मुकुंद बाविस्कर, नाशिक
जागतिक स्तरावरच भारतीय गणितज्ज्ञांची मोठी परंपरा लाभली आहे. अलीकडच्या काळातही पाश्चात अभ्यासक असोत की चीन, जपान मधील विद्यार्थी भारतीय गणितज्ञ भास्कराचार्य यांचे धडे गिरवतात. हे वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु याची प्रचिती खुद्द होमी भाभा विज्ञान केंद्राचे प्रमुख आणि गणित विषयाचे संशोधक, अभ्यासक प्रा. डॉ. सुधाकर आगरकर यांना आली.
यासंबंधी अधिक माहिती देताना गणित तज्ज्ञ प्रा. दिलीप गोटखिंडीकर यांनी सांगितले की, साधारणत: तीन-चार वर्षांपूर्वी गणिताच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याकरिता प्रा. सुधाकर आगरकर हे जपान येथे गेले होते. तेथे त्यांनी इंग्रजी भाषेत गणित विषयावर व्याख्यान दिल्यानंतर त्यांना एक पुस्तक भेट देण्यात आले. त्यांनी ते उघडून बघितले असता ते इंग्रजी भाषेत नव्हे तर जपानी भाषेत होते.
मला जपानी भाषा येत नाही हे नेमके कोणत्या विषयावरील पुस्तक आहे? अशी विचारणा आगरकर यांनी केल्यावर तेथील संयोजकांनी सांगितले की, थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या गणित पद्धतीविषयी जपानी भाषेतील हे पुस्तक आहे. जपानी शाळेतील विद्यार्थ्यांना या पुस्तकातूनच गणिताचे धडे देण्यात येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजही जपानमध्ये याच पुस्तकातून धडे दिले जात असल्याचे गोटखिंडीकर यांनी सांगितले आहे.