नवे काही करण्यासाठी…
ॲमेझॉनसारखा एक विशाल उद्योग उभरायचा, त्याची भरभराट करायची आणि तो मध्येच सोडून देऊन आपल्याच कंपनीतील दुसऱ्याकडे ती सूत्रे सोपवायची हे काम साधे नाही. जेफ बेझोस या जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या माणसाने गेल्या आठवड्यात ते काम केले आणि आपण ॲमेझॉनचे सीईओपद सोडत असल्याचे जाहीर केले. ॲमेझॉन ई कॉमर्ससाठी ओळखली जाते, परंतु आता आपल्याला यापुढे ई कॉमर्सच्या बाहेर जाऊन काही काम करायचे आहे असे त्यांनी सांगितले आहे. ते नेमके काय करणार हे जरी त्यांनी सांगितले नसले तरी जे करतील ते भव्यदिव्य असेल आणि काहीतरी नवा शोध लावून ते नवीन उपक्रम सुरु करतील असे मानायला जागा आहे.
जेफ बेझोस यांनी ॲमेझॉनमध्ये सुरू केलेल्या ‘ॲमेझॉन वेब सर्विसेस’ प्रचंड लोकप्रिय झाल्या आणि हा विभाग सांभाळणारे अँडी जेसी आता बेझोस यांच्यानंतर ॲमेझॉनचे सीईओ होत आहेत. ॲमेझॉनचे प्रमुखपद सोडले तरी ते कंपनी मात्र सोडणार नाहीत. शिवाय बेझोस यांच्याकडे त्यांची वैयक्तिक अशी इतर कामे भरपूर आहेत. अंतराळ क्षेत्रात ते काम करतात, तसेच हवामानबदलाविषयी ते काम करतात आणि द वॉशिंग्टन पोस्टसारखा महत्वाचा पेपर त्यांच्या हातात आहे. या क्षेत्रातील काम ते करतच राहतील, परंतु ते आता नवीन काय करतात ही मात्र ओढ निर्माण झाली आहे.
अर्थात एखादी कंपनी उभारायची, तिला आकार द्यायचा आणि नंतर ती मध्येच सोडून देण्याचे काम इतरांनीही यापूर्वी केले आहे. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी काढली आणि ती ऐन भरात असतानाच त्यातून ते बाहेरही पडले. आज ते स्वतःच्या फाऊंडेशन तर्फे विविध समाजोपयोगी कामे करत असतात. गुगल स्थापन करणाऱ्या सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनीही ती कंपनी आकाराला आल्यावर दुसऱ्या प्रोफेशनलकडे कंपनी सोपविली आणि आज मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोन्ही कंपन्यांनी किती उंची गाठली आहे हे आपण बघतोच आहोत. अशा कंपन्या ऐन भरात आल्या असताना अचानक सोडून जाणे हे का होत असेल असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही.
काहीतरी नवे करण्याची ओढ या माणसाला स्वस्थ बसू देत नाही का? आपण जितका व्यवसाय वाढवायचा आहे तितका वाढवला, आता दुसर्या माणसाने तो वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवावा असा विचार मनात येतो का? किंवा आता आपली आणखीन वेगळी कंपनी स्थापन करून नवीन काहीतरी करून पहावे असे त्यांना वाटते का? अलीकडे व्हॉट्सअपच्या नवीन धोरणाच्या विरोधात अनेक लोक टेलिग्राम किंवा सिग्नलकडे वळले. यातील सिग्नल हे ट्विटरच्या माजी सहनिर्मात्यांनी काढलेले उत्पादन आहे. म्हणजेच ही मंडळी सतत नवीन काहीतरी करत राहतात आणि मुख्य म्हणजे ते यशस्वी करून दाखवतात.
