सामाजिक प्रश्नांना संयमितपणे
गझलेच्या ऐरणीवर आणणारा कवी : आप्पा ठाकूर
निसर्गाने नटलेल्या,समुद्र काठावर वसलेल्या अलिबागच्या मायभूमीतल्या कलासक्त कलंदर गझलकार आप्पा ठाकूर आणि त्यांच्या गझलांचा हा परिचय…
भाषा ही समाजाच्या विशिष्ट गरजांमधून धार्मिक, ऐतिहासिक परंपरातून, आर्थिक व्यवहारातून स्त्री-पुरुष संबंधातून आणि अशा अनेक परिस्थितीशी आणि कालमानाशी बांधलेल्या मूल्यांतून तयार झालेली आहे. भाषा ही मानवी समुहाच्या जगण्याचं, चालीरिती, रुढींचं, प्रथा परंपरांचं, श्रद्धांचं प्रतिबिंब वागवीत असते. या सगळ्यातून त्या-त्या समाजाची संस्कृती प्रतिबिंबीत होत असते. म्हणजेच याबाबी बदलल्या, लोप पावल्या की, संस्कृती बदलते. संस्कृती बदलली की, भाषा बदलते. म्हणून भाषा व संस्कृती अशा हातात हात घालून नांदतात, तशाच बदलतात. भाषेबरोबर साहित्यातही बरेच अमुलाग्र बदल होत राहतात. भाषा हिच त्या त्या समुहाची ओळख असते. भाषा ही कुणा एका जातीधर्माची नसून एका प्रांताची, तेथे रहाणा-या सामान्य माणसांची असते. जेव्हा वेगवेगळ्या प्रांतातील माणसे व्यापार,उद्दीम किंवा इतर अनेक कारणांनी जवळ येतात. वास्तव्य करतात. त्यामुळे त्यांची भाषा,संस्कृती,साहित्य आणि संस्कार यांची कळत नकळत देवाणघेवाण होते. अशाच साम्राज्यवादी विचारातून भरतात मुस्लीम आले. प्रदीर्घकाळ सत्ता साम्राज्य स्थिरावले. त्यातून त्यांची उर्दूभाषा, साहित्य इथल्या मातीत फुललं. त्यांचे उर्दू काव्य म्हणजे गझल. हिंदी भाषेपाठोपाठ गझल मराठीत भाषेत रुजली.
मागच्या एका सदरात गझलकार नितीन देशमुख यांच्या गझलेवर लिहितांना मी गझलेचा ओघवता इतिहास मांडला आहे. गझल या काव्य प्रकाराबद्दल सविस्तर लिहिले आहे. म्हणून मी द्विरुक्ती टाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहे. गझल हा काव्यातील एक वृत्त प्रकार आहे. गेयता हे गझलेचे प्रमुख वैशिष्ट्य असल्यामुळे गायनाद्वारे देखील गजलेची अभिव्यक्ती केली जाते. गझल काव्यप्रकार ही इस्लामी संस्कृतीची देन आहे. सुफी संतांद्वारे हा काव्यप्रकार आपल्याकडे आला. अंगभूत गेयता, सौंदर्य नि प्रेमकथांचा बेमालून वापर त्यातून उर्दू रसरसीत बनली. उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी अनेकांचे योगदान आहे. कारण ती सामान्य माणसाने जोपासलेली भाषा असून तिने इतर भाषांना आपल्यात सामावून घेतले. आणि आपले शब्दभांडाराने प्रचंड विस्तृत बनविले. ती सौंदर्यउपासक, सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष असून पुरोगामी विचारांचे पालन करणारी आहे. मरठीत गझल रुजली ,वाढली.अशाच एका मराठी गझलकाराच्या गझलांचा परिचय कवी आणि कविता या सदरातून मी करून देत आहे. निसर्गाने नटलेल्या,समुद्र काठावर वसलेल्या अलिबागच्या मायभूमीतल्या कलासक्त कलंदर गझलकार आप्पा ठाकूर आणि त्यांच्या गझलांचा परिचय करून देणार आहे. कवी आप्पा ठाकूर यांचा ‘ गुंतलेले पाश ’ हा गझलसंग्रह प्रकाशित आहेत.
