जीवनातील शाश्वत सत्याला
कवितेचा कॅनव्हस बहाल करणारा कवी
: कवी राजेंद्र अत्रे
नांदोरे हे सोलापूर जिल्ह्यातील,पंढरपूर तालुक्यातील अति ग्रामीण भागात असलेलं शे-सव्वाशे उंबरा असलेलं आणि भीमा नदीच्या काठावर वसलेलं गाव. याच भीमा नदीच्या परिसरात ज्यांचं बालपण गेलं. याच गावात प्रथमिक शिक्षण ज्यांनी घेतलं. पुध्र मोहोळ,पंढरपूर,बार्शी येथे इंटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. पुढे वडिलांच्या निधनानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंड या यावी स्थलांतर करून शेतशिवारात काबाडकष्ट करून बहिस्थ विद्यार्थी होऊन शिक्षण पूर्ण केले. याच कालावधीत शेताची नांगरणी पेरणी,कुळवणी केली. ब्यानो –त्र्यानोच्या दुष्काळात लातूरजवळ करून आयुर्वेद फार्मशीमधे नोकरी केली.जगण्यासाठी मोठी धडपड केली. पुढे लातूरला चित्रकला महाविद्यालयात शिक्षण घेऊन हायस्कूल मध्ये कलाद्यापक म्हणून नोकरी केलेल्या,आणि अलीकडे सेवानिवृत्त झालेल्या कवी मित्राची आपण कवी आणि कविता या सदरात त्यांच्या कवितेचा आस्वाद घेणार आहोत. त्या मित्राचे नाव आहे. कवी राजेंद्र गोपाळराव अत्रे.
कवी राजेंद्र अत्रे यांचे पाऊसगाणे( कवितासंग्रह), अथांगतेत गुंतुनी(गीतसंग्रह), लेकरं(कथासंग्रह),रस्ता आणि इतर कथा ( कथासंग्रह) प्रकाशित आहेत. इथल्या अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. उस्मानाबाद येथे मागील वर्षी येथे ९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात व त्यापूर्वी ९७वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आयोजक म्हणून सेवा देण्याची त्यांना संधी मिळाली.
बालभारती इयत्ता ५ वी व सुलभभारती इयत्ता ७ वी.च्या पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे इयत्ता ७ वी सुलभ भारती व सुगम भारती या पाठ्यपुस्तकातील चित्रे त्यांनी काढलेली आहेत.नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन २०१८ चा कविवर्य भा.रा.तांबे काव्य पुरस्का राने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांची कथा,कवितांना ही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ‘सुखाची ठेव’ ह विठ्ठल भक्तिगीतांचा अल्बम प्रकाशित आहे. औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावरून त्यांची तीस गाणी संगीतबध्द करण्यात आलेली आहे.
कवी राजेंद्र अत्रे यांची कविता जीवनातली सुख-दु:खं, आनंद, निसर्गाची विशालता, समाजात आढळून येणारे दांभिकपण, भोंदूपणा, अति छोट्या माणसातही असलेले प्रचंड मोठेपण, अशा मनाच्या अनेक भावावस्थेतून , पावलोपावली होणा-या मनाच्या अस्वस्थतेतून आणि बेचैनीतून त्यांची कविता येतांना दिसते. जन्मत:च लाभलेली विचाराची सकारात्मकता, उद्विग्नतेत अणि दु:खातही मनाचा तोल ढळू देत नसते. कारण तेथे विचारांचं अधिष्ठान प्राप्त होत असतं. याचा मनोमन खूप आनंद होतो. त्यामुळेच आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या भावस्थितीत राहणे शक्य होते.
राजेंद्र अत्रे यांच्या कवितेवर त्यांच्या जीवन संघर्ष मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो.ऊन,वारा,पाऊस,माती या महातत्वाशी त्यांची कविता संवाद करताना दिसते. जीवनातील शाश्वत सत्याची कास त्यांची कविता धरताना दिसते.विशेष म्हणजे त्यांची कविता संवादी असल्याने ती प्रवाही आहे. शेती मातीत काबाडकष्ट करणा-या शेतक-याप्रती त्यांची कविता एकनिष्ठ राहते. त्यामुळे त्यांच्यावर होणा-या आण्याची चीड त्यांच्या कवितेतून व्यक्त होतांना दिसते.
माती आणि मातीतल्या नात्याची पाठराखण करताना त्यांची कविता दिसते. जीवनाकडे एका सकारात्मक दृष्टीने त्यांची कविता बघायला शिकविते.कवी चित्रकार असल्याने चित्रातला पाऊस त्यांच्या कवितेत ओतप्रोत ओसांडताना दिसतो. निसर्गातील अनेक घटीतांचे अन्वायार्थ त्यांची कविता लावताना दिसते. त्यांच्या कवितेच्या वाटा निसर्गातील विविध छटा घेऊन येतांना दिसतात. त्यांच्याच आवाजात आपण त्यांच्या कवितांचा आस्वाद घेवू या.