मातीतल्या माणसांच्या व्यथा आणि वेदनांना कवितेचं आवकाश बहाल करणारा कवी : विष्णू थोरे
कवी विष्णू थोरे हे रंगांच्या रानात रंगलेला रानकवी. चित्रकर्मी असलेले कवी विष्णू थोरे कवितेच्या क्षेत्रामध्ये रंग,रेषा आणि चित्रांच्या आशयघनते एवढीच दमदार कविता घेऊन येतांना दिसतात. त्यांच्याविषयी…
कला म्हणजे माणसाला माणूसपणाकडे घेऊन जाणारी पायवाट. कला म्हणजे माणसातील सर्जनशीलता प्रवाहित करणारा झ-याचा हिरवाकाठ. दररोजच्या कंटाळवाण्या जीवनाला एक हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कला. कला माणसाच्या जगण्याला सौंदर्य प्रदान करते. तसेच माणसाचं जगणं अधिकाधिक सुसाह्य करत जाते. कला माणसाच्या जगण्याला उंची बरोबरच खोली देते. कलेमुळे दु:खाचा विसर पडतो. दु:खाला हलकं बनविण्याचं सामर्थ्य कलेत असतं. खरं तर कला हा विरंगुळा नसून माणसाला, समाजाला, सुसंस्कृत, संवेदनशील व विचारप्रवण बनवत असते. मानवाच्या आयुष्यात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आगोदर मुलं अनेकदा चित्रातून संवाद साधत असतात. संवाद हे माध्यम आयुष्यातल्या अनेक गोष्टींना जोडत जातं. चित्र हे चित्रकाराचं संवाद साधण्याचं महत्वाचं माध्यम आहे. माणसाच्या अभिव्यक्त होण्याच्या अनिवार्यतेतून कलानिर्मिती होते. चित्रकला ही अशीच एक कला आहे. ‘पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ‘ म्हणजे पूर्णाचे पूर्णत्व काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. चित्रातील सौंदर्य अनेकांनी अनुभवले किंवा उपभोगिले तरी ते जसेच्या तसेच मूळ चित्रात कायम शिल्लक राहते. म्हणूनच चित्रकला ही एक उत्तम ललितकला आहे.चित्रकला ही तर पूर्णतः मानवी कृतीशींच संबंध जोडणारी कला आहे. सौंदर्यावर प्रेम करणे व सौंदर्यावरील प्रेमाचे आविष्करण करणे यागोष्टी चित्रकलेच्या उपासकालाच साध्य होतात. ज्याला चित्रकलेचे ज्ञान नाही त्याला जगातील सौंदर्याचे भान नाही. असे म्हटले तर वावगे ठरू नये. चित्रकलेपासून होणारा आनंद सार्वजनिक स्वरूपाचा असतो तो सार्वलौकिक स्वरुपाचा आनंद असतो. ज्यांना डोळे आहे, त्याहीपेक्षा दृष्टी आहे.त्यांनाच तो आनंद लुटता येतो. चित्रकलेत बाह्यरेषा, छाया–प्रकाश, चित्राचा आकार, वर्णव्यवस्था, सप्रमाणता, एकभावमयता, भाव व रंगांची सांगड, उठाव या गोष्टींना विशेष महत्व असतं. चित्रकला ही एक द्विमितीय कला आहे. सत्य,शिव आणि सौंदर्याचा संगम घडविणारी कला. ख-या अर्थाने कला माणसाला जगायला शिकविते. असा रंगकर्मी,चित्रकर्मी रंग आणि रेषांवर अधिराज्य गाजवीत हजारो पुस्तकांना चेहरा प्रदान करतो, अर्थात मुखपृष्ठ बहाल करतो अशा कवी विष्णू थोरे यांच्या कवितांच्या शिवाराला आज आपण भेट देत आहोत. म्हणून आपणास कवितेच्या रंगात चिंब भिजविण्यापूर्वी चित्रकलेच्या पायवाटेने आपल्या पायांना थोडासा मातिचा रंग,गंध माखवण्याचा प्रयास केला.
