मातीगर्भातील सृजनाचे सुगंधी स्वप्न
शब्दांच्या ओंजळीत फुलवणारी कवयित्री : मीनल येवले
‘विचारांच्या सहाय्याला कल्पना आणून सत्य व आनंद एकत्रित निर्माण करण्याची कला म्हणजे काव्य.’ असे जॉन्सनने म्हटले आहे. कार्लाईल तर विचारांनाच काव्य म्हणतो. तर कोलरीज यांच्या मते ‘उत्तम शब्दांची उत्तम रचना म्हणजे काव्य’. ‘उदात्त भावनांची कल्पनेच्या सहाय्याने झालेली अभिव्यक्ती म्हणजे काव्य’. अशा शब्दात रस्किन काव्याची व्याख्या करताना दिसतो. अशा काव्याच्या अनेक व्याख्या केल्या गेल्या असल्या तरी यात महत्त्व भावना आणि कल्पना यांना प्राधान्य दिलं जातं. असे असले तरी साहित्याचे स्वरूप हे मात्र आल्हाददायी असावे. आनंददायी असावे हे मात्र नक्की. सामान्यता माणूस व्यवहारी दृष्टीतून भोवतालचे विश्व, जीवन पाहतो. परंतु कलावंत हा नेहमी त्यातलं सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करतो. सत्य सृष्टितून तो स्वत:चे असे नवे कल्पनाविश्व उभे करतो. तशी पाहिली तर मानवी मनाची जडणघडण, रचना अतिशय गुंतागुंतीची असते. किंबहुना मन हे एक न उलगडलेले कोडे आहे.असे असताना त्याच्या अंतरंगापर्यंत जाऊन भिडण्याचे सामर्थ्य कलावंतांमध्ये असतं. आणि म्हणून कवी एक स्वतःची प्रतिमासृष्टी निर्माण करतो. हे सगळं असलं तरी भोवतालचं वास्तव हा साहित्याच्या कलाकृतीचा मुख्य पाया असतो. कविमनाचे निरीक्षण अवलोकन जसे असेल त्यानुसार त्याच्या सवयी, आचार-विचार यातून त्याची जडणघडण होत असते. या सर्वांचा परिणाम त्याच्या कलाकृतीवर होत असतो. अनेक अनुभवलेले प्रसंग, घटना यांच्या आधारावर तो स्वतंत्र निर्मिती करतो. त्यासाठी कल्पनाशक्ती त्याच्या मदतीला येते. त्याने निर्माण केलेले विश्व हे काल्पनिक असते. ती एक नवनिर्मिती असते. ती एक कलाकृती असते. माणसांची सुख-दुःखं, व्यथा-वेदना साहित्यातून बोलक्या होत असतात. त्यांना अभिव्यक्तीसाठी जागा मिळते. कवितेच्या पाऊल वाटेने आपलं मनातलं हितगुज खूप दिवसांनी भेटलेल्या आपल्या बालपणीच्या सखीला सांगावं.अशी ज्यांची कविता अनवाणी पायांना माती माखून रानावनातून येते. गावखेड्यातून येते. कधी श्रावण होऊन बरसून जाते.तर कधी मोर होऊन फुलून येते. कधी ती नदीनाल्यातून पूर होऊन वाहते तर कधी अंत:कराणातल्या दु:खाला आसवातून वत मोकळी करून देते. असं मातीचं आणि आपलं नातं गुंफणारी, मातीतून उगवणारी सुखदु:खाची कविता विदर्भभूमीत लिहिणारी, नागपूरची कवयित्री मीनल येवले ‘कवी आणि कविता’ या सदरातून आज आपल्या भेटीला येत आहेत.
