सामान्य माणसाच्या जगण्याची कविता
लिहिणारा कवी : रावसाहेब कुवर
कोणत्याही साहित्यकृतीची निर्मिती ही साहित्यिकाच्या मानसिकतेतून होत असते.त्यामुळे त्याच्या विचारांचे,संस्काराचे सेंद्रियत्व त्याच्या साहित्यकृतीत आल्याशिवाय राहत नाही. साहित्यिकाच्या संवेदनक्षम मनावर सभोवतालच्या सामाजिक,राजकीय,धार्मिक,नैतिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे साहित्यिकाच्या विचार शैलीचाही परिणाम होत असतो. त्यामुळे एकाच कालखंडात लिहिले गेलेले साहित्य हे वेगवेगळे असू शकते. कारण साहित्यिकाचा प्रकृती धर्म तितकाच महत्वाचा ठरतो. म्ह्जेच एकाच कालखंडात लिहिलेले साहित्य हे कालनिष्ठ आणि व्यक्तीनिष्ठ असू शकते. ज्या समाजात साहित्यिक वावरत असतो त्याच समाजातून त्याची साहित्यकृती निर्माण होत असते. समाज नेहमीच साहित्यिकाच्या लेखनीला खाद्य पुरवत असतो. खरे तर लेखक,कवी यांचे व्यक्तित्व समाज घडवीत असतो. ज्या काळात साहित्य लिहिले जाते त्या काळाच्या विविध घटनांच्या छटा साहित्यकृतीत दिसत असतात. कारण साहित्य हे प्रामुख्याने त्या त्या काळाची निर्मिती असते.समकालीन घटना साहित्यकृतीत कळत नकळत उतरत असतात. त्यांचे प्रमाण कमी ज्यास्त असू शकते. त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषा, चालीरीती,रूढी,परंपरा, सण,उत्सव,विधी,व्रत,वैकल्य,श्रद्धा,अंधश्रद्धा,रीतीरिवाज यांचे बिंबही साहित्यकृतीत पडत असते. थोडक्यात समाजातून साहित्य आणि साहित्यात समाजाचे दर्शन होत असते. ज्यांचा नोकरीपुर्वी आणि नोकरी करतांना नेहमीचसंबंध हा शेती,शेतकरी,शेतमजूर यांच्याशी आला. त्या ग्रामीण भागातील माणसांचं जगणं ज्यांच्या चिंतनाचा भाग होतो. तोच तिथलं वास्तव कवितेत प्रभावीपणे मांडू शकतो. तिथल्या माणसांच्या सुख-दु:खाशी,व्यथा वेद्नांशी त्याची नाळ जोडली जाते.शेतात पडलेलं शेण उचलतांना शेणा सोबत माती,काडी कचरा येतो.अगदी अशीच तिथल्या वास्तवाचं अवकाश कवेत घेऊन ज्यांचे शब्द थव्या थाव्यातून कागदावर उतरून काळजात ऋतून बसतात. असे खानदेशातले साक्री येथे शासकीय सेवेत कार्यरत असणारे कवी रावसाहेब कुवर यांना आजच्या ‘कवी आणि कविता’ या सदरात यांच्या कवितेसह त्यांची भेट घडवून आणणार आहोत.
कवी कविता लिहितो म्हणजे तो शब्दातून व्यक्त होतो. तो त्याच्या कवितेतून बोलत राहतो.त्याला जे वाटतं ते तो कलेच्या पातळीवरून मांडत राहतो. ती त्याची अभिव्यक्ती ठरत असते.कवी ज्या परिसरात, वातावरणात राहतो, त्याच्या आवतीभोवतीच्या परिघातील घडणा-या घटनांचे प्रमाद त्याच्या साहित्यकृतीत कळत नकळत आल्याशिवाय राहत नाही. या सा-या घटनांचा कवीच्या जडणघडणीवर सदैव परिणाम होत असतो. तसाच त्याच्या साहित्यकृतीवरही परिणाम होत असतो. कवीच्या जगण्याच्या अनुभवाची विविध रूपं त्याच्या कवितेमध्ये अभिव्यक्त होताना दिसतात. कारण ती कवीच्या जगण्याचा आणि अनुभूतीचा एक अविभाज्य भाग असते. त्याच्या चिंतनाच्या पायवाटेची जडणघडण त्यातून झालेली असते. कवी जे जे सकलसमांतर वास्तव जगतो, अनुभवतो, ते त्याच्या साहित्यकृतीमध्ये उतरत जाते. आजच्या जागतिकीकरणात भौतिक सुविधांच्यासाठी अधीर झालेला माणूस त्याच्या संस्कृतीपासून,संस्कारापासून,नीतिमूल्यांपासून दूरावत चालला आहे. ही सामाजिक खंत कवी रावसाहेब कुवर यांची कविता प्रामुख्याने अधोरेखित करताना दिसते. कवीचे बालपण ग्रामीण भागात,शेतकरी कुटुंबात गेले आहे.ग्रामीण वास्तवातील सर्वसामान्य माणसांचं सारं जगणं चारीमेरा एकवटून त्यांच्या कवितेत येताना दिसतं. तिथला गावगाडा,तिथल्या परंपरा, चालीरीती, रितीरिवाज त्यांच्या कवितेमध्ये सहजपणे डोकावत राहतात.त्यांची कविता तीनही काळाचा शोध घेताना दिसते. कारण कवी हा भूत, भविष्य आणि वर्तमानाचा सांगाती असतो,तसाच प्रवासीही असतो.