सामाजिक दायित्वाच्या आत्मभानाची कविता लिहिणारा कवी : प्रा.प्रदीप पाटील
साहित्य हे चिरंजीव शास्वत स्वरूपाचं असतं. त्याला स्वतःचं मूल्य असतं. लेखनामध्ये साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व उमटत असतं. कारण साहित्य हे जीवन भाष्य असतं. कवी आपल्या जगण्या,वागण्यातून, अनुभवातून कवितेची कलाकृती निर्माण करतो. त्या कलाकृतीतून तो जीवनभाष्ये मांडत असतो. साहित्य हे भावनांना हात घालतं. साहित्यात अवतीभोवतीचा समाज प्रतिबिंबित होतो. त्यातल्या त्यात कविता ही कवीची अनुभूती असते. फक्त ती लालित्यपूर्ण पद्धतीने मांडली जाते. साहित्य ही अशी गोष्ट आहे की तिच्यात भावना कल्पना आणि विचार यांचा भाषेच्या माध्यमातून अविष्कार घडविलेला असतो. भावना व्यक्त करणे हा साहित्यकृतीचा अविभाज्य घटक असतो. भावने इतकेच कल्पनेला ही महत्व दिले जाते. खरे म्हणजे साहित्य हे विचार प्रकट करण्यासाठी लिहिले जाते. विचार हा साहित्यकृतीचा मुख्य पाया असतो. कोणत्याही कलाकृतीतून भावना, विचार,शब्द, अर्थ, प्रतिमा या सर्व घटकांचे एकसंघ विश्व आपण अनुभवत असतो. कलावंताचे अनुभव व अवलोकन, त्याच्यावर झालेले संस्कार,त्याची श्रद्धा, सभोवतालची परिस्थिती,त्याची भाषा,यासारख्या अनेक घटकांचा कवीच्या काव्यनिर्मितीवर परिणाम होत असतो. कलावंत जो अनुभव घेतो तो त्याच्या नित्याच्या अवलोकनातून. त्याच्या लेखनातून जीवनविषयक दृष्टिकोनही प्रकट होतो. कवीच्या कविता समाजातल्या व्यापक अनुभवाचा आणि सत्य परिस्थितीचा कवी मनावर झालेला संस्काराचा परिपाक असतो. कवीने घेतलेले अनुभव व्यवहारातले असतात. त्याला व्यवहार अनुभव म्हणतात. आणि तोच अनुभव कलाकृतीच्या संदर्भात कलात्मक पातळीवर पोहोचतो तेव्हा त्याला कलानुभव म्हणतात. कलावंताने घेतलेल्या जीवनानुभवातून कलाकृती निर्माण होते. ती कलाकृती जीवनाचे प्रतिबिंब असते. त्याच्या जीवनातील घडलेल्या घटनांची अनुभूती कवी कवितेतून व्यक्त करतो. साहित्य हे जीवन भाष्य असते. हे विसरू नये. कवी हा सत्यसृष्टीतला चित्रकार व मानवी जीवनाचा भाष्यकार असतो. सत्य सृष्टीचे जितके ज्ञान त्याला असते, अनुभव असतो. त्यावर त्याचे काव्य प्रभावशाली किंवा प्रत्ययकारी काव्य निर्माण होते. त्यामुळे अनेकांच्या हृदयाला भिडण्याचे सामर्थ्य त्यात येते. जेवढा कवी अनुभव संपन्न, बहुश्रुत असतो, त्याचे अवलोकन,सूक्ष्म निरीक्षण या सर्वांचा त्याच्या काव्यनिर्मितीसाठी उपयोग होतो.