मीनल येवले यांची कविता म्हणजे मातीवरची नितांत श्रद्धा. मातीवरची अवीट भक्ती. माती हाच त्यांचा ईश्वर. पंचमहाभूतांची सारी तत्व त्यांच्या कवितेत डोकावतात. मातीच्या प्रेमातून,सहवासातून आयुष्याची वाटचाल करतांना, त्यांची कविता मातीचं सारं सौष्ठव घेऊन अंकुरते. कवयित्रीचं बालपण गावखेड्यात गेल्याने जन्मापासून माय आणि मातीचा सारखाच सहवास त्यांना लाभला. मायमातीचे संस्कार लाभले. त्यामुळे माती हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला. सहवासातूनच माणूस प्रेमात पडतो. मीनल येवले त्याला अपवाद कशा ठरणार. मातीवरच्या निर्मळ आणि नितळ श्रद्धेतून त्यांची भक्ती मातीत रुजते. भरल्या कंठातून माती, गाव, तिथली संस्कृती, रितीरिवाज,परंपरा, तिथला निसर्ग ,डोंगर , द-या,नदी,नाले,तिथल्या वाटा,आडवाटा, झाडं, झुडपं,पशू,पक्षी हे सगळं कवयित्री मीनल येवले यांच्या कवितांमधून प्रतिकं आणि प्रतिमांच्या रूपानं सतत डोकावताना दिसतात. मानवी जीवनाचा आधार माती आहे. मातीच्या अंगाखांद्यावरून संस्कृतीच्या पाऊलवाटा चालत येतात. मातीच्या आणि संस्कृतीच्या वाटांवरून त्यांची आणि त्यांच्या कवितेची वाटचाल होताना दिसते. कवयित्री मीनल येवले या ऋजू स्वभावाच्या कवयित्री आहेत. अत्यंत तरल भावना त्यांच्या शब्दातून कवितेमध्ये उमटतात. त्यांच्या कवितेत त्या मानवी मन,मानवी प्रवृत्ती बरोबरच स्वतःचा शोध घेतांना दिसतात. मातीतल्या माणसांचा स्नेहबंध त्या हळूवारपणे जपतांना दिसतात. त्यांची कविता माणसाचा शोध तर घेतेच परंतु स्वतःचा आत्मशोध जाणीवपूर्वक घेतांना दिसते. अशा दुहेरी वाटेवरून त्यांची कविता वाटचाल करतांना दिसते. माती हा तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय दिसतो. मातीतून उगवलेल्या फुलाप्रमाणे त्यांची कविता मातीचा गंध, मातीची लय ,रुपबंध घेऊन येते. निसर्गाच्या बारीक-सारीक हालचाली त्यांच्या कवितेत डोकावतात. निसर्गाचे विविध विभ्रम त्यांच्या कवितेतून जाणवत राहतात. मातीगर्भातील सृजनाचे सुगंधी स्वप्न नियमित शब्दांच्या ओंजळीत फुलवणारी कवयित्री म्हणजे मीनल येवले. त्यांच्या कवितांच्या आशयात मातीचे बिंब-प्रतिबिंब सातत्याने पडलेले दिसते. कवयित्री मीनल येवले यांचे ‘ परीघ ’, ‘ मी मातीचे फुल ’, ‘ वेदानेला फुटे पान्हा ’, हे काव्यसंग्रह प्रकाशित आहे. ‘ आंदण ’, ‘ एकांताचे कंगोरे ’ हे ललित लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
माती हीच आई आणि माती हेच सासर-माहेर मानणा-या कवयित्री मीनल येवले मातीचे ऋण मानणा-यातल्या आहेत. आपल्या कवितेच्या शब्दांच्या अंगाखांद्यावरून त्यांनी अनुभवलेलं भावविश्व सातत्याने वाहताना दिसतं. त्यांच्या कवितेत अर्थापेक्षा नाद महत्त्वाचा वाटतो दिसतो. कवितेचे बाह्य आणि अंतरंगात फारसा फरक दिसत नाही. गावसंस्कृतीत वाढणाऱ्या, दैनंदिन जीवन जगणाऱ्या, नीतिमूल्यांची जपणूक करणाऱ्या, शेतकरी कुटुंबात रममाण होणा-या, माता-भगिनीचे आयुष्य कवितेतू चित्रित करतांना दिसतात.बायकांच्या आयुष्याचं गाणं त्यांच्या कवितेत होतांना दिसतं. त्यांची कविता ही गावसंस्कृतीत जन्मलेली.