काळोखाच्या कवितांमध्ये
वाघूरच्या मातीचा रानगंध
शब्दबध्द करणारा कवी – नामदेव कोळी
प्रत्येक माणसाचं आयुष्य हे वेगवेगळ्या परिस्थितीतून घडलेलं अन् बिघडलेलं असतं. जीवनातले चांगले अथवा वाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्याला खूप काही देऊन जातात. खूप काही शिकवून जातात. आयुष्यातल्या वाईट दिवसांत खूप चांगली माणसं घडली आहेत. महान व्यक्तिमत्व घडले आहेत. आयुष्यातल्या त्याच खडतर दिवसांनी त्यांना आयुष्याकडे बघण्याची दृष्टी दिली.त्यातून जीवनाकडे बघण्याचा त्यांचा स्वत:चा असा सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला. जीवनविषयक विचार तयार झाले. जीवनातल्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे.अंधाराच्या साथीने आयुष्य जगलेल्या प्रत्येकाला उजेडाचे दिवस लाभतात.दु:खाच्या काळरात्री भोगणा-यांच्या आयुष्यात आंनदाचे क्षण नक्कीच येतात.ते क्षण कसे स्वीकारावे हे त्यांनाच लवकर समजते.ती समज त्यांना त्या भूतकाळातील दिवसांनी बहाल केलेली असते. दिवस खरे तर सारखेच असतात.त्यांच्याकडे कोण कसे पाहतो. कोण कसे त्यांना स्वीकारतो. यावर सर्व अवलंबून असतं.
खडतर परिस्थितीतून आलेली माणसं जीवनात नक्कीच यशस्वी होत असतात.कारण काळोख दूर सारून सूर्य उगवत असतो.मातीच्या गर्भातला अंधार दूर सारून हिरवा अंकुर उगवत असतो. प्रत्येकाच्या आयुष्याची जडणघडण ही थोड्या अधिक फरकाने सारखीच होत असते.नेहमीच प्रकाशाची लेणी काळोखाच्याच छाताडावर खोदली जाते.म्हणजे काळोखाचे अनन्यसाधारण महत्व मानवी जीवनात नक्कीच आहे.हे ध्यानात घेतले पाहिजे.जीवनाच्या सामाजिक काळोखाच्या तळातून उगवून अनेकांनी आपलं आयुष्य सुगंधित केलं आहे. झाडावर भरलेली फुले,फळे पाहून आपण संमोहित होतो.परंतु झाडाने फुला,फळापर्यन्तचा केलेला खडतर प्रवास कुणालाच माहित नसतो. अगदी माणसांचही असचं असतं.
जळगाव जिल्ह्यातील वाघूरच्या खो-यातील कडगाव येथे गुराखी म्हणून सारी हयात घालवलेल्या शेतमजुराच्या पोटी जन्म घेऊन वारसाहक्काने आलेले सारे भोग भोगत एम.ए.मराठी नेट परीक्षा पास होऊन नऊ वर्षे तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्या दरम्यान स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचनालयात अनुवादक म्हणून कार्यरत असलेले कवी नामदेव कोळी यांच्या कवितांचा आस्वाद ‘कवी आणि कविता’ सदरात घेणार आहोत. ‘वाघुर’ या दिवाळी अंकाचे संपादन करणारे कवी नामदेव कोळी अलीकडे ‘नव-अनुष्टुभ’चे सह्संपादनाचे काम पाहत आहे.आज अनेक साहित्यिक आपल्या आयुष्याचा शोध,धांडोळा कथा कवितेतून अथवा ललित साहित्यातून घेतांना दिसतात. असाच काहीसा आत्मशोध कवी नामदेव कोळी यांनी आपल्या ‘काळोखाच्या कविता’ तून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. काळोखाच्या कविता हा त्यांचा काव्यसंग्रह सप्टेंबर २०२० मध्ये प्रकाशित झाला आहे.
