आपल्या आवतीभोवातीचे वास्तव
साहित्यात उतरवणारा
ग्रामीण लेखक : विजयकुमार मिठे
मराठी भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा वृध्दींगत करणारी महत्वाची सामाजिक संस्था आहे. या सामाजिक संस्थेच्या जडणघडणीत व विकासात सर्व समाजतील विविध घटकांचा सहभाग असतो. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. ज्या प्रांतातून नदी वाहत जाते तशी ती सोबतीला तिथली माती, नाती घेऊन प्रवास करते. अगदी भाषेचेही तसेच असते. भाषा ही आपल्यासोबत काळ घेऊन चालत असते. त्या त्या काळाचे तसेच परिसरातील बदलांचे सारे संदर्भ घेऊन ती वाहत असते. प्रत्येक भाषेचे एक वेगळेपण असते. कारण ते वेगळेपण तिथल्या मातीने, तिथल्या संस्कृतीने जपलेले असते.
आज महाराष्ट्रात अनेक बोली बोलल्या जातात. तिथल्या मणसांनी त्या सा-या जतन करून ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे त्या जपल्या आहेत. तशी अनेक राजकीय,सामाजिक आणि संस्कृतिक आक्रमणे येऊनही तिथली बोलीभाषा टिकून आहे. कारण ते तिथल्या माणसांचं वैभव आहे. प्रत्येक प्रान्तातील भाषेचा एक वेगळाच आयाम असतो. माणसांच्या बोलण्याची लकब, शब्दांचे उच्चार सर्व काही वेगळं असतं. हे वेगळेपण त्या त्या प्रान्तातील भाषेचं खरं वैभव असतं. भाषेचे हे मौखिक वैभव तिथल्या माणसांच्या लेखणातून सहजपणे पहावयास मिळतं. ते पाहण्यापेक्षा ऐकण्यात आणि वाचण्यातही मोठा आनंद देवून जात असतं. त्या त्या प्रांतातील लेखकांच्या साहित्यकृतीत तिथल्या लोकसंस्कृतीचे संदर्भ येत असतात. तिथल्या मातीतले रितीरिवाज, परंपरा, तसेच तिथल्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन वाचकाला झाल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक प्रान्ताची एक अभिजात संस्कृती असते. तिथला प्रत्येक माणूस त्या संस्कृतीचा वाहक असतो. ते सर्व अनुभवायचं असेल तर त्या प्रान्तातील साहित्यिकांच्या साहित्यकृती वाचल्या पाहिजे. त्याशिवाय तो आनंद मिळू शकत नाही.
आज मी नाशिक जिल्ह्यातील निसर्गाने नटलेल्या,द्राक्षबागांनी,ऊस मळ्यांच्या हिरवाईने भरलेल्या, वाघाड, करंजवण, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड या धरणांनी व्यापलेल्या दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीच्या काठावर वसलेल्या पालखेड(बंधारा) या खेडेगावात शेतीमातीत राबता राबता अक्षरसाहित्य निर्माण करणा-या अशाच एका ग्रामीण साहित्यिकाचा परिचय एका मुलाखतीतून वाचकांना करुन देणार आहे. आठवणीतील गावगाडा आणि आजचा बदलता गावगाडा ज्यांनी नेमकेपणाने आपल्या साहित्यकृतीत टिपला आहे. तिथल्या रूढी,परंपरा,तिथलं लोकजीवन,लोककला, लोकसंस्कृती, सामाजिक स्थित्यंतरे टिपले आहे. बदलत्या ग्रामीण कृषिजीवनाचे वास्तव चित्रण ज्यांच्या कथा,कवितेतून साहित्यात आले आहे.