त्यांच्या सोबत त्यांचं बोट पकडून तिथंच वाढलेली असल्याने त्यांच्या कवितेत गावसंस्कृतीचा, तिथल्या मातीचा गंध दरवळताना दिसतो. दुःखं सोसण्याची आणि त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य हे पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये जास्त आहे. खरा सृजनाचा वारसा मातीला जसा आहे, तसाच स्त्रीला आहे. म्हणून त्यांच्या कवितेत मातीच्या दुःखाचा कळत नकळत सुगावा लागत जातो. त्यांचं कवीमन हे सतत मातीशी संवाद साधत राहतं. मनातल्या भावना मोकळ्या करायला त्यांना मातीच जवळची मैत्रीण सापडते. मातीच्याच सहनशीलतेचा गुण कळत नकळत स्त्रियांच्या स्वभावात येतो. म्हणून त्या शेती मातीलाच स्वतःची सखी मानतात. त्यामुळे त्यांच्या कवितेतून स्त्रीमनाच्या विविध जाणिवा, स्त्रियांच्या विविध भूमिका आणि स्त्रीमनाचे विविध पदर कवितेतून व्यक्त होतांना जाणवतात. स्त्रीची वेदना, तिचं प्रेम, तिच्या भावना या सगळ्या त्यांच्या कवितेत येतांना दिसतात. त्यांची कविता म्हणजे पहिल्या पावसात मृधगंधाने गंधित झालेली माती होय. त्यांच्या कवितेत माती येते. पाठोपाठ पाऊस येतो. माती आणि पाऊस यांच्या विविध छटा त्यांच्या कवितेत दिसून येतात. त्यांचं बालपण गावखेड्यात गेल्यामुळे तिथल्या माणसांची निर्मळआणि निर्व्याज नाती त्यांनी अनुभवली आहे. आज नागरसंस्कृतीत वास्तव्य करतांना त्यांना त्यांचे गावखेडे सतत खुणवतना दिसते. गावाकडच्या मातीच्या रंगाची, गंधाची भूल त्यांच्या मनाला सतत पडते. कवयित्री मीनल येवले यांच्या कवितेत स्त्रीच्या भावजीवनाचे विविधस्तर मातीसोबत जोडले गेलेले आहेत. म्हणून तर मातीचा गौरव करताना त्या लिहितात-
दिशा गवसल्या चालत जाता
धरून मातीचे बोट
व्याकूळ ओठी तिने पाजला
नवसृजनाचा घोट.
पदरामध्ये बांधून माझ्या
सुखदुःखाच्या ठेवी
भरल्या कंठामधुनी गाते
मी मातीची ओवी.
जोजवितांना अजुनी गाते
नित्य नवी अंगाई
मी मातीची लेक सावळी
मातीच माझी आई.
मातीच्या पाऊल वाटेने चालत जातांना नवसृजनाचा संस्कार झाला.जीवन जगताना सुख,दु:खं सोबत घेऊन मातीची ओवी गात गात आयुष्य सुखद झालं. बालपणापासून मातीची अमूल्य साथ लाभल्याने जीवन जगणं सोपं होत गेलं. त्याचबरोबर सावळ्या मातीची सावळी लेक असल्याचा आभिमान तर त्यांच्या कवितेच्या पानापानातून वाचकांना जाणवत राहतो.मातीचा आधार हा सर्वात मोठा आधार त्यांना वाटतो. म्हणून त्या स्वत:ला समजावताना लिहितात-
पदरातल्या काट्यांचे, आता व्हावे विस्मरण
भरभरून स्विकार, बाई ओटीतले दान.
भूतकाळाची वादळे, नको आणूस मनात
ठेव जिव्हारीच्या कळा, ओठी दाबुनिया दात.
जुने आठवित काही, नको गाऊ दुःखगाणी
आता त्याच्याशी हलेल, थोडे पोटातले पाणी.
अपरुप वेळ अशी, पुन्हा नाही यावयाची
अंगणात उतरेल, किलबिल पाखरांची.
घरादाराला लागली, त्याची पैंजणी चाहूल
किती दिसांनी आलेले, जप उंबराचे फूल.
स्त्रीला मिळणारं मातृत्व हे तिच्या जीवनाचं परिपूर्णत्व मानलं जातं.आई होणं म्हणजे पूर्णत्वाला पोहोचणं.त्या पृर्णात्वाच्या आंनदाला सामोरे जातांना भूतकाळातील कडू दिवसाच्या आठवणी विसरून जा.