खरं म्हणजे कोणताही आत्मशोध स्वत:पुरता मात्र कधीच सिमित राहत नाही.तर तो समकालाचाही शोध ठरत जातो.त्यामुळे तत्कालीन समाजव्यवस्थेचा लेखाजोखा आपोआपच मांडला जातो.सामाजिक,मानसिक,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वृत्ती,प्रवृत्तीचा बोध सामान्य वाचकाला त्यातून होत जातो.कवी नामदेव कोळी यांची कविता आपल्या गावखेड्यातील संवेदनांचा विचार शहरी संवेदनेच्या अनुषंगाने करण्याचा प्रयत्न करते.त्यांची कविता आई,बाप,बहिणी आणि स्वत:च्या पूर्वायुष्याचा बंध-अनुबंध शोधतांना दिसते.त्यांची कविता ग्रामीण समाजरचनेचा आकृतिबंध उधृत करतांना दिसते.त्याचबरोबर त्यांची कविता वेगवेगळ्या प्रतिमातून संकेत,भाकिते चिन्हांकित करतांना दिसते. काव्यसंग्रहातील सा-याच कवितांमध्ये मनाची ओढाताण,गावखेड्यातल्या परंपरा,रीतीरिवाज,
बालपणीच्या मित्रांच्या सहावासातल्या सजग आठवणी,पशु,पक्षांचे सहवासातले क्षण, बहिणींच्या सोबतचे क्षण यांची जाणीवपूर्वक नोंद दिसते.त्यांची कविता गावशिवाराच्या समग्र मानसिकतेचा लेखाजोखा मांडत येते.खरं म्हणजे कोळी यांची कविता भूतकाळातील विस्मृतीच्या काळोखात गडप झालेल्या आठवणींचा धांडोळा घेत पूर्वायुष्याचा तळ शोधतांना दिसते. त्यांची कविता शहरी मानसिकतेच्या दृष्टीतून त्यांच्या जगून झालेल्या आयुष्याचा आलेख मांडत जाते. तशीच पुनर्प्रत्ययाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यांच्या बालपणातील भोवतालचा हा काळोख आयुष्याला चाचपडायला लावणारा वाटत असला तरी तो जगण्याची प्रेरणाही होताना दिसतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला परिस्थितीचा साराच काळोख वरवर खलनायक वाटत असला तरी तोच त्यांच्या आयुष्याला जसा प्रेरक ठरतो. तसाच तो कविता लेखनाला प्रेरक ठरत आलेला दिसतो. प्रेरणा देत आलेला दिसतो. त्यांच्या आवतीभोवतीचा काळोख सामाजिक विषमतेचा,वर्गव्यवस्थेचा,समाजव्यवस्थेचा,रूढीपरंपरेचा जसा आहे तसाच तो भावनिक,मानसिक गुलामीचा देखील आहे. पुढे जावून मागे वळून पाहतांना, नव्याने स्वत:चा शोध घेताना त्यांच्या मनाची तगमग सातत्याने जाणवत राहते. त्यामुळे त्यांच्या मनाची होणारी कासावीस,घडपड,पडझड आणि परवड काळोखाच्या सा-याच कवितेतून स्पष्ट जाणवत राहते.
बालपण गावखेड्यात गेले असल्याने शहरातलं वास्तव्य मनाला रुचत नाही,पचत नाही. तेव्हा मन महानगरीय हमरस्त्यावरून गावखेड्यातल्या आडवाटेने गावी जाऊन पोहोचतं.कारण बालपण तिथं रुजलेलं असतं.महानगराच्या विन्डोतून ते त्या भूतकालीन दिवसात डोकावतात.मन सैरभैर होतं.मनाच्या त्या द्विध्दा अवस्थेचे वर्णन करताना कवी नामदेव कोळी लिहितात-
शहरात गेल्यावर पाझरतं गाव
डोळ्यांच्या बुबुळांतून
आठवते मायेनं मुका घेणारी माय
पडक्या घराच्या खिडकीतून
काप-या हातानं निरोप देणारा बाप.
गावी खाटेवर पडल्यावर आठवतात
जगण्याचं गणित हिशोबात मांडणारे मित्र
शहरात स्थायिक होचा तगादा लावणारे सहकारी.
माय माती माणसं ओढून नेतात गावात
पैसा प्रगती प्रतिष्ठा झुलवत ठेवते शहरात .
गावसोडून शहरात येतांनाचे आई बापाचे निरोप, खेड्यातले मित्र आणि शहरातले सहकारी यांच्या मानसिकता,गाव आणि शहर यातली तफावत आणि त्यातून शहर आणि खेड्याच्या मध्यावर होणारी मनाची होरपळ कोळी यांची कविता मांडून जाते. मनाचा संघर्ष,भूत-भविष्याचं द्वंद्व आणि आयुष्याचं स्वप्न यातील मनाच्या पातळीवर चाललेला सततचा संघर्ष काळोखाच्या कवितांमधून पाझरत राहतो.हा काळोखाच जगण्याचा,गतकाळाच्या स्मृतीचा ,स्वप्नांचा आणि प्रेरणेचा असल्याने त्या काळाच्या काळोखाच्या उदरात वेगळाच जीवनाचा आनंद लपलेला आणि जपलेला असल्याचे कोळी यांची कविता सुतोवाच करून जाते.पूर्वायुष्यातला हा काळोख सर्जनशील असल्याने त्याच्याच उदरातून उजेडाची तिरीप आयुष्य उजळून टाकते.हे सांगताना कवी नामदेव कोळी लिहितात-
मी लिहितोय कविता
घरातल्या काळोख्या कोप-यात
ती न्याहळते चिमणीच्या उजेडातून माझी अखंड तगमग .
ती अवस्था पोखरते माझं शरीर
मन,मेंदू पेशीपेशी
एक उजेड चालत येतो माझ्या दिशेने
विलीन होतो माझ्यात
मी उजेडाची एक तिरीप.
कवीच्या मनाची तगमग,कासाविसता याबरोबरच अमुर्तांशी चाललेला संवाद कवीच्या सर्जनशील मनोवृत्तीशी जोडला जातो.भूतकाळाशी जोडला जातो.त्यातून पोखरणारी अस्वस्थता वर्तमानाच्या फटीतून उजेडाची,विचाराची तिरीप होऊन कवितेतून व्यक्त होत जात असल्याची जाणीव त्यांची कविता करून देते. माय,बाप आणि स्वत: कवीच्या जगण्याचं,विचारांचं आवकाश वेगळं आहे.त्यांच्या जीवनातल्या आनंदाच्या जागा वेगळ्या आहेत.हे सांगताना कोळी आपल्या कवितेत लिहितात-
भिंतीच्या पोपाड्यातून उडणा-या पराच्या मुंग्या
सडा सारवणात वळवळणारे किडे
शेणाचे गोळे हवेत वाहून नेणारे भुंगे पाहत
सुखावते माय .