कवितेतून कवीचा जीवन विषयक दृष्टिकोन कळतो. जगाबद्दलचा प्रत्येक कलावंताचा अनुभव वेगळा असतो. त्यानुसार त्याची कलाकृती निर्माण होत असते. कलावंत वास्तवाला सजीव करण्यासाठी कल्पनाशक्तीचा वापर करतो. मानवी भावनांचे साहचर्य साधतो. वास्तवाची किंवा भावनांशी साहचर्य साधने हे कल्पनाशक्तीचे साहित्यातील मोठे कार्य आहे. तेथे भावनांची तीव्रता अधिक सखोल तेथे कल्पनाशक्तीची आवश्यकता असते. ती नेहमी भावनांची साहचर्य साधते . भावनेची खोली जर अधिक असेल तर निश्चितपणे कल्पना शक्ती उच्च असते. भावना आणि कल्पना या जुळ्या बहिणी मानल्या जातात. थोडक्यात भावना जागृती करणे, भावना साहचर्य साधने कला वस्तूचा भाष्यकार होणे, ही साहित्यातील कल्पनाशक्तीची महत्त्वाची कार्य आहेत. कलाकृतीची नवनिर्मिती आणि आस्वाद खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल तर कल्पना शक्ती हवी. कवीमनातील यातनांचा खुलासेवार पट कवी मांडत असतो . त्याच्या कवितेतून अर्थाचा सुगंध दरवळत असतो. त्या गंधावर कवी जगत असतो. कवीच्या आत दुःखाचा वनवा पेटलेला असतो. तो बनवा कवितेचा पाऊस पडल्याशिवाय विझू शकत नाही. कारण कवीला त्याचे शब्द धीर देतात. त्याचे शब्द संयम शिकवतात. कवी हा सामान्य माणूस असतो. तो इतरांपेक्षा वेगळा नसतो. त्याचं मन मात्र इतरांपेक्षा संवेदनशील असतं. सभोवतालच्या सामाजिक वास्तवाचा कविच्या मनावर परिणाम होतो. सामाजिक वास्तवाच्या ज्वाळांची कविता मनाला होरपळून काढते. भाजून काढते. त्याच्या अंतरंगापर्यंत जाऊन भिडण्याचे सामर्थ्य कलावंतांमध्ये असतं. आणि म्हणून कवी स्वतःची प्रतिमासृष्टी निर्माण करतो. हे सगळं असलं तरी भोवतालचं वास्तव हा साहित्याचा, कलाकृतीचा पाया असतो. कविमनाचे निरीक्षण, अवलोकन जसे असेल त्यानुसार त्याच्या सवयी, आचार-विचार त्यांची जडणघडण होत असते. ह्या सर्वांचा परिणाम त्याच्या कलाकृतीवर होत असतो.आज आपण अशाच कलावंताच्या कवितेचा प्रवास अनुभवणार आहोत.कृष्णाखो-यातील,सांगली जिल्ह्यातील, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील कवी प्रा.प्रदीप यशवंत पाटील कवी आणि कविता सदरात सहभागी होत आहे.
कवी प्रा.प्रदीप पाटील यांची कविता माणसाच्या अंतर्मनातील द्वंद्व प्रभावीपणे टिपताना दिसते. वर्तमानकालीन वास्तव जीवनातील सर्वसामान्यांची मानसिकता सहजपणे अधोरेखित करते. चंगळवादी आणि उपभोगवादीवृत्तीमुळे परस्परांच्या नात्यांमध्ये निर्माण होत चाललेला दुरावा ते आपल्या कवितेत नेमक्यापणाने मांडून जातात. साधनांची आणि सुविधांची उपलब्धता असूनही माणसामाणसांमध्ये वाढत चाललेले अंतर किती भयावह वाटते. याची जाणीव त्यांची कविता करून देते. रक्ताच्या नात्यातील आपलेपणाची नष्ट होऊ घातलेली भावना अत्यंत तरलपणाने व समर्थपणाने त्यांची कविता व्यक्त करतांना दिसते. जीवनात येणारे एकाकीपण, कृषीव्यवस्थेतील प्रश्न, नीतिभ्रष्ट राजकीय व्यवस्थेमुळे आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याच्या वाट्याला येणारा भोगवटा असे विविध प्रश्नांना