कवी प्रकाश धर्म हे अत्यंत तरल मनाचा माणूस आहे. ते आपल्या कवितेतून सहजपणे संवाद कतांना दिसतात. त्यांची कविता म्हणजे त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न होय. आज जाणून घेऊया त्यांच्यासह त्यांच्या कवितेविषयी…
कोणतेही साहित्य हे चिरंजीव शाश्वत स्वरुपाचे असते. त्याला स्वतःचं मूल्य असतं. कवी आपल्या जगण्या वागण्यातून कवितेची कलाकृती निर्माण करतो. त्या कलाकृतीत तो जीवन भाष्य मांडत जातो. साहित्य हे नेहमी भावनांना हात घालत असतं. साहित्य ही अशी गोष्ट आहे की तिच्यात भावना, कल्पना आणि विचार यांचा भाषेच्या माध्यमातून अविष्कार घडविलेला असतो.
भावना व्यक्त करणे हा कोणत्याही साहित्यकृतीचा अविभाज्य घटक असतो. साहित्यात भावने इतकेच कल्पनेला ही महत्व दिले जाते. आणि विचार हा तर साहित्यकृतीचा मुख्य पाया असतो. भावना, विचार, शब्द, अर्थ आणि प्रतिमा या सर्व घटकांचे एकसंघ विश्व आपण साहित्यात अनुभवत असतो.
कलावंताचे अनुभव व अवलोकन, त्याच्यावर झालेले संस्कार, त्यांची श्रद्धा, सभोवतालची परिस्थिती, त्याची भाषा यासारख्या अनेक घटकांचा कवीच्या काव्यनिर्मितीवर परिणाम होत असतो. थोडक्यात कवीच्या कलाकृतीत त्याच्या जीवनाचे प्रतिबिंब सामावलेले असते. हे विसरून चालणार नाही.
जेवढा कवी अनुभव संपन्न, बहुश्रुत असतो तेवढी त्याची साहित्यकृती प्रभावी ठरत असते. त्याचे अवलोकन, निरीक्षण या सर्वांचा त्याला काव्य निर्मितीसाठी उपयोग होत असतो. कवीच्या कवितेतून त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन वाचकाला कळतो.
त्यांची कविता नेहमीच सामाजिक प्रश्नांचा शोध घेत आली आहे. तिला सामाजिक जाणिवांच्या ध्यास आहे. ती पूर्ण सत्याच्या शोधात गुंतलेली दिसते. विशेष म्हणजे त्यांची कविता रूढी-परंपरांवर कडाडून हल्ला करताना दिसते. त्यांची कविता नेहमीच सामाजिक आणि धार्मिक बाबींचा समाचार घेताना दिसते. त्यांच्या कवितेतील प्रतिकं आणि प्रतिमा या सहजतेने त्यांच्या कवितेला सौंदर्य बहाल करून जातात.
त्यांच्या कविता अल्पाक्षरी असल्या तरी खूप मोठ्या आशयाला आपल्या कवेत घेताना दिसतात. थोडक्यात त्यांची कविता मानवी जीवनातील वास्तव अधोरेखित करताना दिसते.तसेच त्यांची कविता मानवी मनाच्या विविध प्रवृत्तीचे दर्शन घडवत जाते. वृत्ती-प्रवृत्तीचे सहसंबंध, तसेच नीतिमूल्यांसह जुन्या नव्या संस्कारांचे दर्शन घडवते. त्यांची कविता म्हणजे मानवी मनाच्या जखमांच्या वेदनेचं गाणं आहे. साहित्यातील बावनकशी सोनं आहे. आणि सामाजिक दायित्वाचं देणं आहे.
कवी प्रकाश धर्म यांचे शालेय शिक्षण पुणे येथील सरस्वती मंदिर, पूना इंग्लिश स्कूल, ज्ञान प्रबोधनी मधून झाले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर बाळकृष्ण दोशी, अनंत राजे यासारख्या नामवंत आर्किटेक्ट बरोबर काम करण्याची संधी मिळाली.