विशेष म्हणजे ज्यांच्या लेखनाला नाशिक जिल्ह्यातील कादवा खो-यातील मातीचा एक वेगळा रंग आणि गंध आहे.ज्यांच्या भाषेत अवीट गोडवा आहे. स्वत:ची अशी वेगळी लयआहे.आणि हो ओघवती भाषा, देखणी शब्दकळा हे ज्यांचे लेखन वैशिष्ट्ये आहे. ज्यांनी घोंगट्याकोर, कादवेचा राणा, बुजगावणं, लाऊक, हेळसांड, येसन हे कथासंग्रह, गावाकडची माणसं, माझी माणसं, गावाकडचे आयडॉल हे व्यक्तिचित्र. आम्ही साक्षर श्रीमंत , लेखणी उडाली आकाशी, ह्या एकांकिका . आभाळओल हा ललित लेखसंग्रह, हिवीं बोली, ओल तुटता तुटेना हे काव्यसंग्रह, अशी विपूल ग्रंथसंपदा ज्यांच्या नावावर आहे. आगामी कादंबरी गोष्ट पाटीवरल्या बाईची, पोटपाणी, वांझोळ, मातीमळण या चार कादंब-या प्रकाशनावर मार्गावर आहेत. त्यांच्या साहित्याला विविध राज्यपुरस्कारांनी सन्मानित केले आहेत.
शंकर पाटील कथा पुरस्कार, अण्णा भाऊ साठे कथा पुरस्कार, नारायण सुर्वे कथा पुरस्कार, कुसुमाग्रज काव्य पुरस्कार.राजे संभाजी ललितलेखन पुरस्कार.महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ललितलेखन पुरस्कार.आई प्रतिष्ठानचा काव्य पुरस्कार. दिंडोरी तालुका पत्रकार संघाचा दिंडोरी वैभव पुरस्कार, साहित्य ज्योती संस्था कडा यांचा जीवन गौरव पुरस्कार.इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचा “सर्वतीर्थ पुरस्कार. कलाभ्रमंती संस्था नासिकचा वसंत पोतदार स्मृती पुरस्कार, इत्यादी राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत आहेत. त्याचप्रमाणे पालखेड (बंधारा) ग्रामस्थांनी विजयकुमार मिठे यांच्या साहित्य सेवेच्या गौरवार्थ त्यांच्या नावाने ‘ कविवर्य विजयकुमार मिठे सार्वजनिक वाचनालय’ गावात सुरु करून ख-या अर्थाने त्यांना सन्मानित केले आहेत.
इगतपुरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ‘चांदणभूल’ या ललितलेखाचा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.,बी.कॉम आणि बी.एस्सी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी आणि सन्मानांनी जे सन्मानित केले आहे. असे साहित्यिक विजयकुमार मिठे या साहित्य क्षेत्रातील कलंदर व्यक्तिमत्वाशी मारलेल्या गप्पागोष्टी आपणाशी शेअर करणार आहेत. त्या गप्पागोष्टीतून मला उलगडत गेलेलं त्यांचं बालपण, त्यांचे शालेय जीवन, त्यांचे वाचन वेड, त्यांची साहित्यिक म्हणून झालेली जडणघडण, त्यांच्या साहित्याचा लेखन प्रवास, त्यामागच्या प्रेरणा, त्यांना मिळालेले मानसन्मान, पुरस्कार व त्यांचे झालेले सत्कार या सर्वाविषयी मारलेल्या गप्पागोष्टीचा प्रपंच वाचकांसमोर मांडत आहे.
प्रश्न- कुमारजी आपण कथा, कविता लिहू शकतो.याची जाणीव आपणास केव्हा व कशी झाली ?
“माझे बालपण पालखेडसारख्या ग्रामीण भागात गेलं. आजही मी तिथंच राहतो आहे.या ग्रामीण वातावरणात माझं सगळं शिक्षण झालं. मी साधारणतः चौथी-पाचवीच्या वर्गात असताना मला वाचनाची गोडी लागली. शाळेतून पुस्तकं मिळत. त्याना वाचनाचं वेड होतं. माझे वडील गावातच ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ते स्वतः नाटकात काम करायचे. घरात नाटकांची पुस्तकं असायची. माझी वाचनाची भूक भागत होती. त्याकाळी मास्तर, ग्रामसेवक, हे गावातळ्या पांढरपेशा वर्गात मोडत. त्यामुळे दिवाळीच्या आसपास वडील नाशिकला गेले म्हणजे हमखास दोन चार दिवाळी अंक घरी घेवून येत. त्यातल्या कथांमधली वर्णनं मला आपली वाटायची. त्यातच माझे मामा शंकरराव गवळी सिन्नरला राहत. त्याकाळात त्यांच्या कथा साप्ताहिकात प्रकाशीत होत. त्यात आई नेहमी म्हणायची, मामा सारखं लिहीत जा. जमेल तुला. मी हळूहळू प्रयत्न करू लागलो. पुढे मला जमूही लागलं. मी कथा लिहू लागलो. आईने नेहमी प्रेरणा दिली. लिखाणाची कला अवगत झाली. ‘हिसाब’ नावाची पहिली कथा लिहिली. आवतीभोवतीचं अनुभवातलं ग्रामीण वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. असे हे लेखनाचे बाळकडू भाच्याला मामाकडून मिळालं.’’