‘गझल म्हणजे सहज सोपेपणा, गेयता, नाट्यमयता, शब्दकल्पना ,भावना अशी त्रिविध चमत्कृती, नाट्यमयता या सर्वांच्या सहाय्याने स्वछ्न्द्वादी निर्भयशील,रोमांटिक,वृत्तीचा केलेला भावोत्कट व चिन्तनगर्भ आविष्कार म्हणजे…. गझल.’ ‘एकाच वृत्तातील एकच यमक (काफिया) व अंत्य यमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी दोन-दोन ओळींच्या किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक कवितांची बांधणी म्हणजे …… गझल ’. ‘अर्थपूर्ण प्रभावी व उत्कट अभिव्यक्ती असलेली दोन ओळींच्या द्विपदीची एक एक स्वतंत्र कविता म्हणजे …….. गझल. गझलेच्या क्षेत्रातलं आप्पा ठाकूर हे मोठं नाव. विश्वभर पोहोचलेलं. उर्दू गझल जितकी सर्व दूर पोहोचली तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मराठी गझलेचा प्रवास सुरु आहे. मराठी गझलेच्या क्षेत्रात माधव जुलियन ते सुरेश भटांपर्यंतचा कालखंड फारसा गतिशील नसला तरी मराठी गझलेचा प्रवास सरू ठेवण्यास मोठी मदतच झाली.कविवर्य सुरेशभट यांच्या काळात मराठी गझल थोड्याफार जोमाने लिहिली गेली.असे असले तरी उर्दूच्या तुलनेत ती फारशी लिहिली गेली नाही. भाऊ साहेब पाटणकर, विनय वाईकर, सुरेशचंद्र नाडकर्णी, भीमराव पांचाळे, मदन काजळे, जाई देशमुख, राजेश उमाळे, इलाही जामदार, घन:श्याम धेंडे, मनोहर रणपिसे, वा.ना.सरनाईक यांच्यासह अनेकांनी गझल लेखनाला बळकटी दिली आहे. मराठी गझल समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.याच मराठी गझलेच्या प्रांतात आपल्या गझल लेखनातून आणि सादरीकरणातून कवी आप्पा ठाकूर यांनी आपलं नाव कोरलं आहे. कवी आप्पा ठाकूर यांची गझल दु:खं,वेदना, मृत्यू या मानवी जीवनातील अत्यंत अस्वस्थ करणा-या गोष्टीना केंद्रीभूत आहेत. कवी आप्पा ठाकुरांनी अत्यंत शालिनतेने या क्लेषदायक गोष्टींचा जगण्याचा सोहळा बनविला आहे. आपल्या प्रत्येक गझलेतून जीवनाकडे तटस्थपणे बघण्याची दृष्टी दिली आहे. कवी आप्पा ठाकुरांच्या गझला वाचतांना,ऐकतांना त्या रसिक मनावर गरुड करतात. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडतात. त्यांच्या गझलांमध्ये भावमयता,ह्ळूवारता आणि त्याचबरोबर तरलता जाणवते. त्याहीपेक्षा मनाला भिडणारी संवेदनशीलता आणि प्रामाणिकता मनाला अधिक भुरळ घालते. आप्पांच्या मनाची पारदर्शकता त्यांच्या गझलेच्या शब्दाशब्दातून डोकावत राहते. कवी आप्पा ठाकुरांची गझल जीवनाचे गुंतलेले पाश तर मोकळे करण्याचा प्रयत्न करतेच परंतु सामाजिक जाणीवांनाही हात घालते. समाजातील दांभिकतेवर कडाडून हल्ला तर करतेच, पण बेगडीपणाचा पर्दापाशही तितक्याच सहजतेने करतांना दिसते. ती माणसांच्या अस्मितेचा जयजयकार करते. ती संतत्वाचा स्वीकार करते. वेळप्रसंगी त्यांच्यातल्या दांभिकतेला फाडून काढते. ढोंगीपणावर हल्ला चढवते. कवी आप्पा ठाकुरांची गझल निराशेतून जीवनाला जगण्यासाठी दिशा देते. दु:खातून जगण्याची ऊर्जा देते, नव प्रेरणा देते. समाजातील मुठभर हस्तकांच्या हातात इथली लोकशाही बंदिस्त असल्याची भाषा करून लोकशाही मूल्यांचा लिलाव मांडणा-यांच्या विरोधात समर्थपणे उभी राहते. थोडक्यात आप्पांची गझल वैयक्तिक जाणिवांबरोबर सामाजिक जाणिवांकडे अधिक प्रकर्षाने लक्ष वेधते. कवी आप्पा ठाकूर आपली ओळख रसिक, वाचकांना करून देतांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगतात की –
मी कमी बोलतो मौनच माझी भाषा
शब्दांचा रतीब उगाच घालत नाही.
