सर्वसामान्य माणसांच्या व्यथा, वेदनेचा उद्गार
कवितेतून शब्दबध्द करणारा कवी : डॉ.संजीवकुमार सोनवणे
कलाकृतीचा आशय हा नेहमी साहित्यिकाच्या अनुभवाशी जोडला जातो. कारण कोणतीही कलाकृती एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आकाराला येते. शब्दबद्ध होते. म्हणून तिच्या निर्मितीमध्ये कोणता ना कोणता सामाजिक अथवा सांस्कृतिक संदर्भ येत असतो. त्यामुळे साहित्यकृतीत अभिव्यक्त होणाऱ्या घटनांचा स्पर्श होऊन आत्मिक पातळीवर त्या शब्दबद्ध होतात. म्हणजेच कलाकृतीच्या निर्मितीमध्ये साहित्यिकाच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक वास्तवाचा नक्कीच परिणाम होत असतो. थोडक्यात सामाजिक पार्श्वभूमीवर साहित्य जन्माला येत असते. म्हणून साहित्य आणि समाज हे दोन्ही एकमेकांचे बिंब प्रतिबिंब मानले जाते. साहित्यिकाच्या संवेदनशीलतेचा त्याच्या कलाकृतिच्या निर्मितीशी संबंध येत असतो. नव्हे तर त्या मानसिकतेतून त्याची कलाकृती निर्माण होत असते. साहित्य कलाकृतीचा विषय सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असतो. असे असले तरी साहित्यिकाचा अनुभव मात्र एक अस्वस्थ करणारा अनुभव असतो. थोडक्यात साहित्याचा समाजावर परिणाम होत असतो. तसेच समाज घडविण्यात साहित्याचा सहभाग असतो. यांचा हा सहभाग परस्परसंबंध दाखवण्यापुरता कधीच मर्यादित नसतो. साहित्यकृतीच्या निर्मितीप्रक्रियेत प्रेरणा अनेकदा सामाजिक वास्तवातून मिळत असते. साहित्यिक ज्या वातावरणात लहानाचा मोठा होतो. त्या वातावरणाचा त्याच्या मनावर परिणाम होतो. त्या परिणामांची परिणती म्हणजे त्याची साहित्यकृती होय. म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक सुद्धा तत्कालीन समाजाच्या साहित्याचा अभ्यास करताना दिसतात. कारण तत्कालीन समाजात होणारे स्थित्यंतर साहित्यकृतीमध्ये कळत नकळत दिसत असतात. म्हणून साहित्यकृती ही त्याकाळाची प्रतिनिधित्व करत असते. आज आपण खानदेशातल्या बालकवींच्या जन्मभूमीत अर्थात धरणगाव जि. जळगाव येथे वास्तव्य करणारे साहित्यिक कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या कवितांचा परिचय आजच्या कवी आणि कविता या सदरातून करून घेणार आहोत.
कवी डॉ.संजयकुमार सोनवणे यांची कविता विशेषत: सामाजिक संदर्भ घेऊन येतांना दिसते. त्यांच्या कवितेत सामाजिक संघर्ष, सामाजिक,आर्थिक स्थित्यंतरे,परिवर्तन,विद्रोह आणि काहीसा निसर्ग डोकावतांना दिसतो. त्यामुळे संजीवकुमार सोनवणे हे सातत्याने रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, सामाजिक अपप्रवृत्ती या सर्वांच्या विरोधात उभे राहिलेले दिसतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या आदर्शांच्या वाटेवर त्यांच्या कवितेची वाटचाल सुरू आहे.म्हणूनच वेळप्रसंगी त्यांची कविता बंड करून उठतांना दिसते. सामाजिक समतेच्या विरोधात बंडाची भाषा करते. सामाजिक परिवर्तनासाठी विद्रोह करतांना दिसते.
