नवी अमेरिकन क्रांती
अमेरिकन सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदी कोण विराजमान होणार यावरुन अमेरिकेसह जगातील राजकारणासह अर्थ आणि अन्य अनेक क्षेत्रांवर मोठे परिणाम होणार आहेत. या निवडणुकीच्या निकालाचा हा अन्वयार्थ….
गेल्या मंगळवारी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले आणि तेथील नियमाप्रमाणे या दिवसाच्या आधीही अनेक लोकांनी मतदान केले होते. मतमोजणी तीन नोव्हेंबरला संध्याकाळी चालू झाली आणि भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता ही मतमोजणी चालू असतानाच २० इलेक्टोरल मते देणाऱ्या पेनसिल्व्हानिया राज्यात बायडन जिंकले असे गृहीत धरून त्यांना अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष जाहीर करण्यात आले.
बायडन अध्यक्ष होणार हे गेल्या दोन दिवसांच्या मतमोजणीवरून कळतच होते. निवडणूक अमेरिकेपुरती मर्यादित असली तरीही अवघे जग या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लावून बसले होते. सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होताहेत हे पुरेसे स्पष्ट झाल्यावरही जगातील लाखो टीव्ही सेटसमोर बसलेले नागरिक अंतिम अधिकृत निकालाची वाट पाहत होते. एरवी आपला स्वतःचा देश सोडला तर दुसऱ्या एखाद्या देशाच्या प्रमुखपदी कोण निवडून येतो हे पाहण्यासाठी कोणीही कधीच उत्सुक नसतो, अपवाद फक्त अमेरिकेचा.
बायडन हे तिसऱ्या वेळेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते. १९८८ आणि २००८ या दोन्ही वेळेला ते डेमोक्रॅटिक पक्षातर्फे निवडणूक लढले, पण पराभूत झाले. डेलावेअर येथून १९७३ ते २००९ इतका प्रदीर्घ काळ सिनेटर, २००९ ते २०१७ अमेरिकेचे उपाध्यक्ष (बाराक ओबामा अध्यक्ष होते ) आणि आता २०२०मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष अशी बायडन यांची वाटचाल आहे. या पदावर येणारे ते सर्वात जास्त वयाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वय ७७ आहे. ट्रम्प ७४ वर्षांचे आहेत. असे असले तरी बायडन यांचा अनुभव लक्षात घेता, ते कुठेही कमी पडणार नाहीत हे स्पष्ट दिसते आहे. त्या तुलनेत कमला हॅरिस यांची सेनेटरपदाची ही पहिलीच टर्म चालू होती. त्या उपाध्यक्ष झाल्या आहेत. भारतीयांना त्यांच्याबद्दल विशेष आस्था आहे. त्या उपाध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिला, पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियायी महिला आहेत. त्यांच्या बरोबरच या निवडणुकीत विविध पदांवर निवडून आलेल्या भारतीय अमेरिकनांबद्दलही.भारतात विशेष कौतुक आहे. आपले मराठमोळे श्री श्री ठाणेदारही त्यातलेच. या सर्वांचे अभिनंदन.
अमेरिकेचे अध्यक्षपद कोणाकडे जाते यावर साऱ्या जगाची नजर का लागली होती याचे कारण सहज समजण्यासारखे आहे. अमेरिका हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली देश आहे. आर्थिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्याही. त्यांनी घेतलेले अनेक धोरणात्मक निर्णय हे फक्त त्यांच्या देशावर नव्हे, तर साऱ्या जगावर परिणाम करतात. आज चीन हा अमेरिकेला पर्याय होऊ पाहात असला तरीही अजून तरी त्यांना अमेरिकेला गाठता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनला म्हणावा तसा पाठिंबा नाही आणि अमेरिकेला ‘एकमेव महासत्ता’ हे विशेषण अद्यापही लावता येते. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षपदी कोण निवडून येतो यात प्रत्येक देशाचा काहीना काही स्वार्थ दडलेला असतो हे नाकबूल करून चालणार नाही. गेले पाच दिवस बीबीसी, सी एन एन , अल जझीरा, फॉक्स न्यूज, सिबिएस न्यूज यासारखी आंतरराष्ट्रीय चॅनल्स या निवडणुकीचे / मतमोजणीचे वार्तांकन करत आहेत. या मतमोजणीमुळे अमेरिकेतील लोकशाही पद्धतीवरचा विश्वास वाढला, हे कबूल करावे लागेल.
एरवी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती ज्या पद्धतीने काही बाबतीत निर्णय घेते त्यावरून संताप जरूर असेल, परंतु निवडणूक, नंतरची मतमोजणी आणि ती करणारे हजारो कर्मचारी यांचे कौतुक करायलाच हवे. गेले पाच दिवस न थकता हे कर्मचारी काम करत आहेत. एकीकडे ट्रम्प हे या निवडणूक निकालावर साशंकता व्यक्त करत असताना दुसरीकडे मात्र या साऱ्या प्रक्रियेबद्दल अमेरिकेचे कौतुक होत आहे यात ट्रम्प यांचा उणेपणा अधिक दिसून येतो.