त्यांची कविता हात घालतांना दिसते. ग्रामीण संस्कृतीतील माणूस आणि त्याचे जीवन हे त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. कवी प्रा. प्रदीप पाटील यांचे ‘ आत्मसंवाद ,’ ‘ अंतरीचा भेद ,’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा राज्य पुरस्कार,औदुंबर ,सांगली येथील सदानंद साहित्य मंडळाचा ‘पद्मश्री सुधांशू साहित्य पुरस्कार,पुणे येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार,नाशिक येथील मुक्त विद्यापीठाचा विशाखा साहित्य पुरस्कार, औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘ कुसुमावती देशमुख काव्य पुरस्कार,’ पुणे येथील बंधुता प्रतिष्ठान चा ‘ प्रबोधनयात्री साहित्य पुरस्कार ,’ कोकण मराठी साहित्य परिषदेचा मराठी कविता राजधानी पुरस्कार, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ‘पंडित आळवीकर काव्य पुरस्कार, ’ बेळगावचा वाङ्मय चर्चा मंडळ साहित्य पुरस्कार, इचलकरंजी येथील इंदिरा संत साहित्य पुरस्कार, मुंबईचा आशीर्वाद साहित्य पुरस्कार, धरणगावचा बालकवी साहित्य पुरस्कार, बारामतीचा अथर्व साहित्य पुरस्कार, आदींसह अनेक साहित्य पुरस्कार मिळाले आहे. सोलापूर विद्यापीठ,मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात साहित्याचा समावेश करण्यात आलेला आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमात व कर्नाटक राज्याच्या इयत्ता १२ वीच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे.
कवी प्रा.प्रदीप पाटील हे समाजिक जाणीव असलेले कवी आहेत. त्यामुळे त्यांची कविता सामाजिक भान व्यक्त करतांना दिसते. त्यांच्या कवितेला मातीचा गंध आहे. मातीत राबणा-या माणसांच्या वेदनांचा रंग आहे. त्यांच्या कवितेत घरादाराच्या सांदी कोप-यात गुंतलेल्या स्त्रीमनाच्या संवेदना आहेत. आईपणाच्या जाणीवा आहेत. घरादाराच्या काळजीने पडणारा आतड्याचा पीळ आहे. मातृत्वाचा उमाळा आहे. मायलेकीचं माहेर आहे. कष्टक-याचा व्यवहार आहे. हिरवं रान आहे. जगण्याचं भान आहे. संघर्षाची जाण आहे. त्यांच्या कवितेत माणूसपणाची तहान आहे. भाकरीचा प्रश्न आहे. जगण्याचं स्वप्नं आहे. त्यांच्या कवितेत उभ्या जन्माची माती आहे. नाती आहे. त्यांच्या कवितेत गाव आहे. पार आणि पाणवठा आहे. वाटा आडवाटा आहे. नदीचा घाट आहे. डचमळता माठ आहे. पदराचा काठ आहे. आणि पायाखाली वळणावळणाची रानमळ्याची वहीवाट आहे. म्हणून तर त्यांच्या कवितेला स्वत:चा असा घाट आहे. स्वत:ची लय आहे. त्यांची कविता वर्णनाच्या मोहात न पडता प्रश्नांना हात घालते. वेळप्रसंगी कडाडून हल्ला करते. त्यांची कविता संवादी, काहीशी आत्मसंवादी आहे. तरी ती सामाजिक जाणिवांचा पाढा वाचते. संघर्षाची भाषा करते. आयुष्यावर प्रखर भाष्य करते. थोडक्यात कवी प्रा.प्रदीप पाटील हे सामाजिक दायित्वाच्या आत्मभानाची कविता लिहिणारे आघाडीचे कवी आहेत.
संसार कशाचा, हा तर करावास
लागतो गळ्याला व्यवहाराचा फास
चिंतेत दिवस नि प्रहर रात्रीचा जातो
अन् सूर्य नव्या प्रश्नांना घेऊन येतो.
