रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष – कवी आणि कविता – गझलकार नितीन देशमुख

ऑक्टोबर 8, 2020 | 1:01 am
in इतर
0
IMG 20201007 WA0016

सामाजिक वास्तवाला गझलेचं

आवकाश देणारा गझलकार : कवी नितीन देशमुख

      ‘ गझल म्हणजे सहज सोपेपणा, गेयता, नाट्यमयता, शब्दकल्पना ,भावना अशी त्रिविध चमत्कृती, नाट्यमयता या सर्वांच्या सहाय्याने स्वछ्न्द्वादी निर्भयशील ,रोमांटिक,वृत्तीचा केलेला भावोत्कट व चिन्तनगर्भ आविष्कार म्हणजे…. गझल ’

‘एकाच वृत्तातील एकच यमक (काफिया) व अंत्य यमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी दोन-दोन ओळींच्या किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक कवितांची बांधणी म्हणजे …… गझल ’.

‘अर्थपूर्ण प्रभावी व उत्कट अभिव्यक्ती असलेली दोन ओळींच्या द्विपदीची एक एक स्वतंत्र कविता म्हणजे …….. गझल.

IMG 20200902 WA0034
प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)

कविता माणसांच्या जाणीवा समृद्ध करते. समाजाला वाट दाखवते. अनेकांना दिशा देते. अनेकांचा आधार होत धीर देते. आत्मविश्वास गमावलेल्यांना कविता प्रेरणा देते. जगण्यासाठी नवी हिंमत देते. कवितेच्या प्रांतात गझल हा प्रकार मुळात फारशी भाषेतून इराणमधील अरबी संस्कृतीच्या वर्चस्वातून तसेच प्रभावातून नवव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आला. मुस्लिम सत्ताधीशांच्याबरोबर भारतात आलेल्या सुफी साधुसंतांबरोबर फारशी गझलचे बाराव्या शतकात उत्तर भारतात आगमन झाले .पुढे दक्षिण भारत व उत्तर भारतात विकसित झालेल्या उर्दू भाषेतून गझल काव्यप्रकार प्रचलित झाला. फारशी गझल मागेपडून उर्दू गझल ही रसिकमान्य झाली.गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे तेराव्या शतकातील सूफी संन्त ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती  व खल्जी आणि तुघलक साम्राज्यांचा राजकवी अमीर खुसरौ  यांच्यामुळे पुढे हा प्रकार फोफावला. . अनेक मोगल बादशहांनीही पुढे या प्रकारास राजाश्रय दिला बहादूरशाहजफर बादशहा शेवटचा मोगल याच्या पदरी गालिब  व जौक हे प्रसिद्ध गझलरचनाकार शायर होता. स्वतः बादशहा बहादूरशाह जफर एक प्रसिद्ध शायर होता.

गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे. गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरा असे म्हणतात.गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.गझलेचे अनेक चरण असून दर दोन चरणांच्या प्रत्येक खंडास ‘शेर’ म्हणतात. एका गझलात कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखेध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलच्या आरंभी बहुधा मतला असतोच.गझलच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. गझलाबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात.

अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य मोरोपंत यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे.त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावली. या चळवळीचे प्रवर्तक सुरेश भट होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर भटांच्याच प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स.१९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात भीमराव पांचाळे पुढे आले, आणि भटांच्याच मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले.

याच गझलेच्या पायवाटेने विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील सत्यशोधक चळवळीच्या केंद्रस्थानी असलेल्या बेलोरा या गावातून कवी आणि कविता या सदरात कवी नितीन देशमुख सहभागी होत आहे .गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या गझला ऐकून कवी नितीन देशमुख हे गझल लेखन आणि गझल गायनाकडे वळले. हे जरी खरे असले तरी त्यांच्याकडे पिढीजात गायकीचा वसा होता. त्यांचे आजोबा हे कीर्तनकार होते.वडील सुंदर तबला वादक होते. त्यामुळे बालपणापासून शब्दांचे स्वर आणि गायकीचे सूर कानावर पडत गेले. शब्द आणि सुरांच्या मनमोहक वातावरणात कवी नितीन देशमुखांचे बालमन घडत गेले. त्या फुटण्या,बहरण्याच्या हिरव्या वयात त्यांच्या  बालमनावर गाण्याचे संस्कार झाले. गाणं  बालपणातच कुठेतरी काळजात घर करून बसलं होतं.  पुढे संधी मिळतात  त्यांचे शब्द स्वर घेऊन बाहेर आले. तरुणाईच्या कविता लिहिता लिहिता ख्यातकीर्त गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या ‘ एक जखम सुगंधी ’ ऐकून ते भीमरावांच्या गझलेच्या प्रेमात पडले. एका दैनिकात भीमराव पांचाळे गझलेवर स्तंभलेखन करत होते. त्याच सदरात नव्याने गझल लेखन करणा-याच्या एका गझल काराच्या एका गझलेची ते निवड करत. या उपक्रमाचा पहिला शिलेदार होण्याची संधी या विदर्भातील गझलकार मित्राला मिळाली. विशेष म्हणजे ती गझल भिमाराव पांचाळे यांनी त्यांच्या गझलांच्या कार्यक्रमात जगभर पोहोचवली.