विविध टीव्ही चॅनल्स पाहत असताना प्रामुख्याने लक्षात येते ते शांतपणे, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता केलेली चर्चा, प्रत्येक मतदारसंघ किंवा राज्य याचे तपशीलवार विश्लेषण आणि ते करताना कोणताही राजकीय अभिनिवेश धारण न करता केलेले मांडलेले आकडे, हे या पाच दिवसाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नाही म्हणायला फॉक्स न्यूज चॅनेलने अरिझोना राज्य बायडन यांनी जिंकले, ही बातमी खूप आधी देऊन टाकली, यामुळे ट्रम्प खूप नाराज झाले आणि याचा परिणाम असा झाला की बायडन निवडून आले तरी त्यांना ‘प्रेसिडेंट इलेक्ट’ म्हणजे नियोजित अध्यक्ष म्हटले जाऊ नये असा एक विचित्र फतवा फॉक्स न्यूजने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी काढला, असा ट्विट पाहण्यात आला. म्हणूनच फॉक्स न्यूज बायडन यांच्या पारड्यात २६४ आणि ट्रम्प यांच्या पारड्यात २१४ जागा टाकत असताना इतर चॅनल्स मात्र २५३ – २१३ या आकड्यांवर अगदी आतापर्यंत ठाम होती. जोपर्यंत अधिकृत निकाल येत नाही तोपर्यंत हे आकडे बदलता येणार नाही असे या चॅनेल्सनी अधिकृतपणे जाहीरही केले होते.
आपल्याकडे निवडणूक निकालाच्या वेळी राजकीय पक्षांमध्ये होणारे वाद प्रतिवाद आपल्याला माहीत आहेत, रोजच्या चर्चांमध्ये होणारा आक्रस्ताळेपणा हाही सर्वांना परिचित आहे, परंतु बीबीसी, सी एन एन, अल जझीरा, सिबिएस न्यूज यांचे वार्तांकन पाहिले की निवडणूक निकालाचे विश्लषण कसे असले पाहिजे, याचा उत्तम पाठ आपल्याला मिळतो. निकाल लागलेला नसताना सलग पाच दिवस विश्लेषण करत राहायचे ही सोपी गोष्ट नाही, त्यामुळेच हे सारे वार्तांकन अनेकांना आवडले. याच काळात ट्रम्प जाहीरपणे बोलून अथवा ट्विट करून वेगवेगळे दावे करत होते. त्यातले बरेचसे खोटे होते, तसे या चॅनेल्सवर स्पष्ट सांगण्यात आले. ट्विटरनेही काही ट्विट रद्द केले. फक्त मतमोजणीदरम्यान ट्रम्प खोटे बोलले असे नाही, हा आरोप त्यांच्यावर गेली चार वर्षे होत आहे. देशातली प्रमुख चॅनेल्स आमचे अध्यक्ष खोटे बोलतात असे जाहीरपणे सांगू शकतात, हे ऐकायला वेगळेच वाटत होते. आपल्याकडे मुख्यमंत्री /पंतप्रधान /राष्ट्रपती यांच्यावर असे जाहीर आरोप झाले असते तर काय झाले असते हे मी सांगायला नको.
मतमोजणीच्या पाच दिवसात ट्रम्प यांनी अनेक वेळेला त्रागा केला. निवडणूक निकाल योग्य नाही, असे सुचवले. न्यायालयात धाव घेतली. वैध मते मोजल्यास मी जिंकलो आहे असा विचित्र दावाही त्यांनी केला. परंतु काल म्हणजे शनिवारी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता जो बायडन यांनी येऊन देशाला संबोधून जे भाषण केले ते खूप भावले. अत्यंत शांतपणे त्यांनी देशाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला आणि आता आपल्याला एकत्रित, हातात घालून जायला हवे, मला मत दिले नाही तो आणि मला मग दिलेले तो अशा सर्व प्रकारच्या मतदारांना मी समान न्याय देईन असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि ट्रम्प व बायडन यांच्यातला हा फरक खूप ठळकपणे जाणवला.
गेल्या चार वर्षात ट्रम्पनी त्यांच्या स्वभावाचे दर्शन जगाला घडवले आहे. कधी हार मानणारा हा माणूस नाही. त्यांना पराभव माहीत नाही, त्यामुळे या निवडणुकीत आपण पराभूत होऊ शकतो असे कदाचित त्यांच्या मनातही आले नसेल. आपणच पुढची चार वर्षे अध्यक्ष राहू असा त्यांचा भ्रम झालेला असू शकतो. कदाचित कोरोना नसता आणि परिस्थिती सर्वसामान्य असती तर ट्रम्प निवडून आलेही असते. परंतु कोरोनाने एका महासत्तेचा अध्यक्ष हटवला असे म्हणायला हरकत नाही. कोरोना काही महाभयंकर आजार नाही असेच ट्रम सांगत राहिले, स्वतः मास्क घालायचा नाही असा निर्णय त्यांनी घेतला होता, त्यांना स्वतः कोरोना झाल्यावर मात्र त्यांना तो घालावा लागला हा भाग वेगळा.