ज्याला तुम्ही आम्ही संसार म्हणतो तो भ्रम काढून टाकतांना त्याला कारावासाची उपमा देऊन कवी प्रा.प्रदीप पाटील व्यवहाराच्या पातळीवरून विश्लेषण करतात. इथं गळ्याभोवती सतत व्यवहाराचा फास आवळला जातो. रात्रंदिवस चिंतेत काढावे लागतात. आणि रोज उगवणारा दिवस नवा प्रश्न घेऊन उगवत असतो. त्यातून माणसांची मनं करपतात. रक्ताची नाती तुटतात. आयुष्याच्या चिंतेतून मरणाच्या चितेवर अखेरीस जळतो. असे माणसाच्या जीवनावर कवी प्रा. प्रदीप पाटील टोकदारपणे भाष्य करून जातात. सारी माणसं स्वत:साठी जगत असतात. पण काही माणसं मात्र इतरांसाठी जगतात. ज्यांच्यासाठी जगतात त्यांना त्याची जाणीव होऊ नये.याची खंत व्यक्त करतांना कवी प्रा. प्रदीप पाटील लिहितात-
केव्हा न कळाले त्यांना तगमगलो त्यांच्यासाठी
अजुनी न समजले त्यांना मी जगलो त्यांच्यासाठी
मी जन्मताच नियतीने वरदान दिले जखमांचे
गोंजारून जखमांनाही मी सजलो त्यांच्यासाठी.
फुलताना वसंत त्यांचा मोहरली त्यांची स्वप्ने
नसताना वसंत माझा मोहरलो त्यांच्यासाठी
काळीज म्हणाले माझे नसते रे कोण कोणाचे
तरीही न ऐकता त्याचे मी झुरलो त्यांच्यासाठी.
अशी नाकर्ती माणसं सभोवताली असतांना माणूसपणाची कदर तरी कशी होणार. जीवनभर जखमांचे वरदान मिळालेला माणूस अनुभवातून शाहाणा होऊ नये. कारण जीवनात व्यवहार आणि भावना या परस्पर पूरक नसतात. त्या वेगवेगळ्या असतात. त्या वेगवेगळ्याप्रकारे जपल्या पाहिजे. जिथे व्यवहार असेल तिथे भवना उपयोगाच्या नसतात. जिथे व्यवहार असतो तिथे भावना कुचकामी ठरतात. कवी पता.प्रदीप पाटील हे वैश्विक सत्य मांडून जातात.
वाटेवर आयुष्याच्या स्वप्नांचा दाह उसळतो
मी नीरव गाभाऱ्यातिल ज्योतीसम निश्चल जळतो
वणव्यात चहुबाजूंच्या स्वप्नांची झाली राख
अंधार मनातून येते अदृश्य कुणाची हाक
मी दिशाहीन रस्त्याचा रहिवासी भरकटलेला
मी झेप घ्यायच्या आधी पंखातच गुरफटलेला.
जीवनाच्या वाटेवर वाटचाल करतांना अनेक स्वप्नांची गावे वाटेत लागतात. पतंगाप्रमाणे आपल्या अवतीभोवती स्वप्ने उडतांना दिसतात. काही स्वप्ने आयुष्याच्या वणव्यात जळून खाक होतात. अशा परिस्थितीत माणूस भरकटलेल्या रस्त्याचा प्रवाशी होतो. आयुष्याच्या प्रश्नांचा गुंता इतका वाढत जातो की त्यातून मार्ग काढण्याऐवजी त्या गुंत्यात माणूस गुंतून गुरफटून जातो. त्याने नव्यासामर्थ्याने, जिद्दीने वाटचाल केली पाहिजे. असा विचार कवी प्रा.प्रदीप पाटील यांची कविता मांडून जाते. जागतिकीकरणाच्या धबडग्यात,आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही प्रगतीची पावले टाकून विकासाच्या पाऊलखुणा उमटवीत चाललोआहे. समृद्धीच्या दिशेने आमची वाटचाल सुरु असतांना आमच्या देशातील वर्तमान किती भयावह आहे. याची जाणीव त्यांची कविता करून देते. ते लिहितात-
स्वप्नातही नव्हते इतका समृद्ध देश हा व्हावा
चतकोर भाकरीसाठी पोरींनी देह विकावा
देवावर भक्तांनीही भक्तीने केली मात
संभोग चालतो आता देवाच्या गाभाऱ्यात
देशात नव्या जोमाने मुक्तीचा वारा आला
नीतीची फेकुन वस्त्रे हा देश नागवा झाला .