दलित समाजातील सर्वसामान्य माणूस म्हणून वाट्याला आलेलं जगणं त्यांच्या मनाला अधिक चिंतनशील बनवत गेलं असावं. त्यामुळे तळागाळातील समाजाच्या जाणीवांचा शोध त्यांच्या कवितेने प्रामाणिकपणे घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याचबरोबर सामान्य माणसाच्या मानवी मूल्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न त्यांच्या कवितेने केलेला दिसतो. कोणताही कवी जेव्हा लिहू लागतो तेव्हा त्याच्या बालपणापासून अनुभवलेल्या जगण्याच्या काही गोष्टी कवितेमधून उद्रीत होतात. कवी संजीवकुमार सोनवणे याला अपवाद नाही. ग्रामीण भागात त्यांचे बालपण गेले. तिथल्या सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदनांनी त्यांच्या हळव्या मनात कवितेचे शब्द अंकुरत गेले. त्यांच्या मनाची वेदना शब्दांनी जाणली. त्यातून परिवर्तनाची भाषा पुढे आली. कवितेच्या माध्यमातून ती अभिव्यक्त होत गेली. कवी हा इतरांपेक्षा ज्यास्त संवेदनशील असतो.
इतरांच्या दुःखाची जाणीव त्याला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून दलित समाजातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या व्यथा,वेदनांचा उद्गार होऊन त्यांची कविता येते. त्यातून त्यांचे सामाजिक भान आणि दायित्व कळत नकळत सिद्ध होते. मागासवर्गीय समाजात जन्माला येऊन अनुभवलेल्या सामाजिक वास्तवाचे चटके हेच त्यांच्या कवितेचे प्रेरणास्थान वाटते. शेतात राबणा-या, वेळप्रसंगी मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांचा मनाचा कोलाहल त्यांच्या बालमनाने बालपणापासून अनुभवला. वाट्याला आलेलं फाटकं आयुष्य शिवताना त्यांनी भोगलेल्या हाल-अपेष्टा हाच त्यांच्या चिंतनाचा आणि लेखनाचा विषय बनला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना कितीदा तरी आयुष्य फाटत गेले. उसवत गेले. त्याला जोडण्याचा आईवडिलांनी केलेला प्रयत्न केला. हे सारं जगण्यातलं भयावह वास्तव त्यांची कविता घेऊन येतांना दिसते. हे जगण्यातलं, अनुभवातलं, वेदनेचं भरलेपण चिंतनातून अंकुरत राहिलं. शब्दांच्या ओंजळीत फुलत राहिलं. कवितेतून बोलत राहिलं.
कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे यांचा ‘माझ्या घराचे दार’ हा कवितासंग्रह, ‘जागर’ लोकनाट्य, ‘भादवा’ ललित लेखसंग्रह, ‘गाव कुठे आहे?’ कथासंग्रह ‘परिवर्तनवाद आणि दलित कविता’ संशोधन ग्रंथ प्रकाशित असून ‘आंबेडकरी मूल्यदर्शी प्रतिबिंब’ वैचारिक ग्रंथ, ‘खानदेशी भाषा,साहित्य आणि संस्कृती’ लेखसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा प्रफुलदत्त पुरस्कार. मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमावती देशमुख साहित्य पुरस्कार. मुस्लिम सोशल कमेटीचा संत कबीर पुरस्कार.महाराष्ट्र साहित्य परिषदेचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार. कामगार कल्याण मंडळाचा दै. सकाळ पुरस्कृत नारायण सूर्वे पुरस्कार. कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता पुरस्कार. दै.लोकमतचा राज्यस्तरिय ललित लेखनाचा प्रथम पुरस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद, बार्शीचा शाहीर अमर शेख वाड्.मय पुरस्कार ,महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचा वाड्.मय पुरस्कार. खानदेश अहिराणी कस्तुरीचा खानदेश रत्न पुरस्कार. सप्तर्षी आयोजित अखिल भारतीय मराठी कथालेखन स्पर्धेत रूपये दहा हजाराचा प्रथम पुरस्कार,.महाराष्ट्र अनुवाद परिषद बुलढाणा यांचा भगवान् ठग पुरस्कृत तुका म्हणे साहित्य पुरस्कार, अस्मितादर्श उत्कृष्ट वाड़मय पुरस्कार, दीनमित्र मुकुंदराव पाटील स्मारक समितीचा सत्यशोधक साहित्य पुरस्कार, धनदाई महाविद्यालय, अमळनेरचा ‘ग्रंथमित्र ‘ पुरस्कार, सूर्योदय सर्वसमावेशक साहित्य मंडळाचा सूर्योदय साहित्य पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमात सात कवितांचा समावेश करण्यात आलेला असून एम.ए.अभ्यासक्रमात दोन कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य आहेत.तसेच महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळावर लेखन व समीक्षण समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. (आंबेडकर विचारधारा) अभ्यासक्रमाचे लेखनकार्यात त्यांचा सहभाग आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या पुस्तकाचा अहिराणी बोली भाषेत अनुवाद केला आहे. दूरदर्शन व आकाशवाणी वरून त्यांचे काव्यवाचन भाषणांचे कार्यक्रम प्रसारित होत असतात. त्यांच्या कविता व कथांचा हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद झालेला आहे.
कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी घरातील आणि समाजातील अठराविश्व दारिद्र्य, गरिबी अनुभवली असल्याने काळाच्या ओघात बुजलेला भूतकाळ त्यांच्या कवितेला खतपाणी घालतांना दिसतो. त्यांची कविता माणसाने माणसांशी माणूस म्हणून वागण्याबाबत आग्रही राहिलेली दिसते. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकात मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन झाले. त्याचबरोबर माणसामाणसात भिंती उभ्या राहिल्याचे त्यांची कविता सूचित करतांना दिसते. घर,गल्ली, गाव आणि माणूस किती वेगाने बदलतो आहे. याची नोंद त्यांची कविता घेतांना दिसते. त्यांच्या कवितेला सामाजिक परिवर्तनाचा जसा ध्यास आहे तसाच धार्मिक,सांस्कृतिक विकासही अपेक्षित आहे. सामान्य माणसांच्या दु:खाचा कढ हा नेहमी आसवातून व्यक्त होतो. तो कढ त्यांची कविता शब्दातून सर्वदूर पोहोचविण्याचे काम करतांना दिसते. त्या संदर्भात कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे लिहितात-
इथल्या आसवांना साथ माझी
पटेल त्याने ल्यावे पटेल त्याने प्यावे.
आसवं माझी मित्रच आहेत
ज्यांनी शिकवलंय सूर्याचं गाणं
गाऊन पानगळ झेलण्याचं
फरक एवढाच की,
डोळ्यात अंगार असताना आसवंही पेटून द्यावीत.
आसवांच्या रूपकातून सूर्याचं गाणं गाऊन पानगळ झेलण्याचं सामर्थ्य सर्वसामान्यात यावं. हा सम्यक क्रांतीचा मूलमंत्र त्यांची कविता देऊन जाते. आसवांचं सामर्थ्य सांगण्याची भाषा त्यांची कविता करते. कारण आसवं हे नुसतेच आसवं नाहीत. याच आसवात बुद्धाची करुणा असून शांतीचा महान संदेश देण्याचे सामर्थ्य त्यांची कविता आधीरेखीत करून जाते. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा लढा,केलेला संघर्ष, उभी राहिलेली चळवळ, आसवातून लिहिली गेलेली गाणी यांची पुढे गटातटात विभागणी झाल्याचे पाहून आपले शब्द गोठून टाकल्याची खंत त्यांची कविता करते. या बदलाच्या दिशेने बाबासाहेबांचे विचार घेऊन निघतांना कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे लिहितात –
मी या दोन्ही हातांच्या चिमटीत
आता सूर्य पकडून ठेवलाय.
अरे, बदडवा तुमचे ढोल
आणि गा एकतेची गाणी,
अगदी क्षितिज फोडून बाहेर येईस्तोवर.
तोवर हा निघालोय मी,
ह्याच सूर्याच्या तेजात निधळणा्या झंझावातासारखा.