चिमण्यांची धुळांघोळ ,गायी-वासरांचं उड्या मारणं
धुरकट डोंगरालगत नाचणारे मोर पाहून
धुन्दावतो बाप.
कागदावरून पसरलेली शाई
पाणथडावर जमलेली काजव्यांची शाळा
चंद्राची सावली दिसल्यावर शहारतो मी .
मानवीजीवन हे विविध अंगाने आणि रंगाने भरलेले आहे.जीवनातले आनंद घेण्याची प्रत्येकाची मनोवृत्ती वेगवेगळी असते.निसर्गातील वेगवेगळे संकेत समजून घेत माणसाने आयुष्याला आनंदाने सामोरे जाण्याचा संदेश नामदेव कोळी यांची कविता देवून जाते.त्याचबरोबर प्रत्येकाच्या विचारांचे आवकाश किती वेगळे आहेत.याची प्रचीती त्यांची कविता कळत न कळत देऊन जाते.प्रत्येकाचं बालपण त्याच्या आयुष्याचा ठेवा असतो.कवी नामदेव कोळी आपल्या समृध्द बालपणा बद्दल लिहितात-
रोजच्या धावपळीतून जगणं नवती व्हावं म्हणून
गावच्या वाटेवर वळतात पाय आपोआप
माय बाप मित्रांच्या भेटी
घर वाडा शाळा मळा पिंजून काढतो दिवसभर .
शहरात घेऊन येतो दरवेळेस गझनीचा महमूद बनून
हवं ते हवं तितकं सुलतानी अविर्भावात
हजार स्वा-या करूनही शिल्लक राहतं
सोरटी सोमनाथाच्या अक्षय संपत्ती इतकं
माझं बालपण.
आजच्या महानगरी वास्तव्यात गावखेडयाची आठवण येणे,हे मानवी मनाचे स्वाभाविक लक्षण आहे.त्यामुळे कवी तिथल्या गावाच्या,नदीच्या,समवयस्क मित्रांच्या, आई,वडील,बहिण,पशु पक्षांच्या,बांधामेराच्या,झाडाझुडपाच्या,गाव आणि शाळेच्या प्रेमात पडल्याने त्यांना आपल्या गावाची आठवण सतत येते.कवी मन आजही वेळ मिळेल तेव्हा गझनीचा महमद बनून सोरटी सोमनाथासारखे गावावर स्वारी करून येत असतं.तिथल्या अक्षय,मौलिक संपत्तीची लुट करून येत असल्याची जाणीव त्यांची कविता करून देते.माणूस कितीही मोठा झाला तरी तो कधीच गावाला विसरत नाही.त्याच्या पूर्वायुष्याच्या अनेक गोष्टींशी तो मनाने जोडलेला असतो.ते माणसाचे जोडलेपण त्यांची कविता अधोरेखित करून जाते.आपल्या आईची विविध रूपं सांगतांना कवी नामदेव कोळी लिहितात-
माय
बापाला आंधणासोबत मिळालेली जिवंत वस्तू
माय
सदा खुंट्यावर बांधलेलं गरीब जित्राब
माय
काळोख्या घरात तेवणारी मिणमिणती चिमणी
माय
दारुड्या नवऱ्यानं हासडलेली झणझणीत शिवी
माय
वास्तवाच्या विस्तवावर भाजलेली गवरीची राख
माय
सासरच्या आगीत जळलेली अर्धमेली चिता
ग्रामीण पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचे स्थान नेहमी दुय्यम मानले गेले. तिच्याकडे नेहमीच उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले गेले.आजही त्यात म्हणावा असा फारसा फरक पडलेला नाही.आई,पत्नी आणि मुलगी या महत्वाच्या तिन्ही भूमिका वठवताना बाप ,पती आणि मुलगा या समांतर भूमिकांना ज्यास्त महत्व दिले जाते. ही सामाजिक खंत आणि विसंगती त्यांची कविता मांडून जाते.घराचे घरपण सांभाळताना,कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्या जीवन संघर्षाच्या काळात मदतीला धावून आलेल्या विळ्याबद्दल ते लिहितात-
पाच लेकरांच्या कापल्या नाळा
गुरांसाठी चारा मेरावरचं काटवण चासांतली वासन काढली
उघड्यानं वावरं घेतली याच्या भरवशावर
उडीद ज्वारी तुरी हरबऱ्यात सर्वांत पुढे राहिली मायची आथ
कधी कातोड्यात आला हातावर बोटं झाली रक्तबंबाळ
तरी धुड्याच्या चिंधीने बोटं बांधून माय लढत राहिली लढाई
विळा परजवणारा बापही नाही आता
बोथट झालेय विळा चालवणारे हात
मानवी जीवनात प्रत्येक वस्तूचे एक स्थान असते. त्याची जागा दुसरी वस्तू घेऊ शकत नाही.खरीप,रब्बी हंगामात पिकांची सोंगणी टिपणी,जनावरांसाठी गवत कापणी,बांधामेरावच्या सरपणासाठी, काट्या काढणी आणि स्त्रियांच्या बाळंतपणात लेकरांच्या नाळी कापणारा विळा कुटुंबातला एक जीवाभावचा सहकारी असतो.त्याच्या मदतीनेच जीवनाची लढाई लढावी लागते.त्याच्या मदतीची, सहकार्याची जाणीव शेतीमातीत राबणा-याला माणसालाच असते.घरातील कु-हाड,टिकाव,पाटी,पावडे,पहार,कोयता,कंदील,विळती यासारख्या असंख्य वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांच्याशिवाय सामान्य माणसाचं जगणं असाह्य होऊन जातं. खरं म्हणजे ही त्यांची शस्त्र आहेत.प्रातिनिधिक स्वरूपात या वस्तूंचे,शस्त्रांचे स्थान,महत्व कोळी यांची कविता व्यक्त करतांना दिसते.त्यातून त्यांची निर्जीव वस्तूप्रती असलेली संवेदनशीलता आणि सजगता व्यक्त होतांना दिसते. शहरात आलेल्या आईला आपण बंदिवासात असल्याची जाणीव होतांनाची मानसिकता टिपताना नामदेव कोळी लिहितात-
माय शहरात आली तेव्हा
दिसला नाही तिला तिचा भोवताल
झाडं-झुडपं वावर-शिवार
भेटली नाहीत माणसं ओळखीची
गायी-गुरं कावळे-चिमण्याही
घुसमटली ती चार भिंतीत
तिचा आर्त चिवचिवाट विरत गेला इथल्या गोंगाटात.