प्रश्न- आपलं पहिलं पुस्तक केव्हा प्रकाशीत झालं ? आणि कोणतं ? अन् तेव्हा काय् वाटलं ?
“माझं पहिलं पुस्तक साधारणतः १९९०च्या आसपास प्रकाशीत झालं. ‘घोंगट्याकोर’ नावाचं. तो माझा पहिला कथासंग्रह. दहा-बारा कथा त्यात होत्या. तत्पुर्वी या सा-या कथा गावकरी, देशदूत, विडीकाडी या सारख्या साप्ताहिकांतून प्रकाशीत झाल्या होत्या. पुण्याच्या सुरभी प्रकाशनानं ते प्रकाशीत केलं. पहिल्या पुस्तकानं खूप आनंद दिला. गावभर त्याची सामुदायिक वाचनं झाली. कारण त्यातील पात्रे आणि घटना गावात जशा घडल्या त्या तशाच मी टाकल्या होत्या. खरं सांगू माझ्यापेक्षा आईला, मामाला अन् गावाला मोठा आनंद झाला. राज्यभरातून प्रतिक्रिया देणारे पोष्टकार्ड, अंतर्देशीय अथवा पाकीटे पोष्टमन घरी आणून देतांना त्यालाही आनंद वाटायचा. वाचकांच्या प्रतिक्रीया वाचताना मी मोहरून जायचो. त्या प्रतिक्रियांनी मला माझ्या कथालेखनाकडे तटस्थपणे बघण्याची दृष्टी दिली. त्यामुळे कसं लिहावं , काय लिहावं या बाबतचा माझा स्वतःचा एक दृष्टीकोन बनत गेला. हे मात्र नक्की”.
प्रश्न- आपण ग्रामीण लेखनाकडेच का वळालात ?
“त्याचं असं झालं. माझं बालपण, युवा, तरुणपण आणि सारं आयुष्यच शेतीमातीत अन् खेड्यात चाललं आहे. इथल्या धूळमाती इतकं आवती भोवतीच्या माणसांचं आयुष्य माझ्या अंगाखाद्यावर घेवून मी वावरतो आहेत. त्यामुळे मला कथानकाची वाणवा नाही. माझ्या कथा–कादंबरीतली पात्रे माझ्या आवतीभोवती रात्रंदिवस फिरत असतात. माझ्या अनुभवांची बाजू मला लेखनासाठी नेहमीच मोठं भांडवल ठरलं आहे. जीवनातलं स्वानुभवातलं भांडवलच लेखनाला उपयुक्त ठरते. इथल्या माणसांचे राहणीमान, चालिरीती, रुढी परंपरा, इथले सणवार, शेतीचे वेगवेगळे हंगाम, ऋतुमानाचे ज्ञान, पाण्यापावसांचे, शेतीमालाच्या बाजारभावाचे अंदाज,पशू, पक्षी, कृमी, किटकांचं सहजीवन, विविध निरिक्षणं, या सा-यांविषयीचे चिंतन, मनन सातत्याने चालू असतं. हे सगळे वास्तवाचे बीजभांडवल माझ्या आवतीभोवती आहे. ही माझी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, वैभव आहे. या सगळ्यांचा मला कथासूत्र मांडताना मोठा उपयोग होतो. तेच मला कथा , कादंबरी लेखनाचं बळ देत आले आहे.”
प्रश्न – तुम्ही म्हणालात की मी गावात. परिसरात घडलेल्या घटानांवर अनेक कथा लिहिल्या. त्या बाचून कुणाची मने दुखावलीत का ? ती माणसं तुमच्याकडून दुरावलीत का ?