संविधानाच्या रूपाने देशाचे उद्याचे तेजोमय भवितव्य लिहिले जात असतांना इथे मात्र एकीकडे संस्कृती च्या नावने टाळ कुटले जात होते. तर दुसरीकडे आर्थिक ,सामाजिक विषमतेचे बळी पडत होते. अशा विसंगतीत देशाचे भवितव्य घडत होते. बाबासाहेबांच्या रुपानं विचारांचा सूर्य चिमटीत धरून मोठ्या आत्मविश्वासाने त्यांची कविता वाटचाल करत असल्याचे ते सांगून जातात. तरी सामाजिक जीवनात जगतांना आपण आपल्या वाटा आणि दिशा तपासून वेळीच बदलून घेण्याची जाणीव त्यांची कविता करून देते.ते लिहितात –
आता मलाच माझ्या दिशा
बदलून घेतल्या पाहिजेत,
नाहीतर वादळानं भरकटावं बेताल
आणि झाडांनी व्हावं निष्पर्ण
कोरड्या ठणठणीत डोळ्यांसारखे.
कुठल्यातरी प्रदेशातून पाखरे होतात सैरभैर
दंगलीत सापडलेल्या निरागसागत.
आता तर सोसल्या जात नाहीत ह्या उजेडाच्या गोष्टी
शब्दांनी स्फोट कराव्यात तशा,
आणि अंधारही असा डोळ्यांच्या खाचा झालेल्यासारखा.
तरीच ह्या दिशा अशा बदलून घेतल्या पाहिजेत.
निसर्गात नेहमी ऋतूगणिक बदल होतात. तसे बदल आता समाजात, माणसात होत आहे. त्यातून समाजाची मानसिकता बदलत आहे. कोणत्याही क्षणी काय होईल सांगता येत नाही. म्हणून स्वत:च्या दिशा बदलण्याची भाषा कविता करताना दिसते. अन्यथा ब्र्ताल आणि दिशाहीन वादळात भरकटत राहण्याची वेळ येऊ शकते. स्वतंत्र्य,समतेच्या गोष्टी आता मानवत नसल्याची खंत, तसेच दिशा बदलण्याची भाषा कविता करतांना दिसते. हे असेच चालले तर देशाची अखंडता शाबूत ठेवायची कशी? देशातल्या माणसा माणसातील दरी बुजवायची कशी ? या प्रश्नांचे समर्पक शब्दात त्याची कविता उत्तर देते. त्यासंदर्भात कवी सोनवणे लिहितात-
या देशातील सुरंग फेरणा–या माणसांना पाहून तो हसला,
तेव्हाच मी समजलो,
या देशातील माणसांची दरी
त्याला बुजवायची आहे,
धर्माधर्मातील दुरी दूर ढकलायची आहे,
आणि जमलंच तर
देशातल्या अंधारात उजेड ओतायचा आहे.
म्हणून मी त्याला सहज विचारले,
दोस्ता, सुरुंगाच्या ठिणग्या
तुझ्यापर्यंत पोहेचल्या ?”
ठिणग्यांची गोष्ट काय करतोस
अख्खा सुरुंग येथे पेरला आहे.
मी उद्ध्वस्त डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले.
तसा तो बदलला.
त्याच्या डोळ्यातून सांडणारा अंगार
माझ्यात सुरुंगाचा स्फोट करीत होता.
माणसा माणसातील दरी कमी करायची आहे. तर अगोदर धर्माधर्मातील दुरी कमी करावी लागेल. कारण यादेशात धर्म हेच बॉम्बपेक्षा स्फोटक सुरुंग आहे. तेव्हा वेगळ्या सुरुंग लावणा-याचा शोध घेऊन तुरुंगात टाकण्याची गरज नाही. धर्माच्या विषारी विचारातून रोज स्फोट होतात. रोज कितीतरी माणसं मरतात. हे मरण अनेकांना जगवून जातं. जातीयता,धार्मिकता हेच या देशातील सुरुंग असल्याने तेच स्फोट करीत असल्याचे विदारक सत्य त्यांची कविता सांगून जाते. पाखरं आणि माणूस यांच्यातला मूलभूत फरक व्यक्त करतांना कवी सोनवणे लिहितात-
पाखरं तशी बेइमान नसतात.
मात्र, केव्हा केव्हा पाखरं अशी गप्पगार होतात की,
मोसम बदलल्यावरही ती जागा बदलत असतात.