ती विहरली नाही स्वच्छंदी आभाळात
घेतला नाही मनभरून मोकळा श्वास
तिला अंगवळणी पडला इथला मोहमयी बंदिवास.
गाव आणि शहर यातील मोठी तफावत आज जाणवते.खेड्यातलं मोकळेपण,निर्मळता,आपलेपणा,सहकार्य, विचारपूस,
गप्पागोष्टी,पानंफुलं,गुरंढोरं,पशुपक्षी यांना सामावणारं अवकाश आज शहरात राहिलं नाही.सर्वत्र कृत्रिमता पसरत चालली.पानं-फुलं प्लास्टिकची वापरताना लोकं दिसतात.भिंतीवर निसर्गचित्रे लावून निसर्गाचा फील आणण्याचा तोकडा प्रयत्न करताना इथली दुनिया दिसते.निसर्ग,जैवविविधता, पर्यावरण यापासून शहरातील पुढची पिढी हजारो मैल दूर जात असल्याची मोठी खंत कोळी यांची कविता करताना दिसते.आपल्या अनाडी बापाचं शेतशिवाराशी जडलेलं नातं सांगताना कोळी लिहून जातात-
ढोरांशी बनलंय बापाचं घट्ट नातं
आयुष्याच्या शेवटच्या काळातही
बाप घरी आरामात बसत नाही
भल्या पहाटे गडायकाठी अन् विळा घेऊन
हरवलेली गाय चुकार वासरू उनाड गोऱ्हा
कधी व्यालेल्या म्हशीच्या शोधात
निघून जातो रानात
सापडत नाही कुठेच कोणतंच जित्राब
पण गावखोरीच्या लवणातून
गवताचा भारा आणायला कधीच विसरत नाही
गोठ्यात एकही ढोर शिल्लक नाही … तरीही
गावखेडयातल्या माणसाचं तिथल्या सा-याच घटकांशी किती जीवापलीकडचं नातं असतं. आत्मियता असते.मी आणि माझ्या भोवतालच्या परिघात वावरणा-या सा-याच जीवाची काळजी वावरणारा फक्त मातीतला माणूस असतो.त्याच्या जगण्या वागण्यात मातीची ओल असते.ओढ असते.मातीची सर्वसमावेशकता असते.गोठ्यात एकही ढोर शिल्लक नसताना गवताचा भारा आणण्याची कृती वाचकाचं काळीज चिरून जाते. प्राणीमात्राशी असलेला अपरंभाव, गीतेचा ‘ जगा आणि जगू या ’हा वैश्विक विचार त्यांची कविता सांगून जाते.दुस-याची घरी आयुष्यभर मोलमजुरी करणा-या बापाची कैफियत सांगताना नामदेव आपल्या कवितेत लिहितात-
घर चालावं म्हणून
बाप दुसऱ्यांच्या वावरात राब राब राबला
रेताड बखळ जमीन रक्ताचं पाणी
हाडाची काडं होईस्तोवर
आतड्यांना पीळ देत सुपीक केली
घरची बिघाभर जमीन मात्र
शेवटपर्यंत पडीकच राहिली
आयुष्याच्या लढाईत सामान्य माणसाला प्रत्येक आघाडीवर संघर्ष करावा लागतो.त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील माणसाच्या पाचविलाच गरीबीही पुजलेली असल्याने जीवनसंघर्ष ठरलेलाच असतो.त्यासाठी इतरांच्या शेतात मजुरी करणे,गुरे सांभाळणे, सालदारकी करणे,शेतात काबाडकष्ट करणे अशी कामे करावी लागतात.अशा सामान्य माणसाच्या कष्टाच्या घामातून इतरांचे आयुष्य उजळून निघते.आणि स्वत:चे आयुष्य मात्र नापीक राहते. ही समाजातल्या वर्ग विग्रहाची नोंद कवी नामदेव कोळी यांची कविता अधोरेखित करतांना एक जळजळीत सत्य मांडून जाते.कुटुंबाच्या या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना नामदेव कोळी लिहितात-
