आमटे, दाभोलकर आणि देशपांडे !
बाबा आमटे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पु ल देशपांडे या तिन्ही व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कामामुळे अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला माहित आहेत. त्यांचे काम त्यांच्या निधनानंतरही आज आपल्या डोळ्यासमोर आहे आणि ते अर्थातच कौतुकास्पद आहे. परंतु गेल्या काही महिन्यात आमटे कुटुंबियातील वाद चव्हाट्यावर आला तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेला ट्रस्ट, त्यांचे कुटुंबीय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांमधला वादही चव्हाट्यावर आला. अशा वादांमुळे बाबा आमटे किंवा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेल्या कामाची प्रत किंचितही कमी होत नसली तरी यापुढे कारभार कसा चालेल याबद्दल मनात सर्वसामान्यांच्या मनामध्ये शंका येऊ शकते. त्याच वेळी पु. ल. देशपांडे यांच्या कुटुंबीयांचे पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेशी पुलं व सुनिताबाई यांचे साहित्य, त्यांचे हक्क यासंबंधीचा वाद चालू आहे. आमटे – दाभोलकर हे विषय वेगळे आणि पु ल देशपांडे यांच्या साहित्यावरचा वाद वेगळा हे जरी असले तरी त्यात या तिन्ही मोठ्या घराण्यांमध्ये असलेली सध्याची अस्वस्थता लोकांना अधिकच अस्वस्थ करणारी आहे यात शंका नाही.
यावर्षी जुलै महिन्यामध्ये लोकसत्तेने आमटे कुटुंबियातील वाद चव्हाट्यावर आणला. पहिल्याच दिवशीच्या बातमीत असे म्हटले होते, की ” कार्यकर्त्यांचा छळ, त्यांच्या बाबतीत होणारी मनमानी, आरोप-प्रत्यारोप, त्यातून उद्भवलेले आमटे कुटुंबियातील वाद यामुळे आनंदवन चर्चेचा विषय ठरले आहे. शिवाय कॉर्पोरेट होण्याच्या नादात अनेक जुन्या प्रकल्पांना लागलेले कुलूप आणि यातून आलेल्या अस्वस्थतेमुळे या प्रकल्पातील माणुसकीची वीणच उसवली आहे.”. या बातमीमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. हा विषय सार्वत्रिक झाला. या आरोपांना डॉ. शीतल आमटे करजगी यांनी उत्तर दिले. समाजमाध्यमांवरही हा विषय गाजला. या वादाचा ताजा अंक २० नोव्हेंबरला झाला.
डॉ. शीतल यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे आमटे कुटुंबियांवर आरोप केले. त्यानंतर आमटे कुटुंबियांनी एक पत्रक काढून या आरोपांचा इन्कार केला. तसे पत्र डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे तसेच डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांनी दिले. फेसबुक लाईव्ह कार्यक्रम झाल्यानंतर फेसबुकवरून डिलीट करण्यात आला. डिलीट झाला असला तरी त्यावरून वाद हा झालाच. हा वाद कुठपर्यंत जाईल आणि त्याचा आनंदवनातील व इतर कामावर किती परिणाम होईल हे येणारा काळच सांगेल. त्या आरोप-प्रत्यारोपात कोणाचे बरोबर, कोणाचे चूक या वादात मला जायचं नाही. परंतु बाबा आमटे यांनी उभारलेले मोठे काम यापुढेही सुरळीत चालू राहावे एवढीच मनापासून इच्छा आहे.
यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर, त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती , डॉ. दाभोलकर यांनी स्थापन केलेला ट्रस्ट आणि संघटना यातील वादाच्या बातम्या दिल्या. महाराष्ट्रातील अनिष्ट प्रथांविरुद्ध गेली काही दशके लढा देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधील मतभेद आता विकोपाला गेले असून समितीमध्ये दुफळी निर्माण झाली आहे, असे सांगून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने समितीचे सध्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि समिती संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कुटुंबीय व समर्थक असे दोन गट कसे पडले आहेत, समितीचा कारभार कसा चालवावा इथपासून ते आर्थिक नियोजन काय असावे ,असे मतभेदाचे मुद्दे असल्याच्या बातम्या दोन भागांमध्ये प्रसिद्ध केल्या.