आजच्या जागतिकीकरणाच्या भुलभुलय्याच्या नादात सामान्य माणूस फसल्याने तो अधिक दुःखाच्या गर्तेत ओढला जात आहे. त्याच्या मानसिकतेचा टाहो घेऊन त्यांची कविता येतांना दिसते. इथल्या समाज व्यवस्थेच्या फसव्या व्यवहार नीतीत इथला माणूस लुटला जात असल्याचा आक्रोश त्यांची कविता मांडतांना दिसते. भ्रष्टाचारी प्रशासन,स्वार्थी लोकप्रतिनिधी, लुटणारे व्यापारी या सर्वांच्या स्वार्थी वृत्तीमुळे इथला सामान्य माणूस अद्यापही विकासाच्या कव्हरेज क्षेत्राच्याबाहेर फेकला गेलेला आहे. ही खंत त्यंची कविता व्यक्त करताना दिसते. सातत्याने विकासाचे गाजर दाखवून त्याला मानसिक गुलाम बनवले जात असल्याची द्वाही कुवर यांची कविता पिटतांना दिसते. समाजातील सामान्य माणसाच्या शोषणाचा तसाच पोषणाचा आलेख त्यांची कविता मांडताना दिसते. त्याचप्रमाणे तिथल्या गाव गाड्याची, नीतीमूल्यांची झालेली पडझड,माणसांची जगण्यासाठीची धडपड, पोटासाठी माणसांचे पाखरांप्रमाणे होणारे स्थलांतर, स्थलांतरित माणसाची कैफियत, गाव आणि शहर यामध्ये माणसाच्या मनाची होणारी होरपळ, रावसाहेब कुवर यांच्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते. कवी रावसाहेब कुवर यांची कविता म्हणजे ग्रामीण जीवनातील बदलत्या मानवी संस्कृतीच्या मानसिकतेचा शोध घेणारी कविता आहे.
कवी रावसाहेब कुवर हे पंचायत समिती साक्री, अंतर्गत ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. त्यांचा ‘गहिरवलेला पाऊस‘ हा पहिला काव्यसंग्रह २००० ला प्रकाशीत झाला.त्यांचा बहुचर्चित दुसरा काव्यसंग्रह ‘हरवलेल्या आवाजाची फिर्याद‘ हा काव्यसंग्रह २०१७ ला प्रकाशित झाला. त्यांच्या ‘हरवल्या आवाजाची फिर्याद ‘ या संग्रहाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरुनगरचा ‘पद्म्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार.गारगोटी (कोल्हापुर) येथील ‘गाव शिवार” साहित्य परिषदेचा गावशिवार पुरस्कार.सूर्योदय सर्व समावेशक मंडळ जळगांवचा अरुणोदय पुरस्कार. स्व.प्रकाश ढेरे चॅरीटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्रमंडळ पुणे,येथील यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार. काव्यरसिक मंडळ डोंबिवली या संस्थेचा ‘कै.अनिल साठये सर्वोत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार’. मराठी वाड्मय परिषद बडोदा, (गुजरात) आभिरूची गौरव पुरस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नर, राज्यस्तरीय उत्कृष्ठ काव्यसंग्रहाचा प्रथम पुरस्कार. नाशिक कवी साहित्य संस्थेचा ‘नाशिक कवी’ प्रथम पुरस्कार. मातोश्री शेवंताबाई सरकाटे प्रतिष्ठान भुसावळचा प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार. कादवा प्रतिष्ठान पालखेड(बं) दिंडोरी, यांचा स्व. विमलबाई एकनाथराव देशमुख सामाजिक काव्यपुरस्कार. थोर साहित्यिक बाबासाहेब के. नारखेडे राज्य पुरस्कार भुसावळ. दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान चेंबूर यांचा उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार. नाशिक येथील संवाद या संस्थेचा ‘चैत्रसंवाद’ पुरस्कार. मातोश्री लक्ष्मीबाई मगरे स्मृती प्रतिष्ठान दर्यापुर, अमरावती यांचा कवी देवानंद गोरडे स्मती पुरस्कार. भि.ग.रोहमारे ट्रस्ट कोपरगाव यांचा भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कर. संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार.विश्वकर्मा तरुण मंडळ वडशिवणे ता. करमाळा, जि. सोलापूर यांचा गावगाडा साहित्य पुरस्कार. या आणि इतरही पुरस्कारांनी त्यांच्या कवितेचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात एम.ए. भाग-२ च्या अभ्यासक्रमात पाच कविता, एफ.वाय. बी.ए.च्या अभ्यासक्रमात सहा कवितांचा समावेश आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या एफ.बाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात दोन कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्पर्शांकुर’ या गजलनवाज पंडित भिमराव पांचाळे संपादीत भारतातील पहिल्या ब्रेल लिपीतील गजलसंग्रहात त्यांच्या गझलेचा समावेश करण्यात आला आहे. पोशिंद्याची कविता, बाप शोध आणि बोध, खानदेशचे मराठी साहित्य-कवी आणि कविता, काव्यतरंग, मराठी गझल-सुरेश भटांनंतर इत्यादी पुस्तकांमध्ये कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कविता कविता-रती, खेळ, आपले वाङ्मय वृत्त, काव्याग्रह, अक्षरपेरणी,अक्षरवैदर्भी,उर्मी यांसह अनेक नियतकालिकातून आणि दिवाळी अंकातून प्रसिद्ध होत असतात.नोएडा (उत्तरप्रदेश)) येथील महाराष्ट्र मंडळाच्या अखिल भारतीय काव्यस्पर्धेसह अनेक राज्यस्तरीय काव्यस्पर्धामध्ये त्यांच्या कवितांनी पारितोषिके मिळविली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी गजल संमेलनात निमंत्रीत कवी म्हणून अनेकदा सहभाग नोंदविला आहे.