अमेरिकेत दोन लाखापेक्षा जास्त नागरिकांचे या कोरोनाने बळी घेतले आहेत आणि अशा परिस्थितीतही याकडे गंभीरपणे पाहण्यास ट्रम्प तयार होत नाहीत असे चित्र अमेरिकन नागरिकांना आणि जगालाही दिसले. कृष्णवर्णीय लोकांसावरील अत्याचार आणि काही कृष्णवर्णीय लोकांची हत्या हा या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा भाग होता. त्यात जो बायडन यांनी कमला हॅरिस या कृष्णवर्णीय महिलेची उपाध्यक्षपदासाठी निवड करून निवडणूक अर्धी जिंकलीच होती. ट्रम्प यांनी कमला यांची टिंगल करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांच्या नावाच्या उच्चारापासून ते त्यांच्या वागण्यावर ट्रम्प यांनी भरपूर टीका केली. परंतु प्रत्येक टीका त्यांना स्वतःला पराभवाकडे नेणारी ठरली. ट्रम्प यांच्या वागण्यातला उद्दामपणा आणि बायडन यांचे अतिशय शांत, संयमी वागणे यात लोकांनी बायडन यांना पसंती दिली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
अर्थात ट्रम्प यांच्या समर्थकांना हा पराभव सहजासहजी पचवता येत नाही असे दिसते. क्लिअर बरलिंस्की नावाच्या महिलेने काल एक ट्विट कला होता. ”नियोजित अध्यक्ष बायडन भाषणात काय बोलतात हे ऐकण्यासाठी मी टीव्ही लावला. बायडन इतके बोअरिंग (कंटाळवाणे) भाषण करत होते की मी ते भाषण पूर्ण होण्याच्या आधीच टीव्ही बंद केला.” असा ट्विट त्यांनी केला. या ट्विटवर भारतातील पत्रकार स्मिता प्रकाश यांची कॉमेंट बघण्यासारखी होती अमेरिकन न्यूज चॅनेल्स पुढची चार वर्षे काय करणार कोणास ठाऊक, ट्रम्प यांचे कव्हरेज करून त्यांचा टीआरपी वाढत होता , परंतु आता तुमच्या भाषेत बोअरिंग अध्यक्ष होणार असले तर टीव्ही चॅनेल्स कशी चालतील याचा विचार करायला लागणार तुम्हाला”, असे स्मिता प्रकाश म्हणाल्या. म्हणजे ट्रम्प यांचे बिनधास्त (खोटे) बोलणे आणि वागणे चांगले होते , पण शांत, संयमी बायडन कंटाळवाणे वाटतात , असे जर बरलिंस्की बाईना म्हणायचे असेल तर मग कठीण आहे. बायडन याना किती आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे याची एक चुणूक दिसली एवढेच.
बायडन निवडून आल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये काय बदल होतील असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. संरक्षण आणि एकंदरीत जागतिक संरक्षण क्षेत्र याबाबत अमेरिकेची भूमिका आधीसारखीच राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. चीनबाबत मात्र बायडन यांच्या गटात दोन मतप्रवाह आहेत, त्याचा भारताला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे एच वन बी व्हिसावर ट्रम्प यांनी आणलेले निर्बंध बायडन लगेच पूर्ण काढून टाकतील, का आहे तसेच ठेवतील याकडेही भारताचे लक्ष लागून राहिले असेल. डेमोक्रॅटिक पार्टी काश्मीरबाबत काय भूमिका घेते हेही बघण्यासारखे असेल. त्यामुळे ट्रम्प जाऊन बायडन येणार याचा फार आनंद होण्याचे कारण नाही. बायडन हे ट्रम्प यांच्यासारखे आक्रस्ताळे नाहीत, त्यामुळे ते सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेतील यात शंका नाही.
ट्रम्प चार वर्षांपूर्वी निवडून आले आणि हिलरी क्लिंटन पराभूत झाल्या यालाही काही कारणे होती. ट्रम्प यांनी अमेरिकन भूमिपुत्राला नोकऱ्या मिळाव्यात अशी भूमिका घेतली होती, आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिक हे ट्रम्प यांच्या विचिध मतांशी सहमत होते. परंतु तरुणांचे नोकऱ्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही, कोरोना काळात तर हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यास ट्रम्प थेट जबाबदार नसले तरी कोरोनाची हाताळणी, पोलिसी अत्याचारांमुळे अस्वस्थ झालेला कृष्णवर्णीय समाज आणि ट्रम्प यांचे एकूणच वागणे यामुळे बायडन यांचा विजय सुकर झाला. मात्र यापुढची आव्हाने सोपी नाहीत, हेही लक्षात ठेवलेले बरे !