ख्यातनाम उद्योगपती आनंद महिंद्रा हे एक चौफेर पाहणारे जागरूक व्यक्तिमत्व आहे. अनेकदा अप्रकाशित घटना, लोकांची कामगिरी ट्विटरच्या माध्यमातून ते लोकांच्या समोर आणतात. प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या अशा लोकांना केवळ प्रकाशात आणून ते थांबत नाहीत. खूपदा ते अशा लोकांना सहाय्य करण्यात देखील आघाडीवर असतात. नुकतेच त्यांनी तमिळनाडच्या कोईम्बतूरमध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला राहण्यासाठी एक नवा कोरा फ्लॅट घेऊन दिला आहे.
संपूर्ण तमिळनाडमध्ये त्या महिलेला इडली अम्मा म्हणून ओळखले जाते. पंच्यायशी वर्षाच्या ह्या महिलेची कहाणी विलक्षण आहे असेच म्हणावे लागेल. ती समजाऊन घेतली तर तिच्याबद्दल आणि कोणताही स्वार्थ आणि नातेसंबंध नसतांना तिच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्याबद्दल कमालीचा आदर वाटल्याशिवाय राहत नाही.
तमिळनाडूतल्या कोईम्बतूरच्या सीमेवरच्या वादिवल्लमपलायम येथे राहणाऱ्या कमलाथल ह्या एका वृद्ध महिलेची ही कहाणी आहे. जवळच्या लोकांमध्ये पोट्टीम्मा म्हणून ओळखली जाणारी ही महिला गेली तीस वर्षे इडल्या तयार करून विकते आहे. त्या व्यवसायावर तिचा परिवार अवलंबून आहे.
वय म्हणजे तिच्या दृष्टीने केवळ एक आकडाच आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. ह्या वयात देखील त्या दररोज पहाटे पाच वाजता उठतात देवाची प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. नंतर त्या आपल्या मुलासह सांबारसाठी आवश्यक साहित्य खरेदी करायला जातात. मग त्या स्वतः आटुकल्लू ह्या पारंपारिक दगडी रगड्यावर म्हणजेच हँड ग्राइंडरमध्ये इडलीचे पीठ आणि चटणी तयार करण्यासाठी नारळ, मीठ आणि इतर देशी मसाले वाटतात. जेवण चवदार व्हावे यासाठी त्या दररोज वेगळ्या प्रकारची चटणी तयार करतात..
पोट्टीम्मा आजही पारंपारिक मातीच्या चुलीचा उपयोग इडली तयार करण्यासाठी करतात. आपल्या कामाशी त्या अत्यंत प्रामाणिक आहेत आणि त्यामुळेच ग्राहकांच्या स्वागतासाठी सकाळी सहा वाजता दुकान उघडतात आणि त्यांनी बनवलेले इडलीचे पीठ शिल्लक असेपर्यंत ते चालू असते. एकत्र कुटुंबात अनेकांसाठी स्वयंपाक करण्याची सवय असल्याने ह्या इडलीच्या व्यवसायातले कष्ट त्यांना फारसे जाणवत नाहीत.
दररोज त्यांच्या कुटुंबातील सदस्य शेतात काम करण्यासाठी जायचे आणि घरी पोट्टीम्मा एकट्याच रहायच्या ह्या एकटेपणामधून त्यांनी इडल्यांच्या व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला स्थानिक लोकांसाठी इडली बनवण्याची त्यांची इच्छा होती, जे अजूनही चालू आहे. जवळजवळ सर्व शेजारी पाजारी त्यांचे ग्राहक आहेत . दररोज त्यांच्याकडून नियमित इडल्या घेणारे अनेकजण जवळच्याच बोलूवंपट्टी, पुळुवंपट्टी, थेंकराई आणि मठीपालयममधील लोकांसह जेवण घेण्यास येतातयाशिवाय स्थानिक पंचायत समितीच्या माध्यमिक शाळेतील मुले देखील शाळेत जाण्यापूर्वी त्यांचा नाश्ता करतात.
कोरोनाच्या काळात घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे त्यांना इडली-चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिळवायला खूप त्रास जाणवला होता. प्रसंगी त्यांना त्यासाठी जास्तीचे पैसे देखील मोजावे लागले होते. पण ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात त्यांनी आपले काम सुरू ठेवलेले होते.
विशेष म्हणजे त्या काळातल्या परिस्थितीचा फायदा घेत अनेकांनी आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या असतांनाच आपल्या इडल्या सर्वसामान्य जनतेच्या भुकेची गरज भागवण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी इडल्यांची किंमत बदलण्यास नकार दिला आणि एक रुपयात इडली हे आपले वैशिष्ट्य कायम ठेवले होते.
लॉकडाउनमध्ये आपापल्या गावी परत जाणाऱ्या हजारो लोकांच्या रांगा आपण पाहिल्या होत्या. शेकडो मैलांची पायपीट करणाऱ्या लोकांसाठी पोट्टीम्मा यांच्या एक रुपयातल्या इडल्या म्हणजे एक मोठाच दिलासा ठरल्या होत्या. त्याकाळात त्यांना साऱ्या राज्यात इडलीअम्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांच्यावर लेख छापले गेले. त्यांच्या कामात त्यांना सहाय्यभूत ठरणारे अनेक हातदेखील ह्यामुळे पुढे सरसावले.
अनेकांनी इडलीच्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य त्यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली. ख्यातनाम उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या निदर्शनास पोट्टीम्मा यांचे काम आपल्यावर त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची इच्छा महिंद्रा यांनी वउक्त केली. ख्यातनाम शेफ विकास खन्ना यांनी पोट्टीम्मा यांच्या कार्याला सहाय्य म्हणून तांदूळ आणि इतर सामुग्री पाठवून दिली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील पोट्टीम्मा यांना गॅस कनेक्शन मिळण्यासाठी सहाय्य केले. पोट्टीम्मा यांच्या कार्याला तमिळनाडच्या शासनाने देखील सहाय्य केले. अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी त्यांना एक नवा कोरा फ्लॅट घेऊन दिला आहे.
अतिशय सामान्य स्थितीतली एक वृद्ध महिला आपल्या स्वतःच्या मेहेनतीने आणि परिश्रमाने अगदी साधे काम देखील अतिशय उच्च स्तरावर नेऊन ठेवते आणि अनेकांच्या आदराचे आणि कौतुकाचे केंद्र बनते .. त्याच वेळी हजारो भुकेल्या लोकांच्या तोंडी घास भरवते हे एक अद्भुत असे उदाहरण आपल्याला इडलीअम्मा यांच्या रूपाने पहायला मिळाले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!