बापानं जन्मभर गायलं गुराढोरांचं गाणं
गाण्यात गायी-म्हशीचे वाडे सदा भरलेले
गावड्या-वासरं-गोऱ्हे हेलं-वगारू-म्हसडा
शेण-खत-गवऱ्या हीच बापाची इस्टेट
आज बाप
जत्रेत हरवलेल्या पोरासारखा भटकतो वणवण
शोधतो घर-घर गुरांनी भरलेले वाडे-गोठे
जीव गुदमरतो त्याचा सुने खुंटे पाहून
विहीर मोटेवर,सोंगणी टिपणी करतांना,रानावनात गुरं सांभाळताना श्रमपरिहारासाठी गाणी गायिली जातात.ही गाणी कुणब्याच्या वैभवाची,समृद्धीची,तशीच त्याच्या जीवनातलं दु:खं हलकी करणारी असतात.मन ताणाव मुक्त करणारं हे गाणं असतं.त्या गाण्याच्याच आशयात मोठा आशावाद भरलेला असतो.गायीबैलांच्या भरलेल्या गोठयांचं वर्णन त्यात असतं. जीवनातलं डोळ्यात चितारलेलं एक स्वप्नचित्र आसवातून,मनातून आणि वास्तव जीवनातून नष्ट झाल्याची खंत मनाला सतत बोचत राहते. दुष्काळ,गरीबी,नापिकीने हे वैभव मात्र नष्ट झाल्याची खंत त्यांची कविता अधोरेखित करून जाते. बारोमास शेतात राबणा-या शेतमजूराची कैफियत मांडतांना कवी लिहितो-
शेतमालकाला काम हवंय गाडोगंती
पैसाअडका द्यायला नाकीनऊ
शेतमजूर गिधाडाचा खाऊ
शेतकरी अस्मानी सुलतानीनं हवालदिल
शेतमजूर बेकाम जाळतो फुकाचा कंदील
कुणाचा बाप मेलेला कुणाचा बैल मेलेला
प्रत्येक शेतमजूर स्वत:मधेच मेलेला
शेतकरी नेहमीच आस्मानी,सुलतानी व्यवस्थेच्या कचाट्यात सापडलेला आणि शेतमजूर हातबल झालेला.हे चित्र सर्वत्र दिसणारं.काम करूनही मजुरी मिळणे कठीण होऊन बसते.अनेक समस्यांना त्याला सामोरे जावे लागते.अशा शेतमजुराची होणारी कुचंबणा मांडून एका सामाजिक सत्याला त्यांची कविता वाचा फोडताना दिसते.ग्रामीण भागातला सामान्य माणूस जमीनदारांच्या किती दहशतीखाली जगतो. हे सांगताना नामदेव कोळी लिहितात-
उन्हातान्हातून गायरानातून
गव्हाऱ्यामागे ढोरहमाली करतो बाप
चार अमावस्या गेल्यात तरी मागू शकत नाही
मालकाला ढोरांचा हप्ता
पेरणी-निंदणी धसकटं वेचेस्तोवर
हंगामांसोबत अधमेली होत जाते माय
तेल-मिठाची घरात वाणवा तरी धाकधुकते
शेतमालकाला हक्काची रोजंदारी मागताना
घामाचा पैसाही मिळत नाही वेळेवर राबणार्या हातांना
माणसा-माणसांत घराघरात
ही कुठली दहशत पसरलीये माझ्या गावात?
