आपण आशादायी राहू…
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्हीचा आनंद घेतल्यावर आता उद्या बलिप्रतिपदा पाडवा आणि भाऊबीज. आणि दीपावलीचा शेवटचा दिवस. मार्चमध्ये येणारा गुढी पाडवा म्हणजे आपण हिंदूंचा नववर्षारंभ. बऱ्याच जणांसाठी, नवीन वर्ष कसे साजरे करायचे, त्यात काय काय संकल्प करायचे हे ठरविण्याचा दिवस. ते संकल्प पुढे किती पाळले जातात हा भाग वेगळा. तसे संकल्प करण्याचा प्रकार दिवाळी पाडाव्यापासून होत नाही हे खरे असले तरी यंदाच्या दिवाळी पाडव्यालाही आपण प्रत्येकालाच काही न काही संकल्प करण्याची वेळ आली आहे, असे समजायला हरकत नाही. याचे कारण कोरोना!
कोरोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य बदलून जाणार आहे. किंबहुना बदलून गेलेच आहे. आणि हे फक्त ‘वर्क फ्रॉम होम’पुरतेच बदलले असे अजिबात नाही. खण्यापिण्याच्या सवयींपासून ते सर्व बदलले आहे. एकमेकांशी संपर्क साधण्याची पद्धत बदलली आहे. प्रत्यक्ष भेट झाली तरी थोडा परकेपणा ठेवावा, ही जाणीव प्रत्येकात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. देशाची आणि प्रत्येक माणसाची अर्थव्यवस्था बदलली. देशादेशांमधले संबंध बदलले. परदेशात शिकण्यासाठी गेलेला माणूस तिथेच अडकून पडला. जाऊ इच्छिणारेही अडकून पडले. उद्योगधंदेही ‘सेटबॅक’ मोडमधून अजून बाहेर येऊन ‘कम बॅक’ मोडमध्ये आलेले नाहीत.
गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी आत्मनिर्भर ३.० योजना जाहीर करून अर्थव्यवस्थेत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक माणसात जान आणण्याचा प्रयत्न केला. या योजनांचे आकडे पाहिले की भोवळ येते. ही तिसरी योजना २.६५ लाख कोटी रुपयांची आहे. तिन्ही योजना (सरकार व रिझर्व बँक) मिळून हा आकडा २९ लाख ८८ हजार लाख कोटी इतका महाप्रचंड होतो. या आकड्याचे अर्थव्यवस्थेत किती सकारात्मक पडसाद उमटले हे माहीत नाही, परंतु अलिकडे उद्योग क्षेत्रातून सकारात्मक बातम्या येऊ लागल्या आहेत. ही चांगली बाब आहे. अर्थात सर्व उद्योगांना हा फायदा मिळतो असे नाही.
दसरा ते दिवाळी या दिवसांत मागच्या वर्षी इतक्याच गाड्या विकल्या गेल्या किंवा मागच्या वर्षी इतकेच मोबाईल आणि फ्रीज व इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या गेल्या. ही बातमी सुखावून जात असली तरी तो अर्थव्यवस्थेचा अत्यंत छोटा हिस्सा आहे, बहुसंख्य नागरिकांच्या आयुष्यात तर अजिबात महत्वाचा नाही. आर्थिक योजना आकड्याने कितीही मोठी असली तरी लोकांच्या हातात जास्त पैसा आला तरच त्यांची विविध गोष्टींची मागणी वाढेल. ती वाढली की पुरवठा वाढेल. मगच अर्थव्यवस्था सुधारेल. सध्या पुरवठाही कमी आहे, कारण त्याची निर्मिती कमी आहे, अन्यथा यंदा फ्रीज विक्रीच्या संख्येत खूप वाढ झाली असती, हे मुंबईतील एका विक्रेत्याचे उदगार महत्वाचे आहेत. असे सगळे एकात एक अडकले आहे. ते सगळे जागेवर यायला किती वेळ लागेल हे सांगणे कठीण आहे.