पायांना माझ्या छंद सदा मातीचा
मी क्षणभर सुध्दा हवेत चालत नाही.
त्यांचं जगणंच संयत असल्यामुळे ऊतू-मातू जाणं त्यांच्याकडून कधी झालंच नाही. त्यांचं जगणं त्यांच्या गज़ल आणि कवितेत उतरत येतं. चुकीची तडजोड किंवा प्रसिद्धीचा अट्टाहास करण्याची त्यांची प्रवृत्ती नसल्याने त्यांच्या शब्दांतून रसिकाला जर आनंद मिळत असेल तर तीच साहित्यिक कमाई असल्याचे ते आवर्जून सांगतात. गझलेची सहज सुंदर उकल करुन तिला गर्भार्थाच्या आसपास नेऊन ठेवणे एवढंच कवीचं काम असतं. ते काम कवी आप्पा ठाकूर सहजपणे करतात. याचा अनुभव त्यांच्या गझला वाचतांना वाचकांना आणि ऐकतांना श्रोत्यांना आल्याशिवाय राहत नाही. आप्पांच्या गझलेला अतिशयोक्तीचा अजिबात सोस नाही. कारण त्यांच्या जगण्याला या गोष्टींचा हव्यास नाही. खरे तर कवीच्या वृत्ती प्रवृत्तीचे प्रतिबिंब हे त्यांच्या कलाकृतीत पडत असते. मी का लिहितो ? हे सांगतांना कवी आप्पा ठाकूर लिहितात-
कष्ट ज्यांच्या सावलीला घाम ज्यांची भाकरी
चूल त्यांची पेटली की नाचते माझी ग़ज़ल !
हिन्दु वा मुस्लिम दोघे जन्मताना माणसे घेउनी
काखेत त्यांना चालते माझी ग़ज़ल !
संपला माणूस आता हे तिला कळते तरी
वाटच्या गर्दीत त्याला, शोधते माझी ग़ज़ल !
पाखरांचे सूर घेते, निर्झराची गेयता
पानगळ होते तिथेही नांदते माझी ग़ज़ल !
फुलांचा गंध वा-यावर दरवळत जावा तशी त्यांची गझल सर्वत्र दरवळतांना दिसते. कोणत्याच विषयाचे बंधन त्यांच्या गझलेला नसल्याचे ते स्पष्ट करतात. कष्टक-यांच्या घामातून पिकलेल्या धान्यातून भाकरी भाजली की त्यांची गझल शब्दातून नाचून आंनद व्यक्त करते. हिंदू मुस्लीम ऐक्याचा मंत्र घेऊन त्यांची गझल येते. तर कधी माणसातील माणुसकी संपत चालली हे जाणूनही त्याचा शोध त्यांची गझल करतांना दिसते. ऐश्वर्याची पानगळ झालेल्याचे सांत्वन करतांना त्यांची गझल दिसते. थोडक्यात त्यांची गझल सर्व क्षेत्रात भ्रमंती करतांना दिसते.त्यांच्या गझलेचा आवाका मोठा आहे.मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडविताना ते लिहितात-
काल ज्यांनी मस्तकाला धूळ माझी लावली
आज का हृदयात त्यानी बाण माझ्या मारले.
