कवयित्री राधा भावे अत्यंत तरल मनाच्या भाव कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेत प्रामुख्याने मनाने मनाशी केलेला संवाद बघावयास मिळतो. मनाचे गहिरेपण, मनाचा स्वच्छंदीपणा, मनाची मानसिकता, मनाचे संभ्रम आणि विभ्रम चितारण्याचा प्रयत्न त्यांची कविता करताना दिसते.
मनाच्या शुद्धतेचा तळ गाठून त्याचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न त्यांची कविता करते. जुन्या आठवणींची छाया त्यांच्या मनाच्या मातीवर सदैव दरवळताना जाणवते. कधीकधी ती त्यांना प्रश्न करती होते. आपल्याच मनाची चाहूल त्या त्यांच्या कवितेतून टिपताना दिसतात.
मनाच्या सावल्या त्यांना सतत गुढ स्वप्नांमधे घेऊन जातात. त्यामुळे मनाची तगमग हा त्यांच्या कवितेचा एक भाग बनतो. खरं म्हणजे राधा भावे खुपदा कवितेतून स्वतःचा आत्मशोध घेताना दिसतात. मनाआडच्या अनेक गोष्टींबद्दल त्या कवितेतून बोलताना दिसतात.
त्यांची कविता म्हणजे निर्मळ मनाने केलेली विनम्र प्रार्थना वाटते. तर त्या कधी हळव्या मनातलं दुःख शब्दातून रेखाटताना दिसतात. त्यांच्या कवितेत पशु-पक्षी,ऊन-वारा, सकाळ-दुपार दिवस-रात्र ह्या प्रतिमा सहजपणे डोकावत राहतात. त्यांची कविता उत्सुक मनाचं कुतूहल सदैव जागृत ठेवताना दिसते.
मनाचा हव्यास, मोह याचा शेवट नेहमी राखेत होतो. असे वास्तव सत्य त्यांची कविता सांगून जाते. स्वप्नपक्षी, मनाची डहाळी, गोंदलेला चंद्र, चांदण्याचे तळे, सुगंधी मुळे, नभाची रूपं,तृप्ततेचा गंध, निळी सावली, गोंदलेला चंद्र, अशा अनेकविध निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता सहजपणे वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
कवयित्री राधा भावे यांची कविता साधी सरळ निष्पाप मनाचं सूचक आहे. त्यांच्या कवितेत निसर्ग प्रतिमांचा मोठा वापर दिसतो. निसर्गाच्या विविध प्रतिमांमधून मानवी मनाच्या विविधांगी रांगोळ्यांचा अभ्यास करतांना त्यांची दिसते. तर कधी कधी त्यांची कविता ही वास्तवावर बोट ठेवतांनाही दिसते.
राधा भावे यांच्या कवितेत प्रतिमा आणि रूपकांची उधळण पाहावयास मिळते. मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, बहीण, आणि आई अशा अनेक विविध रूपात त्यांची कविता आपल्याला जागोजागी भेटत राहते. अत्यंत नितळ, आरसपाणी कविता हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या कवितेला स्वतःची अशी एक लय आहे, नाद आहे. त्यांची कविता तिच्या लयीत आपल्याला गुंतवून टाकणारी आहे.
अल्पाक्षरत्व हे त्यांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या कवितेत लालित्य आहे, माधुर्य आहे. त्यांची कविता वाचक रसिकाला विश्वास देते. नव्या जाणिवेचे नवे अवकाश बहाल करते. त्यांच्या कवितेत भावनांचा उत्कट आविष्कार दिसून येतो. त्यांच्या कवितेतील एकाकीपण हे वाचकाच्या मनाला स्पर्श करून जाते.
एकाकीपण आणि त्यातून येणारी बेचैनी,व्याकुळता हे त्यांच्या कवितेचे बलस्थान वाटते. आपल्या स्वतःच्या अनुभवाला नेमके शब्दांमध्ये पकडणे हे त्यांना सहजपणे जमले आहे. त्या स्वतः संवेदनशील मनाच्या असल्याने त्यांची भाषा ओघवती आहे.
त्यामुळे त्यांची कविता वाचकांना सहजपणे आपलीशी करून जाते. त्यांची कविता आशादायी आहे. तिच्यात भविष्याच्या उदरात मोठा कायापालट करण्याचा सामर्थ्य आहे. त्या जाणीवेने त्यांनी त्यांच्या कवितेकडे बघितले पाहिजे. थोडक्यात त्यांची कविता म्हणजे त्यांच्या मनाचं पडलेलं सुरेख प्रतिबिंब होय.
कवियत्री राधा भावे त्यांचा जन्म गोव्यातला. रिवण या खेडेगावात त्यांचे बालपण गेले. गोव्याच्या निसर्गाच्या समृद्धतेवर त्यांचं बालमन जोपासलं गेलं. शालेय,महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी त्यांना आवडणा-या पुरातत्त्वशास्त्रामध्ये एम.ए केले. पाठोपाठ मराठी विषयामध्ये एम.ए केले. त्या सध्या गोवा शासनाच्या राज्य वस्तुसंग्रहालयात संचालक पदावर कार्यरत आहेत.
कोकणी, मराठीबरोबरच इंग्रजी भाषेत विविध विषयांवर माहितीपर लेखन, ललित आणि काव्यलेखन केले आहेत. एडव्हेंचर ऑफ डेझर्ट, आणि कॉन्झर्वेशन ऑफ आर्ट ऑब्जेक्ट्स या दोन इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले. दोन्ही पुस्तके नॅशनल बुक ट्रस्ट दिल्ली या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केले आहेत. त्यांचा मराठी भाषेत लिहिलेला ‘ उमलताना ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे.
त्याचबरोबर ‘तुला भेटून येताना’ मराठी कवितांचा व गझलांचा हा कवितासंग्रह प्रकाशित आहेत. या संग्रहाला गोमंत विद्या निकेतन मडगावचा कला अकादमी, गोवा गोवा हिंदू असोसिएशन, यु.आर.एल फाऊंडेशन मुंबई या संस्थेतर्फे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
सन २०१८ साली बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग होता. तर डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचा ‘जीवाचो पतंग’ हा कोकणी भाषेतील लेखसंग्रह प्रसिद्ध आहे.आज आपण त्यांच्या आवाजातल्या काही कवितांचा आस्वाद घेऊया.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!