अहमदाबाद गावाच्या पूर्ण कंपास डिझाईनवर काम करण्याचा अनुभव त्यांना प्राप्त आहे. हैदराबाद येथे स्वतंत्र व्यवसाय ते करतात. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि पेंटिंग या कलाही त्यांनी जोपासल्या आहेत. १९८३ सालचा एक छोटासा अनुभव असा की, संगीतभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणी या कार्यक्रमाचे हैदराबाद येथे ऐनवेळी निवेदक म्हणून निवेदन करण्याची विनंती त्यांना केली गेली. आणि ते आव्हान त्यांनी स्वीकारले.
एवढेच नव्हे तर पंडितजींची शाबासकीही मिळविली. तेव्हा हे काम वसंत बापट करत असत. आश्चर्य म्हणजे प्रकाश धर्म यांचे निवेदन पंडितजींना इतके आवडले की, पुढील निपाणी येथील संतवाणीच्या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण दिले गेले. प्रकाश धर्म यांनी बंगलोर येथे १९९८ साली झालेल्या ‘रंग दक्षिणी’ स्पर्धेसाठी एकांकिकेचे दिग्दर्शन केले. या एकांकिकेला त्या वर्षाची दिग्दर्शन, नेपथ्यपासून ते सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे पर्यंतचे सर्वची सर्व पुरस्कार मिळाले होते.
कवी प्रकाश धर्म यांचे सोलो पेंटिंग एक्झिबिशन कलकत्त्याच्या ललित कला अकादमी बरोबरच पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात मध्ये झाले आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी एका पेंटिंगची विशेष मागणी करून ते वर्षभर आपल्याकडे ठेवून घेतले होते. कवी प्रकाश धर्म यांनी नंदिता दास दिग्दर्शित ‘फिराक’ या चित्रपटात नसरुद्दीन शहाबरोबर, सुजीत सरकार दिग्दर्शित ‘मद्रास कॅफेमध्ये’ जॉन अब्राहम त्यांच्याबरोबर, तसेच श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘वेलकम टू सज्जनपूर’ या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकार केल्या आहेत.
वाराणसी येथे ललित कला अकादमी आयोजित शेतक-यांसाठीआर्टिस्ट कँपसाठी भारत सरकारकडून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये दिलेल्या थीमवर त्यांनी केलेले पेंटिंग भारत सरकारच्या ललित कला अकादमीने जतन करून ठेवले आहेत. सन २०१८ मध्ये चाळीसगाव येथे ‘रंगगंध’ न्यासच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेत प्रकाश धर्म यांनी स्वतःची कथा सादर करून अभीवाचनाचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले.
२०१९ साली ग्रंथाली प्रकाशनाच्या बृहन्महाराष्ट्र व परदेशी लेखकांसाठी आयोजित कथालेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विविध साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित कवी म्हणून सन्मानाने बोलावले जाते. उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनात कवी कट्टामध्ये निमंत्रित म्हणून त्यांनी त्यांची कविता सादर केली आहे. गुलजार यांच्या कवितेवर आधारित ‘कही खो ना जाये हम’ व ‘ब्लॅक नाईट’ या लघु फिल्मची त्यांनी निर्मिती केली आहे.
’स्कीट’ या शॉट प्ले स्पर्धेत अभिनय सादर करून प्रथम पारितोषिक त्यांनी प्राप्त केले आहे. ‘वृंद’ या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे ते अध्यक्ष असून, या संस्थेच्या वतीने मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून मराठी ग्रंथसंग्रहालयात ‘अंगणी वाचू’ हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे ते सांभाळत आहे. हैदराबादच्या ‘विमल नाट्य समाज’, ‘रंगधारा’, ‘कलास्रोत’, ‘उडान’ व काही हिंदी नाट्य संस्थांच्या नाटकात ते स्वतः अभिनय करतात.
‘गांधारी’, ‘दुसरा पेशवा’, ‘मै नथुराम बोल रहा हू’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांमधून त्यांची भूमिका विशेष गाजते आहे. ‘श्रावणी इंद्रधनुचे चेले’ हा कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ‘संस्कार भारती’ चित्रकला विभागाचे ते राज्यस्तरावर प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. अशा विविधरंगी भूमिका सांभाळणाऱ्या साकारणाऱ्या कवी प्रकाश धर्म यांच्या काही कविता यांच्या सुमधुर आवाजात आपण आस्वाद घेऊ.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!