मनाला जिव्हारी लागलेले शब्द, कळा दातओठात दाबून ठेव. मातृत्वाच्या, आनंदाच्याक्षणी दु:खाची गाणी गाऊ नको.स्वत:ला समजून घेत जीवन जग. तुझ्या अंगणात पाखरांची किलबिल सुरु होईल. त्या चिवचिवाटाने तुझं घर भरून जाईल.त्या तान्हुल्याची लगबग,त्याच्या पायातल्या पैंजणाचा नाद ऐकत त्या फुलाला जप. असा आपुलकीचा सल्ला द्यायला त्या विसरत नाही.कवयित्री मीनल येवले लिहितात-
बघ, आता हे युगसंक्रमणाचे आशादायी वारे
येताहेत तुझ्याकडेच वाहात,
तू होती तशीच उभी रहा आपले पाय मातीत घट्ट रुतवून…
सर्वव्यापी झालेले तुझे लेखणीचे हात फिरू दे
नव्याने अवघ्या संसारावरून
बदलू दे युगामागून युगे,
उमलू दे विज्ञान तंत्रज्ञानाची फुलं
हे जगज्जननी,
अजूनही तुझ्याच उदरात जन्म घेणाराहेत उद्याची शहाणी मुलं.
कवयित्री मीनल येवले सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा विचार मांडताना स्त्रियांच्या मानसिकतेचा किती सूक्ष्मपणे विचार करतात. संक्रमणाचे वारे आता वाहू लागले आहे. मातीत पाय घट्ट रुतून उभी रहा. याची जाणीव द्यायला त्या विसरत नाही. शिक्षणाचा परीस स्पर्श होऊ दे. दिवसामागून दिवस बदलतील. तुझ्या उदरात जन्मलेली वंशफुलं तुझा उध्दार करतील. कारण उद्याच्या मुलांना तूच संस्कारक्षम बनवणार आहेस. असा विश्वास त्या देतात. त्याचबरोबर संसारातील अधिक उणं विसरायला शिक. हे सांगताना त्या लिहितात-
भातुकलीचा खेळ मांडतांना
भांड्याला भांडं लागतंच ना ?
प्रेम करणारंही आपला माणूस
कधी कधी वाकडे वागतंच ना ?
अगं ! पायांनाच तर कायम
बिलगून आली ओली मऊ माती
तिनेच शिकवलं निभवत जगणं
काळजात रुजलेली जीवट नाती.
घेतला वसा न सोडण्याचं
तिनेच घातलं हळवं बंधन
संवेदनांचा एक गाव
तिनेच पदरात दिलंय आंदण.
संसारात भांड्याला भांडं लागणं,आपल्या माणसाचं वाकडं वागणं हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात चालूच असतं. पायाला लागून आलेल्या माहेरच्या संस्काराच्या ओल्या मातीनं काय शिकविलं. हे कधी विसरायचं नसतं. मातीने घातलेलं बंधन मोडायचं नसतं. कारण मातीनेच आपल्या पदरात संवेदनांचं एक आख्खं गाव आंदण दिल्याचे किती सहजतेने कवयित्री मीनल येवले सांगून जातात.ही सजगता त्यांच्यां संवेदनशील मनाचा वाचकांना परिचय करून देते. तसेच स्वत:च्या आयुष्याला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी मुलींनीच आईबापाचा आधार व्हावा. हे सांगताना त्या लिहितात-
उंबरा ओलांडला की एक नवं जग
गर्दी स्पर्धा, धावाधाव
जगण्याचा रोज नवा डाव
इर्षा, द्वेष, तिरस्कार
समज,गैरसमज, असहकार
मलाही या साऱ्यांची आता
सवय करायलाच हवी
बा ! तू असा किती दिवस अंथरू शकणार
माझ्या पायवाटेवर फुलं .. ?
मुलींचा जन्म एका घरात होतो तर तिच्या आयुष्याची सुरवात दुस-या घरात,गावात होते. लग्न हा मुलींचा लौकीकअर्थाने दुसरा जन्म मानला जातो. कारण तिचं नाव बदललं जातं. तिच्या आयुष्यात नवं घर,नवा उंबरा ठरलेलाच असतो.गर्दी,स्पर्धा, धावाधाव, इर्षा, द्वेष, समज, गैरसमज, असहकार हे सारं पुढे माझ्या वाट्याला जर येणार असेल तर स्वत:ला त्याची सवय करून घेतली पाहिजे. असा विश्वास लेकीनं बापाला द्यावा. म्हणजे मुलीच्या काळजीत बाप राहणार नाही. किती व्यापक विचार त्यांची कविता देऊन जाते. किंवा बापाने दिलेलं आत्मविश्वासाचं अवकाश मुलींना किती सामर्थ्यवान बनवतं. हे सांगताना कवयित्री मीनल येवले लिहितात-
आवाक्यानुरूप पंखांच्या
बापाने मोकळे उडू दिले
भेदाभेदाच्या पल्याड
दृष्टी, व्यक्तित्वाला घडू दिले.