वेळीच सूत्रे सोडण्याची घटना भारतात मात्र दिसून येत नाही. शिवाय अन्य आशियाई देशातही दिसून येत नाही. असे का होत असावे? आपण प्रमुख असल्यावरच कंपनी चांगली चालू राहील, चांगल्या अवस्थेत राहील असे त्यांना वाटते का? नवीन पिढीला बरोबर घेऊन नवीन कल्पना राबवून खूप चांगल्या पद्धतीने कंपनी चालू शकते. त्याचा विस्तारही करू शकते, हा विश्वास या लोकांकडे नाही का? नाही म्हणायला आज काही उद्योगांमध्ये नवीन पिढी सूत्रे हाती घेत आहे, परंतु बिल गेट्स किंवा बेझोस यांनी निर्माण केलेली परिस्थिती तयार झाली म्हणून नव्हे. त्याची कारणे वेगळी आहेत.
भारतातही जेव्हा उद्योग क्षेत्रांमध्ये अशा गोष्टी व्हायला लागतील तेव्हा उद्योग क्षेत्राला नवीन झळाळी येईल असे वाटते. सुदैवाने भारतात स्टार्टअपच्या क्षेत्रात नवीन पिढी येत आहे. आपण आज लहान उद्योग उभारत असलो तरी कधी ना कधी तरी त्याचा वटवृक्ष होईल ही मनीषा बाळगत आहेत. तसे होण्यासाठी भारतात उद्योगशील वातावरण हवे, उद्योजकांना सर्व सोयी-सवलती मिळायला हव्यात, त्यासाठी सर्व राज्यांतील तसेच केंद्र सरकार उद्योगस्नेही हवे. ती संस्कृती देशाच्या काही भागांत आहे, पण बऱ्याच भागात नाही.
सध्या कोविड-१९ च्या काळात तर उद्योगस्नेही असणे अतिशय आवश्यक आहे. त्या दृष्टीने फक्त अर्थसंकल्पात तरतूद करून चालत नाही, प्रत्यक्षात सरकार, केंद्रीय व स्थानिक प्रशासन उद्योगस्नेही असायला हवे. कोणी सांगावे, कधीतरी भारतातूनही अमेझॉन तयार होईल. टाटा, बिर्ला, रिलायन्स वगैरे उदाहरणे आहेतच. परंतु त्यापेक्षाही भव्य स्वप्ने पाहणारे तरुण भारतात नाहीत यावर माझा विश्वास नाही.
ॲमेझॉनचेच उदाहरण घ्या. जेफ बेझोस यांनी ॲमेझॉन स्थापन केली ती ५ जुलै १९९४ रोजी. म्हणजेच आता जवळपास पंचवीस वर्षे झाली. सुरुवातीला केवळ पुस्तके विकण्याचे ठिकाण म्हणून ‘ॲमेझॉन’ची ओळख होती. पण आज तीच ओळख एक मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी अशी झाली आहे. त्यातही ई-कॉमर्स, क्लाऊड कम्प्युटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अशा गोष्टींसाठी ही कंपनी ओळखली जाते.
अमेरिकेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातली पहिल्या पाचातली ही कंपनी आहे. गुगल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक या इतर चार कंपन्या आहेत. २०१५ मध्ये ॲमेझॉनने वॉलमार्टला मागे टाकले आणि नंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही. आज अमेझॉनचे इतर अनेक सेवांमध्ये विस्तारीकरण झाले आहे. आणि ई-कॉमर्स क्षेत्रांमध्ये बरीच स्पर्धा वाढली असली तरी ॲमेझॉनने स्वतःचे असे स्थान मिळवले आहे. सध्याच्या स्पर्धेला तोंड देण्याचे काम अँडी जेस्सी यांना करायचे आहे. जेफ बेझोस यांच्याबाबत ते जगातील सर्वात श्रीमंत कसे झाले अथवा त्यांची पत्नीला घटस्फोटावेळी प्रचंड रक्कम कशी दिली याच्या चारचा रंगण्यापेक्षा त्यांची ॲमेझॉनची यशस्वी गाथा जास्त चर्चिली गेली तर अधिक चांगले!