एका कवितेने,अर्थात गझलेने भिमरावांशी जवळीकता वाढली. पत्रव्यवहार सुरु झाला. एकदिवस भीमराव विदर्भाच्या दौ-यावर येणार असल्याचे पत्र नितीन देशमुखांच्या हातात पडले. त्यात भेटीचा योग आहे. तेव्हा आपण भेटूया. असा निरोपच दस्तुरखुद्द गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी धाडला होता. त्यात गझल आवडल्याचे भीमरावांनी आठवणीने कळवले होते. आणि भेटायला बोलावलं होतं. नितीन देशमुख हे  भीमराव पांचाळे यांना भेटायला गेले. खूप गप्पा झाल्या . गझलेवर चर्चा झाली. त्यांनी त्यानंतर बरंच मार्गदर्शन केलं. पुढे त्यांचा पत्रव्यवहार होत राहिला. भेटीगाठी वाढत गेल्या .त्याच काळात त्यांना विदर्भातील गझलकार लक्ष्मण जेवणे, अनंत नांदूरकर, प्रमोद खराडे या व इतर गझलकारानीही मार्गदर्शन केले. कवी नितीन देशमुख त्यांना गझलकार म्हणून मान्यता मिळाली. पुढे भीमरावांनी नितीन देशमुखांची गझल सुंदररितीने  विविध मैफिलीत  सादर केली. आणि तिला देश-विदेशामध्ये पोहोचले. ती गझल म्हणजे-

पोथीतील  कथांचा उपयोग काय सांगा ?

आमच्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा ?

फसावरी लटकते कर्जातील जवानी

कवितेतल्या बटांचा उपयोग काय सांगा ?

किल्ल्यामधीच शत्रू पोसून ठेवले

मग मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा ?

शेतात फाटलेल्या चपलेतल्या गड्याला

तुमच्या नव्याबुटांचा उपयोग काय सांगा ?

कवी नितीन देशमुखांची गझल शृंगाराचे वस्त्र परिधानकरून अत्तराचा फाया घेऊन मिरवण्यापेक्षा ती विद्रोहाचे पाणी पिऊन सामाजिक वास्तवावर भाष्य करू लागली. विदर्भातील शेतक-यांच्या  मुलांच्या तरुणाईच्या वाताहातीची भाषा करू लागली. समाज व्यवस्थेतच स्वत:चे हित सांभाळताना इतके शत्रू बनवून ठेवले असेल तर मजबूत तटबंदीचा उपयोग काय ? असा प्रश्न ती विचारती झाली. तशीच लोकशाही शासनप्रणालीवर हल्लाबोल करू लागली. गझल हा मूलत: कवितेचाच एक प्रकार आहे. कविता या ललितकलेचे माध्यम भाषा आहे. भाषेचा सर्वात लहान घटक म्हणजे शब्द. कविता छंदात असो की छंदमुक्त, ती शब्दांनी विविध आकारात रचलेली असते. कवितेला शब्दरचना म्हणतात ते या अर्थाने. शब्दरचनेच्या विविध आकारानुसार ओवी, अभंग, गीत, गझल असे वेगवेगळे काव्यप्रकार आपल्याला स्वतंत्रपणे ओळखू येतात. त्यांनाच आपण आकृतिबंध असे म्हणतो.