ज्या घरांनी कैकदा मज अन्न अन् पाणी दिले
त्या घरांच्या उंबऱ्यांनी आज का नाकारले.
दोष मी देणार नाही आणि तो देऊ कसा मी
तरी कोठे कुणाला रेशमांनी बांधले.
ज्यांनी पायाची धूळ मस्तकाला लावून ज्यांनी ज्यांनी आशीर्वाद घेतेले, ते तर आज हृदयात बाण मारत असल्याचे समजते. ज्यांनी अनेकदा अन्न,पाणी दिले, तीच माणसं आज नाकारतांनाही दिसतात. त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याची खंत आप्पा ठाकूर करतात. जीवनातील इतकी तटस्थता कमालीची वाटल्याशिवाय राहात नाही. खरे म्हणजे हेच सुखी जीवनाचं तत्वज्ञान त्यांची गझल वाचकांना, रसिकांना आनंदी जीवनाचा मूलमंत्रच देऊन जाते. जीवनावर भाष्य करतांना कवी आप्पा ठाकूर लिहितात-
खरेच माझ्या मनात आता तणाव आहे
परंतु मजला अशा जिण्याचा सराव आहे.
वसंत माझा निघून गेला असून सुद्धा
उरात माझ्या सुगंध भरला तलाव आहे.
कधीच नाही करू दिला मी लिलाव माझा
म्हणून माझ्या घरी सुखांचा जमाव आहे.
विवंचनांनो, घरात याना, बसून बोलू तसा
समंजस अजून माझा स्वभाव आहे.
एकूणच मानवी जीवन तणावाशिवाय राहूच शकत नाही. जे आहे ते सत्य स्वीकारून जगता येते. पण तसा दृष्टीकोन बनवता आला पाहिजे. त्यासाठी सकारात्मकता असायला हवी. ‘काठोटमे गंगा’ पाहण्याची समाधानी वृत्ती असायला हवी. ती ज्यांच्याजवळ आहे त्यांना ते शक्य आहे. त्यांना ओंजळीत सागर पाहता येतो. आज माणसाने माणूसपणाचे तत्व आणि सत्व सोडले आहे. माणसाने नितीमत्ता सोडली की तो सा-याच सुखाला पारखा होत असतो. सुख असूनही त्याला उपभोगता येत नाही. जीवनात कितीही समस्या असू द्या, विवंचना असू द्या. त्यांच्यातून मार्ग काढता येतो. त्यसाठी त्या विवंचनांशी सामोरे जाऊन संवाद करण्याची गरज असल्याचे त्यांची गझल सांगून जाते. थोडक्यात समस्येवर तोडगा काढण्याची भाषा त्यांची गझल करतांना दिसते.
दुःखालाही घट्ट उराशी धरता येते
आणिक त्याची सुंदर कविता करता येते.
सुकल्या जर या सागर सरिता किंवा विहिरी
घामानेही घागर हल्ली भरता येते.
खोटे हसणे सहजपणाने जमले तर मग
रडण्याचेही सुंदर नाटक करता येते.
वातीमध्ये पीळ बरोबर असल्यावरती
संपुन गेले तेल तरीही जळता येते.
मानवी जीवनात अशक्य काहीच नाही. हे सांगताना कवी आप्पा ठाकूर यांची गझल अतिशय मार्मिक शब्दात सल्ला देते. दु:खाला मिठीत घेऊन संवाद केला तर त्याचे जीवन समृध्द काव्य बनते. समुद्र,नद्या आणि विहिरी आटल्या तर कष्टाने प्रयत्नपूर्वक त्या भरता येतात. ज्याला खोटे हसणे जमले तर रडण्याचे नाटक सहज जमते. आणि जगण्याचा पीळ कापसाच्या वातीमधी असेल तर तेल संपले तरी ती जळू शकते. अत्यंत व्यवहारिक जीवनातले दाखले देत आप्पांची गझल हातबल झालेल्या माणसाला पुन्हा नव्याने जगण्याचा मंत्र देतांना दिसते. किंवा आजच्या आध्यात्मिक जीवनावर भाष्य करतांना त्यांची गझल तितक्याच प्रखरतेने सामाजिक दंभावर बोट ठेवते. ती अशी-
मी कधी देवा तुझी रे, पायरी चढणार नाही
यापुढे माझा तुझ्यावर कोणताही भार नाही.
