भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी दोन पूर्ण दिवसही चालली नाही. भारताने या कसोटीत विजय मिळवला असला आणि ती बाब कितीही सुखावह असली तरी अशा प्रकारच्या दिवस-रात्र कसोटी खेळवायच्या का यावर विचार व्हायला हवा.
अहमदाबाद कसोटीत गुलाबी रंगाचा चेंडू वापरला गेला. त्या चेंडूंबद्दल अनेक भारतीय खेळाडूंनी आक्षेप घेतला आहे, अशी बातमी काल प्रसिद्ध झाली आहे. इंग्लंच्या खेळाडूंनीही आक्षेप घेतला असणे शक्य आहे. एरवी इतक्या कमी वेळात कसोटी संपल्यावर खेळपट्टीला खलनायक ठरविण्यात येते. तसेच याहीवेळी करण्यात आले. पण नंतर लक्ष वळले ते गुलाबी चेंडूंकडे आणि सामन्यांच्या वेळेकडे.
अवघ्या ३८७ धावांत ३० बळी (त्यातील २८ फिरकी गोलंदाजांनी घेतलेले) आणि सामना निकाली ठरला हे आधी कोणीच अपेक्षित धरले नव्हते. रोहित शर्माने नंतर, ‘खेळपट्टीचा दोष देऊ नका, ती खेळण्याच्या लायकीची होती,” असे म्हटले आहे. लाल चेंडू नेहेमी वापरला जातो, पण त्याला सामोरे जाताना काही प्रश्न येत नाही. गुलाबी चेंडू मात्र एकदम वेगाने येतो, चेंडू वळला नाही तरी सरळ आलेल्या चेंडूने फलंदाज LBW होतो.
३० पैकी २१ फलंदाज अशा सरळ आलेल्या चेंडूने फसले व बाद झाले असा ट्विट केविन पीटरसन या इंग्लंडच्या माजी खेळाडूने केला आहे. या सगळ्यांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन भरपूर झाले हा भाग वेगळा, पण क्रिकेटचे भले झाले या या प्रश्नावर भाला मोठा नकार द्यावा लागेल.
मुळात अशा दिवसरात्र कसोटी खेळविण्याची गरज का भासली? गेल्या काही वर्षांत क्रिकेट पार बदलले. कसोटी खेळताना प्रत्येक खेळाडूचा कस लागत असतो. कसोटी हेच खरे क्रिकेट असे म्हटले जाते ते बरोबर आहे. परंतु हा सारा खेळ पैशांभोवती फिरतो. तिकीटविक्री, स्टेडियममधील जाहिराती, टीव्ही प्रक्षेपण हक्क, विविध कंपन्यांची स्पॉन्सरशिप, तो पैसे वसूल करण्यासाठी टीव्ही चॅनेलवर जाहिरातींचा मारा हा सगळा खेळ कोट्यवधी रुपयांचा आहे. हा आकडा आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. कित्येक हजार कोटींचा आहे.
प्रेक्षक येत नसतील तर किंवा कसोटी दोन-तीन दिवसांत संपली तर या कंपन्यांना प्रचंड तोटा होतो. अहमदाबाद कसोटी दोन दिवसात संपल्याने उरलेल्या तीन दिवसांचा जाहिरातीचा महसूल बुडाला, टीव्ही चॅनेलचेही नुकसान झाले. इथे खेळ दुय्यम ठरतो, पैसा महत्वाचा आहे. हे इतर कोणत्याही खेळाबद्दल म्हणता येत नाही, क्रिकेटबद्दल मात्र हमखास म्हणता येते.
असा हा खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांना म्हणे पाच दिवसाची कसोटी ‘कंटाळवाणी ‘ वाटू लागल्याने ते मैदानात येईनासे झाले. प्रेक्षकसंख्या रोडावू लागल्याने ‘कंटाळवाणे ‘ सामने टाळून झटपट सामने खेळविण्याचा विचार झाला, त्यालाही आता दोन दशके होऊन गेली.
एक दिवसीय क्रिकेट लोकप्रिय झाले. कारण सकाळी सामना सुरु झाला की संध्याकाळी निकाल ठरलेला. कालांतराने हेही क्रिकेट कंटाळवाणे झाले आणि टी-२० सामन्यांचा उदय झाला. इथे तर अवघ्या तीन तासांत निकाल लागतो. हे लोकप्रिय होते आहे हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात आल्यावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जन्माला आली.