कवी रावसाहेब कुवर यांच्या मनाची जडणघडण ग्रामीण वातावरणात झाली. त्याच ग्रामीण भागातील गावखेड्यांमध्ये कवीचे वर्तमानकालीन वास्तव्य आहेत. नोकरीच्या निमित्ताने गावखेड्यातील माणसांशी त्यांचा रोजचा संपर्क आणि संवाद होत असल्याने, तिथल्या व्यथा वेदनांचा तळ त्यांची कविता ढवळून काढतांना दिसते. त्याचबरोबर त्यांची कविता भूत आणि वर्तमान याची विसंगती शोधत जाते. त्यांची कविता वर्तमानाचे संदर्भ शोधत कोरमअभावी तहकूब झालेल्या माणसांच्या जिंदगीची कैफियत कवितेतून कविता मांडताना दिसते. ग्रामीण भागात आजही पुरुषापेक्षा स्त्रिया झाडांसारख्या चिवटपणे जगण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. बांदा-मेरावरच्या बोरी बाभळीप्रमाणे आयुष्याला ती पुढे घेऊन जाताना दिसते.या जीवनसंघर्षात कर्जबाजारीपणाने, दुःखाच्या वेदनेने,व्यसनांच्या नादाने खचून गेलेल्या माणसांनी आत्महत्या केल्याचे प्रकर्षाने जाणवते. परंतु त्यानंतर मोठ्या हिंमतीने घरादाराचा कुटुंब कबिला चालवतांना कोणत्याच माऊलीने दुःखाला भिऊन आत्महत्या केल्याचे उदाहरण दिसत नाही. अशा आशावादी स्त्रीमनाचा सन्मान त्यांची कविता करतांना दिसते. ग्रामीण वास्तवातील शेतीतून कास्तकर, शेतमजूर, जनावरे, सालदार यासगळ्यांची झालेली वाताहात त्यांची कविता प्रभावीपणे अधोरेखित करत जाते. त्याचबरोबर या सामान्य माणसांच्या हरवलेल्या आवाजाची फिर्याद रावसाहेब कुवर यांची कविता भक्कमपणे मांडताना दिसते. कधीकधी व्यवस्थेतील भ्रष्टाचारी चाकरमान्यांवर त्यांची कविता तुटून पडते. शासकीय व्यवस्थेतल्या खोट्यानाट्या रेकॉर्डच्या नोंदीबद्दल ती प्रकर्षाने विरोध दर्शवते. कारण त्यांची कविता ही सामान्य माणसाच्या जगण्याची कविता आहे. ग्रामीण जीवनातील वास्तव बदलत आहे. शहराचे वारे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावखेड्याकडे वाहते आहे. गावखेडी आपलं समृध्द गावपण सोडून ‘ग्लोबल व्हिलेज’ बनले आहे. या बदललेल्या ग्लोबल व्हिलेजमधल्या माणसाची फरपट त्यांची कविता घेऊन येते. जन्मजात व्यवसायात होत गेलेले बदल, नव्या आणि जुन्या पिढीतील परिवर्तनाची नोंद त्यांची कविता घेतांना दिसते. शेतकरी, कामगार, शेतमजूर या सर्वांच्या गुलामीची कैफियत प्रभावीपणे रावसाहेब कुवर यांची कविता मांडताना दिसते. इथल्या गाव खेड्यातील माणसांची आर्थिक, मानसिक आणि भावनिक लुट कशा पद्धतीने केली जाते, त्याचे चित्र रेखाटतांना यांची कविता दिसते.या सा-या वास्तवाचे भयावह निरिक्षण आणि परीक्षण करताना त्यांच्यातला कवी हतबल होतो. इतरांच्या व्यथा,वेदना पाहतांना स्वत: कवी अतिशय अस्वस्थ होतांना दिसतात.यासगळ्या पार्श्वभूमीवर कवी रावसाहेब कुवर यांची चिंतनाची एक विचारधारा तयार झाली आहे. त्या विचारधारेतून त्यांच्या कवितेचा प्रवास सुरु आहे. कवी हा परकाया प्रवेश करणारा कलावंत असतो. दु:खाच्या काळोखावर तो प्रकाशाची लेणी कोरत बसतो.हे सांगतांना कवी रावसाहेब कुवर कवीची भूमिका स्पष्ट करतांना लिहितात-
कवीच्या मनात एक झाड असतं वेदनेचं
ज्याच्या मुळ्या पोहचल्या असतात
तुमच्या काळजातील कल्लोळापर्यंत
तुम्ही थकुन भागून झोपून जाता निवांत
तेव्हा तो गात असतो तुमच्या दुःखाची गाणी
आणि जात असतो सामोरा
मृत्यूच्या दारातून परतणाऱ्या
पहिलटकरणीच्या अनुभवाला.