कवी विष्णू थोरे हे रंगांच्या रानात रंगलेला रानकवी. सिध्दहस्त चित्रकार.सिनेमाचा गीतकार. ज्यांना रानावनातल्या उघड्या निसर्गाचे रंग कळतात, त्याना माणसांच्या आयुष्याचे रंग सहज कळतात. असं म्हटलं जातं की रेषेला विकृती झाल्याशिवाय कलाकृती निर्माण होत नाही. अशा रंगांच्या आणि रेषांच्या दुनियेत हरवलेले, रंगांची भाषा बोलणारे, रांगाबरोबरच कवितेतून अभिव्यक्त होणारे कवी विष्णू थोरे आहेत. रंगात रंगणारे कवी विष्णू थोरे तितक्याच तन्मयतेने कवितेत रममान होतात. चित्रकर्मी असलेले कवी विष्णू थोरे कवितेच्या क्षेत्रामध्ये रंग,रेषा आणि चित्रांच्या आशयघनते एवढीच दमदार कविता घेऊन येतांना दिसतात. त्यांची कविता म्हणजे त्यांचं जगणं आहे. शेतीमातीच्या दु:खाच्या व्यथा,वेदना घेऊन येणारी त्यांची कविता आहे. कुणबीकीच्या पाय-यांना तडे गेलेल्या, अंधारापेक्षा उजेडाचीच भीती वाटू लागलेल्या गावखेड्यातल्या माणसांच्या जगण्यातली भयावकता, गाडवाटेच्या पारंपारिक बुजत चाललेल्या चाको-यांचं दु:खं, गावखेडयातल्या निवडणुकांचा सालोसाल आसमंतात उडणारा धुराळा, जगण्यातलं रोजचं महाभारत, चुलींच्या आणि मुलींच्या भावविश्वाचं गांजलेपण, चारभिंतीच्या आतल्या आर्त हाका, सामान्यांचा आक्रोश, माय लेकरांचा हंबर, कोरड्या रानाचा उसवत जाणारा धूळपेरा घेऊन विष्णू थोरे यांची कविता येते. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग,धोडप,चंद्रेश्वर डोंगररांगेच्या परिसरातील चांदवड या पौराणिक गावात राहणारे, शेतीमातीत राबणारे, झाडाझुडपांशी, पशुपक्षांची बोलणारे, चित्रकार कवी विष्णू थोरे ‘कवी आणि कविता’ या सदरात सहभागी होत आहेत. रंगातून आयुष्य रंगवणारे, शब्द,सूर,लयीतून जीवनाला सूर लावणारे, बेसूर आयुष्याचं सुरेल गाणं गाणारे कवी विष्णू थोरे, अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनले आहे.
चित्रांना रंग माखवता माखवता आपल्या आयुष्याचे सारे रंग,गंध शब्दांच्या स्वाधीन करणारे कवी विष्णू थोरे आजच्या युवापिढीतील आघाडीचे कवी आहेत. त्यांचे चित्र जसे जीवनावर भाष्य करते, तशीच त्यांची कविता भोवतालच्या वर्तमानाचे वास्तव मांडून जाते. चित्रांची एक लय असते. रंगांची एक भाषा असते.तद्व्द्तच शब्दांनाही गंध असतो, लय असते. रंगांचे अर्थ समजून घेत त्यांचा अन्वयार्थ लावायचा असतो. तर शब्द स्वत:चाच आशयगर्भ व्यक्त करणारे असतात. म्हणून कवी विष्णू थोरे त्यांच्या चित्रांच्या आशयघनते इतकीच त्यांच्या शब्दांची आशयघनता मनाला भावविभोर करणारी आहे. त्यांच्या प्रत्येक चित्राला मातीचं व्यापक अवकाश आहे. मातीचा गंध आहे. चित्रांसारखीच त्यांची कविता त्यांच्या सुरेल गळ्यातून सर्वदूर पोहोचली आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांची कविता ताल,स्वर, लय घेऊन गीतांमधून बहरते आहे. असे हे रंग अन् चित्रकर्मी असलेले, सुंदर आवाज लाभलेले कवी आपल्या कवितेतून सभोवतालचं अवकाश टिपण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. सभोवतालच्या वास्तवाचा स्पर्श त्याच्या कवितेला होतो. तिथल्या जगराहाटी,परंपरा, तिथली समाजजीवनातली स्थित्यंतरे शब्दातून पकडताना दिसतात. ‘ धूळपेरा उसवता ..’ हा कवी विष्णू थोरे यांचा पहिला काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाने कवी विष्णू थोरे यांना कवी म्हणून मोठं नाव दिलं. आई, बाप, गाई, गुरं, झाडं झुडंपं,शेतशिवर या सा-यांना ते आपलं गणगोत मानतात. म्हणून ते आपली कविता रानातल्या माळाला, चुलीतल्या जाळाला, मातीची मशागत करणा-या नांगराच्या फळाला आणि जन्म देणाऱ्या मातापित्यांना अर्पण करतात. त्यांना नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार,पुणे येथील गदिमा साहित्य पुरस्कार,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार. सांगोला,वाटंबरे येथील संत तुकाराम माणदेश साहित्य पुरस्कार. कोल्हापूर येथील अ.ना.देशपांडे साहित्य पुरस्कार, पुणे मसापचा कुसुमाग्रज काव्य पुरस्कार मिळाले आहेत.चौर्य,घाटी,गैरी,राडा,पीटर या चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे.माय,गुज पावसाचे, सह्याद्रीचा राजा,बागे बागे( अहिराणी )या अल्बमसाठी त्यांनी गाणी लिहिली आहे.
कवी विष्णू थोरे यांची कविता काबाडकष्ट करणाऱ्या, शेतीमातीत राबणाऱ्या, कष्टकरी माणसाची वेदना घेऊन येते. शेतकऱ्यांच्या आयुष्यात दाटलेलं मळभ त्यांच्या कवितेचा विषय होतो. समाजव्यवस्थेच्या चक्रव्युहात चहूबाजूंनी सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची कविता विष्णू थोरे घेऊन येतात. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, उद्धवस्त होणारी ग्रामीण भागातली गावखेडी, तिथल्या व्यवस्थेला लागलेली वाळवी, शहरांची होणारी अनाकलनीय वाढ, चुलीतली विझत चाललेली धग, तिथल्या माणसांची गुलामी, त्यांच्या जुलुमाचा पाडा, त्यांची गाभुळलेली स्वप्न, बांधामेरावर आयुष्य काढणा-या शेतक-यांची दुःख, तिथली दांभिकता, राजकारणाचे फड, तिथला संघर्ष, व्यवस्थेतला गारुडीपणा,निसर्गाचा प्रकोप, होणारी हानी, सामाजिक जीवनातील स्थित्यंतरे, सरकारी धोरण, वेदनांचा जाळ, उसवलेलं जीवन, विस्कटलेलं आयुष्य, रुजण्याची जिद्द, जगण्याची पराकाष्टा, तिथली व्याकूळता, तिथली व्यथा, आयुष्याचा पाचोळा, जीवनाचं मातेरं हे आणि असं सारं अवकाश व्यापून टाकणारी कवी विष्णू थोरे यांची कविता आहे. त्यांच्या कवितेला कोणत्याच विषयाचे बंधन नाही. चौफेर दृष्टी टाकणारा हा कवी. ‘धूळपेरा उसवता’ या काव्यसंग्रहाच्या धनी होतो. महाराष्ट्रातील मराठी वाचक,रसिकांपर्यंत आपली कविता घेऊन जातो.