खेळाडूंचे लिलाव व्हायला लागले, आणि आपला लिलाव होतो आहे यावर खेळाडूही खुश व्हायला लागले. कारण कल्पनेपलीकडचा पैसे अत्यंत कमी वेळात खात्यांमध्ये येऊ लागला, जाहिरातींमुळे क्रिकेटपटू दिवसरात्र घरांघरांमध्ये पोचले आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये धावांपेक्षाही वेगाने वाढ व्हायला लागली. या सगळ्यामध्ये क्रिकेट या ‘gentleman’s Game चे काय झाले? हा विचार कोणीच करत नाही.
यात प्रश्न खेळाडू पैशाने गब्बर झाले हा नाही. तुम्ही आम्ही नोकरी करून पैसे मिळवतो, क्रिकेट खेळणे हे क्रिकेटपटूंचे उपजीविकेचे साधन आहे, ते अल्पावधीत गब्बर झाले तर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, असा युक्तिवाद यावर केला जाईल. तो बरोबरही आहे. परंतु शेवटी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पैसा आणि खेळाचा दर्जा यात समतोल साधायचा की नाही हा खरा प्रश्न आहे.
सचिन, द्रविड, विराट, धोनी यांसारख्या खेळाडूंची कारकीर्द प्रदीर्घ असल्याने आर्थिक लाभही मोठे असतात. परंतु त्यासाठी त्यांना स्वतःचा दर्जाही टिकवून ठेवावा लागतो, त्यासाठी अपार परिश्रम घ्यावे लागतात आणि त्यांना मिळणारे अफाट पैसा हा त्याची किंमत म्हणून घेतला जातो, हे समजून घेतलेच पाहिजे. परंतु हे भाग्य फार थोड्या खेळाडूंच्या वाट्याला येते. बहुसंख्य लोकांची क्रिकेट कारकीर्द एवढी प्रदीर्घ नसते, त्यामुळे कमी काळात जास्तीत जास्त पैसे हा क्रिकेटचा सर्वात मोठा फायदा आहे, हे मान्य करायला हवे.
क्रिकेटपटूंची कमाई हा इथे दुय्यम विषय आहे असे गृहीत धरले तर मग मुख्य मुद्दा काय? या पैशाच्या खेळात क्रिकेटच्या दर्जावर परिणाम झाला का हा तो विषय. तो परिणाम निश्चित झाला. तो सुखावह नव्हता. आयपीएलमध्ये काही दिवसांपूर्वीच काही क्रिकेटपटुंवर जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यावर टीकाही झाली. ती स्वाभाविक होती. इतके पैसे एखाद्या भारतीय खेळाला मिळाले तर या खेळणं उर्जितावस्था प्राप्त होईल. वस्तुस्थिती तशी नाही.
गेले वर्षभर कोरोनामुळे मैदानात शुकशुकाट होता. क्रिकेट , फुटबॉल यांचे सामने झाले, पण प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत. आता प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. अहमदाबादमधल्या कसोटीत प्रेक्षकांची गर्दी पाहून गुजरातमधून कोरोनाने काढता पाय घेतला असावा असा समज कोणाचाही होऊ शकतो. मधल्या मध्ये या कोरोनाने रणजी स्पर्धेचा बळी घेतला आणि एक दिवसीय विजय हजारे चषक महत्वाचा ठरला. रणजी स्पर्धा हा कोणत्याही क्रिकेटपटूंचा भारतीय संघात प्रवेश करण्यासाठीचा पहिला व अत्यंत महत्वाचा टप्पा ठरतो.
कोरोनामुळे प्रत्येक राज्यात जैवसुरक्षा असलेले (बायोबबल) वातावरण निर्माण करून खेळाडूंना त्यात ठेवता येणार नाही, असे कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिले. ते कारण समजण्यासारखे असले तरी रणजी स्पर्धा रद्द होणे यासारखे दुर्दैव दुसरे नाही. पाय डळमळीत झाला तर पुढे काय होणार हा प्रश्नच आहे. आणि याच पार्श्वभूमीवर दिवस रात्र कसोटीचा अट्टाहास व दोन दिवसात संपलेली कसोटी हा ‘न्याय ‘ कोणता म्हणायचा?
अहमदाबाद कसोटीवर अजूनही टीका होत आहे. चौथी कासोटीही अहमदाबादलाच खेळविली जाणार आहे. पुढील टी ट्वेंटी सामनेही अहमदाबादलाच आहेत. त्यासाठीच तर एवढे मोठे स्टेडियम उभारून त्याचे उद्घाटन करण्यात आले. एक दिवसीय सामने पुण्याला होणार आहेत. इंग्लंड संघाला कोरोनामुळे फार शहरांत जावे लागू नये म्हणून असे करण्यात आले आहे. ते समजण्यासारखे आहे. परंतु तिसऱ्या कसोटीतून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काही धडे घेईल अशी अपेक्षा करायची का?
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!