रोजंदारी करूनही सामान्य मजुरांना मालकाच्या मर्जीनुसार अथवा सौजन्याने मजुरीचे पैसे मिळतात.आजही मोठ्याप्रमाणात जमीनदारांच्या मर्जीवर सामान्य माणसाला जगावं लागतं.याचे भयावह चित्र त्यांची कविता मांडून जाते.या संदर्भात कायदे होऊनही ग्रामीण भागातील वेटबिगारी नाहीशी झालेली नसल्याचेच कोळी यांची कविता
आज मी सहज सांगतोय जुना हिशेब
पाटलानं शे-दीडशेच्या पुस्तकांपायी
बापाचे इतके-तितके हजार बुडवले
शेर-अस्तेर दाळदाण्यात मास्तरचे सालभरात
अमुकतमुक पैसे शिल्लक राहिले
अक्षरशून्य माय-बापाला हिशेबातलं
कवडी इतकंही कळत नाही
पण पोराला हिशेब येतो
याचा आनंद आभाळात मावत नाही
याच वेटबिगारीत आई बापाच्या कामाचा मोबदला वेळेवर कधी मिळाला नाही.काम करूनही शेतमालकाच्या दहशती खाली आयुष्यभर जगणं सुटले नाही.मुलाला पुस्तकांसाराखी शिक्षणाची साधने मिळावीत म्हणून बाप जमीनदाराकडे आयुष्यभर राबत आला.मुलाकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून शिक्षकाला डाळदाणा देत राहिला.यासारखी ग्रामीण व्यवस्थेतली भावनिक,मानसिक स्थरावर होणारी लुट त्यांची कविता मांडून जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सामान्य माणसांच्या कितीतरी जमिनी सावकारांकडे गहाण आहेत.हे सांगताना नामदेव कोळी लिहितात-
बाया निघाल्याय अनवाणी पावलांनी
कायभुईची वावरं तुडवत
ही वाट अंगवळणी पडलीये त्यांना
यांच्याच बापजाद्यांची ही वहिवाट
म्हणून जन्मत: मिळालंय हे वळण पावलांना
गायीच्या मोरख्याला बांधावीत वासरांची दावे
तशी नेणती लेकरंही दाखल आहेत या टोळीत
आपल्याच जमिनीत करतोय मजुरी
याचा मागमूसही नाहीये कुणाला
गरीबी माणसाला चारही बाजूने पिळून काढते.गरिबीशी लढण्यात कित्येकांच्या हायाती जातात.कितीतरी सावकारी जाचात सापडतात.कर्जाचे हप्ते फेडण्यात कित्येकांचे आयुष्य जाते.कित्येक वर्षेनुवर्षे शेतजमिनी मुलीबाळीच्या लग्नाच्या निमित्ताने सावकाराकडे गहाण पडलेल्या असतात. हे पुढच्या पिढीला माहित नसतं.ते फक्त रातंदिन राबत आपल्या शेतात राबत असतात.ती शेतीवाडी सावकाराकडे गहाण असण्याचेही माहित नसते.अशा सामन्यांच्या पिळवणूकीचे विदारक चित्रणातून वास्तवातील सरंजामशाही प्रवृत्तीची जाणीव नामदेव कोळी यांची कविता देऊन जाते. शेतमजुरांच्या पोरीच्या आयुष्याची कैफियत मांडतांना कोळी लिहितात-
शेतमजुराच्या पोरी
शहाण्या होतात शेतमजुराच्या पोरी
पाटी-दप्तराच्या वयात येते डोक्यावर शेणाची पाटी
त्या नाही धरत हेका पार्लरबिर्लरचा
मेलेलं असतं त्यांचं भुकेचं सहावं इंद्रिय
अचानक पिवळे होतात हात अजाणतेपणीच
दुपारच्या सावल्या विराव्या पावलांत
इतका अलगद पसरतो काळोख त्यांच्या जगण्यात
दिवाळी-आखाजी-पंचमीला उजळवून टाकतात
बापाचं मातीघर उद्ध्वस्त स्वप्नांची डागडजी करू
शेतमजुराच्या पोरी गरीब गायी
बिनबोभाट आपलासा करतात अनोळखी खुंटा
वाटेतले निखारे पायदळी तुडवत त्या गात असतात सावलीचं गाणं
खेळण्या बागडण्याच्या वयात शाळेची स्लेटची(खापराची)पाटी हातात धरून शाळेत जाण्याऐवजी त्यांच्या हातात परिस्थिती शेणामातीची पाटी देत असते. बापाच्या दारिद्र्याला अस्तर देण्यासाठी अजाणत्या वयात मुली शेतीतल्या कामाला जातात.रोजंदारी करतात.नको त्याचे बांध तुडवतात.बापाची अब्रू वाचवत आर्थिक हातभार लावतात.अशा मुलीचे भविष्य काय ? नको त्या कोवळ्या वयात लग्न लावून त्या गायीसारख्या अनोळखी दारात खुंट्याला बांधल्या जातात. असं सगळं सकलसमांतर वास्तव कवी नामदेव कोळी आपल्या कवितेतून मांडत जातात.बापाच्या मृत्यूनंतर परिस्थितीवर भाष्य करतांना कोळी लिहितात-
बाबांच्या जाण्यानं कुणालाच नाही पडला फरक
वगळले गेले मतदार यादीतून त्यांचे नाव
अमुक आधार नंबर असलेल्या नागरिकाची
मृत्यूनोंद झाली ग्रामपंचायत दप्तरात
बंद झाल्यात बँक खात्याला लिंक असलेल्या सरकारी सुविधा
ज्या तालुक्याला कचेरीचे उंबरे झिजवत
अलीकडेच लाभार्थी झाला होता बाप
बापाच्या जाण्यानं कुणाचं काय गेलं असेल माहित नाही.शासकीय मतदार यादीतून नाव, आधार क्रमांक वगळले गेले.ग्रामपंचायतीला मृत्यूची नोंद केली गेली. यापलीकडे फारसं काही गेलं नसावं. पण सा-या कुटुंबाचा भक्कम आधार देणारा खांब गेला.घराच्या चारीभिंतीना आधार देणारा,विश्वास देणारा आणि सर्वांना प्रेमाची ऊब देणारा हक्काचा कोपरा गेला.याची खंत त्यांची कविता करतांना दिसते.स्वत:ची खास वेगळी शैली घेऊन कवी यांची कविता याली आहे.त्यांची कविता ग्रामीण जीवनाचे वास्तव आवकाश व्यापून टाकतांना दिसते.वाचकांना विचार आणि चिंतन करायला नक्कीच भाग पाडते.