स्वतंत्र्यात पोटासाठी इथल्या माय भगिनीना देह विकावा लागतो. आमच्या देशातील मंदिरे आमच्या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करणारी केंद्रे आहेत. आज भक्तीच्या नावाखाली तिथे सर्रास संभोग साजरा होतो. स्वातंत्र्यानंतर मुक्तीचे पाश्चिमात्य वारे वेगाने वाहते झाले. नीतीमत्तेची वस्त्रे फेकून सारा देश नागवा झाला आहे. अशी टोकदार भाषा वापररून ते इथल्या व्यवस्थेवर हल्ला करतात. किंवा संस्कृती प्रधान देशात आज स्त्रियांवर होणारे अमानुष सामुहीक बलत्कार,खुनी हल्ले,सेक्स स्कँडंल यावर भाष्य करतांना कवी प्रा.प्रदीप पाटील लिहितात-
स्त्रियांना दिवसाढवळ्या चौकात खेचले जाते
बघतात फक्त डोळ्यांनी पुरूषांची इथल्या प्रेते
दुर्भाग्यच हे देशाचे वालीही भ्रष्ट असावा
अन् कौसल्येच्यापोटी रामाला जन्म नसावा !
आज आम्ही एकीकडे देशात रामराज्य आणण्याच्या गोष्टी करतो आहे. तर दुसरीकडे देशात अराजकता माजताना दिसत आहे. कुणाचाच कुणावर अंकुश राहिलेला दिसत नाही. असे चित्र दिसते आहे. त्यामुळे बळी तो कान पिळी. असेच आता दिसू लागले आहे. बायका,मुलींवर दिवसाढवळ्या अन्याय अत्त्याचार गावाच्या चौकात होतात. तेव्हा सारेच पुरुष षंड होऊन धृतराष्ट्र बनतात. पुरुषासारखे पुरुष प्रेतासारखे पडून राहतात. रामराज्याची अपेक्षा करतांना इथले वालीच भ्रष्ट असतील तर रामराज्य कसे येणार ? आणि कौशाल्येच्या पोटी राम तरी कसा जन्म घेईल ? असे प्रश्न त्यांची कविता उपस्थित करते. आसन आणि शासन यावर कुणाचाच विश्वास उरला नसल्याचे सांगताना कवी प्रा.प्रदीप पाटील लिहितात –
राबणाऱ्या माणसांना का इथे वनवास आहे ?
रोज त्यांना भाकरीचा लागलेला ध्यास आहे
राबताना आतडयांसह कातडी करपून गेली
काय याहून वेदनेचा पाशवी गळफास आहे ?
