स्त्री मनाचा आत्मशोध घेणारी
भाव कवयित्री :अनुराधा नेरुरकर
अत्यंत तरल मनाच्या मराठी कवयित्री.निसर्गातील भावविभोर चित्र आपल्या कवितेत शब्दबध्द करणा-या कवयित्री म्हणून त्यांची साहित्यक्षेत्रात ओळख आहे. त्यांच्या कविता म्हणजे निसर्गाच्या विविध रम्य भाव छटा.निसर्गाचे भावतरंग कवितेत सहजपणे टिपणा-या कवयित्री होत. त्यांचे नाव आहे अनुराधा नेरुरकर. आज ही काव्य सफर त्यांच्या कारकीर्दीवर
निसर्ग हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. झाड आणि माणूस या निसर्गातील घटकांमधील असणारी भिन्नता त्या सहजपणे आपल्या कवितेत मांडून जातात.माणूस निसर्गाच्या सहवासातून भौतिक प्रगती करत असतांना आपले नीतीमूल्ये हरवून बसला आहेत.याची खंत त्यांची कविता मांडताना दिसते. देश-विदेशातील सांस्कृतिक मूल्यांची विसंगती त्यांची कविता टिपताना दिसते आहे. त्याच प्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या भिन्न मनोवृत्तीवर त्यांची कविता बोट ठेवते.कळत नकळत त्यांच्या मानसिकतेचा शोध घेताना दिसते.आई आणि मुलगी यांच्यातल्या भावभावनांची स्पन्दने त्यांच्या अनेक कवितामध्ये जाणवत राहतात.
स्त्री मनाचे अनेक कंगोरे त्या कवितेतून टिपून जातात.मातृत्व हे स्त्रीचे सर्वस्व.मातृत्वाच्या विविध अंगांना त्यांची कविता स्पर्श करतांना दिसते. त्यांनी त्यांच्या कवितेतून विविधप्रकारे मातेची मानसिकता टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या कवितेत निसर्गातील अनेक प्रतिमांचा वापर दिसून येतो. आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याची त्यांची मनोवृत्ती असल्याने, त्यांची कविता वाचकांच्या मनाचा तळ ढवळून काढते.विशेषत: स्त्री जीवनाच्या विविध भावावस्था आपल्या कवितेतून यथोचित टिपण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.त्यामुळे स्त्री स्वातंत्र्याचा लेखाजोखा त्या आपल्या कवितेतून प्रकर्षाने मांडताना दिसतात. कुटुंब आणि समाज व्यवस्थेच्या चौकटीत स्त्री मनाची होणारी घुसमट हा त्यांच्या कवितेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहेत.त्यांच्यातली कवयित्री स्त्री मनाचा आत्मशोध घेतांना सतत जाणवत राहते.
कवयित्री अनुराधा नेरुरकर केंद्रसरकारच्या आयकर विभागात आयकर अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाल्यात.सध्या त्यांचे वास्तव्य दहिसर(प)मुंबई येथे वास्तव्यास आहेत. विविध मासिके,वृत्तपत्रे,दिवाळी अंकातून त्या सातत्याने कथा,कविता, ललितलेखन व पुस्तकांचे परीक्षणे लिहित असतात.आता पर्यंत त्यांचे ‘ एक आभाळ ’, ‘आनंदनिधान’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.विशेष म्हणजे दोन्ही काव्यसंग्रहाच्या दोन आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.त्याचप्रमाणे ‘सलणारे सलाम’ हा ललित लेखसंग्रह प्रकाशित झाला आहेत.त्यांच्या ‘एक आभाळ’ या काव्यसंग्रहाला पुणे येथील यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार,मुंबई येथील अष्टगंध साहित्य पुरस्कार,महाराष्ट्र पत्रकार लेखक संघाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
तसेच त्यांच्या ‘ आनंदनिधान ’ या काव्यसंग्रहास अहमदनगर येथील कवयित्री संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार,गोवा येथिल शैला सायनकर स्मृती पुरस्कार,रत्नागिरी येथील कोकण साहित्य परिषदेचा साहित्य पुरस्कार मिळाला आहेत. त्यांचे ‘ मौनात बोले रात ’, ‘ स्वामी अय्यप्पा ’ हे दोन गीतांचे अल्बम प्रकाशित आहे. तर ‘ मन-शब्दांचे नाते ’हा कवितांचा अल्बम प्रकाशित आहेत. त्यांनी विविध अल्बम आणि चित्रपटासाठी गीत लेखन केले आहेत. गीतासाठी त्यांना म. टाइम्स मानांकन मिळाले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उत्तर मुंबई शाखेच्या त्या अध्यक्षा आहेत.जागतिक मराठी अकादमीच्या सदस्या आहेत.अखिल भारतिय साहित्य संमेलनात अनेकदा निमंत्रित म्हणून सहभाग नोंदविला आहे.आकाशवाणीवर कविता आणि ललीतबंधाचे कार्यक्रम त्या सादर करतात. ‘ मौनात बोलते रात ’ हा श्रवणीय कविता आणि गीतांचा कार्यक्रम त्या सादर करतात.अशा मनस्वी आणि साक्षेपी कविता लेखन करणा-या कवयित्री अनुराधा नेरुरकर यांच्या काही कवितांचा आस्वाद आपण आज ‘कवी आणि कविता’या सदरातून घेऊ.