विष्णू थोरे हे सामाजिक बांधिलकी जपणारे कवी आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणजे स्वतःला बांधून घेणे. निश्चित स्वरूपाचा नैतिक निर्णय व आचरणासाठी बांधील असणे. वास्तवातील समाजजीवन आणि जीवनपद्धती ही त्यांच्या लेखनाची प्रेरणा आहे. समाजमनाच्या विविध रंगाचे विविध प्रकारे दर्शन कवी विष्णू थोरे यांच्या कवितेतून होते. समाजातील नास्तिक प्रवृत्तीवर ते घणाघाती हल्ला करतात. प्रत्येक कलाकृतीचा आशय हा कवीच्या अनुभवाच्या स्पर्शातून साकार होत असतो. कोणत्याही कलावंताची कलाकृती ही विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण होत असते. कलाकृतीच्या निर्मितीमागे सामाजिक संदर्भ असतात. असे संदर्भ असणे हे स्वाभाविक आहे. कारण साहित्याची निर्मितीच मुळात अनुभव प्रकट करण्यासाठी होत असते. कवीने घेतलेला अनुभव हा तो रसिकांना कवितेच्या माध्यमातून कलात्मक पातळीवरून देत असतो. म्हणून साहित्यकृतीत अभिव्यक्त झालेली मानवसृष्टी जशीच्या तशी न येता, ती कवीच्या अनुभूतीच्या आणि सहानुभूतीच्या कक्षा विस्तृत करून रसिकांचे मन नेहमीच्या पातळीच्या पलीकडे घेऊन जाते. खऱ्या अर्थाने रसिकांच्या मनावर, वाचकांच्या मनावर साहित्यकृतीचा हा संस्कार होणे महत्वाचे असते. अशा सामाजिक घटनांवर कवी विष्णू थोरे आपल्या सुंदर शब्दात प्रकाश टाकतांना लिहितात –
पायरीला गेले तडे पाय झाले जड
देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड.
गळा शापथांची रीत होता नजरेचा धाक
शब्दांसाठी मरणारे कैवारीही लाख
विश्वासाला गेले तडे जगण्याचे कोडे
डोळे तरी रूप तुझे साठ्वती वेडे
पेरलेल्या संस्काराचे खुरटले मोड
देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड.
शेतीमातीत राबणा-या श्रमिकांचा सारा भरवसा देवावर असतो. देव हेच त्यांच्या जीवनातील अत्यंत आदराचं श्रध्दास्थान असतं. त्या देवळात श्रद्धेचाच बाजार मांडला जातो. देवळातल्या देवाचं दर्शन जेव्हा मिळत नाही. त्यामुळे जनसामान्यांच्या विश्वासा तडे जातात. त्यामुळे देवावरची श्रद्धा कमी होत नाही. व्यवस्थेने निर्माण केलला अडथळा ओलांडता येत नाही. तेव्हा अगतिकतेने देवाचे रूप डोळ्यात साठवून, हतबल होऊन भक्त परतीच्या प्रवासाला निघतात. अशा मानसिकतेत अंधारापेक्षा उजेडाची भीती वाटू लागल्याची खंत कवी विष्णू थोरे व्यक्त करतात. गावखेड्यातल्या निवडणुका आणि लोकशाही मूल्यांची कशी गळचेपी होते. हे मांडताना त्यांच्या शब्दांना धार येते. ते व्यवस्थेवर घणाघाती हल्ला चढवतात.
बैलगाडीच्या चकाऱ्या बुजल्या
अस्ते, गाव पाँश झालं
गावकीचं इलेक्शन सुद्धा
रोकड आणि कॅश झालं.
शिकली हुकली पोरं
नांगर हाती धरला नाही
डिजिटल झाले कार्यकर्ते
नेता कुणी उरला नाही.
भाकरीचं इमान गेलं
दारुशिवाय मतदार आता वळत नाही
निवडणुकीच्या भाद्रपदाशिवाय
उमेदवार काही फळत नाही.
अशा प्रखर शब्दात गावातल्या निवडणुकांवर ते भाष्य करतात. आजची तरुणाई कुठे चालली ? हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. शिकण्याच्या वयात मुलं निवडणुकांच्या काळात व्यसनी बनतात.लोकशाहीच्या दिंड्या ढाब्यांवर चरतात. गावात मंत्री-संत्री आला म्हणजे गाव एकदम हायटेक होतं.सर्वत्र डिजिटल बोर्ड झळकतात. हा बेगडीपणा कविमनाला खटकतो. लोकशाहीतल्या निवडणुकांनी, त्यातल्या किळसवाण्या प्रकारांनी अनेक माणसं देशोधडीला लागली आहे. यामुळे आपलं कोण ? आणि परकं कोण ? हे समजेनासे होते. नाती फक्त नावापुरती उरतात. त्यातला स्नेहाचा ओलावा उडून जातोय. ओळखीच्या सा-या वाटा परक्या होतांना पाहून कविमन लिहून जातं.