रचनेने सिद्ध केलेल्या प्रत्येक आकृतिबंधाचे काही नियम, काही कायदे असतात. ह्या नियमांनाच आपण त्या त्या एकजीव झालेले असते तोवर ते स्वतंत्रपणे आपले अस्तित्व जाणवू देत नाही. तीच ख-या अर्थाने त्या तंत्राची शुद्धता असते. कवी नितीन देशमुखांची पुढील गझल पहा -काव्यप्रकाराची लक्षणे, किंवा त्या आकृतिबंधाचे तंत्र म्हणतो. तंत्र कोणत्याही कवितेचे असो;जोवर ते आशयाशी

निघतात संसदेतून गाडी भरून स्वप्ने

रस्त्यामधीच जाती का विरघळून स्वप्ने 

विमान आले आश्वासने उतरली 

गेली उडून आमच्या गावावरून स्वप्ने.

देशातील सामान्यांच्या विकासाचे सुंदर स्वप्नावर आणि विकासकार्यावर एवढी सडेतोड गझलेतून टीकेची झोड उठविल्याचे मी तरी अनुभवले नाही. सामान्य जनतेला निवडणुकांच्या काळात स्वप्नांच्या सुंदर, मुलायम पायघड्या टाकता क्षणीच विरघळून जातात.विमानातून उतरलेली आश्वासने सभेपाठोपाठ विमानासारखी गावावरून उडून जातात. या वस्तवावर बोट ठेवत राजकीय प्रवृत्तीचे भांडाफोड करते. लोकशाही मूल्यांच्या होणा-या –हासावर तुटून पडते.

गझलकार कवी नितीन राजेंद्र देशमुख यांचे  ‘ पैंजण ’ आणि ‘ बिकॉज  वसंत इज  कमिंग सून ’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहे. ‘ प्रश्न टांगले आभाळाला ’  हा गजलसंग्रह आणि ‘रुद्रा’ ही कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे टिंब टिंब, नपुसा व प्रेमरंग चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.त्यांची गाणी सुप्रसिद्ध गायक गझलनवाज  भीमराव पांचाळे ,स्वप्निल बांदोडकर ,आनंद शिंदे ,आदर्श शिंदे, अभिजीत कोसंबी, सायली पंकज,आणि  कविता निकम या गायकांनी गायली आहेत.  त्यांच्या साहित्याला आजपर्यंत कवी नारायण सुर्वे पुरस्कार मुंबई, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे येथील कविवर्य  गदिमा पुरस्कार , कविवर्य  विठ्ठल वाघ काव्यगौरव पुरस्कार  प्राप्त आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातून स्तंभलेखन केले आहे. दूरदर्शनच्या सर्व मराठी वाहिन्यांवर त्यांच्या कवितांचे आणि गझलांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झालेले आहे. कवी नितीन देशमुख यांनी थायलंड ,दुबई  व इंडोनेशिया देशात आपल्या गझलांचे कार्यक्रम केले आहेत. असा कवी कवितेच्या पाउलवाटेने निघाला. पुढे गझलेकडे वळाला असला तरी तो मातीतला कवी आहे. महाविद्यालयीन फुलपंखीवयात गावाकडच्या आवतीभोवतीच्या वास्तवाला त्यांची कविता बगल देवू शकली नाही. रानावनात काबाड कष्ट करणारा बाप कवी आणि कवितेच्या डोळ्याआड होऊ शकला नाही. त्यांची ‘बाप’ ही वैदर्भीय बोलीभाषेत लिहिलेली पहिली कविता श्रोत्यांनी डोक्यावर घेतली.

माय महान महान साऱ्या जगाचं म्हणनं

बाप लहान लहान कसं मानलं जगानं

दूर निभिड रानात राघू पिलाला पाहते 

बाप लेकाच्यापाशी तशा घिरोट्या घालते

नाही बोलून दाखोत  नाही रडून दाखोत

आत नारळ दुधाळ नाही चिडून दाखोत

लेक मोठा व्हावा म्हाया त्याचं एकच सपन 

बाप लहान लहान कसं मानलं जगानं.