बंद दगडांच्या महाली, तू सुरक्षित बारमाही
आणि येथे वंचितांच्या झोपड्यांना दार नाही.
का तुझ्यावर वेळ आली दान पेट्या ठेवण्याची
लागली का भीक देवा की तुला घरदार नाही.
आज अध्यात्माच्या क्षेत्रात काय चालले आहे. अध्यात्मातील दांभिकतेवर त्यांची गझल हल्ला करतांना दिसते. देव बंद दगडीभिंतींच्या आत सुरक्षित आहे. त्याच्या रक्षणासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. परंतु सुरक्षेची खरी गरज तर गोरगरिबांच्या झोपड्यांना आहे. कारण त्यांच्या घरांना दारेच नाही. या सामाजिक वास्तवावर त्यांची गझल बोट ठेवते. देवा तू सर्वांचा तर उध्द्दार करतो, मदत करतो. कल्याण करतो. मग तुझा दारात दानपेट्या ठेवण्याची वेळ का यावी ? असा रोखठोक सवाल त्यांची गझल करतांना दिसते. त्यांची गझल एवढयावरच थांबत नाही, तर असेच तू करत राहिलास तर देवा यापुढे तुझेही चांगले होणार नाही. हे सांगायला त्यांची गझल कचरत नाही. किंवा ते विठ्ठलास ठणकावून सांगतात. विठ्ठलालाच सल्ला देण्यासही त्यांची गझल कचरत नाही. ते लिहितात –
तूर्तास विठ्ठला तू आता असे करावे
सोडून वीट मागे, चालून दाखवावे.
होतील हाल देवा याच्यापुढे तुझेही
तेव्हा आता विठू तू लवकर फरार व्हावे.
झालाच वाद जर का देवा घरात केव्हा
बिनधास्त विठ्ठला तू माझ्याकडेच यावे.
होणार स्फोट नक्की देवा तुझ्या महाली
तक्रार घेवुनी तू दिल्लीकडे निघावे.
सर्व जगाचा पालनकर्ता परमेश्वर आज मंदिरात सुरक्षित नाही. त्याच्या रक्षणासाठी झेड सुरक्षा लागतात. कारण आतिरेक्यांच्या हिट लिस्टमध्ये देवदेवतांचे मंदिरे आहेत. त्यात पंढरपुरचे विठ्ठल मंदिर सुध्दा आहे. इथला देवच जर सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न त्यांची गझल उपस्थित करते. यापुढे जावून उपहासाने ते सांगतात. की देवा तुमचा दोघांचा घरात जर वाद झाला तर देवा तू बिनधास्तपणे माझ्या घरी ये. असे आवाहन करतांना त्यांची गझल दिसते. त्यांची ही गझल फार मोठ्या उपहास आणि उपरोधाने भरलेली आहे. किंवा ‘बापुजी’ या गझलेत ते आजच्या लोकशाहीचा चांगलाच समाचार घेतांना दिसतात.
बांधले आहेत पुतळे बापु तुमचे खूप जागी
मात्र त्यावर कावळ्यांची रोज धावाधाव आहे.
कोणताही पक्ष बापू निवडुनी आला तरीही
पांढऱ्या कपड्यास येथे बारमाही भाव आहे.
फाळणी केलीत बापू, चांगले झाले परंतू…
त्यातसुद्धा संशयाला फार मोठा वाव आहे.
आणि बापू ऐकले का? नीट ऐका सांगतो
मी देश विकणाऱ्यामध्ये तर आपलेही नाव आहे.