१९८९ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये फूट पडली होती. त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली तर दुसरीकडे श्याम मानव यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत ठेवली. आता या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार की काय अशी भीती वाटत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दोन दिवस अविनाश पाटील यांची भूमिका, त्यांचे आरोप सविस्तरपणे प्रसिद्ध केले आहेत. डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी हा लेख लिहीपर्यंत त्यांची बाजू मांडली नव्हती. त्यामुळे अजून तरी अविनाश पाटील यांनी केलेले आरोपच सर्वांसमोर आहेत. मुक्ता दाभोलकर आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांची बाजू दिली की हे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर येईल. ”आम्ही याआधीही अंनिसचे सामान्य कार्यकर्तेच होतो, आजही आहोत आणि यापुढेही आम्ही सामान्य कार्यकर्तेच राहू. संघटनेतील वादविवाद संघटनेच्या अंतर्गत सुटावेत, असे आमचे मत आहे. समाजाच्या विवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे.” एवढीच दाभोलकर यांची प्रतिक्रिया आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्राला आनंदवनाची जेवढी गरज आहे तेव्हढीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गरज आहे, त्यामुळे कामातले, पुढील वाटचालीसंदर्भातले वादविवाद अधिक न वाढवता सामंजस्याने काम झाले तर अवघा महाराष्ट्र त्यांचा ऋणी राहील. इथेही दुसरी बाजू माहीत नसल्याने कोण बरोबर, कोण चूक हा निष्कर्ष एवढ्यात काढणे चूक ठरेल.
पु. ल. देशपांडे आजही साहित्य- संगीतविश्वात केलेल्या अजोड कामगिरीमुळे आपल्यातच आहेत असे वाटते. त्यांच्या कुटुंबियांनी पुण्याच्या ‘आयुका’ला पत्र पाठवून पु ल देशपांडे यांच्या साहित्याच्या हक्कांबाबत विचारणा केली आहे. सुनीताबाई देशपांडे यांचे मृत्युपत्र आपल्याकडे आहे आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला हक्क दिलेले आहेत, असे आयुकाचे म्हणणे असले तरी ते देशपांडे कुटुंबियांना मान्य नाही, असे दिसते. श्री जयंत उमाकांत देशपांडे, श्री हेमंत उमाकांत देशपांडे आणि श्री राजेंद्र रमाकांत देशपांडे, त्याचबरोबर उमाकांत देशपांडे आणि रमाकांत देशपांडे यांच्या विवाहित मुली याच पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांचे कायदेशीर वारसदार आहेत, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
पुलंच्या लिखाणाचे हक्क विकून किंवा या हक्कांचा वापर करून पैसे मिळवणे अथवा पुलंच्या साहित्याचा वापर नाटक, सिनेमा, अभिनय यासाठी कोणाला करायचा असेल तर त्यासाठी ‘आयुका ‘ने पैसे घेणे योग्य नाही या नोटीसमध्ये म्हटले आहे. पुलंच्या कायदेशीर वारसांना एका ‘पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना करायची आहे आणि त्यात पुलंचे साहित्य, ऑडिओ, व्हिडिओ तसेच त्यांचे सामाजिक काम यासंदर्भातल्या गोष्टी जतन करायच्या आहेत. या सगळ्यातून कोणत्याही प्रकारे वैयक्तिक पैसा मिळवण्याचा या वारासदारांचा अजिबात हेतू नाही ,त्यामुळे हे पैशासाठी ते करत नाहीत, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. याशिवाय इतरही कायदेशीर मुद्यांचा उल्लेख पत्रामध्ये केला आहे. देशपांडे कुटुंबियांचे वकील समीर तेंडुलकर यांनी आयोगाचे संचालक श्री सोमक रायचौधरी यांना १८ नोव्हेंबर २०२० रोजी हे पत्र पाठवले आहे. ते पत्र मिळाल्याची पोचपावतीही आयुकाकडून त्यांच्याकडे आली आहे. मात्र यावर आयुकाने काय उत्तर दिले ते कळू शकले नाही. पुलंच्या लेखनावर जे पैसे आयुकाने मिळवले आहेत ते परत करावेत अशीही मागणी देशपांडे कुटुंबियांनी केली आहे.