दुखं उतू आल्यावर कसं झेलावं मनाला
सावलीनं द्यावा आता थोडा विसावा उन्हाला
जत्रा स्वप्नांची भरे गर्दी उसनी शीवाला…
गोठा सोडून निघाल्या गाई चुकल्या रानात
खोटया मातीच्या बैलाला माय पूजते सणात
माझं माझं म्हणतांना द्यावा रक्ताचा हवाला…
कळा सोसल्या मातीनं झळा उन्हाच्या सोसून
किती गिरवावे तरी पाढे जातात पुसून
कवितेच्या ओळीतला थोडा गारवा जिवाला…
जगण्यातल्या ख-याखोट्यांच्या सीमारेषा किती पुसट होत आहे. जीवनातल्या सुखदु:खाच्या सा-या कळा, वेदना सहन करून उसन्या स्वप्नांची अभाशी यात्रा शेतमळ्यांच्या बंधामेरावर भरते.शेतक-यांचे गोठे गाई बैलाविना ओस पडत आहे. पोळ्याला पूजेसाठी मातीच्या बैलांशिवाय आता दुसरा पर्याय उरला नाही.जीवनातलं हे वास्तव कवितेतून मांडताना मनाला थोडा तरी गारवा मिळतो.म्हणून कवी कविता लिहितो. हे नमूद करायला कवी मागेपुढे पाहत नाही. सतत पडणा-या दुष्काळांना सामोरे जातांना बाप आणि लेक यांच्या मानसिकतेची तुलना करतांना कवी विष्णु थोरे लिहितात-
अलिकडे सगळेच दुष्काळ अंगवळणी पडलेले
बापाला सवय झालेली
अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देण्याची
मग आपल्यात भिनलेलं बापाचं रक्त
असं नपुसकांसारखं
माती सोडून परागंदा होण्याचं स्वप्नं
का पहात असतं ?
का आपलीही माती ठरलेली आधुनिकतेच्या वर्तुळात?
असल्या वांझ प्रश्नांना उजविण्याच्या प्रतिक्षेत
गहाळ होत चाललीये आपली अस्मिता
दुरावत चाललोय आपण मातीपासून, घरापासून, स्वत:पासून
असं मीही बरळतो हल्ली
बापासारखंच कधी कधी हुक्की आल्यावर…
हा प्रश्न कास्तकरांच्या मुलांना पडावा. ही स्वातंत्र्यानंतरच्या कृषी संदर्भातील विकास योजनांच्या अपयशाची परिणती समजावी का ? किंवा कृषीप्रधान राष्ट्राच्या अधोगतीची नांदी समजावी का ? असा सरळ प्रश्न कवी विष्णू थोरे यांची कविता करतांना दिसते. मातीसोडून परागंदा होण्याची स्वप्नं कुणब्याची पोरं पाहू लागली. हा समजावा इतका साधा सरळ प्रश्न नाही. वर्तमान कुणब्याची पुढची पिढी आधुनिकतेच्या झगमगाटात दिपून गेली. मातीतल्या कष्टप्रद जीवनापासून ती स्वत:ला मुक्त करू पाहते आहे. मातीपासून, घरापासून आणि स्वत:पासून ती दुरावतांना दिसते आहे. त्याची कारणे सांगताना कवी विष्णू थोरे लिहितात-
काल बबन्या म्हणाला च्यायला,
पोष्टरवरची उघडी बाई लई अश्लील वाटते.
मी म्हटलं, कपड्यातली माणसं
अश्लील नसतात काय ?
खर तर विचारांचीच झालीय सुंता
मग कसा सुटेल गुंता.
ऋतूतला फरक कळणंच कठीण झालय
यार भाद्रपदाला दोष देऊन उपयोग काय ?
आजची तरूणाई ही जागतिकीकरणाच्या धबडग्यात चंगळवादाच्या भोव-यात सापडली आहे. त्यांची विचार करण्याची क्षमताच संपली आहे.जिथे विचारांची क्षमता संपते तिथे विचारांचा गुंता अधिकच वाढत जातो.