“ मुळीच नाही. माझे लेखन गावात घडलेल्या घटनांवर आधारीत असल्याने आणि नावानिशी व्यक्तिरेखा घेतल्याने तो धोका होताच. माझे ‘गावाकडची माणसं’ हे माझे व्यक्ती चित्रांत्रांचं पुस्तक . या पुस्तकात आठ व्यक्तिरेखा घेतल्या. त्या व्यक्तिरेखांच्या जीवनात घडलेल्या भल्याबु-या घटनांवर लिहिले आहे. असे असूनही ही माणसं माझ्यापासून दूरावली नाही.पुस्तक प्रकाशानाच्या दिवशी गवातल्या काही माणसांनी त्यांना बिथरून देण्याचा प्रयत्न केला. विजयकुमारने तुमच्या अब्रूचे धिंडवडे काढून पुस्तकात छापले. प्रकाशन सोहळाच हाणून पाडा. त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या होत्या . अरे पुस्तकात लेखकाने चार आणेच आमचं आयुष्य मांडलं आ. अजून बारा आणे बाकी आहे. या सगळ्या नकरात्मक सूचना नाकारून ही माणसे माझ्यामागे समर्थपणे उभी राहिली. खरं तर माझे सगळे बालपण याच व्यक्तिरेखांच्या अंगाखाद्यावर गेलं. त्यांच्या खांद्यावरुनच मी गावगाडा पाहिला. अनुभवला आहे. अगदी बालपणीच मी गावातल्या सर्व जातीधर्मांच्या माणसांशी जोडलो गेलो. आजोबा,पंजोबापासूनची सारी नाती मी जपत आलो आहे.”
प्रश्न- तुमच्या कथा लेखनावर पुर्वीच्या ग्रामीण कथा लेखकांचा मोठा प्रभाव दिसतो? असे नाही का वाटत तुम्हाला? या विषयी काय सांगाल ?
“ होय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कोणत्याही नवख्या प्रदेशात जायचे म्हटले तर त्या वाटेने अगोदर प्रवास केलेल्यांचं बोट धरूनच प्रवास करावा लागतो माझ्या कथा लेखनाच्या प्रवासात माझेच मार्गदक्क्षक गुरुवर्य चंद्रकान्त महामीने, अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, शंकर पाटील, रा.रं. बोराडे, द.ता. भोसले, यांचा काहिसा प्रभाव काही काळ नक्कीच पडला हे मी प्रामणकपणे मान्य करतो, पण तो काही काळच होता. हे मात्र आवर्जून नमूद करतो. नंतर मात्र मी माझी बाट शोधली. मी नवे नवे प्रयोग कथालेखनात केले. विशेष म्हणजे धक्का तंत्र मी वापरले. या धक्का तंत्राला काही समीक्षक मिठे तंत्रही म्हणतात. ”
प्रश्न – तुमची कथा अजूनही जुन्याच वळणाने जाताना दिसते ? नव्या जाणीवांचे संदर्भ तुमच्या कधांमध्ये दिसत नाही ? या बद्दल काय सांगाल ?
“तुम्ही म्हणता तसे नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालून भी कथा निर्मीती करीत असतो. जुन्या मतांना चिकटून बसलेली माणसं आणि नव्या विचारांच्या पिढीतील तरुणांचा संघर्ष मी माती मळण कथेतून मांडला आहे जमीन विकायची नाही म्हणून मुलाला विरोध करणारा बाप आणि जमिनीत काही पिकत नाही म्हणून ती विकून शहरात कारखाना सुरु करण्याचे स्वप्न बघणारा मुलगा. अशा कथानकाला तुम्ही जुन्या वळणाची कथा कशी म्हणता. द्राक्षबळी कथेत व्यापरी द्राक्षाचे पैसे बुडवून पळून जातो. आणि कथेचा नायक विष पिऊन जीवन संपवितो. हे वास्तव आपल्याला माहीत आहे, पण पुढच्या हंगामात तोच व्यापरी पे से द्यायला येतो. हे सारं सत्य मी अनुभवलं