लाख मरणे नित्य जगणे हेच ज्यांचे भाग्य असे
रोज मृत्यूशी अशांचा झुंजणारा श्वास आहे
आसवे आणून खोटी हे चिता रचतील अमुची
शासनावर फक्त त्यांचा एवढा विश्वास आहे
इथल्या सामान्य माणसांना पोटाच्या भुककेसाठी रात्रंदिवस राबावे लागते. जे प्रामाणिकपणे कष्ट करतात.त्यांनाच इथे वनवास आहे. जगण्याच्या संघर्षात ते रोजच इथे मरणाच्या यातना भोगत आहे. श्वासागणिक रोजच त्यांचा मृत्यूशी संघर्ष चालतो. त्यांच्या भवितव्याची कुणालाच चिंता नाही. त्यांच्या टाळूवरचं लोणी चाखणारी इथली व्यवस्था मात्र त्यांच्या बद्दलचा खोटा कळवळा दाखवण्यापलीकडे दुसरे काहीच करीत नाही. असे वास्तव सत्य कवी प्रदीप पाटलांची कविता मांडून जाते. इथली सामान्य जनता कर्जातच जन्माला येते आणि कर्जातच मृत्युला कवटाळते. हे सांगताना कवी प्रा.प्रदीप पाटील लिहितात-
आम्हीच जरी दुनियेच्या पोटांची खळगी भरतो
कर्जात जन्मतो आम्ही कर्जातच आम्ही मरतो
धगधगता जाळ उन्हाचा अंगावर आम्ही घेतो
मातीत कष्ट घेताना घामाचा पाऊस होतो
कष्टांचा ऐकून टाहो आकाशी पाझर फुटतो““““““““““““““““““““““““““““`
स्वप्नांना मोहर येता आनंदुन पुन्हा झटतो
मातीच्या नसानसांतुन अंकुरती हिरवे कोंब
प्रत्येक मुळाशी त्यांच्या रक्ताचा असतो थेंब
इथल्या मातीत काबाडकष्ट करणारा शेतकरी, कास्तकार आयुष्यभर राबतो. तेव्हा देशातील जनतेच्या पोटाची खळगी भरते. इथला कुणबी सा-या जगाचा पोशिंदा आहे. पण इथे त्याला किंमत नाही. त्याच्या कष्टांची जाणीवही कुणाला नाही. तो कर्ज घेऊन जन्माला येतो आणि कर्जापायी झाडाच्या फांदीला दोर आडकून फाशी घेऊन मरतो. शेतातून अन्नधान्य पिकविताना उभं आयुष्य उन्हातान्हात काढतो. त्याच्या शेतातलं पिक पावसाच्या पाण्यावर येत नसून त्याच्या कष्टाच्या घामातून येतं. मातीतल्या बीजाला हिरवा अंकुर फोडण्याचे सामर्थ्य त्याच्या घामात आहे. कारण तो घाम नसतोच खरा तर तो त्याच्या रक्ताचा थेंब असतो. त्याच्या रक्तातून शेतीमाती पिकते. याची जाणीव कुणालाच असू नये. याची खंत त्यांची कविता मांडताना दिसते.
सोसूनही डोंगरदुःखे मालाला नसतो भाव
अन् मनातल्या स्वप्नांचा मग उजाड होतो गाव
आयुष्यच असते अमुचे कर्जाचे कोरीव लेणे
मेल्यावर सरणाचेही डोक्यावर असते देणे.
शेती पिकुनही शेतमालाला योग्य बाजारभाव मिळेलच याची सुतरामही खात्री नसते. उत्पन्नापेक्षा उत्पादनखर्च जास्त झालेला असतो. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाट्याला येतो. त्यामुळे पिकांवर येणा-या पाखरांच्या थव्यांप्रमाणे त्यांच्या स्वप्नांचे थवे मनातल्या मनात नाहीशे होतात. त्यांच्या स्वप्नांचे गाव उध्वस्त होऊन जाते. जुन्या कर्जात नवे कर्ज मिळत जाते. या कर्जाच्या ओझ्यानेच त्यांचं मरण त्यांचा पत्ता पुसत येतं. आणि मरणानंतरच्या सारणाचे कर्ज त्यांच्या सातबारावर देणे म्हणून शिल्लक राहतात. अशा शब्दात कुणब्याच्या जीवनाचं दाहक वर्णन त्यांची कविता करतांना दिसते.
आभाळ ढासळल्यासारखा कोसळणारा पाऊस…..
मस्तीला आलेला वारा….. अंगावर काटा आणणाऱ्या
पाण्याच्या बेगुमान लाटा…..
नदीच्या पुराचा वाढता झपाटा बुडत चाललेली घरं
माणसं सैरावैरा झाली वाट फुटंल तिकडं
वाऱ्यासारखी पळाली
एक विशीतली पोर
एका सायबाच्या माडीखाली अर्ध्याअधिक पाण्यात थरथरत उभी
गच्च ओली….. सायबाने वरच्या मजल्यावर बोलावली
सकाळी गावात बोंबाबोंब झाली
‘अमक्यातमक्याची तरणी पोर
महापुरात वाहून गेली..!