जिथं विचार संपतात, तिथं संस्कृती संपते आणि विकृती जन्म घेते. हे निसर्गसत्य कवी विष्णू थोरे आपल्या कवितेतून अधोरेखित करून जातात. तर एकीकडे जगण्याच्या लढाईत आईनं जगण्यातून दिलेलं बाळकडू सांगायला कवी विष्णू थोरे विसरत नाही. ते ‘मायची प्रयोगशाळा’ या कवितेत लिहितात-
सम्दं रान कोळपून
मी अक्षरांचं सरपण येचलं
वझं मायला देत म्हटलं
माय, मला शब्दांचा
जाळ करून दाखीव.
मायनं कवितेची चूल पेटवली
शब्दांचा जाळ झाला.
शब्दांची उब घेत
मी शोधीत राहिलो
मायची …. प्रयोगशाळा.
आई कोणाचीही असो, जगण्याच्या संघर्षात ती नेहमीच प्रयोगशील असते. ती स्वत:च एक प्रयोगशाळा असते.अशा प्रयोशील मायीच्या प्रयोगशाळेचा शोध कवी शब्दांची ऊब घेऊन घेतो आहे. याउलट बापाच्या आयुष्याचा हिशोब कधीच जुळत नाही. त्याच्या स्वप्नांचा पापुद्रा कधी फुटेल याचा नेम नसतो. हे सांगताना कवी विष्णू थोरे लिहितात-
दिसभर मातीत आदबून
रातच्याला बाप चुलीचा घेतो शेक
भाकरीवानी अंग भाजल्यावर
स्वप्नांचा येतो पापुडा
अन् सुरू होते धूळफेक.
औन्दाच्या बागायतीचा
हिशोब मनात पक्का होतो
अचानक आटते विहीर
अन् उतरणारा भावही
त्याला धक्का देतो.
आयुष्यभर शेतात काबाडकष्ट करतांना कुणब्याच्या आयुष्याचं गणित सुटत नाही. त्याचे हातचे घेतलेले कधीच परत जात नाही. तेच हातचे त्याच्या गळ्याला फास लावतात. त्यामागची कारणमिमांसा कवी मांडून जातो. बागायती पिकांचा हातभार चांगला लागणार असे वाटत असतांना अचानक विहिरीचे पाणी आटून जाते.त्याचवेळी कुणब्याच्या मनातले स्वप्नं मनातच गाभडून जाते. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी कुणबी सदैव त्रस्त असतो. त्यामुळे त्याचे मनसुबे कधीच सफल होत नाही. याचे संदर्भात कवी विष्णू थोरे श्रद्धा-अंधश्रद्धा या सामाजिक विषयाला बगल न देता सरळ हात घालतात.
त्यांचे सगळेच मनसुभे
आपण उधळायचे ठरवले तर
त्यांना पळता भुई थोडी व्हईल
बळीच्या माथ्यावरून
वामनाचा छाटून टाकू पाय
म्हणजे पृथ्वीवर पुन्हा
बळीचं राज्य येईल.
बांधावरचे देव पुजून
मालाला भाव नाही मिळत
अन् इथंच घोडं पेंड खातं
हे आपल्याला नाही कळत.