आहे. तेच नेमकं कथेत टिपलं आहे. प्रश्न-कथालेखनात आपला चांगला जम बसला असतानाही कविता लिहावीशी का वाटली ? कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करण्याची क्षमता फक्त कविता या साहित्य प्रकरात आहे. जे मी चाळीस पन्नास पानांच्या कथेतून व्यक्त करतो, ते कवितेतून कवी मंडळी आठ दहा ओळीतून व्यक्त होतात. कथालेखनाबरोबर मी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. माझ्या मित्रांना त्या दाखविल्या परंतु कबी म्हणून मला कोणीच स्वीकारायला तायार नव्हतं. दोन हजार सातसाली मी स्वतः कादवा शिवार नावाचे मासिक सुरु केले. डिसेंबर महिण्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर मी माझी शेतकरी जीवनावरील कविता छापाली. परंतु कवितेच्याखाली कवी म्हणून माझे नाव टाकले नाही . कविता आवडल्याचे असंख्य दूरध्वनी, पत्रे आली. कुणाची कविता म्हणून विचारणाही अनेकाकडून झाली. रवींद्र मालुंजकर आणि विवेक उगलमुगले यांनी प्रत्येक अंकाच्या मुखपृष्ठावर एक कविता टाकण्याची विनंती केली. मला ते आव्हान होतं . ते आव्हान मी आनंदानं स्वीकारलं. वाचक व मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. काही वाचकांनी त्या कवितांचे पोष्टर तयार कारून घरात लावले आहे. मला वाटतं ‘माई’ या कवितेचा मोठा सन्मान आहे. ”
प्रश्न- कथा, कविता, आणि अलिकडे तुम्ही ललित लेखनाकडे एकदम कसे वळालत ?
“ललित लेखनाबाबत असेच झाले. माझ्या मित्रांचे ललित लेख वर्तमानपत्रांच्या रविवारच्या विशेष पुरवण्यांमध्ये प्रकाशित होत. ते ललित लेख आहेत असे मला कधीच वाटले नाही. म्हणून मीच ललित लेख लिहिण्याचा प्रपंच मांडला . तिच्या अंगणातला पांढरा चाफा हा ललित लेख मी पहिल्यांदा लिहिला. नाशिकच्या गावकरीमधून प्रशांत भरवीरकर यांनी प्रकाशीत केला. वाचकांनी अभिप्राय पाठवून अभिनंदन केले. माझा हुरुप बढला. भरवीरकरांच्या प्रेरणेतून बरेचसे ललित लेख लिहिले. पुढे कादवा शिवार नावाचे मासिक मी सुरू केले. त्यातून सातत्याने ललित लेख, कविता मी लिहू लागलो. ”
प्रश्न- एक वेगळा प्रश्न विचारतो. आपण आकाशवाणीसाठी काही काळ लेखन केल्याचे समजते. त्या विषयी काही सांगाल का ?
“ नाशिक आकाशवाणीसाठी ‘घरकुल’ श्रुतिकेचे लेखन १९९९ पासून सलग तेरा वर्षे केले. तर जळगाव. आकाशवाणीसाठी सहा वर्षे ‘चौफेरचे’ लेखन केले. पुढे ‘घरकुल’ श्रुतिका बंद झाली. सहाजिकच लेखन बंद कारावे लागले. आकाशवाणीने लेखक म्हाणून मला सर्वदूर घराघरात पोहचविले. लेखनाचे मानधन चांगले मिळाले. या श्रुतिकांचे विषय शेती मातीशी संबंधित असल्याने ते लिहिणे मला सहज शक्य झाले.”
प्रश्न- अलिकडे साहित्याला वाहिलेल्या मासिकांचे अंक काढणे कठीण होत असताना आपण प्रकाशनाच्या क्षेत्रात कसं पाऊल ठेवलं? या क्षेत्रातला आपला अनुभव कसा ?
