गरिबीमुळे कुटुंबाने स्थलांतर केले तरी हे शिक्षण चालू राहाते.
आज दसरा. सीमोल्लंघनाचा दिवस. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात सात महिन्यांपूर्वीच जेवढे सीमोल्लंमघन झाले तेवढे इतर कोणत्याही क्षेत्रात झाले नाही. सर्व कंपन्यांनी ‘घरून काम ‘ करणे सुरु केले असले तरी बहुतांश कंपन्यांकडे त्यांना तसे करता येईल अशी यंत्रणा उपलब्ध होती. त्यामुळे फार प्रश्न आला नाही. हाल झाले ते रोजंदारीवरच्या लोकांचे. रोजगार नाही, आणि खायलाही काही नाही, अशी स्थिती होती. आता तीही हळूहळू बदलत आहे. शिक्षण क्षेत्रातही उच्चभ्रूंच्या श्रीमंत शाळांना काही त्रास झाला नाही, घरोघरी उत्तम लॅपटॉप, फोन होते, नेटपॅक विकत घ्यायला फारसा त्रास नव्हता, याउलट हाल झाले ते इतर शाळांचे. त्यांच्या प्रत्येक मुलाकडे स्मार्टफोन असेलच असे नाही. किंबहुना नव्हताच. असला तर एखादा साधा फोन असायचा. घरात एकापेक्षा जास्त मुले असली तर एकावेळेस कोणीतरी एकाच शिकू शकतो अशी वेळ आली. आईवडील शिक्षणासाठी मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत या भावनेपोटी नैराश्य येऊन काही मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही आल्या. रोजगार नसल्याने रोज दोन वेळेचे जेवण मिळणे मुश्किल असणाऱ्या कुटुंबाला मोबाईल फोनला प्राधान्य देता येत नाही, हे सरकारी बाबूंना कळलेच नाही. यातून अनेकांच्या शिक्षणात खंड पडला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
सुदैवाने, भारतात अनेक राज्यांतील अगदी गावागावातील शिक्षकांनी यावर उपाय शोधला. हरयाणा राज्यातील झमरी गाव हे त्यातले एक उदाहरण. अशी कितीतरी उदाहरणे पुढे आली. गुजरात राज्यातील घनश्यामभाई नावाच्या शिक्षकाने ग्राम पंचायतीच्या ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केला. त्यावरून गोष्टी, गाणी, कोरोनाबद्दलच्या सूचना, अभ्यासाबद्दलच्या सूचना सांगितल्या. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळून वेगवेगळ्या वेळी बोलावून त्यांना मदत केली. महाराष्ट्रातील भाडळे गावात एक नवीन प्रयोग झाला. फोन असणारा विद्यार्थी आणि नसणारे विद्यार्थी यांचे गट करण्यात आले. शिक्षकांनी फोन असणाऱ्या विद्यार्थ्याकडे अभ्यास पाठवायचा, तो फोन नसणाऱ्यानी फोन असणाऱ्या विद्यार्थ्याकडे जाऊन उतरवून घ्यायचा. अभ्यास सोडवायचा आणि त्याचे फोटो काढून परत शिक्षकांकडे पाठवायचा. फोन असणाऱ्या विद्यार्थ्याकडे गर्दी होऊ नये म्हणून अगदी लहान गट तयार करण्यात आले. त्यांनाही वेगवेगळ्या वेळेस जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कोणाच्याही आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला नाही.
उत्तर प्रदेशातील खैर गावातील एका पालकाची कथा विलक्षण आहे. आहे माणूस शेतकरी आहे. लहानपणी वडिलांनी शेतीच्या कामास जुंपले म्हणून इयत्ता दहावीनंतर शिकू शकला नाही. त्यांचा मुलगा आता बारा वर्षाचा आहे. त्याचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून ते प्रयत्न करत आहेत. ते जिथे राहतात तिथे इंटरनेट नेटवर्क नाही. त्यामुळे सकाळी शेतीची कामे झाली की ते फोन घेऊन निघतात. गावात दुसऱ्या टोकाला इंटरनेट नेटवर्क थोडे आले की तिथे थांबून शिक्षकांनी मुलासाठी पाठवलेला अभ्यास डाउनलोड करून घेतात. संध्याकाळी घरी येतात आणि रात्री मुलाला त्या अभ्यासाच्या आधारे शिकवतात. त्यामुळे घरात इंटरनेट नेटवर्क नसले तरी मुलाचा अभ्यास चालू आहे. ही परिस्थिती भारतात अनेक गावांत आहे , पालकांना मुलांनी शिक्षण घ्यावे असे तीव्रतेने वाटतेही. पण इच्छा असूनही ते काही करू शकत नाहीत.