आजच्या प्रकाशमान आयुष्याचा शोध दु:खं,दारिद्र्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने घेण्याचा प्रयत्न करताना कोळी यांची कविता दिसते.तशीच ती माय,माती आणि माणसातलं द्वंद्व सातत्याने मांडत राहते.त्याचबरोबर सामान्य माणसाची कैफियत मांडत येते. त्याचा दैनंदिन जीवनातील संघर्ष मांडत येते. काळोखाच्या रुपेरी कडांमधील आयुष्य काळाच्या ओघात उजळून निघतं. नामदेव कोळी यांच्या आयुष्याबरोबर वाघूरकाठच्या परिसराचा रानगंध घेऊन त्यांची कविता येते. यांचे बालपण खेड्यातल्या डोंगर,नदी,माळरान,शेतशिवारातील अनेकविध सशक्त अनुभवांनी समृध्द बनंलं आहे.त्यामुळे त्यांच्या कवितेत ते समृध्द बालपण सतत रांगत राहते.ते तिथल्या ग्रामीण प्रतिक,प्रतिमांमधून. हीच प्रतीके आणि प्रतिमा त्यांच्या कवितेला समृद्धता बहाल करतांना दिसतात. समाजातील गरीबी आणि दारिद्र्यात आयुष्य गेलेल्या सर्व सामान्य माणसाची भूमिका घेऊन त्यांची कविता येते. ती तिथल्या वास्तवाबरोबर मानवी मनोवृत्तीचा पट मांडत येते. तिथल्या माणसांच्या दु:खाची,काळोखाची संघर्षाची बाजू प्रकाशमान करते.नामदेव कोळी आपल्या काळोखाच्या कवितांमधून कळत न कळत स्वत:चे जीवन चरित्र शब्दबध्द करून जातात. त्याचबरोबर समकालीन वास्तवाबरोबर सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक विषमता आधोरेखित करून जातात. काळोखाच्या सा-याच कवितांमधून त्यांचा मनाचा निर्मल,नितळ आणि पारदर्शक सच्चापणा व्यक्त होताना दिसतो.नव्वोदीनंतरच्या ग्रामीण वास्तवाचा लेखाजोखा त्यांची कविता मांडताना दिसते. त्याचबरोबर त्यांची कविता समकालीन अनुभव विश्वाला अधोरेखित करून जाते. त्यांची कविता आपल्या आयुष्याच्या जडणघडणीचा इतिहास मांडत तिथल्या बदलत्या मानसिकतेचा आलेख मांडतांना दिसते.तशीच आईवडीलांच्या जगण्याच्या व्यवहारातून ती सामाजिक,आर्थिक विषमतेचा भयपट मांडतांना दिसते.बापाच्या रूपातून समाजाचं अज्ञान आणि आईच्या रूपातून समाजातील स्त्रीची कुचंबणा त्यांची कविता अधोरेखित करते.त्यांच्या कवितेत सहजता आहे. साधा सच्चा मनाचा भाबडेपणा आहे.तिच्यात विषयांची वैविध्यता आहे. अनुभवांचा व्यापकपणा आहे. भावभावनांचा प्रांजळपणा आहे. गावखेड्यातल्या बालपणीचे सारेच संदर्भ त्यांची कविता जीवापाड जपताना दिसते. त्यामुळे त्यांच्या कवितेत तिथली लोकसंस्कृती, सण,उत्सव, नदी,डोह,गुरेढोरे,गाव,देवदेवता,मित्र, मोलमजुरी,रोजंदारी सतत डोकावत राहते. खरं म्हणजे कोळी यांची कविता जगून झालेल्या सामान्य माणसाच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडता येते. ती बालपणातील समृध्द जीवनाचा परिपाठ सांगत येते. अंधारल्या सांजेचा हरिपाठ सांगत येते.
कवी नामदेव कोळी काळोखाच्या कवितांमधून आपल्या बालपणातील अनुभव आणि समृध्द जीवनाचा नितळ,निर्मल आनंद शोधण्याचा प्रयत्नपूर्वक प्रामाणीकपणे प्रयत्न करताना दिसतात.तिथल्या जगण्यातून आणि आत्मचिंतनातून आई या रूपकाचे विविध अन्वयार्थ सांगतात.आई म्हणजे जिवंत वस्तू,गरीब जीत्रब,मिणमिणती चिमणी,झणझणीत शिवी,हाडांचा सापळा,गोवरीची राख,कर्दळ ठुणी आणि अर्धमेली चिता. अशा या विविध प्रतिमामधून आईची सामाजिक स्थिती आणि एकूणच समाज व्यवस्थेतील स्त्रीचे दुय्यम सामाजिक स्थान प्रभावीपणे अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे ग्रामीण स्त्रीच्या जगण्याच्या कितीतरी त-हा मांडताना त्यांची कविता दिसते. मुल म्हणजे आईच्या हाडामासाचा गोळा. तिचं नाळ आणि रक्ताचं नातं.तिची मुलाप्रती असणारी माया,त्यातून होणारी तडफड,जगण्याचा संघर्ष,लढा, झुंज यातून आई अधिक ठळकपणे कवितेतून व्यक्त होताना दिसते.काळोखाच्या कवितामधून दोन काळातील स्थित्यंतरे अचूकपणे टिपण्याचा प्रयत्न केला गेला आहे.त्याचबरोबर वातावरणातील बदलाची समग्र नोंद कविता घेताना दिसते.शहरातील निर्जीवता आणि खेड्यातील आत्मीयता कोळी यांची कविता ठळकपणे अधोरेखित करते.