उणिवातल्या पायवाटांनी
पुरविले चालत राहण्याचे बळ
बाळकडू पचवून सोसता आली
दुःख व्यथांची झळ.
मुलींचं निम्म अधिक आवकाश हे बालपणातील आत्मविश्वासावर उभं असतं. तो आत्मविश्वास बालपणी मुलींना मिळायला हवा. त्या विश्वासाच्या बाळावर त्यांचं आयुष्य सुकर होतं. जीवनातले अनेक अनुभव माणसाला समृध्द करून जातात. ते बाळकडू बालपणापासून मिळालं पाहिजे. आज सामाजात किती वेगाने बदल होतो आहे. त्या बदलावर त्यांची कविता प्रखरतेने हल्ला करताना दिसते. जवळची माणसं एकमेकांचा गळा घोटतात.विश्वासघात करतात.यावर भाष्य करतांना कवयित्री मीनल येवले लिहितात-
सारा गाव पाठीशी आपलेच घोटतात गळा
परस्परातल्या जिव्हाळ्याचा का सुकत चालला मळा ?.
कागदाचीच झाली मनं गैरसमजाने भरले पोते
स्थावर जंगम व्यवहारी कागदी झाले नाते.
शिवता शिवता आयुष्याचे उसवतच गेले टाके
हिसकावण्याच्या मनसुब्यात नात्याला पडली भोके.
कुणाचाच कुणावर विश्वास उरला नाही. भावकीतली माणसं एकमेकांचा गळा कापतात. एकमेकांमधील आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा आटतो आहे. भौतिक सुखाच्या लालसेने माणसांची मनं कागदी झाली. रक्तातल्या नात्यात अंतर पडत चालले. हे कुठेतरी थांबले पाहिजे. नीतिमूल्ये जोपासली पाहिजे. अशी आशा त्यांची कविता करतांना दिसते. गावखेडी चंगळवादाच्यामागे लागल्याने नितीमुल्याचा मोठा –हास सुरु आहे. तो मांडताना मीनल येवले लिहितात –
गाव तरी कुठे राहिलं आता पहिल्यासारखं
मनामनातले प्रेमाचे झरे पार चाललेय आटत
तुटत जातात नाती गोती दुभंगून जातात मनं
रक्तात इतकी भिनून गेली स्वार्थाची रसायनं .
जगवणारी काळी माय तुकड्यातुकड्यात वाटली गेली
आपुलकीची हिरवी फांदी भाऊबंदकीत छाटल्या गेली.
गावखेडी बदलत आहे. नातीगोती तुटत आहे. प्रेम जिव्हाळा आटत आहे. मनं दुभंगत आहे. स्वार्थात माणसं आंधळी होत आहे. निती व अनिती समजेनाशी झाली. जन्मदात्या आईवडीलांची घरातनं हाकलपट्टी केली जातेय.भाऊबंदकी टोकाला पोहोचलीय. हे सारं समाजव्यवस्थेचं वास्तवचित्र कवयित्री मीनल येवले सार्थ शब्दात मांडतात. मुलींनी शिकावं. संघर्ष करावा. आपापल्या प्रश्नांची, समस्यांची तड लावावी. त्यासाठी त्यांनी लढायला शिकलं पाहिजे. हे सांगताना त्यांच्या शब्दांना धार येते.
आयुष्याच्या रणांगणातील चक्रव्युह तोडता आलाच पाहिजे
हरेक प्रश्नांशी आपल्याला लढता आलं पाहिजे.
जेवढं पाणी होतं साचलं पुलाखालून गेलं वाहून
चंद्रासवे बींब माझं पहायचे आजवर गेले राहून
कोरड्या डुबक्या मरत जगणं मला थांबवता आलं पाहिजे
अन् जगण्याशी हसत हसत भिडता आलं पाहिजे.
तनामनातून जपता जपता उकरतच गेल्या घरभिंती
काळ पुढे सरकत गेला पायाखालची पोखरून माती
सावरण्यासाठी घरभिंतीना आता सारवता आलंच पाहिजे
जगण्याशीही आपल्याला भिडता आलं पाहिजे.