आई आणि बापाचा मुलांच्या आयुष्यात, त्यांच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा असतो. आईची सहृदयता बापा जवळ असते; पण तिचं प्रकटीकरण फारसं जाणवत नाही. आईचा सर्वात मोठा सहवास आपत्यास जन्मापुर्वीही आणि जन्मानंतरही लाभत असतो. त्यामुळे आईवर फार लिहिलं गेलं असलं तरी कवी नितीन देशमुख यांनी बापाची मुलाप्रती असणारी आत्मीयता,प्रेम आणि जिव्हाळा आपल्या कवितेतून टिपला आहे.कवी देशमुख यांचं बालपण विदर्भाच्या ग्रामीणभागात गेल्याने तिथला निसर्ग तिथली जीवनशैली, समाजजिवनातील होत गेलेले बदल सहजपणे त्यांच्या कवितेतून डोकावून जातात.

अशा ग्रामीण जीवनातील आठवणींची साठवण कवितेतून मांडताना तिथल्या बदलत्या काळाला अधोरेखित करते.

कवी नितीन देशमुख हे शेतीमातीतील कवी असल्याने त्यांची कविता मातीचा गंध घेऊन येते. मातीतील प्रतिमा त्याच्या कवितेला समाजमान्य करून टाकते. कारण त्यांच्या या प्रतिमाच त्यांच्या कवितेची, गझलेची बलस्थाने आहे. असे मला वाटते. त्यांची ‘ डाळिंबाच्या ओठावरती ’ ही गझल पहा.

उगाच घेते नाव सखे तू माझे का प्रेमाने 

डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे गाणे .

घर हृदयाचे सोडून गेली असे वाटले तेव्हा

मधमाशांच्या पोळ्यामधुनी मकरंदाचे जाणे.

तुझ्या अंगणी अमृतचा मोहर फुलला असता

तुला कशाला हवी आता निवडुंगाची पाने.

कवी प्रेमाच्या या गझलेत डाळिंब,कडुलिंब,निवडुंग या झाडांच्या प्रतिमांचा किती चपखलपणे वापर करतो. दोन घटकातील प्रेमाची तुलना करून कडुलिंब,निवडुंग या प्रतिमांमधून नगर-शहर,सुशिक्षित-अशिक्षित जीवनातील बदलाची, तसेच सामाजिक स्तराची तफावत नेमक्या शब्दात मांडून जातो. आजच्या सामाजिक वास्तवात फार मोठा बदल होत आहे. सामाजिक विषमतेबरोबर आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बोच त्यांच्या कवितेतून जागोजागी जाणवत राहते. त्यामुळे त्यांची गझल सामाजिक वास्तवाला अधोरेखित करून जाते. त्याचबरोबर त्यांची गझल दांभिकपणाचा पडदा फाडत जाते.

ईश्वराला तुझी फक्त श्रद्धा हवी 

मंदिरांना भार झाला दौलतीचा 

झोपड्यांना देणग्या का देत नाही

का उधारीत फत्थरांशी  भाव करता 

पुण्य हे नगदितले घेत नाही 

ईश्वराला फक्त तुझी श्रद्धा हवी 

दान दे तू फक्त भिकार्‍यास दे 

पावसाचे असो वा गारठ्याचे असो 

रोज कारण फक्त पिणाऱ्यास दे.

देव,धर्म आणि धार्मिकता यावर घणाघाती हल्ला त्यांची कविता करतांना दिसते. ईश्वराला श्रद्धा हवी असली तरी दानपेट्यात दक्षिणा का टाकतात ? असा सवाल त्यांची कविता करतांना दिसते.देशातील झोपडपट्टी विकास कामाला पैशांची गरज आहे. तिथे कुणी दानशूर पुढे येत नाही,परंतु मन्दिराना पैशाची गरज नाही. पण इथे संपत्तीचा भार वाढतोय. हे वैश्विक सत्य त्यांची कविता अतिशय उपहासात्मक पद्धतीने मांडताना दिसते. आजच्या भरताचे वर्तमान म्हणजे सर्वत्र आग पेटलेली स्मशाने होत.इथल्या धर्मांचे प्रतिके बदलत आहे.गीता,कुराणऐवजी बंदूक, बाँम्ब आणि सत्ता हीच आजच्या धर्माची प्रतिके बनली आहे. लोकशाही देशात सर्वात पवित्र काय असेल तर ते म्हणजे संविधान होय. ते असतांना कायद्याचे का उत्खनन करण्याची गरज काय आहे. ? असा सवाल त्यांची कविता करतांना दिसते.

सर्वत्र आग भरली होणे स्मशान आहे..