दिवाळी झाल्यावर नाताळ सोडला तर पुढचे काही महिने कोणतेही मोठे सण नाहीत. त्यामुळे अर्थव्यवस्था जागेवर येण्यात अडथळे येऊ शकतात. म्हणूनच मागच्या नऊ महिन्यांइतकेच पुढील नऊ महिनेही महत्वाचे आहेत. कोरोना लस कधी येणार आणि आली तरी प्रत्येक नागरिकांपर्यंत कधी पोचणार हाही प्रश्नच आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याला काही संकल्प करायचे असलेच तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. आता हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु होत आहेत.
उद्यापासून महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे सुरु करायला मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. राज्याला दिलेली ही दिवाळी भेटच म्हणायची. मंजुरी दिली तर सगळे लोक एकदम गर्दी करतील अशी भीती मला गैरलागू वाटते. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात झालेली गर्दी पाहूनही मी हे मत व्यक्त करीत आहे. याचे कारण बहुतांश माणसांना स्वतःला जपण्याचे भान या काळात आले आहे, असे वाटते. मास्क न घालता रस्त्यावरून फिरणाऱ्याना होणाऱ्या दंडाची रक्कम पाहिली की निदान त्या जरबेपोटी तरी ते मास्क घालतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
मनुष्याचा स्वभाव आशादायी आहे हीच तर आपली जमेची मोठी बाजू आहे. तसे नसते तर सध्याच्या आर्थिक / आरोग्यासंदर्भातल्या संकटात आपण टिकून राहू शकलो नसतो. या परिस्थितीला सामोरे न जाण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध नव्हता हे खरे असले तरी, ”ही परिस्थिती सुधारेल, सारे सुरळीत होईल,” ही आशाच तर आपल्याला जागवत असते, धीर देत असते. मराठी माणूस उत्सवप्रिय असतो. कोणताही सण असला या मराठी माणसाचा उत्साह बघण्यासारखा असतो. तरीही गेल्या नऊ महिन्यातले सण हा माणूस साजरे करू शकला नाही. वेगवेगळ्या भागांत दहीहंडीचे थर लागले नाहीत, ‘गोविंदा रे गोपाळा”चे आवाज घुमले नाहीत. गणपती मूर्तींची उंची कमी झाली (हे मात्र चांगले झाले), समोरची गर्दी कमी झाली, रस्त्यारस्त्यावरचे मंडप दिसले नाहीत आणि प्रचंड मोठ्या संख्येने होणारा ‘गणपती बाप्पा मोरया ”चा गजरही झाला नाही.
घरगुती गणपती मात्र आणले गेले आणि गणरायांना विराजमान केले गेले, साग्रसंगीत पूजा झाली आणि घरटी चार माणसांच्या उपस्थितीचे निर्बंध पाळून गणरायाला निरोपही देण्यात आला. दसराही तसा शांतच गेला. दिवाळी येईपर्यंत कोरोना निर्बंध तसे शिथिल झालेले होते, त्यामुळे सर्वांची उत्सवप्रियता पुन्हा जागी झाली आणि ते मोठ्या संख्येने बाहेर पडले. याचे परिणाम कदाचित १५ दिवसांनी दिसतीलाही. ते फार भयंकर नसतील एवढी आशा आपण करू या.
गेल्या काही महिन्यांत राज्यावर नैसर्गिक वादळ, अतिवृष्टी यामुळे आधीच खचून गेलेला शेतकरी आणखी खचून गेला. त्याला उभे करण्याची तातडीची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे मदत पोहचते का हे पाहण्याची गरज आहे. बंद पडलेले लघु किंवा मध्यम क्षमतेचे उद्योग पुन्हा उभारून रोजगार निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आर्थिक, सामाजिक आव्हाने कमी नाहीत. परंतु दीपावलीत उजळून गेलेल्या दिव्यांचा प्रकाश या सगळ्यांच्या आयुष्यात लख्ख प्रकाश पाडो, एवढीच इच्छा !
या आशादायी विचारांसह … आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!