आमटे – दाभोलकर यांच्या कुटुंबियातील वाद आणि पु ल देशपांडे यांच्या साहित्यावरून होणारा वाद पूर्णतः वेगवेगळे असले तरी तीनही घराणी खूप मोठी आहेत आणि हे तीन थोर लोक गेल्यानंतर निर्माण होणारे वाद हेही तितकेच वेदनादायी आहेत. मध्यंतरी नामवंत अभिनेते अतुल परचुरे यांना पुल यांच्यावर एकपात्री प्रयोग सादर करायचा होता. आयुकाने त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची रॉयल्टी मागितली. एवढी रॉयल्टी देण्यास अतुल परचुरे यांनी असमर्थता दर्शवली. मी या कार्यक्रमाचे किती प्रयोग करेन अथवा वर्षभरात मला त्याचे किती पैसे मिळतील याचा काहीच अंदाज नाही आणि तेवढी रॉयल्टी देणे मला परवडणार नाही, असे अतुल परचुरे यांनी कळवले होते. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग करण्याचा निर्णय रद्द करत आहे असेही अतुल परचुरे यांनी कळवले आहे. एवढेच नव्हे तर पु ल देशपांडे यांचे नातू म्हणजे श्री हेमंत देशपांडे यांचे सुपुत्र यश देशपांडे यांना पुलंच्या साहित्याचा वापर करायचा होता, त्यांच्याकडूनही आयुकाने पैसे मागितले, तेव्हा हे सारे प्रकरण उघड झाले. या सार्या प्रकरणावर काहींचा आक्षेप असा आहे की आयुकाला सरकारी अनुदान मिळते, त्यांना असे कोणाचे साहित्याचे हक्क घेऊन पैसे मिळवण्याचा अधिकार नाही. मात्र यासंदर्भात आयुकाकडून अधिकृत पत्र यायचे असल्याने ही सारी कहाणी ‘सफळ संपूर्ण झालेली नाही. आयुकाचे उत्तर आल्यास पूर्ण खुलासा होईल.
या सगळ्या वादांपासून महाराष्ट्र काय धडा घेईल ? बाबा आमटे, डॉ. दाभोलकर यांच्यासारखी माणसे गेल्यावर नवीन पिढीने त्यांचे काम पुढे न्यावे असे अपेक्षित असते. ते कसे न्यावे, आधीच्या व्यक्तीच्या विचारसरणीएवढी प्रगल्भता नवीन पिढीकडे आहे की नाही, ती असल्यास त्यांचा काम करण्याचा दृष्टिकोन कसा राहील? गेलेल्या व्यक्तीचे काम पुढे नेताना सर्वाना बरोबर घेऊन जायचे की स्वकेंद्रित कारभार करायचा, कारभारातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथा मोडून नवीन सुरु करताना त्यातली आधुनिकता बघायची की आणखी काही, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न फक्त या दोघांबाबत नव्हे तर समाजाच्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीबाबत बघायला मिळतात. औद्योगिक क्षेत्रात तर अशी अनेक उदाहरणे असतील. पिढ्यापिढ्यांची काम करण्याची पद्धत, आयुष्य वाहून घेण्याची तयारी आणि निःस्वार्थीपणा सर्वांमध्ये असेलच असे नाही. कारण प्रत्येक पिढीची कामाची पद्धत वेगवेगळी असते. त्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. हा दृष्टिकोन, नवीन लोकांच्या कामाचा दर्जा आणि संघटना चालविताना असलेला मूलभूत दृष्टिकोन हे वेगवेगळे झाले की संघर्ष होतात, हेच आतापर्यंत दिसून आले आहेत, एवढेच ! तिन्ही प्रकरणात लवकरात लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा ठेवू या !