पाखरांच्या प्रदेशात
पाखरं आसवं गाळीत नसतात,
सारं आभाळ पडताळून झाल्यावर
ती सूर्याच्या शोधात निघतात.
पाखरांचं मन इतकं हळवं असतं की,
नुस्ता माणसांचा स्पर्श झाला
तर ती आत्महत्या करीत असतात.
पाखरं निसर्गाशी एकरूप वागतात. माणसांसारखी बेईमानी त्यांच्या रक्तात नसते. पाखरं प्रत्येक संकटांना सामोरे जातात.ती नियती, प्राक्तन अथवा नशिबाला दोष देत नाही. किंवा दुःखाची कारणं न शोधता नव्या उमेदीने आयुष्याला सामोरे जातात. पुन्हा नव्याने आकाश कवेत घेऊन जीवनप्रकाशाच्या शोधात निघतात. परंतु हेच पाखरं माणसांचा स्पर्श झाल्यावर आत्महत्या करतात. हा नैसर्गिक सिध्दांत त्यांची कविता सांगून माणूस आणि पाखरांच्या जगण्यातील तफावत मांडून जाते. आम्ही धर्म वाटून घेतले. देव वाटून घेतले. रंग वाटून घेतले. इतकेच नाही तर राष्ट्रपुरुष सुद्धा धर्म,जात,प्रांतनिहाय वाटून घेतले. हे वास्तव सत्य ते ‘माझ्या घराचे दार’ याकवितेतून अतिशय समर्थपणे मांडताना दिसतात. ते लिहितात –
माझ्या घराचे दार सताड उघडे ठेवून
मी पाहतोय पेटत्या घरांच्या उजेडात
माणुसकीचा जयघोष करणारी माणसे,
धुसमुसत्या चौकाचौकांत छाटल्या जाणा-या
राष्ट्रीय एकात्मतेच्या गप्पांत दडलेल्या
‘गर्व से कहो ‘च्या ललका-या आणि
जातीपातीच्या भिंतीआड दडलेला धर्मनिरपेक्षतेचा पुळका.
तसा मीही बेभान होतो,
घरातल्या देवादिकांच्या तसबिरी
उलटून ठेवायच्या म्हणतोय,
मेरा भारत महानचे चित्र
त्यात फ्रेम करून ठेवायचे म्हणतोय.
‘गर्व से कहो हम भारतीय है ‘ची ललकारी
हम सब एक है ‘ची डरकाळी.
तत्पूर्वी माझ्या जातिबांधवांचे
आपापसातील भांडण
मला थांबवून घेतले पाहिजे,
माझ्या घराचे दार आता लावून घेतलं पाहिजे.
आज समाजात जो उठतो तो भावनेचा बळी ठरून माणुसकीचा जयघोष करत सुटतो. एकात्मतेच्या गोष्टी करतो. वेळप्रसंगी प्रत्येकजण आपापल्या जातीच्या भिंतीआड लपतो. वरवर धर्मनिरपेक्षतेचा खोटा पुळका दाखवतो. हे सगळं बघितल्यावर सामान्यातल्या सामन्यावर परिणाम होतो. अशा अस्वस्थेत देशाचे सार्वभौमत्व कसे टिकविता येईल ? प्रत्येक जातीच्या घोषणा, ललका-या, डरकाळ्या वेगळ्या आहेत. त्यांच्यातील तेढ, वाद थांबविल्याशिवाय भारताच्या महानतेचे चित्र साकार होऊ शकणार नाही. त्यासाठी काही काळतरी सुविचारासाठी ,चिंतनासाठी घराचे दार लावून घेण्याचा सल्ला कवी सोनवणे यांची कविता देतांना दिसते.समाजातील जातीय तेढ कमी करायची असेल तर आपल्याला प्रथम आपला समाज सांधून एकसंघ ठेवला पाहिजे. असा सल्ला त्यांची कविता देतांना दिसते. स्वत:च्या स्वार्थासाठी माणसं अविचाराने वागतात. अशा परिस्थितीबाबत सांगताना कवी संजीवकुमार सोनवणे लिहितात-
आभाळ गर्जत असताना फाटलेली बस्ती
तुला शिवायची ना मित्रा ?