अस्वस्थ भारताचे,हे वर्तमान आहे….

उत्खनन कशाला करतोस कायद्यांचे..

देशास पारदर्शी जर संविधान आहे…..

कुठल्यातरी कटाची मसलत सुरू असावी..

पण सावधान सदरे,भिंतीस कान आहे….

बंदूक बाँम्ब सत्ता जर धर्म जाहला तर…

हाती उगा कशाला,गीता,कुरान आहे….?

इथल्या लोकशाही संसदीय शासनप्रणालीवर त्यांची कविता तुटून पडते. कोणत्याच नेत्याची पक्षावर निष्ठा राहिली नाही.राजकारण फिरते दुकान बनले आहे. कावळ्यांसारखी ‘ जिकडे विष्ठा तिकडे निष्ठा ’ अशी अवस्था राजकारणात झाली आहे.नीतीमूल्ये पायदळी तुडविली जात आहे. नेतृत्वाचे अध:पतन होतांना समाज पाहतो आहे. आदर्शांची पायमल्ली होते आहे. हे व्यक्त करताना कवी नितीन देशमुख लिहितात-

डोक्यावरी नको तू, घेवूस पक्ष कुठला,

तुर्तास राजकारण, फिरते दुकान आहे

वा-यावरी कशाला खोटाच आळ घेता..?

घरच्याच वादळाने,खचले मकान आहे..

सर्वत्र आग भरली होणे स्मशान आहे..

अस्वस्थ भारताचे,हे वर्तमान आहे….

IMG 20201007 WA0017

आजच्या भरताचे वर्तमान का बदलत आहे. माणसांच्या जीवन जगण्याच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. कुणाचेच पाय मातीवर थांबायचे नाव घेत नाही. विचार देणारे गावातले पार आणि पाणवठे नष्ट झालेत.विभक्त कुटुंबपध्दतीने आजी आजोबा नावाचे संस्कार करणारे आधारवड कोसळून पडले आहे. फुलांचे हार गळ्यात स्फोट घडवू लागले आहे. प्रत्येकाच्या स्वप्नाचा वेग वाढला आहे. ते मांडताना ते लिहितात-

हळवी स्वप्ने मातीवरती रांगत नाही,

म्हणून आता घरात घरपण नांदत नाही.

उजेड देणारी ती झाडे विझून गेली,

घरात आता आजी गोष्टी सांगत नाही…

अंगणातल्या गुलबासाचे वारस मेले,

कुंपणातली मेंदी आता लाजत नाही…

स्वप्नांचा तर वेग वाढला खूप परंतु,

धुळीतल्या रस्त्याहुन दमणी धावत नाही..

सत्तांध झालेल्या माणसांना माणसाची किंमत नाही. जो तो ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतो आहे. कुणी कुणाला वाली राहिला नाही. कुणी कुणाला आपला मानायलाच तयार नाही. प्रत्येकजण सारखा धावतो आहे. कुणालाच थांबायला वेळ नाही. अहंकार बोकाळतो आहे. भक्तीची जाहीरात होते आहे. कुणाचाच पायोस कुणात नाही.या सामाजिक वास्तवावर कवी नितीन देशमुख यांची कविता पेटून उठते.

जो तो येथे उघडा करतो ज्याला त्याला,

पदराखाली कुणी कुणाला झाकत नाही..

टिव्हीत नाचे जाहिरात भक्तीची आता,

म्हणुन बिचारा विठू किर्तनी नाचत नाही…

वेडी झाली दुनिया वेडे झालो आपण,

फक्त धावतो क्षणभर कोणी थांबत नाही..

अभिमानाची सूज एवढी वाढुन गेली,

स्वतःच आपण स्वत:त आता मावत नाही..

खोटी प्रतिष्ठा आणि अभिमानाची सुज वाढल्याने माणूस स्वत:त स्वत: मावत नाही. हे वास्तव सत्य मांडून त्यांची कविता माणसाच्या सर्वसामान्य जीवनावर भाष्य करताना दिसते. माणसाला जीवन जगणे कधी कळणार? असा प्रश्न त्यांची कविता करते. जीवनाकडे तुम्ही कसे पाहता यातच खरे जगणे सामावलेले आहे. हे सांगायला त्यांची कविता विसरत नाही.ते लिहितात-

जळणा-याला विस्तव कळतो बघणा-याला नाही

जगणा-याला जीवन कळते पळणा-याला नाही.

कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला

चिंता याची बघणा-याला लढणा-याला नाही.

जात्यामध्ये जीव देऊनी घास मुखी जो देतो

त्या दाण्याला जीवन कळते दळणा-याला नाही

ता-यांमधले अंतर सोडा माणसातले मोजा

जवळिकतेची गरज माणसा ग्रहता-याला नाही

जो आयुष्याशी संघर्ष करतो आहे.त्याला हरण्याची चिंता नसते. ती बघणा-याला असते. माणूस माणसांपासून दूर होत चालला. वृध्दाश्रम, अनाथाश्रम निघत आहे. हे कशाचे लक्षण आहे. जन्म देणा-या आईवडिलांचे मुलांना ओझे व्हावे. मुले त्यांना घराबाहेर काढतांना आपण पाहतो आहे. असे संवेदना हरवत चालेला समाज मात्र ग्रहता-यांचे जगण्याशी संबंध जोडतांना दिसतो. याला काय म्हणावे ? असा प्रश्न कवी नितीन देशमुख यांची कविता करताना दिसते.

वेल म्हणाली कळीस बाई इतुके असू दे ध्यानी

लाख दिवाने फुलणा-याला गळणा-याला नाही

रोज घेतली तरिही त्याला दारू कळली नाही

दारू कळली विकणा-याला पडणा-याला नाही

एका जागी थांबून थांबून डबके होईल पाणी

वाहत्या पाण्या मार्ग सापडे अडणा-याला नाही

थांबायाचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू

गहराईला सलाम हा खळखळणा-याला नाही

देह देखणा काय शेवटी विरघळणारी माती

सत्य देखणे याहुन सुंदर,कळणा-याला नाही

चालत्या गाडीत प्रवास करणे, वाहत्या गंगेत हात धुणे, ही जगाची रीत बनलीय. रोज दारू पिऊनही आयुष्यभर पिणा-याला दारू कळत नाही. पडणा-याला सुध्दा कळत नाही.ती फक्त विकणा-याला कळते. तिच्यामुळे कित्येक जणांचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले .याचा हिशोब त्याच्याकडे असतो. थांबला तर डबके होते. वाहत राहिलात तर प्रवाहित व्हाल.जो वाहतो त्याला मार्ग सापडतो. थांबायचे तर समुद्र होऊन थांबा. अशा आशयाचे जीवनाचे तत्वज्ञान त्यांची कविता सांगून जाते. त्यामुळेच कवी नितीन देशमुख यांची कविता वाचकाला व ऐकणा-याला जवळची वाटते. कवी नितीन यांची कविता असो की गझल असो ती त्यांच्या तयार झालेल्या गळ्यातून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव आहे. श्वासाइतकं त्यांचं कवितेवर प्रेम आहे. त्यांना त्यांच्या कवितेची अर्थात गझलेची वाट सापडली आहे.ते गझलेविषयी  बोलताना लिहितात-

श्वास माझे सखे तुला द्यावे …. संपतांना पुन्हा नवे व्हावे 

मी जरी संपलो  गातांना ….. गीत माझे कुणी तरी गावे

अशा शब्दात ते गझलेवर असलेलं आपलं प्रेम व्यक्त करतात. माझे श्वास थांबले तरी गझल गाणे थांबू नये.ती कुणी तरी गात रहावी. अशी अपेक्षा व्यक्त करणे हे गझलेवर असलेलं प्रेमच व्यक्त होतं.  गझल हा एक  कवितेचा सशक्‍त आकृतीबंध आहे. गझल ऐकणार्‍या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे. कवी नितीन देशमुख हे स्वत: गझल  तर्ज आणि तरन्नुम मध्ये सादर करतात. त्यांचा खर्जमधला स्वर श्रोत्यांच्या मनावर गरुड करतो. त्यांच्या गझल लेखनाला आणि गायनाला खूप सा-या शुभेच्छा.

सदर लेखमाला

 

 

 

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केकेआरने पलटवली बाजी…..रोमहर्षक सामन्यात चेन्नईचा पराभव

Next Post

आजचे राशीभविष्य – गुरुवार – ८ ऑक्टोबर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post

आजचे राशीभविष्य - गुरुवार - ८ ऑक्टोबर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011