कवीने जपून ठेवली आहे
संवेदनशील नावाची गोष्ट
जी होत चालली आहे परागंदा
माणसाच्या जगण्यातून.
राजपुत्र नसला तरी
बुध्द होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो कवी
आणि पाहत असतो स्वप्ने
समस्त विश्वाच्या उत्थानाची.
झाडांच्या मुळाप्रमाणे कवीचे सजग मन सर्वदूर पोहचू शकते. तो त्यातून इतरांच्या सुखदु:खाची अनुभूती घेत असतो. कवी हा कोणताही अनुभव आपला म्हणून अनुभवत असल्याने त्याच्यातल्या संवेदना जागृत होतात. त्या इतरांच्या होतीलच अशा नाही. म्हणून तर तो बुध्दाच्या मार्गाने जाण्याचा त्याचा प्रवास सुरु होतो. यातून निरामय शांतीच्या शोधार्थ आयुष्यभर जगत असतो. थोडक्यात कवी कुवर हे कवीच्या लेखनाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करतांना दिसतात. त्याचबरोबर गल्लीबोळातील,वाडीवस्तीतील आणि गावखेड्यातील सारी माणसं या तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक सुखांच्यामागे धावतांना जवळचे हात,जवळची नाती कायमची सुटून आणि तुटून जात आहे. ती पुन्हा नव्याने गुंफली आणि सांधली पाहिजे. कारण गावशिवारात माणसं एकत्र नांदली पाहिजे. त्यासाठी कवी रावसाहेब कुवर आपल्या कवितेतून लिहितात-
जुळे तुझा माझा स्वर जिथे नांदावा ईश्वर
चल बांधू असे घर, चले बांधू असे घर
राग लोभ वैर गाडू खोल खोदल्या पायात
सुखे समाधाने काढू उभी आपली हयात
साध्या शब्दाचाही वार नको एकमेकावर
चल बांधू असे घर…
लावू श्रमाची घामाची सखे अंगणी तुळस
देवघराला चढवू शेणामातीचा कळस
माय आणि मातीचाही होत रहावा आदर
चल बांधू असे घर….
माणूस जोडला पाहिजे. जपला पाहिजे. हे वर्तमान कोरोनाने सा-या विश्वाला संदेशच दिला आहे. तोच संदेश कवी आपल्या कवितेतून देतो आहे. कारण माणसं तुटत आहे. एकमेकामासून माणसं फोडली,तोडली जात आहेत. एकमेकांच्या मनात एकमेकांविषयी विष पेरले जात आहे. अशा ताटातुटीच्या,विग्रहाच्या काळात आपण आपलं घर नव्याने ऊभं करण्याची गरज असल्याची त्यांची कविता भाकीत करते आहे. म्हणून आपुलकीचं,स्नेहाचं ,प्रेमाचं ,जिव्हाळ्याचं,माय-मातीचा सन्मान करणारं, आडीआडचणी सोडवणारं,सर्वांना सोबत घेऊन चालणारं,विकारविरहित सर्वांना समाधान देणा-या घराची नव्याने उभरणी करण्याचे सुतोवाच त्यांची कविता करते. थोडक्यात बदलत्या सामाजिक वास्तवावर प्रकर्षाने त्यांची कविता बोट ठेवतांना दिसते. जागतिकीकरणाचं वारं गुण्यागोविंदाने वागणा-या खेड्यापाड्यात येऊन पोहोचलं. मातीवरती चालणारी माणसं एकदम बॅनरवर झळकू लागली. सत्ता,संपत्तीच्या संघर्षात हे बॅनरचे वारे गल्लीबोळात धडकल्याने एका नव्या वर्गविग्रहाची नांदी सुरु झाल्याचे सूचित करताना कवी कुवर लिहितात-
बुद्रुक खुर्द वाडी वस्तीपर्यंत
पोहचली आहेत बॅनरमधली माणसं
जी पैदा झाली आहेत जागतिकीकरणाच्या संकरातून.
शहरापासून गावापर्यंत गल्ली बोळ कॉर्नर भिंती
गॅलरी आणि घरेसुध्दा बॅनरमधे नमुद.
बॅनरमधे वानर बनून बसली आहेत काही पोरं
कार्यकर्त्यांचं बिरुद कपाळावर गोंदून
कपाळमोक्ष होण्याच्या प्रतिक्षेत.
आणि बॅनरमधली माणसं हसताहेत हात जोडून
जाणाऱ्या येणाऱ्या तुमच्या माझ्याकडे पाहून
च्युत्या बनवण्याचा गेम अखंडित सुरू असल्याच्या
अघोरी आनंदात.