“ एका वर्तमानपत्रात मी पंधरा सोळा वर्ष पत्रकार म्हणून काम केलं. रविवारी साप्ताहिक पुरवणी निघत. संपादक आमच्याशी त्या संदर्भात नेहमी चर्चा करत. एका मिटिंगमध्ये मी माझे मत मांडले. ते पटले पण त्या प्रकारचा बदल मात्र झाला नाही. याच दरम्यान ‘कादवा शिवारचे’ नोंदूणी पत्र हातात पडलं.सप्टेंबर २००७ चा पहिला अंक प्रकाशित झाला. जे मनात होतं ते आता प्रत्यक्षात आणलं. ग्रामीण साहित्याला बाहिलेल्या या अंकाचं सर्व स्थरातून अभिनंदन झालं. मला फार बरं वाटलं. खेड्यापाड्यातील लिहिणा-यांना मला व्यासपीठ देता आलं. आज ‘कादवा शिवार’ मासिकाने एक तप पूर्ण करून तेराव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘कादवा शिवार’ म्हणजे नवोदितांची लेखन कार्यशाळाच आहे. त्यामुळे नवनवे साहित्यिककादवा शिवार मधून लिहिता लिहिता बरीच मंडळी महाराष्ट्रातील इतर नामवंत मासिकात लिहू लागली. ”
प्रश्न- अलिकडे आपलं ‘गावाकडचे आयडॉल’ नावाचं पुस्तक प्रकाशित झालं. गावाकडचे आयडॉल या मागची तुमच्या मनातली नेमकी संकल्पना काय होती ?
“ खरं म्हणजे ही संकल्पना माझी नाही. ‘कादवा शिवारचे’ सल्लागार विवेक उगलमगले यांची आहे. दरवर्षी ‘कादवा शिवारच्या’ दिवाळी अंकातून परिसरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व समाजात निर्माण करणा-या कर्तबगार माणसांची यशोगाथा आम्ही देतो. खरे म्हणजे त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या आयुष्याचा आलेख आम्ही मांडतो. अशा व्यक्ती इतरांना प्रेरणा देतात. आशा व्यक्तींच्या संकलीत मुलाखती ‘गावाकडचे आयडॉलमध्ये’ आल्या आहेत. याचा दुसरा भाग आता प्रकाशनाच्या मार्गावर आहेत ”.
प्रश्न- तुमच्या इतक्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. परंतु राज्यपुरस्काराने एखाद्या साहित्यकृतीचा गौरव अद्याप झाला नाही. या बदल आपण काय सांगाल ?
“ हे बघा , पुरस्कारासाठी कुणी साहित्यिक लिहित नाही. साहित्यिक नेहमी स्वतःसाठी आणि वाचकांच्या आनंदासाठी लिहितात. पुरस्कार ही काही साहित्याच्या मूल्यमापनाची अंतिम मोजपट्टी ठरत नाही.परंतू शासनाच्या पुरस्कराने साहित्यकृती सन्मानित झाली तर लेखक आणि त्याच्या साहित्याची सर्वत्र चांगली चर्चा होते. समीक्षकांच्या, वाचकांच्या, रसिकांच्या नजरा वळतात हे मात्र खरं. ते नाकरून चालणार नाही. ज्यांच्या कथा,कादंब-या अन् कविता वाचून मी मोठा झालो. त्या शंकर पाटील, आण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे यांच्या नावाने दिले जाणारे उत्कृष्ट कथा निर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. कुसुमाग्रज, वसंत पोतदार यांच्या नावाने दिले जणारे पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच ना. ”
प्रश्न- आपण सातत्याने लिहित आलात. एखाद्या विद्यापीठाने आपली साहित्यकृती अभ्यासक्रमात लावली का ? या बद्दल काय सांगाल ?
“ लेखकाने लिहित राहावं. विद्यापीठात साहित्यकृती लागल्याने प्रत्येकाला आनंद होतोच. माझ्या कथा अद्याप विद्यापीठ अभ्यासक्रमात लागल्या नाही. परंतु अलीकडे नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेला ‘चांदणभूल’ या ललित पुस्तकाची निवड झाली. लिहिणे माझे काम ते मी प्रामाणिकपणे करतो आहे. जसे थोर साहित्यिकांचे नावाने पुरस्कार मिळाले. तसेच आज ना उद्या विद्यापीठातही माझ्या कथा,कविता लागतील.मी प्रथम हाडाचा शेतकरी आहे. आशावाद आमच्या रक्तात मुरलेला आहे. आज ना उद्या सर्वच दखल घेतील. भगवान के घर देर हे अंधेर नही. आज अनेकांची पत्रे येतात त्यात मला मोठं समाधान मिळतं. लेखक म्हणून मला यापेक्षा अजून काय हवे ?”
प्रश्न- आपण कथा लेखनातच समाधान मानता का ? आपण तर साहित्यातील अनेक प्रकर हाताळले परंतू कादंबरीकडे का वळाला नाहीत ?