महापुराचे थैमान आणि माणसाच्या माणुसकीच्या मुखवट्याआडचा सैतान याचे विदारक चित्र कवी प्रा.प्रदीप पाटील आपल्या कवितेतून मांडताना समाजमनातल्या संवेदनाहीन आणि भोगवादी मानसिकता अधोरेखित करून जातात.
महापुरात घराच्या आश्रयाला आलेल्या तरण्या पोरीला आश्रय देणे. तिच्या कौमार्याच्या कळीला कुस्करून पुराच्या पाण्यात फेकून देणे. आणि ‘अमक्यातमक्याची तरणी पोर महापुरात वाहून गेली..!’ अशी बातमी गावभर चवीने चघळणे. असा कौर्याचा कळस गाठणारी माणसं आजही समाजात उजळ माथ्यानं वावरताना दिसतात. त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीचा समाचार घेतांना त्यांची कविता दिसते आहे. गावं आता गावची वैभवशाली संस्कृती टाकतं आहे. चंगळवादाच्या नादानं खेडीपाडी बिघडत चालली आहे. यावर भाष्य करतांना कवी प्रा.प्रदीप पाटील ग्राम संस्कृतीबद्दल लिहितात-
लेक सासरी जाताना होई वेडीपिशी माय
दूर वासरू जाताना जशी हंबरावी गाय
जड पावलांनी बाप शीवेपर्यंत यायचा
बघताना लेक मागे आत फाटून जायचा
असे होते माझे गाव कसे बदलून गेले ?
कोणी मेले तरी आता डोळे नसतात ओले
कोणालाच कोणाचेही नाही देणेघेणे काही
माणसांचा असूनही गाव माणसांत नाही .
कधीकाळी मुलीची पाठवणी करतांना आईची अवस्था गायीसारखी व्हायची.गावाच्या शिवेपर्यंत जाणारा बाप आतून फाटून जात असे. आणि आज गाव बदलून गेले. सोईसाधनांनी माणसं परिपूर्ण झाली आणि एकमेकापासून माणसं तुटत गेली. नाती फाटत गेली. माणुसकी आटत गेली. त्यामुळे गावात माणसं असूनही गाव माणसात राहिला नसल्याची सामाजिक,भावनिक खंत त्यांची कविता मांडून जाते. ग्रामीण जीवनात होत चाललेला बदल माहित असूनही आम्ही आमच्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या बाता आणि फुशारकी मारण्यात पटाईत आहोत. हे सांगताना ते लिहितात-
कित्येक पिढ्यांनी अमुच्या गाजवली रणमैदाने
हे ऐकून रक्त उसळते इतिहास सांगतो तेव्हा
पाऊल वाजता अमुचे भीतीस वाटते भीती
बाहुतिल ताकद दिसता काळोख थरकतो तेव्हा
फेकली नजर जर आम्ही खडकांना पडती भेगा
गोंधळते वादळ, आम्ही निःश्वास टाकतो तेव्हा.
किंवा-
ऐकली जन्मात नाही एकदाही हार आम्ही
घेतली अद्याप नाही एकही माघार आम्ही
पोसली कृष्णातटावर आमची राजेघराणी
त्याच कृष्णेच्या कृपेने वाढलो रगदार आम्ही
जन्म या भूमीत घेऊन घडविला इतिहास ज्यांनी
ते युगंधर, ईश्वराचे मानतो अवतार आम्ही
मारता तुम्ही कशाला संस्कृतीच्या थोर गप्पा ?
संस्कृतीच्या वैभवाचे खुद्द वारसदार आम्ही .
