ग्रामीण जीवनाचा हुंकार
आपल्या शब्दात कवटाळणारा कवी : साहेबराव ठाणगे
साहेबराव ठाणगे हे प्रसिध्द वात्रटिकाकार आणि कवी म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात सुप्रसिध्द आहेत. त्यांची कविता निसर्गाचे विविध भाव,विभ्रम टिपताना दिसते.मानवी मनातली अनेक आंदोलनं त्यांची कविता शब्दातून मांडताना दिसते.तसेच रूढी,परंपरावर घाव घालताना दिसते.सामाजिकतेचे भान त्यांच्या कवितेला आहे. म्हणून तर तिथल्या मातीत खपणा-या माणसाचं सारं संचित घेऊन त्यांची कविता येते. तिथल्या माणसांच्या स्थित्यंतराचा आलेख मांडते. त्यांच्या जगण्याचा सातबारा मांडत येते.
साहेबराव यांच्या कवितेत तिथला गावगाडा,परंपरा , निसर्ग अधनंमधनं डोकवत राहतो. गावखेड्यात बालपण मुरलेलं अन् शिकलेले साहेबराव ठाणगे राज्य सहकारी बँकेचे आधिकारी म्हणून शहरवासी झाले. तरी त्यांच्यातला सुसंस्कारीत माणूस कवितेच्या आडवाटेने आयुष्यभर रानमळ्यात फिरत राहिला. त्यांनं अखेरपर्यंत मातीची नाळ तोडली नाही. त्यांची कविता तिथल्या मातीतल्या पाऊसा पाण्यावर वाढली आहे. म्हणून तर त्यांची कविता ओल्याचिंब पावसात रसिकांना न्हावून काढते. तशीच कधीकधी आस्मानी,सुलतानी संकटानी त्यांची कविता अस्वस्थ होतांना दिसते.कवी साहेबराव ठाणगे यांची कविता सामान्य माणसाच्या जगण्याचे तेरीज आणि ताळेबंद मांडताना दिसते. ते शहरात स्थिरावले पण त्यांच्या कवितेला शहरीकरणाची बाधा कधीच झाली नाही. याउलट ती आयुष्यभर मातीतली राधा बनून शहराशहरातून सन्मानाने मिरवत राहिली. त्यांच्या कवितेला लोकगीताची अंगभूत लय आहे.अगदी अभंगापासून ते लावणीपर्यंतच्या सगळ्यात फॉर्ममध्ये त्यांची कविता येतांना दिसते. त्यांच्या कवितेच्या भाळी विठोबाचा बुका आणि गालावर मातीची तिट खुलून दिसते. त्यांची कविता शेतशिवारातील जाणलेली,जपलेली नाती आणि पायाखालची माती सदैव गुलाल बुक्याप्रमाणे अंगाखांद्यावर घेऊन मिरवताना दिसते. त्यांच्या कवितेतल्या प्रतिमा आणि प्रतिकं हे निसर्ग आणि ग्रामीण जीवनातले असल्याने त्यांची कविता वाचकांच्या, रसिकांच्या मनात घर करते.
वाचक,रसिकांना आपल्यासोबत घेऊन निसर्गाचा फेरफटका मारून आणते.त्यांची कविता प्रत्येकाच्या जगण्यातली आहे. त्यामुळे ती प्रत्येकाला आत्मसुख,आत्मानंद देऊन जाते. हे त्यांच्या कवितेचे खास वेगळेपण म्हणावे वाटते.खरं म्हणजे कवी साहेबराव ठाणगे यांचा गाता गळा आणि त्यांच्या कवितेचा पिकता मळा समृध्द झाला तो त्यांच्या बालपणातल्या संस्कारांतून.
कवी साहेबराव ठाणगे यांच्या कवितेत काय नाही. त्यांच्या कवितेला रानसयीची ओढ आहे. पाऊस पाण्याचं वेड आहे. त्यांच्या कवितेत माळरानातील एकांताची वाट आहे. नदीचा घाट आहे. धुक्याची लाट आहे. सखीची भेट आहे. कल्पनेची लयलूट आहे.इतकेच नव्हे तर त्यांच्या कवितेला ग्रामीण जीवनाची वहिवाट आहे.त्यांच्या कवितेत पंढरीची वारी आहे,तमाशाची बारी आहे. त्यांची कविता म्हणजे झ-याचं झुळझुळणारं पाणी आहे.
रानपाखरांच्या मुखातली गाणी आहे.त्यांच्या कवितेत उधाणलेला वारा आहे,टपटपणा-या गारा आहे. त्यांच्या कवितेत गाय आहे,बैल आहे, हंबरणारं वासरू आहे. फांदीवरती चिवचिवणारं पाखरू आहे. त्यांच्या कवितेत गावखेडयातली झाडे,डोंगर,नदी,नाले,पशु,पाखरे आहेत. यांच्या कवितेला शेणामातीचा वास आहे. पीकपाण्याचा ध्यास आहे. पाखरांची साथ आहे. उपमांची बरसात आहे. मित्रांनो आज आपण कवी आणि कविता या सदरातून त्यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत.
कवी साहेबराव ठाणगे यांचे बालपण अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील करंदी या गावी गेलं. एम. कॉम झाल्यानंतर एच डी. सी., जी.डी.सी.अँड.ए हे सहकार क्षेत्रातील शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी या शिखर बँकेत नोकरी करून सरव्यवस्थापक पदावरुन सेवानिवृत्त झालेत. आजपर्यंत त्यांचे ‘वेदना संवेदना’, ‘सैरभैर’, ‘कवितारंग’, व ‘पाऊसपाणी’ हे चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत.त्याचप्रमाणे ‘उजेडाच्या वाटा’ (व्यक्तिचित्रणे)‘मनातल्या मनात’, ‘खेळखंडोबा’ (कादंबरी) ‘स्वातंत्र्ययौघ्दा हिंदुराव आप्पा, गाथा आणि गीते’. ‘चांगभलं’, हे ललित लेखसंग्रह प्रकाशित आहेत. आकाशवाणी,दूरदर्शनवरून त्यांच्या कविता प्रसारारीत झाल्या आहेत.अ.भा.साहित्य संमेलनात त्यांचा आवर्जून सहभाग असतो.महाराष्ट्रभर त्यांच्या कवितेचे कार्यक्रम होत असतात.अतिशय हरहुन्नरी असे कवी साहेबराव ठाणगे यांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहेत.
१. एकता कल्चरल पुरस्कार, मुंबई – १९९९
२. अ्टगंध साहित्य पुरस्कार, मुंबई २००३
३. कै. संभाजी गोवे मोहिते साहित्य पुरस्कार, मंगळवेढा – २००४
४. का. गंगाधर मोहिते साहित्य पुरस्कार, संगमनेर – २००५
५. जनादेश साहित्य पुरस्कार, ठाणे – २०१४
६. कवयित्री शांता शेळके पुरस्कार – २०१६
७. शब्दगंध राज्य साहित्य पुरस्कार – २०१६
८. यशवंतराव चव्हाण, राज्य साहित्य पुरस्कार – २०१८
९. रानकवी लक्ष्मण दुधाळ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार – २०१६
१०.छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार – २०१७
११.जनादेश साहित्य पुरस्कार- २०१८
१२.ठाणे वाचनालयाचा अँड, रेगे साहित्य पुरस्कार २०१८
१३.साहित्य रत्न पुरस्कार, पारनेर, अहमदनगर – २०१९
१४.न्युज १८ लोकमतचा नवी मुंबई भुषण पुरस्कार – २०१९
ऐका, साहेबराव ठाणगे यांच्या आवाजातील कविता