विकासाचा महामार्ग
महामार्ग हे केवळ त्या परिसरासाठी नाही तर संपूर्ण प्रदेशासाठीच महत्त्वाचे ठरतात. समृद्धी आणि कोकण या दोन महामार्गांमुळे नजिकच्या काळात राज्याच्या विकासाला आणखी वेग येणार आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीतही किंबहुना या लॉकडाऊनचा फायदा घेऊन रेल्वे आणि रस्ते बांधणीतले काही मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात आले. रेल्वेने गेल्या सहा महिन्यात जवळपास २०० प्रकल्प पूर्ण केले. त्यात ८२ नवे पूल, ४८ मर्यादित उंचीचे सबवे, रेल्वे क्रॉसिंगच्या जागी भुयारी मार्ग, १६ फूट ओव्हर ब्रिजची बांधणी अथवा मजबुतीकरण, १४ फूट ओव्हर ब्रिज पूर्ण काढून टाकणे आणि पाच ठिकाणच्या यार्डांची पुनर्रचना करणे एवढी कामे या लॉकडाऊनच्या काळात झाली. एरवी या कामासाठी किमान दोन वर्षे लागली असती. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात रेल्वे सेवा पूर्ण बंद असल्याने ही कामे करता आली. महाराष्ट्र राज्यातील रस्ते प्रकल्पाबद्दल बोलायचे तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि मुंबई-रत्नागिरी कोकण महामार्ग यांची कामे जोरात चालू आहेत.
परवा प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार नागपूर ते मुंबई हे ७०१ किमी अंतर आठ तासांत पार करता येणारा समृद्धी महामार्ग २०२२ पर्यंत वाहतुकीस खुल होईल. प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा १ में २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. गेल्या काही वर्षात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा विचार करता समूद्धी महामार्गावर अशी वाहने चार्ज करण्यासाठी प्रत्येक बाजूस १४ याप्रमाणे २८ केंद्रे असतील. याशिवाय इतर अनेक आवश्यक सेवा पुरविण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रसार, टाळेबंदी याचा राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांना फटका बसला. टाळेबंदीत मजुरांनी मूळ गावी स्थलांतर केल्यामुळे अनेक प्रकल्प बंद पडले होते. समृद्धी महामार्गाच्या कामासदेखील याचा फटका बसला.
कोरोनापूर्व काळात नागपूर ते सिन्नर हा टप्पा डिसेंबर २०२० च्या अखेरीस कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र त्यास आता पाच महिने विलंब होत आहे. लॉकडाऊन काळात आज २० हजारपेक्षा अधिक मजूर इथे काम करत आहेत आणि प्रकल्पाला आणखी उशीर होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे ५० किमी मार्गाचे काम बाकी आहे. मात्र बाकीचे काम वेळेत करण्याचा प्रयत्न आहे. समृद्धी महामार्गाच्या निधीसाठी नेपियन सी रोड, वांद्रे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-कोल्हापूर मार्गाजवळील एमएसआरडीसीच्या ताब्यातील काही जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव आहे. या माध्यमातून सुमारे १५ हजार कोटी रुपये उभारले जातील. मात्र याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही.
समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हा विदर्भात अमरावती जिल्ह्यात दोन तालुक्यांत जमिनीच्या कारणावरून वाद झाला होता. परंतु आता तो मिटल्याचे सांगण्यात येते. हा मार्ग पूर्ण होईल तेव्हा सुसाट वेगाने उपराजधानीत जाता येईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. हा वेग जीवावर बेतण्याची शक्यता आहे. या महामार्गापेक्षा कितीतरी लहान असणारा मुंबई-पुणे महामार्ग अनेक बळींचा साक्षीदार ठरला आहे. या द्रुतगती महामार्गावर पुन्हा एकदा वाहनचालकांची बेशिस्त समोर आली आहे. राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी सप्टेंबरमध्ये केलेल्या कारवाईत अतिवगाने वाहने चालवणाऱ्या १० हजार ११० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. खालापूर ते कळंबोली दरम्यान महामार्ग पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. द्रुतगती महामार्गावर अपघातांचे मुख्य कारण हे मयदिपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे आहे, हे उघड आहे. तसे समृद्धी महामार्गाचे होता काम नये.