आजच्या समाज आणि राजकारणातील भोंदूगिरी आणि गांधीगिरीवर त्यांची गझल उपरोधिक सुरात हल्लाबोल करतांना दिसते. आजच्या लोकशाही शासनव्यवस्थेत पांढ-या कपड्यातील राजकीय नेत्यांचे करारनामे मांडतांना त्यांच्या कवितेला एक वेगळीच धार येते. स्वातंत्र्याच्या फाळणीत संशयाला वाव असल्याचे स्पष्ट करून, देश विकणा-यांचा यादीत बापुजींचे नाव असल्याचे जनमानसात बोलले जाते. हे सांगायला त्यांची गझल मागेपुढे पाहत नाही. मला वाटतं हे आप्पा ठाकुरांच्या गझलेचे वेगळेपण आहे. आजच्या समाजात माणूस माणुसकी विसरत चालला आहे हे मांडतांना ते लिहितात-
दारावरती पाय कुणाचा थांबत नाही
की नात्यांचा काळ संपला समजत नाही.
नको कराया स्वागत त्याचे उगाच कोणी
म्हणून मृत्यू येण्याआधी कळवत नाही.
भविष्य माझे मुठीत माझ्या बुलंद आहे
भूतकाळ मी पुन्हापुन्हा कुरवाळत नाही.
एकेकाळी माणसं माणसांसारखी वागत होती. आजच्या चंगळवादी संस्कृतीत माणसं माणसांकडे जात-येत नाही. त्यामुळे नाती संपली की काय असा संशय येतो. एकमेकाचे कुणी स्वागत करत नाही. हे पाहून अलीकडे मृत्य सुध्दा न सांगता येऊन धडकतो. किती सुंदर शब्दात मानवी प्रवृत्तीचे यथार्थ वर्णन ते आपल्या गझलेतून करून जातात.
आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेलत आहे
आणिक त्याच्या मोहापायी वृद्धत्वाला मिरवत आहे.
आता माझी कुव्वत नाही नातीगोती सावरण्याची
मीच खरोखर श्वासामधले अंतर आता मोजत आहे.
गजबजलेल्या शहरामध्ये जीवच माझा लागत नाही
मी तर आता गावोगावी पुर्वज माझे शोधत आहे.
माणसाचं आयुष्य आज आवघड झालं आहे. रक्ताची नाती तुटत आहे. त्यांचं जगणं कठीण होऊन बसलं आहे. कुणीच नातीगोती सावरायला तयार नाहीत. माणसा माणसांमधील रोज अंतर वाढत आहे. ते अंतर कमी करण्याऐवजी आपल्या श्वासांमधले अंतर मोजण्यात प्रत्येकजण गुंतला आहे. ग्रामीण खेडी थोडीफार बरी आहेत. तिथं थोडीशी माणुसकी शिल्लक आहे. परंतु शहरामध्ये आता जीव रमत नसल्याची खंत त्यांची गझल व्यक्त करून जाते. ते लिहितात –
रोज सुखाने जगण्यालाही तशी फारशी गम्मत नाही
असेल सुंदर जगावयाचे तर दुःखाला उरात घ्यावे.
कंप पावल्या पायावरती तोल स्वत:चा सावरताना
आधाराला फक्त आपुल्या म्हातारीचे हात धरावे.
आपणच आपलं जगणं भयावह करून सोडलं आहे. जीवन जगणं तसं फार सोपं असतं, परंतु ते जगता आलं पाहिजे. आनंदी जीवन जगण्यासाठी, सुखाचे दिवस येण्यासाठी, दु:खाशी सलोक्याने वागलं पाहिजे. त्याला मिठीतच काय तर हृदयात घेतलं पाहिजे. दु:खाशिवाय सुखाचे महत्व ते काय ? आणि कसे कळणार आपल्याला ? स्वत:च्या आयुष्याचा तोल सावरताना आधारासाठी म्हातारीचे हात हातात धरता आले पाहिजे. जुने आणि नवे यांनी एकमेकांविषयीचे हितसंबंध जोपासले आणि जपले पाहिजे. ज्येष्ठांचे अनुभवाचे चार शब्द ऐकले पाहिजे. त्यांचे अनुभव जगण्याला आणि जीवनला नक्कीच प्रेरक ठरतील अशी अपेक्षा त्यांची गझल करते. माणसं आपल्याजवळ येतात तेव्हा त्यांच्या वेदनेला हात घालता आला पाहिजे. हे ज्याला जमले त्याचे आयुष्य सफल होते. हे सांगताना कवी आप्पा ठाकूर लिहितात-
शेवटी मातीच होते माणसाची
हे कधी कळणार इथल्या माणसाला.
