आशाताई, सलाम!
लाखो लोकांच्या कानात आणि मनातही कायमचे घर करून राहिलेल्या गायिका आशा भोसले याना गेल्या आठवड्यात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला तेव्हा त्या बातमीवरील ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया फेसबुकवर वाचायला मिळाली. तीच आशाताईंच्या लाखो चाहत्यांच्या मनातलीही भावना होती.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
[email protected]
कोणताही पुरस्कार त्या विजेत्याला पाठीवरची थाप देतो, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आणखी भरभरून काम करायची ताकद आणि प्रेरणा देतो, हे खरे असले तरी भारतरत्न, अन्य पद्मा पुरस्कार असोत, राष्ट्रीय स्तरावरचे अन्य पुरस्कार असोत किंवा ‘महाराष्ट्र भूषण’सारखे राज्य पातळीवरचे पुरस्कार असोत, हे पुरस्कार म्हणजे त्या व्यक्तीच्या कारकीर्दीला दिलेली पावती असते. तीही कारकीर्दीच्या शेवटी मिळालेली. परंतु तो पुरस्कार वेळेवर मिळाला तर त्याचा गोडवा अधिक असतो. आशाताईना सरकारचे ‘महाराष्ट्र भूषण’ मिळाल्याबद्दल माझ्यासारख्या लाखो सामान्य रसिकांना कमालीचा आनंद झाला आहे यात वादच नाही, परंतु, आशाताईना हा पुरस्कार खूप आधी मिळायला हवा होता यात वाद नसावा.
‘महाराष्ट्र टाइम्स’ने आशाताईना २०१७मध्येच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. त्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला. त्याआधी एकदा त्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अतिथी संपादक म्हणून मटा कार्यालयात आल्या होत्या. एक दीड तास थांबतील असे वाटत असतानाच तब्बल चार तास त्यांनी मटातील सर्व सहकाऱ्यांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या होत्या. तो दिवस आणि ते चार तास कधीच विसरणार नाही. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात पुन्हा भेटल्या.
आपण मोठ्या गायिका आहोत याचा कोणताही बडेजाव नाही, बोलण्यात एकदम रोखठोकपणा, तोच चिरतरुण आवाज आणि अनेक किस्से सांगत समोरच्याला जणू हिप्नोटाईझ करण्याची किमया त्या सहज करतात. स्वत्चच्या संघर्षमय जीवनाचे उल्लेख जरूर येतात, पण ते बोलण्याच्या ओघात. मुद्दाम विषय काढून नव्हे. वेगवेगळ्या निमित्ताने आशाताई या ‘माणूस’ म्हणूनही किती थोर आहेत हे लक्षात येते आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढतो. हा आदर मनामनात असल्यानेच त्यांना आशाबाई ऐवजी आशाताई म्हणतात असे वाटून गेले.
आशाताईना भारत सरकारने २००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार दिला तर ‘भारतरत्न’नंतरचा दोन क्रमांकाचा ‘पद्मविभूषण ‘ २००८ साली दिला. या ‘पद्मविभूषण’नंतर त्यांना तेरा वर्षांनी ‘महाराष्ट्र भूषण’ मिळत आहे. हा ‘महाराष्ट्र भूषण’ मिळाला यात आनंदच आहे, परंतु तो बऱ्याच आधी मिळायला हवा होता असे मात्र राहूनराहून वाटते. ‘महाराष्ट्र भूषण’ महाराष्ट्र सरकार वर्षातून एकाच माणसाला देते.
‘महाराष्ट्र भूषण’ देणे १९९६ साली सुरु झाले. पहिले मानकरी होते पु. ल. देशपांडे. नंतर लता मंगेशकर, विजय भटकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, पं. भीमसेन जोशी, अभय व राणी बंग, बाबा आमटे, डॉ. रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, रा. कृ. पाटील, नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, सुलोचना दीदी, जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, राम सुतार आणि आता आशा भोसले असे मानकरी आहेत. ही सर्व मंडळी महाराष्ट्राची रत्ने आहेत आणि त्यांच्याबाबत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात, देशाबाहेरही अभिमानाची भावना आहे, हे सर्वाना माहीत आहेच. महाराष्ट्राने देशाला, जगाला दिलेले हे मोठे योगदान आहे.
दरवर्षी एकालाच पुरस्कार देण्याची प्रथा बदलावी असे वाटते. दिग्गज लोकांना वेळेवर पुरस्कार मिळायला हवेत. त्यासाठी एखाद्या वर्षी एकापेक्षा अधिक लोकांना पुरस्कार द्यायला काय हरकत आहे? भारतरत्न जाहीर करताना ‘एका वर्षी एकच ‘ असा नियम पाळला जात नाही. किंबहुना या पुरस्कारांच्या पहिल्याच वर्षी (१९५४) सी. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन व सी. व्ही. रामन या तिघांना भारतरत्न जाहीर झाले होते. १९५५ मध्ये भगवान दास , एम. विश्वेश्वरय्या, जवाहरलाल नेहरू या तिघांना भारतरत्न जाहीर झाले. यानंतरही एकापेक्षा अधिक भारतरत्न पुरस्कार दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. २०१९ मध्ये प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख याना हा पुरस्कार मिळाला आहे. एखादी व्यक्ती हयात असताना पुरस्कार मिळणे हे महत्वाचे असले तरी अनेकवेळा मरणोत्तर पुरस्कारही दिले जातात , ते काही कारणाने आवश्यकही असतात. तो भाग वेगळा.