पण थोडं थांब,
आभाळाशी नातं सांगणाऱ्या ठिगळांचा जथ्था येईस्तोवर.
तोपर्यंत एक कर,
वस्तीवरच्या सुयांची
टोकं परजून ठेव —-!
सर्वत्र संभ्रमतेचं वादळ गर्जत आहे. माणसं सैरभैर होत आहे. पहिल्यांदा आपल्याला ही माणसं जोडली पाहिजे. ती जोडतांना सगळ्यांच्या जगण्याचा समान अशा तत्वांचा धागा शोधावा लागेल. त्याशिवाय माणसं जोडणं,एकसंघ करणं कठीण आहे. यासाठी देशाच्या अखंडतेशी, सार्वभौमतेशी नातं सांगणारी चळवळ, संघटन उभं राहत नाही तो पर्यंत इथल्या माणसांची डोकी सुविचारांनी तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा मूलमंत्र त्यांची कविता देतांना दिसते. समाज हा नेहमी स्थिती आणि कालसापेक्ष असतो. त्याचा वापर करणारे या गोष्टींचा विचार करून आपले इप्सित साध्य करून घेण्यात पटाईत असतात. या अनुषंगाने कवी सोनवणे आपल्या एका कवितेत लिहितात-
ते करतात धर्माचा जयजयकार
आणि मी पाहतोय हरवलेल्या चेह-याने
निरपराध बळींना शांती लाभावी
म्हणून आपण काढलेले मूक मोर्चेही
का लाभू देत नाहीत आपल्यालाच शांती ?
मी विचार करतोय
राजकारण त्यांचेच, धर्मही त्यांचा,
फारकतही त्यांचीच
रामही त्यांचा न मंदिरही त्यांचेच
मग माझे तरी काय
तसे त्वेषाने ते ओरडले-
अरे वेड्या, या देशातील माती
आणि लोकशाहीचा नकाशा,
हा देश फक्त तुझा
आणि तू ह्या देशाचा .
आजचे वर्तमान यापेक्षा वेगळे काय ? लोकशाहीत माणसाचे मतदान महत्वाचे असल्याने माणसाला तेवढ्यापुरते महत्व दिले जाते. त्या मतावर राजकारण, धर्मकारण ते सोयीस्करपणे करत राहतात. देशाची भूमी, नकाशा एवढीच सामान्य नागरिकाची. या व्यतिरिक्त सर्व काही सत्ताधीशाचे असल्याचे सुतोवाच त्यांची कविता करतांना दिसते. लोकशाहीच्या पालनकर्त्यांचे अस्तिव आणि स्थान किती दुय्यम ठरविल्याचे कवी सोनवणे यांची कविता अधोरेखित करून जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना कवी संजीवकुमार सोनवणे विनम्रपणे लिहितात-
माणसाला माणूस म्हणून जगू देण्याची तुमची हाक
आभाळभर निनादली,
तेव्हा बाबासाहेब,जयभीमचा किलबिलाट करीत
आम्ही सूर्याच्या शोधात निघालो.
तुम्ही आलात आणि ठेवत गेलात आमच्या हातात
भाकरीएवढा सूर्य
आम्ही चिवचिवणारी पाखरं
गावकुसाबाहेरच घुटमळत होतो
तुम्ही आलात,
आमच्या ओंजळीत चवदार तळे ठेऊन गेलात,
या संविधानाचे तुम्ही
सूर्य बनून राहिलात.
आता जथ्थेच्या जथ्थे आम्ही
येथे आभाळ पित आहोत, भूकेकंगाल आयुष्यातूनही
माणूस घडवित आहोत…!
बाबासाहेबांचं कार्य सर्वांना आचंबित करणारं आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने वागवणे संस्कृतीने नाकारले होते. अशा अतिशय बिकट परिस्थितीत बाबासाहेबांचे येणे हे सूर्यालाही क्षणभर दिपविणारे असेच होते. निसर्गत: मिळणारे सारे शाश्वत हक्क संविधानाच्या निर्मितीतून सर्वसामान्यांना मिळवून दिलेत. माणसांना माणूस म्हणून सन्मानित केले. त्यासाठी महाड येथे चवदार तळे, नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह,मनुस्मृती दहन करावे लगले. संघर्ष करावा लागला. त्या थोर महामानवाबद्दलची कृतज्ञता कवी संजीवकुमार सोनवणे व्यक्त करतात.