शेतक-याचं अज्ञान त्याच्या अधोगतीला आजही कारणीभूत असल्याची खंत कवी विष्णू थोरे व्यक्त करतात.शेतक-याची अवस्था म्हणजे मोकळ्या फिरणा-या जनावराच्या पायाला दोर बांधून पायखुटी दिल्यासारखे आहे.शेतक-याच्या भल्यावर इथली व्यवस्था नाही. निसर्ग, रूढी,परंपरा, धार्मिक संकल्पना, रीतीरिवाज ,श्रध्दा, अंधश्रद्धा या सर्वांच्या कचाट्यात, बंधनात तो सालोसाल सापडतो आहे. आडकतो आहे. त्यातून पिळवटून निघतो आहे. बाहाला घातलेल्या गायीसारखी त्याची अवस्था झाली आहे.गाईचे रूपक कल्पून त्याच्या दु:खाचा पीळ मोकळा करतांना कवी विष्णू थोरे लिहितात-
दुभत्या गाईचे मागचे पाय
जखडून टाकतो
बहाल्याचा घट्ट पीळ
तिनं लाथाडू नये म्हणून…
गाय पान्हावल्यावर
वासरू आखडताना
तिच्या डोळ्यातून ओघळणारी
एक मुकी धार
आख्खं काळीज दुधाळते…
व्यालेल्या दुभत्या गाईचे दूध काढतांना गायीच्या पायांना शेतकरी बाहाला घालतो. दोराच्या साहाय्याने गाय जखडून टाकतो. अगदी तशीच इथल्या शेतक-याची अवस्था शासन व इतर सर्व घटकांकडून केली जाते. पिकवलेल्या शेतमालाची किंमत त्याच्या हाती पडतांना याच व्यवस्थेच्या चक्रव्युहात तो गायीसारखा हंबरडा फोडतो.गायीसारखं त्याचं काळीज डहुळतं. तो हतबल होतो. ही त्याची हतबलता कवी विष्णू थोरे सुंदर रीतीने मांडतात. गावखेड्यातील माणसांची दुरावस्था बघून त्यांचं काळीज तुटतं. तेव्हा ते लिहितात-
गाव गाड्याच्या चाकाला
कुणी टाकावं वंगण
माणसाला पेलणारं
कुठं दिसना अंगण.
हरवल्या माणसांची घरं
उपाशी तापाशी
माया आटल्या शब्दांनी
पोरं बोलती बापाशी .
उसवली नाती गोती
कसं जमेल सांधणं…
खेड्यापाड्यातला गावगाडा कसा चालावा. प्रत्येक ठिकाणी आडथळयाचीच शर्यत. जीवनाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी स्नेहाचं वंगण कोण टाकेल ? असा प्रश्न कवी विष्णू थोरे उपस्थित करतात.कारण माणसं मातीला अंतरत चालली आहे. नाती गोती तुटत चालली आहे. माणसांची माणुसकी हरवते आहे. ऐकमेकांबद्दलची आत्मीयता,आपुलकी आटते आहे. बापलेकांची रक्ताची नाती तुटत आहे. सगळे कोरडे झाले आहे. ओलावा कुठे दिसत नाही. नीतीमूल्यांशी प्रत्येकाने फारकत घेतली आहे. आतूनबाहेरून माणसं,समाज तुटत चालला आहे. त्याला कुणी सांधावे ? दुःखं वेचता वेचता अश्रुंची पानगळ होते आहे. सारी सांत्वने वांझोटी निघत आहे. काळजातून कुणी कुणाशी बोलत नाही. ही समाजातील विदारकता व भयावहकता अशीच वाढत गेली तर कुणब्याच्या शेतात, मातीत वैभवाचे चांदणे कसे फुलावे ? असे अनेक प्रश्न कवी विष्णू थोरे यांची कविता उपस्थित करते. असे असले तरी नकारात्मक आठवणींची नांगरणी करून, नको त्यादु:खाच्या दिवसांची वखरणी करतांना ओलीमाती पुन्हा रुजाण्याचं बळ देईल. पेरलेल्या, मातीत रुजलेल्या नात्यांना टरारून नवे कोंभ येईल. आणि कुणब्याच्या आयुष्यातील मालवत चाललेले सांजदिवे पुन्हा नव्या उमेदीने प्रकाशमान होतील. असा आशावाद कवी विष्णू थोरे आपल्या कवितेतून करतात. कारण ते हाडाचे शेतकरी आहे. शेतक-याचं सारं आयुष्य प्रबळ आशावादावर उभं आहे.
हा आशावाद नुसताच आशावाद न राहता तो वास्तवात उतरावा. कुणबी जगावा. त्याचप्रमाणे कवी विष्णू थोरे यांची कविता दिवसेंदिवस अधिक उर्जस्वल होत जावी. त्यासाठी त्यांना खूप सा-या शुभेच्छा.
(लेखकाशी संपर्क – laxmanmahadik.pb@gmail.com 9422757523