राजकारणाने निर्मळ आणि नितळ मनाची गावखेडी नासवली. संस्कृती बिघडवली.गाव खेड्यातल्या गल्लीबोळातील भिंतीवर बॅनर झळकू लागले. वेगवेगळ्या पोजमधील कार्यकर्ते,नेते मंडळी चमकत आहेत. विशेष म्हणजे भ्रष्ट चेहरेच त्यात मिरवताना दिसतात. त्यात बायकांचेही नावे फोटोसह झळकतात. समाज्याच्या विकासाचे श्रेय लुटण्याच्या या नव्या पोष्टरबाजीत तरुणाई बहकत चालली आहे. याचा प्रभावीपणे सामाचार त्यांची कविता घेते.राजकारणाच्या धुराळ्यात सामान्य माणसं देशोधडीला लागतात. पोटासाठी शहराची वाट धरतात. शहरात जाणा-या माणसांना परतीचा रस्ता नसतो. याबद्दल लिहितांना व्यवस्थेचा बळी ठरणा-या सामान्य माणसाबद्दल कवी रावसाहेब कुवर लिहितात-
सततच्या दुष्काळाला वैतागून
धरला त्यानं सुरतेचा रस्ता
निवडून फेकावा गव्हातनं खडा
तसा एक दिवस याला अलगद काढला घराबाहेर
जन्मदात्या बापालाही स्वीकारण्याची परंपरा विसरलेल्या
शहरातल्या घरानं तरी
किती दिवस बाळगावं हे बांडगुळ अंगाखांद्यावर.
बायकोच्या डोळ्यात
सिरियलमधलं झगमगणारं शहर
पण याच्या काळजात मात्र
सुटत चाललेली भाऊबंदकी
घरदार, बैलगोठा, शेतशिवार
त्यादिवशी पुन्हा एक शेतकरी संपला
त्याच्या अवस्थेमुळे की
इथल्या व्यवस्थेमुळे माहीत नाही.
खेड्यातली माणसं पोटापाण्यासाठी शहरात जातात.घरदार,शेतशिवार,गुरंढोरं सोडून गावाला पारखी होतात. शेतीमातीला पारखी होतात.तरी मनाने तिथल्या वातावरणाशी जोडलेली असतात. त्यामुळे भावनिक गुंता सुटता सुटत नाही.आईबापात गुंतलेला जीव बेजार करतो.दोन पिढ्यांत मानसिकतेची दरी वाढत जाते. मुलाच्या शहरातल्या घरात बापाला करमत नाही. पोटासाठी मुलाला शहर सोडवत नाही.थोडक्यात गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. मनाची ही अवस्था मांडताना कवी रावसाहेब कुवर लिहितात-
शिल्लक दिवसांचं गाठोडं डोक्यावर ठेऊन
बाप फिरतो आहे केविलवाणा होवून
कधी या पोराच्या कधी त्या पोराच्या दारावर
देहाची थरथर सांभाळत.
ढाण्या वाघासारखा जगलेला बाप
गुरगुरत राहतो आतल्या आत
इच्छा असुनही फोडत नाही डरकाळी
नाही कुठेही आवाज हरवल्याची फिर्याद.
गाव जगू देत नाही शहर तगू देत नाही
हा ग्लोबल नावाचा कोळी
टाकून बसला आहे जाळी अडकून
जिच्यामध्ये फडफडते आहे अख्खी पिढी
जुन्या पिढीच्या तडफडीसह.
ही दोन पिढ्यांची मानसिक फरपट अत्यंत प्रभावीपणे कवी मांडताना दिसतो. म.गांधीजीनी भविष्याचा वेध घेऊन ग्रामीण भारतातली खेडी समृध्द करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. ‘खेड्यांकडे चला’ हे अभियानही सुरु केले होते.परंतु स्वातंत्र्यानंतर खेड्यांच्या विकासाकडे पूर्णपणे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले. त्याची परिणीती म्हणजे खेडी ओस पडू लागली.शहरं नको तेव्हढी सुजू लागली. थोडक्यात गाव उद्ध्वस्त होत असल्याची ही भयंकर नांदी
कवी रावसाहेब कुवर यांची कवितेने बरोबर हेरली आहे.आज ग्रामविकासाच्या योजनांचा व्यवस्थेने चालवलेला खेळखंडोबा मांडताना ते लिहितात –
स्वच्छ गाव सुंदर गाव… तंटामुक्त गाव… निर्मल गाव
पर्यावरण संतुलीत समृद्ध गाव
वृक्ष लागवड… कुटुंब कल्याण… आरोग्य अभियान
जलभूमी अभियान… माहितीचा अधिकार
कायद्याचे शिबीर अशी हजार स्वप्ने
परिपत्रकाच्या पोतडीत बांधून गेलो गावात विकायला
तर गाव वसकन धावून आलं अंगावर
शांत बसलेल्या कुत्र्यानं
उगाच दगड भिरकावल्यावर चवताळून यावं तसं.
ग्लोबल ग्लोबल करता करता गाव झालं गोगलगाय
इंच इंच जमिनीमध्ये झाडून -हायलं हातपाय .