समजुतीने हात हाती घेतल्यावर
फारशी जागा नसावी संशयाला.
पावलांना शिस्त यावी याचसाठी
उंबरा मी ठेवला आहे घराला.
माणसांच्या जवळ केव्हां जाता येते, जेव्हा त्यांच्या ख-या प्रश्नांना तुम्ही हात घालाल. नाही तरी माणसांची अखेर मातीच होते. हे तरी आपणास कळायला हवे. हे आपणास अजूनही कळू नये. यापेक्षा दुर्दैव दुसरे काय असू शकते ? माणसाने मणसाचा हात विश्वासाने हातात घेतल्यावर मनात संशयाला जागाच राहू नये. पाय उचलून न ठोकरता चालता यावे. त्यासाठीच घराच्या दाराला उंबरा बसविला असल्याची कबुली ते प्रामाणिकपणे देतांना दिसतात. माणसाच्या आयुष्यात कितिदातरी डोक्यावरचे आकाश फाटते. तेव्हा इतरांची गरज भासते. अशावेळी जवळची भावाकितली, नात्यातली, आपुलकीची माणसे व्यवहारात कसे वागतात. हे सांगतांना कवी आप्पा ठाकूर लिहितात-
पेटले हे शहर तेव्हा धावले सगळे खरे
फार थोडे त्यातले पण माणसागत वागले.
मी कधीही पत्थरांना ना कधी शेंदूरले
ना कधीही आसवांचे हार त्याना घातले.
जन्मलो उदरातुनी हे सत्य मीही जाणतो
मात्र ती सोडून जाता दुःख नाही वाटले.
अशा अडचणीच्या क्षणी माणसं कळतात. माणसं समजतात. संपूर्ण शहरभर माणसं असतांना शहर पेटले तर फारच थोडे माणसं मदतीला धावतात. कारण शहरातल्या फार थोड्यांकडे संवेदना शिल्लक आहेत. माणुसकी शाबूत आहे. उगाच दगडांना शेंदूर लावत बसलो नाही. की आसवं गाळत बसलो नाही. त्यामुळे अशी माणसं सोडून जातांना दु:खं कधीच वाटले नसल्याचे ते अभिमानाने सांगतात. आयुष्याच्या वाटेवर जीवन जगतांना कसा जगलो याची कैफियत सांगताना कवी आप्पा ठाकूर लिहितात-
काळजातल्या कळा लपवुनी लोकांना मी हसवत आलो
हसून खोटे वरच्यावरती आत एकटा फाटत आलो.
आयुष्याच्या वाटेवरती लोक चांगले मला भेटले
ऐकत ऐकत त्यांचे काही माझे काही सांगत आलो.
दारावरती याचक म्हणुनी जेजे आले कृतार्थ झाले
नसतानाही शिल्लक मागे त्यांच्या पदरी घालत आलो.
देणारेही बरेच होते नको नको पण मीच म्हणालो
फक्त तेवढे आपुलकीचे दोन शब्द मी मागत आलो.
आयुष्याच्या वाटेवर संघर्षाचे जीवन जगतांना काळजातलं दु:खं मी लपवत आलो. ब-याचदा वरवर खोटं हासत आतमधी मी फाटत आलो.या जीवन प्रवासात काही चांगली माणसं भेटलीत.त्यांचे ऐकत माझे सांगत आयुष्य जगत आलो. कितीदा स्वप्न भंगली तरी वाळूंचे घर बांधणे टाळले नाही. जे माझ्या दारी आले, त्यांना थोडेफार देवून कृतार्थ नक्कीच झालो. मला देणारेही भेटलेत, पण मी त्यांच्याकडून प्रेमाचे दोन शब्द मागण्याचा प्रयत्न केला. आता आयुष्य जगून झाले. परंतु काही पाश गुंतून राहिले आहे. त्याविषयी कवी आप्पा ठाकूर कृतज्ञतापूर्वक लिहितात-
गुंतलेले पाश थोडे सैल करुनी घ्यायचे
वादळा आधीच तारु पैलतीरी न्यायचे.