स्त्री आता लढण्याची,भिडण्याची आणि तोडण्याची भाषा करू लागली. ही तिच्या क्षमतांची ती ग्वाही देवू लागली आहे.गुलामीच्या जोखडातून तिला ज्योतिबा,सावित्रीने मुक्त केलं आहे. तिचा आत्मविश्वास तिला अधिक आत्मनिर्भर बनवीत आहे. स्त्रियांच्या पायाखालची माती पोखरत काळ कितीतरी पुढे चालत गेला. अजूनही वेळ गेलेली नाही. स्त्रीयांनी स्वत:च्या आयुष्याला सावरत आपापल्या घरभिंती सावरल्या पाहिजे. तसेच स्वत: जगण्याशी भिडले पाहिजे. मला वाटते ‘ भिडणे ’ ही आव्हानात्मक कृती आहे. भीड हा स्त्रीमनाचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यातून सोसिकता वाढत जाते. अंगवळणी पडते. तो स्वभाव गुणधर्म टाकून स्त्रियांनी कणखरपणे आयुष्याशी दोन हात केले पाहिजे. ही जाणीव कवयित्री मीनल येवले यांची कविता स्त्रीमनाला करून देते. अतिशय समर्पक शब्दात त्यांची कविता स्त्रियांच्या आयुष्यावर भाष्य करतांना दिसते. स्त्रीमनाला बळ देते. प्रेरणा देते. ‘बाई आणि माती’ ही त्यांची कविता स्त्री आणि मातीचे साम्य नोंदवून जाते. मातीतील जीवांचे जगण्याचे अद्यतत्व या कवितेतून अधोरेखित करतांना कवयित्री मीनल येवले लिहितात-
अनादिकाळापासून दोघींनाच रुजवता येते गर्भात
सृजनाचं बीज
आपल्या उदरात सामावून घेतात त्या
अबोध खुणा नवांकुराच्या.
त्या करीत नाहीत गवगवा
आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा
मातीच्या कुशीत धान्य अन् बाईच्या कुशीत जीव
लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची
जातकुळी एकच बाई आणि मातीची.
स्त्री आणि माती यांच्यातलं साम्य, मोठेपण सहजसोप्या शब्दात त्या मांडून जातात. दुष्काळाला सामोरे जातांना ग्रामीण भागतील स्त्रियांना मोठी उपासमार सहन करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट,गावखेडयातून पाखरांप्रमाणे होणारे माणसांचे स्थलांतर, मुके प्राणी,पक्षी, झाडी यात अडकलेले प्राण, मनाची होणारी होरपळ, तगमग त्या अलगदपणे टिपून जातात.तिथल्या माणसांची होणारी द्विधा परिस्थिती मांडताना कवयित्री मीनल येवले लिहून जातात.
हताश डोळ्यातली विझून गेली स्वप्न
ओल आटली आनंदाची, खंगत गेले दिवस
पारावरच्या मुकाट सावलीत देवासाठी नवस.
जगण्या-जगवण्याचे आटले अवघे झरे
इगुतीच्या संसाराने कधीचीच खाल्ली हाय
मातीत रुतून बसलेला निघता निघत नाही पाय.
मातीतून वाहणारे पाण्याचे झरे आटावे आणि मातीची ओल उडून जावी तसे दिवस अचानक बदलतात. तेव्हा डोळ्यातली स्वप्नं आधुरी राहतात. खंगत जाणा-या या दिवसात जगण्याची उमेद सारेच हरवून बसतात. तेव्हा देवळातल्या देवालाच नवस बोलावे लागतात. कारण जन्मापासून मातीशी नाळ जोडली गेली आहे. उभ्या हायातभर मातीतच आयुष्य जातांना मातीत पाय रुतत जातात. पायांना माती सोडवत नाही. मातीशी नाळ तुटत नाही. तिला एकदम तोडणं जमत नाही. मनाची मोठी उलघाल होते. तेव्हा त्या प्राप्त परिस्थितीशी कसे लढायचे याची जाणीव देतांना कवयित्री मीनल येवले लिहितात-
तळाखालच्या कातळाशी का लढणे असते सोपे ?
तुटू दिल्या नाहीत फांद्या जपून राखले खोपे.