स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजना येऊनही इथला सामान्य माणूस अद्यापही विकासाच्या कव्हरेज क्षेत्रात आलेला नाही. ही मोठी शोकांतिका आहे.सामान्य माणसांच्या विकासाच्या योजनांचा लाभ राज्यकर्ते उठवतात.सामान्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात.हे सांगताना आपल्यातला शासकीय अधिकारी बाजूला ठेवून त्यांनी आपल्यातला कलावंत जपला आहे. त्यामुळेच तिथलं वास्तव त्यांनी ख-या अर्थाने मांडले आहे. त्याचबरोबर कलावंत म्हणून सामाजिक बांधिलकीही जपली आहे.शासकीय कितीतरी योजना फक्त कागदावर पूर्ण होतात.योजनांचा पैसा गायब केला जातो. सामान्यांना नडले जाते. हे सामाजिक वास्तव कुवर यांनी प्रभावीपणे मांडले आहे. आज काळ वेगाने बदलतो आहे.जुने व्यवसाय कालबाह्य होत आहे. काळाच्या या प्रवाहाची दखल त्यांच्या कवितेने गांभीर्याने घेतली आहे. त्यासंदर्भात कवी रावसाहेब कुवर लिहितात –
विज्ञानाच्या ग्लोबल गावात झाली
आता त्याचीही प्रगती
तो झाला आहे सुताराचा कारपेंटर.
नांगर वखर पांभर सोडून
तो बनवू लागला आहे आता
दिवाण, डायनिंगसेट सोफासेट शहरात जाऊन.
त्याच्या पावलावर पाऊल ठेवून
कुणब्यासकट अख्खे कारूनारूही
करू लागले आहेत प्रस्थान
भाकरीच्या शोधात शहराकडे
आणि गाव देऊ लागलं आहे अखेरचे आचके.
जागतिकीकरणाच्या या लाटेने अनेकांचे जीवन उध्वस्त केले.समृध्द ग्रामव्यवस्था उध्वस्त केली. भौतिक साधनांच्या आणि सुविधांनी माणूस आळशी करून टाकला आहे. कारागीर कंगाल केले आहे. पारंपारिक व्यवसाय सोडून नव्या व्यवसायांना सामोरेजातांना नानाविध सामाजिक समस्या जावे लागत असल्याचे विदारक चित्र त्यांची कविता मांडते.कर्जबाजारीपणाने शेतक-यांच्या सात/बाराचा व्ह्सेरा काढतांना कवी रावसाहेब कुवर आपल्या कवितेत लिहितात-
आता कर्जापायी ‘इतर अधिकारात‘
दाखल झालेलं बँकेचं नाव खोडून
मरत्या बापाच्या नावाभोवती आळे मारून
होऊ शकत नाही
आपल्या नावावर सातबारा
याची खात्री झालेली खेड्यातली पोरं
बसली आहेत येड्यासारखी
निरर्थक गप्पांचे चर्वण करत
उन्हाळी सुटीनं बेवारस झालेल्या
शाळेच्या ओट्यावर .
त्यांनी मांडलेलं शब्दचित्र खूपच काही सूचित करतं.राजकारणाच्या वावटळीत सामील झालेली, त्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडलेल्या तरुणाईची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गावातल्या मंदिर, शाळांच्या ओट्यावर पक्षीय राजकारणाच्या निरर्थक गप्पांच्या फडात रंगणा-या गावगाड्यातल्या तरुणाई च्या डोळ्यात अंजन घालतांना त्यांची कविता दिसते.वडिलोपार्जित शेतजमिनीवर अर्थात सात/बारावर इतर अधिकारात बँकांची नावे लागल्याने बापाच्या मृत्यूनंतर मुलांची नावे लागणे दूरापाक्त झाल्याची जाणीव त्यांची कविता करून देते.गावातला कारागीर गाव सोडून गेला. पाठोपाठ शेतात काम करणारा सालदार गाव सोडून गेला. त्यामूळे शेती करणे कठीण झाले.हे मांडताना कवी रावसाहेब कुवर लिहितात-
शेट सावकार दलालासारखा
मजूरही उठला आता बापाच्या जिवावर
मागतात उक्त काम अव्वाच्या सव्वा भावात
आणि बापही अगतीक होवून फसतो
त्याच्या बेरकी जाळ्यात
हाती आलेलं पीक जाऊ नये हातातून निसटून म्हणून
जागतिकीकरणाचा फटका कुणाकुणाला कसा बसतो आहे. याची नोंद त्यांची कविता घेतांना दिसते.शेती व्यवसायाची विविध अंगांनी होणारी कुचंबणा, होणारी विटंबना कुवर यांची कविता मांडताना दिसते. मजुरांच्या दारादारावर गरके मारूनही मजूर रोजंदारी करायला तयार नाही. मजुरांचे बरे असते.दुष्काळ असला नसला तरी त्यांच्यासाठी मायबाप सरकार काम देते. त्यामुळे त्यांच्या हातात चार पैसे नेहमी असतात. म्हणून शेती सोडून मजुरी करण्याचे सुतोवाच बाप करतो. सामान्य शेतक-याची होणारी कुचंबणा त्यांची कविता अधोरेखित करून जाते. दारिद्र्यरेषेखालील यादीतील पोलखोल करतांना अत्यंत तटस्थपणे कुवर लिहितात-
इंदिरा आवास योजनेचं घरकूल मागणाऱ्या
दगडूला मी म्हटलं
‘अरे बाबा नाही टाकता येणार मला तुझे नाव
त्यासाठी तुझं कुटुंब बेघर असायला हवे
शिवाय दारिद्र्य रेषेचं कार्डही असलं पाहिजे तुझ्याकडे
गावच्या पोलीस पाटलाचं
सरपंचाच्या बायकोचं टॅक्टरवाल्या तात्याचं
बागायतदार बापूचं….
