समाजमनातून हरवत चाललेल्या माणुसकीचा
शोध घेणारा कवी : प्रशांत असनारे
आजच्या या विज्ञान युगात समाजाची भौतिक प्रगती वेगाने होत आहे.त्याच वेगाने अधोगतीला सुरुवात झाली आहे. समाजाचा एक मोठा वर्ग असलेला मध्यमवर्ग, त्याच्या लहान-लहान समजुती, आनंदी जीवनासाठीच्या चढाओढी, त्यातील महिलांचे कष्टमय जीवन या गोष्टींचा जाणीवपूर्वक शोध घेऊन कविता लिहिणारे अकोला येथील कवी प्रशांत असणारे अत्यन्त संवेदनशीलतेने कविता लिहिण्याचे व्रत सांभाळत आहेत. मध्यमवर्गीय अनुभूतीला शब्दातून , कवितातून प्रतिबिंबित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कवी प्रशांत असणारे करीत आहे. मानवी स्वभाव, निसर्गाशी त्याचा समन्वय, आजूबाजूला घडणारे प्रसंग यांचा वेध त्यांची कविता सातत्याने घेतांना दिसते.
कवी प्रशांत असनारे आपल्या कवितेत माणसांची नातीगोती, त्यांचे दैनंदिन आयुष्य, त्यातील जाणवणारी विसंगतीते अत्यंत सफाईने टिपतांना दिसतात. त्यामुळे त्यांच्या कविता वाचक,रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतात आणि काळजात जाऊन बसतात.त्याचबरोबर काही वेळा त्यांची कविता अत्यन्त टोकाचे जळजळीत भेदक भाष्य करताना दिसते. तशीच ती धगधगत्या वास्तवाचा वेध घेऊन वाचक,रसिकांना अस्वस्थही करताना दिसते. त्यांच्या सा-याच कविता ह्या अत्यन्त मार्मिक असल्याने वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या कवितेत नक्कीच आहे आहे, हे इथे नमूद केले पाहिजे.
हल्ली समाजात पशू-पक्ष्यांबद्दल प्रेम वाढलंय. ते चांगलेच आहे; पण प्रामुख्याने ज्या वर्गात हे प्रेम दिसून येते, मात्र म्हातारपणात तेथील आई-वडील वृद्धाश्रमात असतात. कमी-अधिक प्रमाणात का असेना, ही आजच्या समाजातील वास्तविकता आहे. माणसातल्या हरवत चाललेल्या याच माणुसकीचा, नीती आणि मानवी जीवनमूल्यांचा शोध त्यांची कविता घेताना दिसते.
कवी प्रशांत असणारे हे बी.ई.सिव्हील असून त्यांनी मराठी विषयात एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कवी प्रशांत असणारे यांचा ‘मीच माझा मोर’ हा कविता संग्रह २०१० मध्ये प्रकाशित झाला आहे.नाशिक येथील मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कारासह अकरा राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांचा ‘वन्स मोर’ हा दुसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला .त्यांच्या या काव्यसंग्रहाचा उर्दू अनुवाद औरंगाबाद येथील वकील व सुप्रसिध्द कवी,अनुवादक अॅड. अस्लम मिर्झा यांनी ‘मोर पंख‘ नावाने उर्दूमध्ये २०१५ साली अनुवादित केला.या अनुवादित काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर मिळाला. हे यश कवी प्रशांत असणारे यांच्या कवितांचे आहे.त्यांच्या कवितेने तिची स्वतःची वाट शोधली आहे.अत्यन्त संवेदनशील मनाचे कवी असलेले प्रशांत असणारे आपल्या समकालाला कवितेत शब्दबद्ध करताना दिसतात.
व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असूनही सामाजिक जीवनातील होणारी स्थित्यंतरे आपल्या कवितेतून ते शब्दांच्या चिमटीत सहजपणे पकडतांना दिसतात.त्यांची कविता ही माणसांच्या जगण्यातली आहे. मानवी संबंध,नातीगोती,दैनंदिन आयुष्यातील विसंगती कवी प्रशांत असणारे अत्यंत सफाईने टिपताना दिसतात.त्यामुळे त्यांच्या कविता वाचकांच्या,रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात. मित्रांनो खरी कविता जी असते ती वाचताना,ऐकतांना आणि अनुभवतांना काही काळ आपल्यायला आपलाच विसर पाडायला भाग पाडते. ‘मीच माझा मोर’ या काव्यसंग्रहात मानवी स्वभाव, निसर्गाशी त्याचा असलेला समन्वय, आजूबाजूला घडणारे प्रसंग यांचा वेध घेण्याचा प्रयत्न कवी प्रशांत असणारे यांनी केला आहे. त्यांच्या कविता अनुभूतीच्या पातळीवर व्यक्तीकडून साष्टीकडे जाणा-या आहेत. त्या वाचतांना वाचकाच्या काळजावरून हळूवारपणे मोरपीस फिरवून जातात. त्यामुळेच त्यांच्या कविता सर्वसामान्यांना अधिक भावतात.
समाजमनातून हरवत चाललेल्या माणुसकीचा त्यांची कविता सातत्याने शोध घेतांना दिसते. आकाशवाणी व दूरदर्शन वरून त्यांच्या अनेक कवितांचे प्रसारण जाले आहेत.विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनात ते सातत्याने निमंत्रित कवी म्हणून सहभागी होत असतात.नामांकित दिवाळी अंकाबरोबरच साहित्याला वाहिलेल्या अनेक मासिक व नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिध्द होत असतात. अशा स्वेदानशीलमनाच्या विदर्भातील आकोला येथे वास्तव्य करणा-या कवीच्या कवितांचा आपण आपल्या ‘कवी आणि कविता’ या सदरातून आस्वाद घेऊ या.