मुंबईत माटुंगा येथील एका शाळेत शिकवणाऱ्या जयईश्वरी नाडर नावाच्या महिलेने सरळ त्यांच्या फ्रीजच्या एका काप्प्याच्या झाकणाचा (ट्रे ) वापर केला. या ट्रेखाली फोन ठेवायचा, आणि ट्रे वर गणिते सोडवून दाखवायची ! सुरुवातीला त्यांनी व्हाईट बोर्ड वापरून शिकवले, नंतर विडिओ रेकॉर्ड करून शिकवले, तरी त्यात मुलांचे आणि स्वतः नाडर बाईंचेही समाधान होत नव्हते. फ्रीजच्या ट्रेची कल्पना मात्र हिट झाली. तसे शिकवतानाचा फोटो समाजमाध्यमांवरही खूप व्हायरल झाला. अर्थात शिक्षक मंडळी फक्त हा तास घेण्याच्या वेळेत व्यस्त असतात असे नाही. मुलांना आधी फोनवरून अभ्यास द्यायचा, त्यांनी परत पाठवलेला अभ्यास तपासायचा, स्वतः नोट्स काढायच्या, विद्यार्थ्यांना योग्य होतील असे नवनवीन विडिओ शोधायचे हे सगळे करण्यात पूर्ण दिवस जातो. यातच विद्यार्थ्यांच्या मासिक अथवा सहामाही परीक्षा घ्यायचा, त्याचे पेपर काढून विद्यार्थ्यांकडे पोचवायचे , आलेल्या उत्तरपत्रिका तपासायच्या , निकाल लावायचा वगैरे कामे आहेतच. ही कामे शिक्षक मंडळी आधीही करत असली तरी ऑनलाईन जगातली की कामे खूप वेगळी आणि जास्त ताण देणारी आहेत यात शंका नाही.
महाराष्ट्रात एका गावात दिगंत स्वराज फौंडेशनने सहा गावांमध्ये ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे शिकविण्यास सुरुवात केली. समोर कोणीही शिक्षक नसताना मुले शिकतील का अशी शंका होती, पण मुलांना, ‘तुम्हाला स्पीकरभाऊ आणि स्पीकरताई शिकवतील,” असे सांगितले आहे मुलांना ते आवडले, असे फौंडेशनच्या प्रमुख श्रद्धा शृंगारपुरे म्हणतात. महाराष्ट्राच्या आदिवासी ग्रामीण भागात हे फौंडेशन काम करते. या शाळेला त्यांनी ‘बोलकी शाळा ‘ असे नाव दिले आहे. या मुलांचे आईवडील शिकलेलेअसतीलाच असे नाही. त्यामुळे ते मुलांना मार्गदर्शन करू शकत नाहीत. अशा वेळी अशा ‘बोलक्या शाळा ‘ उपयोगी पडतात.
या लेखात अगदी मोजके प्रयोग दिले आहेत. हे सगळे प्रयोग शिक्षकांनी स्वतःच्या प्रयत्नातून, कल्पनाशक्तीतून उभारले आहेत. याशिवाय इतर अनेक शिक्षक मुलांना शिकविण्याच्या तळमळीतून वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गुजरातमधील एका शिक्षकाने सायकलशाला काढली. म्हणजे ते सायकलवरून गावागावात जातात, मुले सायंकाळभोवती बसून शिकतात. त्यांना शिकवून झाले की पुढचे गाव ! ज्या मुलांकडे मोबाईल फोन नाहीत त्यांना ते भेट देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. काही ठिकाणी फोनची लायब्ररी सुरु करण्यात आली. विद्यार्थ्याने फोन घ्यायचा, वापरायचा आणि परत करायचा ! विद्याथ्याला खर्च नाही आणि पालकांवरही आर्थिक भार नाही. असे असंख्य प्रयोग सुरु झाले. ते यशस्वीही झाले. शिक्षण क्षेत्रात जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्या इतर क्षेत्रात आल्या असतील असे वाटत नाहीत. सगळे शिक्षक तंत्रज्ञानस्नेही असतातच असे नाही. वर्गात उत्तम शिकवणारे शिक्षक ऑनलाईन तंत्रे वापरून तेवढ्याच प्रभावी पद्धतीने शिकवू शकतीलच असे नाही. तरीही या कोरोना काळाने त्यांची तंत्रज्ञानाशी मैत्री करून दिली. जे शिक्षक तरीही तंत्रज्ञानस्नेही झाले नाहीत, त्यांच्या मुलांनी अथवा पती अथवा पत्नी यांनी घरात मदत केली. एवढ्या अडचणी असूनही त्यांची मुलांना शिकविण्याची तळमळ कमी झाली नाही.
शिक्षकांसाठी दसरा हा सीमोल्लंघनाचा दिवस असेलही, पण खरे म्हणजे त्यांनी हे काम गेल्या सात आठ महिन्यांपासून केले आहे. आणि रोज करत आहेत. तमाम शिक्षकवर्गाला सलाम !
—
कळवा तुमचे प्रयोग
ऑनलाईन शिक्षण हे मोठे आव्हान असले तरी त्यातून मार्ग काढत शिक्षकांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. या प्रयोगांची माहिती इंडिया दर्पणला पाठवावी. फोटो आणि माहिती indiadarpanlive@gmail.com या ई मेलवर पाठवावी. यातीस उल्लेखनीय कार्याला नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.