दारिद्रय रेषेवरची‘ सारी नावं
तुमच्या ‘दारिद्रय रेषेच्या खालच्या‘ यादीत
आम्ही गरीबचं कसे बसलो नाहीत
तुमच्या सर्व्हेच्या गणतीत ?’
कागदावर चालणाऱ्या
प्रशासनाचा मी प्रतिनिधी
माझे बालही वाकडा करू न शकणारा दगडू
आणि मला बिनधास्त ठेवणारी ही यंत्रणा…
शासकीय योजनांच्या विविध लाभार्थ्यांच्या याद्यात राजकीय वर्चस्व असणा-या माणसांची नावे टाकली जातात. जे खरे लाभार्थी आहेत ते मात्र कितीदातरी लाभापासून वंचित राहतात.हे असे सर्रास चालते आहे. सारेच एकमेकांना सांभाळत असतात. याचा हात त्याच्या हातात. त्याचा हात याच्या हातात असल्याने शासकीय यंत्रणेचे काहीही होत नाही. हे विदारक सत्य त्यांची कविता तर करतेच. परंतु या व्यवस्थेतील भीषण वास्तवाचा पंचनामा त्यांची कविता करून जाते. शेतीत राबणा-या बापाची तुलना बैलाशी करतांना कवी रावसाहेब कुवर लिहितात –
विकाव्या लागणा-या मालकीच्या बैलांच्या आठवणीने
कासावीस होतो बाप आतून-बाहेरून
आणि अधिकच व्याकुळतेने गोंजारू लागतो
भाड्यानं लावलेल्या बैलांच्या पाठीला
बैलाबरोबर बैलासारखा राबणारा बाप
आणि बापालाही बापासारखा वाटणारा बैल
व्यवस्थेचे बळी दोन्हीही
दुष्काळी सालात बैलाबरोबर बापालाही
शेतक-याच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रामाणिक सहकारी कोण असेल तर तो म्हणजे त्याचा बैल.बैलाप्रती त्याचा फार जीव असतो.अगदी पाठच्या भावापेक्षाही ज्यास्त. असा बैल विकतांना बैल बाजारात शेतक-याच्या अंत:करणात माजलेला कोलाहाल त्याच्या डोळ्यात फक्त शेतकरी होऊन अनुभवता येतो. आज या व्यवस्थेने बैलाची आणि बापाची अवस्था एकाच केली आहे. शेतातून बैल आणि घरातून बाप आज हद्दपार होतांना दिसत आहे. वृध्दाश्रम वाढत आहे.ही एक सामाजिक शोकांतिका त्यांची कविता मांडून जाते. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत झडत जाणा-या चर्चेच्या फैरी वांझ निघतात. कुणब्याने कितीही फोडला टाहो, कितीही आक्रोश केला तरी त्याचे प्रश्न जाणिव पूर्वक रेंगाळत ठवले जातात. हे सांगतातना कुवर लिहितात-
जगण्याचे आणि जगवण्याचे
महत्त्वाचे विषय टाळून हा कुणी लिहिला
तुझ्या आयुष्याचा अजेंडा
जो बजावलासुद्धा गेला नाही मुदतीत
व्यवस्थेच्या ठेकेदारांना बिनकसाच्या
कोरडवाहू जमिनीचा वडिलोपार्जित
सातबारा घेऊन तू कसा जिंकशील
ही जगण्याची महासभा
जनसामान्यांना प्रत्येक निवडणुकात दिवा स्वप्ने दाखवली जातात. देश जागतिक महासत्ता होणार.समृद्धी येणार.या केवळ वल्गना ठरत असतात. शेतक-याच्या शेतीला शासन अद्यापपर्यंत पाणी देऊ शकले नाही. ही शोकांतिका मांडताना महासत्तेच्या बाता मरणा-या राज्यकर्ते जगणे आणि जगविणे हे म्हत्वाचे विषय सातत्याने टाळत आलेत. असे असतांना सातबारा घेऊन जगण्याची महासभा जिंकण्याची भाषा कशी करतोस ? असा सवाल त्यांची कविता करतांना दिसते. शहरात मुलाच्या बंगल्यात बापाच्या मनाची दोलायमानता टिपतांना रावसाहेब कुवर अतिशय संवेदनशीलतेने लिहितात-
मुलानं शहरात बांधलेल्या टुमदार बंगल्यात शिरतांना
शेण-माती तुडवून तुटकी झालेली वहाण
कोठे काढावी ?
या यक्ष प्रश्नासह तो प्रवेशतो
चकचकीत संगमरवरी बैठकीत
तो बसतो सोफासेटच्या मऊशार कोपऱ्यात
सर्वांग चोरून
मग बेसन मध्ये थुंकू नका“
ही समज आठवत, खोकल्याची उबळ दाबत
तो गुदमरत राहतो पहाटेपर्यंत
डनलफच्या गादीवर
अतिशय तरल भाव पकडून जन्मदात्या बापाच्या मनाची घालमेल त्यांची कविता टिपते.शिक्षणाने मुलभूत प्रश्न सोडविले पाहिजे की ते आधिक प्रकर्षाने वाढविले पाहिजे.शिक्षण क्षेत्रातील या उणीवेची जाणीव त्यांची कविता प्रकर्षाने करून देताना दिसते. बापाची सावली बनून राहणा-या मावलीचे मोठेपण व्यक्त करतांना कवी रावसाहेब कुवर लिहितात-
कसे हासता हासता दाबे हुंदक्याला आत
बने कोणत्या मातीची बाईपणाची ही जात.