थोडक्यात कवी संजीवकुमार सोनवणे यांची कविता समतेचा पुरस्कार तर करतेच,त्याचबरोबर समतेच्या नावाखाली पोट भरणा-या अपप्रवृत्तीवर हल्लाबोल करते. यांची कविता ही सकल समांतर वास्तवाच्या अनुभवातून विद्रोहाची भाषा करताना दिसते. त्यामुळे त्यांची कविता कधीकधी अग्नीच्या ज्वाला होऊन भडकते. अन्या य अत्याचाराच्या विरुद्ध बंड करते. सामाजिक न्यायासाठी लढण्याची, संघर्षाची भाषा करते. तर कधीकधी जातिव्यवस्थेवर प्रहार करते. त्यांची कविता ही परिवर्तनवादी विचारांची पताका खांद्यावर घेऊन वावरतांना दिसते. तर कधीकधी मानवी मूल्यांचा शोध घेण्यामध्ये रममाण होते. त्यांच्या कवितेला निसर्गाचं वेड आहे. निसर्गातल्या प्रतिमा घेऊन त्यांचा वापर योग्य त्याठिकाणी करून कवितेतील विचारांना अधोरेखित करून जातात.हे त्यांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रेम हा भावनेचा एक आविष्कार आहे. त्यांच्या काही कविता प्रेमभावना व्यक्त करताना दिसतात . एकूणच कवी डॉ सोनवणे त्यांची कविता अन्यायाविरुद्ध बंड करते. शोषणाच्या विरोधात आवाज उठविते. देशातील सामाजिक शोषणाच्या विरोधात उभी ठाकते. त्यांच्या कवितेला सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याने ती सातत्याने संघर्ष करतांना दिसते. ‘शिका आणि संघटित व्हा ’ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार बालपणातच त्यांच्या मनात रुजला असावा . त्यामुळे शिक्षणाचे महत्व ओळखून कवी संजीवकुमार यांनी आपल्या आयुष्याला शिक्षणाचा परीस स्पर्श केला. त्यामुळे त्यांची कविता अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठविते. तशीच अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा प्रयत्न करते. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अत्याचाराच्या विरोधात ती खंबीरपणे उभी राहते. त्यांची लेखनाची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहिलेले आहेत. त्यामुळे ती परिवर्तनाच्या वाटेवर वाटचाल करताना दिसते.
शिक्षणाने सामाजिक क्रांती होते. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सम्यक विचार खेड्यापाड्यात,गल्ली, मोहल्ल्यात पोहोचविण्याचे झाले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान नवी पिढी आवगत करीत आहे. नव्या बदलाची जाणीव त्यांच्या कवितेला आहे. समाजातील भौतिकबदल आज समाजाला कुठे घेऊन जात आहे. घरोघरी मोबाईल,संगणक, इंटरनेट आले. त्यातून स्वैराचार बोकाळतो आहे. अनेक इष्ट-अनिष्ट घटना,प्रसंगाना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांची कविता मांडताना दिसते. वर्तमान पिढीने माणसांचे व्यवहार शिकून घेतले पाहिजे. असा विचार त्यांची कविता करतांना दिसते. ‘माणसाने जगण्यासाठी खावं आणि समाजासाठी जगावं’ डॉ.बाबासाहेबांचे विचार समाजात ख-या अर्थाने रुजविण्याची भाषा त्यांची कविता करताना दिसते.तसेच माणसाला माणूस म्हणून जगून देण्यासाठी त्यांची कविता लढताना दिसते. त्यांच्या कवितेने हा संघर्षाचा वसा आणि वरसा याहीपुढे घेऊन समर्थपणे वाटचाल करावी. त्यांच्या कवितेच्या पुढील प्रवासाला खूप सा-या शुभेच्छा देतो.