काही जखमा चिघळत गेल्या भरत गेल्या काही
ओठ दाबून सोसत गेली रडता आले नाही.
काय ठेवले पुढ्यात मांडून तिला कुठे ते ठावे ?
ऋतू पुरवतील श्वास जेवढा तोवर जगून घ्यावे…!
झाडासारखाच माणसाने संघर्ष दोन स्तरावर सतत चालू ठेवायचा असतो. मुळं मातीखालच्या खडकाशी लढा देत पाणी शोधात पुढे सरकत असतात.पाणी मिळवत राहतात. त्याचवेळी झाडाच्या हिरव्या फांद्या ऊन,वारं,पावसाला समर्थपणे सामोरे जात राहतात.या संघर्षाच्या काळातही माणसांना मनातल्या फांद्यावर बांधलेले स्वप्नांचे खोपे जपता आले पाहिजे. दु:खं दाखवायचं नसतं. कारण दु:खाची बाजार पेठ कुठेच नसते. म्हणून ओठातल्या ओठात दु:खं दाबून ठेवून त्यांची कविता आयुष्य जगायला शिकविते. आपल्या पुढ्यात काय मांडून ठेवलेलं आहे याचा अंदाज बांधणे कठीण असतं. म्हणून जोपर्यंत ऋतू श्वास पुरवतील तोवर जगून घ्यायला शिकले पाहिजे. असा जीवन संदेश त्यांची कविता देतांना दिसते.
कवयित्री मीनल येवले यांच्या कवितेत विविध रूपातून पाऊस कोसळत राहतो. कधी तो सखीचा पाऊस होऊन रिमझिम करून जातो. तर कधी मातीचा पाऊस म्हणून चिंबचिंब भिजून जातो. तसेच त्यांच्या कवितेत मनातला आणि निसर्गातला श्रावण मोहित करून जातो. त्यांच्या कवितेच्या वाटेवर खुपदा माहेर भेटत राहतं. तितकं सासर वाटेत लागत नाही. त्यांच्या कवितेत जागोजागी मातीचे भावदर्शन होत राहते. त्यांच्या अनेक कवितांमधून स्त्रीच्या भावजीवनाचे विविध कंगोरे मातीसोबत जोडलेले जाणवत राहतात. त्यांच्या कवितेत जागोजागी यमक, रूपक,उत्प्रेक्षा,चेतनागुणोक्तीआदी अलंकार भेटत राहतात. तसेच ओटी, ओल, उटी, काठ, हिरवीखुण, आंदण, तहान, सळ, खंत, सल, भुई, गोंदण, माय, दिठ, घागर, पाखरं, ओंजळ, गुंता, कवडसे, भांडं, चिमुटभर यासारखे कितीतरी बोलीभाषेतील शब्दामुळे कवितेच्या सौष्ठवात भर पडून कवितेतील ग्रामीणवास्तव अधिक खुलून दिसतं. तर मम, तम, प्रहर, सांज, धरा, मौतिक, दीप, व्रण, शुभ्र, पुष्प, प्राशान, तृष्णा, ऊर्जा, प्रिती, मधुघट यासारखे अनेक संस्कृतशब्द कवितेत आल्याने कळत नकळत कवितेच्या सौंदर्याला बाधा पोहोचते. भविष्यातही निःसंगाचे देणे त्या निसर्गचक्रातील ऋतुंना बहाल करत राहो. त्यांच्या सा-याच वेदनांचे गाणे होत जावो. मातीचे फुल आणि स्व:ताचे मुल जोपासताना त्यांचे काळीज संवेदनेने भरून येवो. मातीबरोबर त्यांच्या सृजनत्वाचे नाते अधिकाधिक दृढ होत जावो. त्यांच्या कवितेला उजेडवाट मिळो. त्यांच्या ध्येयांना अधिक उन्नत वाटा गवसत जावो. नियमितपणे त्यांच्या आवतीभोवती जिव्हाळ्याची फुलं बरसत राहो. तसेच त्यांच्या ऋतूपर्वाची वही चिरंतन हिरवी राहो. ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये जगणारी आणि जपणारी त्यांची कविता मातीत अधिक खोलवर मुळं रुजून उभी राहो. त्यांच्या कवितेचा गंध सर्वदूर दरवळत राहो. त्यांच्या कवितेच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.
मो- ९४२२७५७५२३