आमचं गाव आमची घराणी कशी होती. पूर्वजांच्या कीर्तिमान कामगिरीवर अभिमानाने आमची छाती आजही फुगते. एकेकाळची सारी राजघराणी कृष्णेच्या तटावर पोसली. तिच्या रगदार मातीत वाढली. त्या घराण्यांनी इतिहास घडविला.त्या संस्कृतीचे खरे वारसदार आम्ही आहोत. असे असले तरी आमचे पौरुष्य कुठेतरी आटले असल्याची जाणीव करून देतांना कवी प्रा.प्रदीप पाटील यांची कविता दिसते.स्वत:च्या आयुष्यावर भाष्य करताना लिहितात –
सगळयाच दिशांना तेव्हा अंधार पसरला होता
नुकताच कुठे जगण्याचा मी रस्ता धरला होता
घेऊन निघालो होतो अंगावर लोळ विजांचे
मजसाठी श्वासच माझा साथीला उरला होता.
कवी प्रा.प्रदीप पाटील अत्यंत पप्रामाणिकपणे आपल्या आयुष्याची कैफियत मांडतात.मला माझे भविष्य दिसत नव्हते. सभोवताली अंधार होता. अनेक संकटांशी सामना करावा लागला. त्यावेळी माझ्या सोबतीला कुणीही उभे राहिले नाही. अशावेळी माझा आत्मविश्वास हाच माझा मित्र म्हणून सोबत होता. त्याच्या समर्थ साथीने मी जीवनाची लढाई लढू शकलो. अशी प्रामाणिक आणि प्रांजळ कबुली कवी प्रा. प्रदीप पाटील देतांना दिसतात.
थोडक्यात कवी प्रा. प्रदीप पाटील यांची कविता मानवी जीवन वास्तव अधोरेखित करतांना दिसते. मानवी मनाच्या विविध प्रवृत्तीचे दर्शन घडविताना दिसते. गावखेड्यातील वृत्ती,प्रवृत्तीचे, सहसंबंधांचे,नीतीमूल्यांचे,जुन्या नव्या संस्कारांचे दर्शन घडवते. त्यांच्या कवितेत मातीत जगणा-या माणसांबद्दलची आंतरिक ओढ जाणवत राहते. त्यांची कविता गावखेड्याच्या पांदीच्या पाऊल वाटेने आल्याने तिथल्या लोककलेचा संस्कार कळत नकळत घेऊन येतांना दिसते. त्यांची कविता शेतीमातीत राबणा-या हातांवर नितांत श्रद्धा ठेवणारी आहे. त्यांची कविता कष्टक-यांच्या रक्ताच्या थेंबातून आणि मातीच्या कोंभातून उगवणारी कविता आहे. त्यांच्या कवितेला श्रमिकांच्या श्रमाच्या घामाचा वास आहे. ते स्वत:चे मायमातीचे दास आहे. त्यांची कविता माणसाच्या वर्तमान अस्तित्वाचा जशी शोध घेते तशीच ती त्याच्या ऐतिहासिक वारशाचा बोध करून देते. त्यांची कविता कालचा आणि आजच्या माणसांच्या वर्तन परिवर्तनाचा तुलनात्मक अभ्यास करतांना दिसते. (सत्य घेऊनच तेव्हा …. माणसातला माणूस ) पाटील यांची कविता काहीशी आत्मसंवादी आहे. तशीच ती कालप्रवाही आहे. त्यांची कविता वाटते तितकी संथ नाही. तिला माणुसकीची खंत आहे. तिच्या अंग प्रतिअंगावर सामाजिक वेदनेचे रंग आहे. तसेच सामाजिक उपहासाचे अंग आहे. प्रदीप पाटील यांची कविता मानवी मनाच्या जखमांच्या वेदनेचं गाणं आहे. तसेच सामाजिक दायित्वाचं देणं आहे. कवी प्रा. प्रदीप पाटील यांची कविता मातीतल्या माणसाच्या सुखदु:खाची गाणी होऊन येते. वेदनेचं पाणी होऊन प्रवाहित होते. तिला कृष्णेच्या पाण्याची लय आहे. मायीच्या स्पर्शाची सय आहे. त्यांची कविता यापुढे अधिकाधिक प्रवाहित होवो. यासाठी त्यांच्या कविता लेखनाच्या प्रवासाला खूप सा-या शुभेच्छा.
मो- ९४२२७५७५२३