त्यांच्या कवितेत पशु,पक्षी,यांचा सहवास व त्यांच्या प्रति असणारी भूतदया कवितेत सातत्याने दिसून येते. कवी नामदेव कोळी यांची कविता मानवी संस्कार आणि जगण्यातील विसंगती मांडत जाते. त्याचप्रमाणे काळाचा महिमा कविता व्यक्त करताना दिसते. काळोखाच्या कवितांच्या केंद्रस्थानी माय,बाप आणि मी असल्याने ती व्यक्तिगत चरित्राकडे अधिक झुकल्याचे दिसते.शहरांचे संमोहित करणे,स्वप्न दाखवणे आणि खेड्यांचे उध्वस्तपण वाचकांना अधिक बेचैन करून जाते.तिथल्या शेतकरी,शेतमजुरांच्या आयुष्यात शिक्षण नेहमी दुय्यमस्थानी असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणारी तिथली सरंजामशाही प्रवृत्ती, ग्रामीण कष्टक-यांच्या शोषणाची कैफियत आणि कष्टक-याच्या मुलांच्या शिक्षणाची दुरावस्था कविता मांडून जाते.कारण नामदेव कोळी यांचं बालपण सारं खेड्यात गेल्याने, गावखेड्याची संस्कृती त्यांच्या व्यक्तिमत्वाला जखडून टाकताना दिसते. त्यामुळेच त्यांची कविता समाजातील सगळ्या उतरंडी आणि व्यवस्थेवर भाष्य करताना दिसते.शेतीमातीत राबणारे शेतकरी, शेतमजूर यांच्या भुकेचा प्रश्न सोडवू न शकणा-या अर्थव्यवस्थेवर अत्यंत उपरोधिक स्वरात कविता भाष्य करताना दिसते.नामदेव कोळी यांच्या कवितेत व्यवस्थेबाबत फारसा आक्रोश दिसत नाही.तशीच आगपाखड करताना त्यांची कविता दिसत नाही.तरी सामाज्यातील शोषक ,शोषितांच्या शोषणाचा पंचनामा त्यांची कविता केल्याशिवाय राहत नाही.अन्याय,विषमता,शोषण व दारिद्र्य याबाबी त्यांच्या कवितेच्या नजरेतून सुटत नाही.ग्रामीण व्यवस्थेतील स्त्रीचे समाजातील स्थान,तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन,तिच्या विविध भूमिका आणि गुलामी यावर कविता अत्यंत प्रभावीपणे भाष्य करताना दिसते.त्याचप्रमाणे त्यांचं निमुटपण प्रकर्षाने अधोरेखित करते. त्यांची कविता आपल्या स्वभावधार्मानुसार भाष्य करताना दिसते.
शिक्षण माणसाच्या आयुष्याचं गणित सोडवत असतं. तरीही आयुष्याचे गणित चुकलेले आईबाप पोटाला चिमटे काढून मुलांना शिकविण्यासाठी आग्रही राहतात.त्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचा प्रयत्न करतात.अशा कुटुंबियाच्या मानसिक संघर्ष कविता मांडत येते.नामदेव कोळी यांची कविता अन्यायाचा पाढा वाचते. पर्यावरणाची ,निसर्गाच्या होत असलेल्या वाताहतीवर भाष्य करते. माणसाच्या जगण्यातली अमानुषता,अगतिकता मांडत येते.रूढी,परंपरा,व्यथा,वेदनावर भाष्य करते.गाव खेड्याचे तुटलेपण,खंगलेपण मांडत कविता येते. कवी कोळी यांच्या प्रांजळपणाची आणि नितळमनाची कविता पानापानातून प्रतिबिंबित होतांना दिसते. त्यांची कविता गावखेड्यातील शेतमजुरांच्या आयुष्याची कैफियत मांडत येते.सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करताना कविता दिसते.नामदेव कोळी यांची कविता म्हणजे सामान्य माणसाच्या जगण्याची कविता आहे. त्यांच्या दु:खं आणि वेदनेची कविता आहे.शहर आणि खेडे यांच्या सीमारेषेवरील सामान्य माणसाच्या मनाच्या घुसमटीची कविता आहे.सनातनी समाजव्यवस्थेच्या पाऊलखुणा रेखांकित करणारी कविता आहे. ही कविता सामान्य माणसांच्या आयुष्याच्या काळोखाची असली तरी त्यांच्या जीवनात उजेडाची तिरीप घेऊन जाणारी कविता आहे.त्यांच्या कवितेत ग्रामीण जीवनातील आख्यायिका, ग्रामीण बोली, मिथकांचा वापर केल्याने तिच्यातले देशीपण जपले गेले आहे.थोडक्यात कवी नामदेव कोळी यांची कविता वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याशिवाय राहणार नाही.उद्या ती अनेक मानसन्मानांनी गौरविली जाईल.विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात लावली जाईल.याबाबत मनात शंका नाही.म्हणून नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कवितांना उजेडाच्या शुभेच्छा देऊन थांबतो.
- प्रा.लक्ष्मण महाडिक, पिंपळगाव बसवंत.(नाशिक)
laxmanmahadik.pb@gmail.com किंवा 9422757523