समृद्धी महामार्ग हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. या महामार्गावरील सोयी-सुविधा पाहता तो पूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरेल असे दिसते. त्याचवेळी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचेही काम चालू आहे. सध्या मुंबईहून रस्ते मार्गाने कोकणात जायचे म्हणजे बऱ्याच वेळेस शरीराची हाडे खिळखिळी होण्याचीच शक्यता जास्त. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने कोकण अत्यंत महत्वाचा असला तरी गेल्या पाच दशकात कोकणकडे कोणत्याही राज्यकर्त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. विदर्भ-मराठवाड्याच्या अनुशेषाबद्दल बऱ्याच वेळ बोलले जाते, पण कोकण या विषयावर फारसे कोणी बोलत नाही. म्हणूनच सध्या चालू असणारा मुंबई-कोकण महामार्ग अतिशय महत्वाचा आहे.
आजही चिपळूण ते रत्नागिरी आणि पोलादपूर ते माणगाव हा रस्ता अत्यंत वाईट स्थितीत आहे. आता नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झाराप या ३६६ कि.मी. लांबीचे चौपदारीकरणाचे काम सुरु आहे. यापैकी १.७२ किमी लांबीच्या कशेडी बोगद्याचे काम रिलायन्सला मिळाले आहे. बोगद्यामुळे २५ किमीचा घाट प्रवास वाचेल. ७४ छोटे पूल, दोन मोठे पूल, १३ फ्लायओव्हर शिवाय सेवा रस्ते यांमधून भोस्ते, बावनदी आदि अवघड घाट ओलांडून महामार्गाचे चौपदरीकरण चालू आहे. यातील खेडपासून पुढे इंदापूरपर्यंत काम प्रगती पथावर आहे. खेड ते आरवली ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. आरवली ते वाकेड ९० किमीचे काम अवघे दहा टक्के पूर्ण झाले आहे. राजापूर ते सिंधुदुर्ग ९० किमी काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. खेड येथील कशेडी बोगदा काम युद्धपातळीवर सुरु आहे. पोलादपूरच्या बाजूने अर्धे काम पूर्ण आहे, तर खेडच्या बाजूने खोदाई सुरु झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या पट्ट्याचे चौपदरीकरण युद्धापातळीवर सुरू आहे. हा संपूर्ण रस्ता काँक्रीटचा असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे चौपदरीकरण केले जात आहे. दहा टप्प्यांत त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत १४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँकीटीकरण पूर्ण करण्यात आले असून पनवेल ते इंदापूर या ८४ कि.मी. रस्त्याचे काम जून २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, तर इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. मुंबई-कोकण प्रवास झटपट आणि सुखकारक व्हावा म्हणून लाखो लोकांनी अनेक वेळा सरकार दरबारी किती याचना केल्या असतील याची गणतीच नाही. त्यांचे हे स्वप्न पूर्ण व्हायला आणखी काही वर्षे थांबायला लागेल.
महाराष्ट्रातील रस्तेबांधणी हा नेहमीचा टीकेचा विषय आहे. परदेशात गेल्यावर तेथील सोयी-सुविधांची तोंड भरून कौतुक करणारे राजकारणी भारतात परत आल्यावर, किमान दहा वर्षे रस्ता टिकेल अशा पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदाराला कामे का देत नाहीत याचे कारण मी सांगायला नको. अशा स्थितीत नितीन गडकरी यांनी समृद्धी आणि कोकण महामार्ग पूर्ण केले तर ते त्यांच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. समृद्धी महामार्ग असो अथवा कोकण महामार्ग किंवा अन्य कोणताही मोठा प्रकल्प, जमिनीचा मोबदला, स्थानिक लोकांचे गरज भासल्यास स्थलांतर यासारखे प्रश्न उद्भवतात. ते स्वाभाविक आहे. याही वेळेस तसे प्रश्न आलेच. हे प्रश्न सांभाळून प्रकल्पही पूर्ण करायचा हे आव्हान गडकरी यांच्यासाठी नवीन नव्हते. सर्वांचे समाधान होऊन हे काम पूर्ण होणार असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे.
माहितीपूर्ण लेख , पण सर्वसामान्य माणसाला कशा प्रकारे संधी ( नोकरी / व्यवसाय ) मिळेल ते विशद करायला हवे होते