कैकदा येईल मृत्यू आपल्याला न्यायला
मात्र आपण आपल्या मर्जीप्रमाणे जायचे.
जीवनाला पेलताना चांगले जे वेचले
त्यातले माणीक-मोती मागच्यांना द्यायचे.
लांबलेल्या मैफिलीला सोबती नसले तरी
आपल्या मस्तीत आपण भैरवीला गायचे.
आसवे अन् हुंदक्यांची तस्करी होते जिथे
त्या समाजातून आपण मुक्त लवकर व्हायचे.
कवी आप्पा ठाकुरांची ही गझल म्हणजे कलासक्त कलंदर कलावंताच्या आयुष्याच्या शेवटचा लेखाजोखाच आहे. कलावंत हा स्वतंत्र विचारप्रणालीचा असतो. त्याच्या मर्जीप्रमाणे तो जगलेला असतो. त्याच्या आयुष्याचा शेवटही तितकाच मजेशीर व्हावा. असे कवी मनाला वाटते. कधीतरी मृत्यूचे वादळ दारावर धडकणार आहे. त्यापूर्वीच आपण आपले गुंतलेले पाश सैल करून घ्यावे. मृत्यू घ्यायला येईलच. त्याची वाट न बघता आपल्या मर्जीप्रमाणे त्याला आपण भेटले पाहिजे. जाण्यापूर्वी आपल्याकडचे चांगले जे आहे ते द्यायला विसरायचे नाही. आयुष्याची भैरवी आपल्याच मस्तीत आपण गायची. जिथे खोटे आसवे गाळले जातात. त्या समाजातून आपण स्वत:ला लवकर मुक्त करावे. असा अतिशय जीवनानुभवाचा सल्ला त्यांची कविता देतांना दिसते.
थोडक्यात जीवनाच्या सा-याच कंगो-यांना आप्पा ठाकुरांची गझल स्पर्श करतांना दिसते. त्यांच्या सा-याच अर्थगर्भ गझला श्रोत्यांच्या आणि रसिक वाचकांच्या मनाचा ठाव घेणा–या आहेत. कवी आप्पा ठाकूर यांची गझल वाचकाला व ऐकणा-याला जवळची वाटते. तसेच त्यांची कविता असो की गझल असो, ती त्यांच्या गळ्यातून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव आहे. गझल हा एक कवितेचा सशक्त आकृतीबंध असून कवी आप्पा ठाकूर तो हाताळण्यात पारंगत झाले आहे. हे मात्र नक्की. कवी आप्पा ठाकूर यांच्या गझलेचे सामर्थ्य तिच्या रूपबंधात दडलेले आहे. शब्दांची वैशिष्ठ्यपूर्ण मांडणी, लय, नाद यातून त्यांची गझल अधिकाधिक उलगडत जातांना दिसते. नाही म्हटले तरी गझलेला मर्यादा आहेत. कवितेत एखादा विचार खुलवत नेतांना मर्यादांची फारशी बंधनं नसतात.परंतु गझलेला दोन शेरांच्या पलीकडे जाता येत नाही. कवी आप्पा ठाकुरांच्या गझलेत ग्रामीण, नागर जीवनातल्या प्रतिमा येतात. तिथलं समाजजीवन, आध्यात्म, माणसांचे स्वभाव दर्शन, वृत्ती प्रवृत्तीचे सम्रग दर्शन वाचकाला होते. मानवी मनातील अनेक प्रश्नाची उत्तरे त्यांची गझल सोडवताना दिसते. माणसाच्या भोवतीचं सारं अवकाश त्यांच्या कवितेत उतरत जातं.हे अवकाश याही पुढे आप्पांच्या गझलेत,कवितेत निरलसपणे उतरत राहो. त्यांची कविताही त्यांच्या गझले इतकीच समृध्द होवो. कवी आप्पा ठाकूर यांच्या गझल आणि कविता लेखनाच्या पुढील प्रवासाला खूप सा-या शुभेच्छा .