“ खरं तर कथा लेखनात मी पूर्ण समाधानी आहेत. अलीकडे माझ्या चाळीस पन्नास पानांच्या दीर्घ कथा विविध दिवाळी अंकात प्रकाशीत होतात. त्या वाचून वाचकांची पत्रे येतात. त्यातूनच प्रेरणा घेवून मी कादंबरीचे लेखन केले. व्यासपीठ दिवाळी अंकातून ‘गोष्ट पाटीवरल्या बाईची’ ही दिर्घ कथा प्रकाशीत झाली. तिचेच रुपांतर मी कादंबरीत केले आहे. सरोगेट मदर या विषयावरची ‘वांझोळ’ आणि ‘पोटपाणी’ या दोन कादंब-याचे लेखन चालू आहेत. या वर्षाभरात त्या लिहून पूर्ण होतील.”
प्रश्न- अलिकडे जोगवा, शाळा, नटरंग, सही निशाणी डावा अंगठा, बारोमास, यासारखे चित्रपट कथा–कादंबरीवर आले आहेत. तुमच्या कथा-कादंबरीवर एखादा चित्रपट निघावा असे आपणास वाटते का ?
“ हो, नक्की बाटते ना. आपल्या कथेवर कादंबरीवर चित्रपट निघाला तर इतरांप्रमाणे मलाही आनंदच होईल. कारण समाज्याच्या सर्व स्तरापर्यंत जाण्याचे चित्रपट एक प्रभावी माध्यम आहे. कथा कादंबरीच्या वाचक वर्गापेक्षा चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तो एक प्रभावी मार्ग आहे. मध्यंतरी गदिमांचे जीवन चरित्र वाचले चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान त्यांनी दिलेले, तरी ते निराश होते. आपल्या हातून काहीतरी भव्यदिव्य व्हावं असा ध्यास घेऊन त्यांनी गीतरामायण लिहिले. ते अजरामर झाले. आपण लिहीत असलेले साहित्य हे अक्षर साहित्य आहे. हा आनंदाचा ठेवा आहे. ”
प्रश्न- अनेक साहित्यिक स्वतःचे आत्मचरित्र लिहितात. आपणही आपले आत्मचरित्र लिहिणार का ?
“ मी माझे आत्मचरित्र लिहावे असे मला आज तरी वाटत नाही. कारण मी जे ललित लेखन करतो त्यातमाझ्या बालपणापासूनचा जीवनपट आलेला आहे. त्यामुळे मी आत्मचरित्राच्या भानगडीत कधी पडेल.असे आज तरी मला वाटत नाही.”
धन्यवाद , विजयकुमार मिठेजी. आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना खूप आनंद मिळाला. आपलं निर्मळ मन झ-यासारखं मोकळं होताना अनुभवता आलं. आपल्या साहित्यात आपण आपल्या आसपासची माणसं, निसर्ग अक्षर वाङ्मयात अजरामर केला आहे. भोवतालचे चराचर आपण कथा कवितेतून जिवंत केले आहे. जी गावाकडची माणसं साहित्यात कधी आली नसती. त्यांना तुम्ही साहित्यात अजरामर केलं आहे. खरं तर एक मोठे काम आपल्या हातून घडलं आहे. या गावाने, इथल्या माणसांनी आपल्या नावाने गावामध्ये वाचनालय सुरू करून आपल्या कार्याची दखल घेतली. खरे म्हणजे तो आपला गावाने केलेला सर्वात मोठा गौरव आहे.एवढे मोठे महतभाग्य आपल्या वाट्याला आले.याचा आनंद माझ्यासह महाराष्ट्रातील तमाम साहित्यिकांना व आपल्या वाचकांना झाला. हा आनंदाचा मोठा क्षण आपल्या आयुष्यात ज्ञानपीठापेक्षा निश्चितपणे कमी नाही. आपल्या पुढील लेखन प्रवासाला माझ्यासह महाराष्ट्रातील आपल्या वाचक, हितचिंतकांच्यावतीने आपणास लाख लाख शुभेच्छा.
लक्ष्मण महाडिक
दूरभाष्य-९४२२७५७५२३ , मेल – laxmanmahadik.pb@gmail
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22