कोरोनाचे संकट येऊन एक वर्ष झाले आहे. प्रारंभीच्या कठीण काळानंतर आता लसीकरणामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच पारशी समाजानेही या संकट काळात मोठे योगदान देत देशभक्ती आणि कर्तव्यपूर्ती केली आहे. हे संपूर्ण वर्ष आव्हानात्मक असले तरी भारतातील कामगिरी लक्षणीय राहिली आहे.
फिरोजशाह मेहता, होमी भाभा, सर दोराबजी टाटा, जे आर डी टाटा, रतन टाटा, अर्देशीर गोदरेज, बैरामजी जीजीभॉय, दादाभाई नवरोजी, होनी सेठना, पालजी मिस्त्री, दिनशॉ मानेकजि पेटिट , आदि गोदरेज डॉ. सायरस पूनावाला… भारताच्या प्रगतीत सक्रिय भाग घेतलेले हे पारसी समाजातले दिग्गज. प्रत्येकाची कामगिरी देदीप्यमान अशी. ही यादीही सर्वसमावेशक नाही. पण याच यादीतील आताचे ताजे नाव म्हणजे आदर पूनावाला. त्यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविड प्रतिबंधक लस तयार केल्यावर साऱ्या जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. या निमित्ताने पुणे आंतरराष्ट्रीय नकाशावर पुन्हा एकदा झळकले. डॉ. पूनावाला हे नाव आज भारतात घरोघरी आदराने घेतले जाते. आरोग्य आणि त्यातही औषधनिर्मितीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे पूनावाला अनेक जीवघेण्या आजारांवरील प्रतिबंधक लसही बनवतात. ते पारसी आहेत पण केवळ त्यांनीच नाही, तर अनेक पारसी व्यक्तींनी कोविड काळात देशाच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
असे म्हणतात की, सीरम इन्स्टिटयूट ने पारसी समाजासाठी ६० हजार डोसेस (लसी) राखून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे त्यांच्या अर्ध्या दिवशीचे उत्पादन आहे. परंतु आम्हाला प्राधान्य नको, आम्ही आमची वेळ येईल तेव्हाच ही लस घेऊ असे, या समाजाच्या वरिष्ठ लोकांनी सांगितले असे सांगण्यात येते. रतन टाटा यांचेही असेच म्हणणे आहे, असे एका बातमीत म्हटले आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ‘आम्ही आधी भारतीय आहोत, मग पारसी’ असे त्यांचे म्हणणे असले तर नवल नाही.
गेल्या आठवड्यात रतन टाटा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले. तेव्हाही त्यांनी अशाच प्रकारचे उत्तर चाहत्यांना दिले. मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांनी एक ट्विट केला आणि रतन टाटा याना भारतरत्न देण्याची मागणी केली. लगेचच #BharatRatnaForRatanTata या हॅशटॅगने हजारो लोकांनी ट्विट करायला सुरुवात केली. शेवटी रतन टाटा यांनी त्यांना थांबायला सांगितले ”मी सर्व लोकांच्या भावनेचा आदर करतो, परंतु त्यांनी ही मागणी मोहीम थांबवावी, अशी मी विनंती करतो. मी भारतीय आहे हे माझे सुदैव आहे. मी देशासाठी काम करून देशाच्या विकासात, प्रगतीत सहभाग देऊ इच्छितो,” असे सांगणारे निवेदन प्रसिद्धीस दिले.
टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी पहिल्यांदा होत नाही. यापूर्वीही काही वेळा झाली आहे. तरी रतन टाटा यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. त्यांना वैयक्तिक पातळीवर जे ओळखतात ते रतन टाटा यांच्या सौम्य, आदबीने बोलण्याच्या अनेक आठवणी सांगतात. काही दिवसांपूर्वी टाटा समूहातील एक माजी कर्मचारी गेली दोन वर्षे आजारी असल्याचे त्यांना कळले. ते कर्मचारी पुण्याला राहतात. रतन टाटा यांनी मुद्दाम पुण्याला ‘फ्रेंड्स सोसायटी’तील त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. बरोबर मोठी सुरक्षा यंत्रणा नाही, मीडियाचे कॅमेरे नाहीत. अगदी सध्या माणसासारखे जाऊन भेटून आले. अशा प्रकारची अनेक उदाहरणे देता येतील.
कोविड प्रतिबंधक लस ज्या बाटलीत साठवली जाते ती बाटली रिशद दादाचंदजी यांच्या कंपनीत तयार होते. ही लस विशिष्ट तापमानात साठवायची असल्याने विशिष्ट प्रकारच्या काचेची बाटली लागते. रिशद हे पारसी समाजाचे आहेत. लसीची वाहतूक काही विमान कंपन्यांनी केली. त्यात एक ‘गो एअर’ ही नेसली वाडिया यांच्या विमानाचाही समावेश आहे. त्याचबरोबर आणखी काही पारसी समाजातील लोकांनी यास हातभार लावला आहे.
एखाद्या समाजानेच कोविड प्रतिबंधक लसीच्या संदर्भात योगदान दिले आणि इतर कोणीही काहीही केले नाही, असे सांगण्याचा इथे अजिबात हेतू नाही. विविध क्षेत्रातील संशोधक, वैज्ञानिक, कर्मचारी, अधिकारी यांनी वेगवेगळ्या पातळीवर योगदान केले आहे. त्या सगळ्यांचे कौतुकच करायला हवे. परंतु, पूनावाला – टाटा – रिशद दादाचंदजी – वाडिया या सगळ्यांचे काम पाहिले की या समाजाबद्दलचा आदर वाढतो हे निश्चित.
कोविड प्रतिबंधक लसीच्या निर्मितीपासून ते प्रत्यक्ष सर्वसामान्यांना लस मिळेपर्यंत खूप मोठी साखळी आहे. हा आजार मानवाला अजिबात माहित नव्हता. एकदम धरणीकंप व्हावा तसा हा आजार आधी चीनमध्ये आणि मग जगभर पसरत गेला. त्यावर लस शोधणे ही सोपी बाब नव्हती. भारतीय वैज्ञानिकांनी हे कठीण काम तुलनेने खूप कमी काळात करून दाखवले. नंतर थेट लस देण्यापर्यंत एक सक्षम यंत्रणा आपण उभारू शकलो हे महत्वाचे आहे. अजून या लसीचे कोणावरही मोठे दुष्परिणाम झाले आहेत असे दिसले नाही.
काही जणांचे लस घेतल्यावर मृत्यू झाले, परंतु मृत्यूचे कारण लस हे नव्हते, असे सांगण्यात येत आहे.
भारतात आता लसीकरण वेग घेत आहे. सुमारे ७० लाख लोकांना आपण २६ दिवसात लसीचा पहिला डोस दिला. एवढ्याच लोकांना लस देण्यास अमेरिका व ब्रिटन याना जास्त दिवस लागले. लसीबाबत सुरुवातीला जी शंका होती किंवा या लसीचे काही दुष्परिणाम झाले तर काय, ही भीती होती, ती केव्हाच गेली आहे. तरीही अर्थात ज्यांना अन्य आजार आहेत त्यांनी हे लस घेताना खबरदारी घ्यायला हवी असे सांगण्यात येते.
कोविड-१९ आला त्याला एक वर्ष होतानाच लस द्यायलाही सुरुवात झाली आहे, ही निश्चितच आनंदाची बातमी म्हणायला हवे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!