तिने राहून उपाशी दिला तोंडातला चास
त्याच लाडक्या दिव्याने दिला जगण्याला फास
बने पाळण्याची दोरी कशी जळण्याची वात.
लेक सासरी जाताना माय सांगते कानात
बाई म्हणून जगणे माझे ठेव तू ध्यानात
त्यांनी दिले देवपण आणि केला केला घात
बने कोणत्या मातीची बाईपणाची ही जात.
आईच्या आयुष्याला कवितेत गुंफले नाही असा कवी अजून तरी जन्मला नाही.कवीकडे संवेदनशीलता, सहृदयता मातेकडूनच येत असावी. हेही त्यामागचे एक कारण असू शकते. आईपण आणि बाईपण याची थोरवी गाऊन त्यांची कविता मातृऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतांना दिसते.
थोडक्यात कवी रावसाहेब यांची कविता सर्व सामाजिक अंगाने बहरताना दिसते. जागतिकीकरणाच्या वाऱ्यात गाव,खेडे उध्वस्त होत आहेत. पक्षीय राजकारणाला आणि त्यांच्या झेंड्यांना भक्कम खांदे हवे असतात. असे खांदे देणारे हे सारेच खांदेकरी राजकारणाच्या प्रवाहात येवून शेतीला दुरावत आहे. शेतीमालाच्या उत्पादनखर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळते. शेती करण्यापेक्षा मजुरी करणे परवडते. त्यामुळे शेती ऐवजी मजुरीच करावी. अशी शेतक-यांची धारणा होते आहे. अशी धारणा होणे, म्हणजेच स्वातंत्र्यानंतर देशात राबविण्यात आलेल्या कृषी विषयक पंचवार्षिक योजनांचे हे अपयश म्हणावे लागेल. खेड्यातून शिकून आलेल्या अनेक माणसांची आणि त्यांच्या अडाणी अशिक्षित आईबापांची शहरात जीवन जगण्याची इच्छा नसल्याची मानसिकता त्यांची कविता टिपताना दिसते. गाव जगू देत नाही आणि शहर तगू देत नाही. असा विरोधाभास त्यांची कविता मांडून जाते. ग्रामीण भागात सतत पडणारे दुष्काळ, शासकीय योजनांचे कागदावरचे प्रकल्प, कागदावरच्या योजना, आणि वास्तवातील योजनांचे पोलखोल करताना त्यांची कविता दिसते. त्यामुळे शेतकरी शेतातून, त्याची जनावरे त्याच्या गोठ्यातून, आणि त्याची मुले पोटासाठी गावातून परागंदा होताना दिसत आहेत. पाखरांच्या थव्याप्रमाणे शहरांच्या दिशेने जगण्याच्या शोधार्थ त्यांची दिंडी निघते आहे. या ग्रामीण वास्तवाची विदारकता, शहरी जगण्यातील बेगडीपणा आणि खोटेपणा, बँकांमधले चक्रवाढव्याज, यातून शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण याचे गणित त्यांची कविता मांडताना दिसते. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे होऊनही इथल्या शेत शिवारातील, वाडीवस्तीतील कुणबी, कास्तकर या श्रमजीवी माणसांच्या जिंदगीचे सामाजिक ऑडिट केले तर जमेच्या बाजूला काहीच दिसणार नाही. ही सामाजिक खंत त्यांची कविता मांडून जाते. त्यांच्या कवितेतील प्रतिमा आणि प्रतिकं अस्सल ग्रामीण जीवनातील आल्याने कवितेचा आशय प्रभावीपणे व्यक्त होत जातो. रावसाहेब कुवर यांचे वास्तव्य साक्री परिसरात असल्याने, त्या परिसरातील बोलीभाषा, म्हणी, वाक्प्रचार तसेच तिथल्या व्यवहारातील देशी शब्दांचा सुंदर पद्धतीने त्यांनी वापर केलेला दिसतो. त्यामुळे कुवर यांची कविता ही सकलसमांतर वास्तव घेऊन चालताना दिसते. ग्रामीण जीवनातील नवे बदल, तिथले भावजीवन, विस्थापित आयुष्य, स्थलांतर, चाकरमान्यांचे व्यवहार, फसवणूक, लुटालुट, शेतमालाच्या बाजारभावातील घसरण, तिथल्या व्यवस्थेचे चित्रण त्यांची कविता करताना दिसते. त्यांची कविता ही माणूस, निसर्ग आणि प्रशासन या सर्वांशी संघर्ष करणाऱ्या कष्टक-याची जीवनगाथा मांडताना दिसते. बैलाप्रमाणे कष्ट करणाऱ्या बापाची झालेली वाताहात, त्याच्या आयुष्याची झालेली पडझड, त्याच्या स्वप्नांचा झालेला चक्काचूर, या सर्वांचे ऑडिट त्यांची कविता करताना दिसते. रावसाहेब कुवर हे प्रशासकीय सेवेत असल्याने त्यांच्या कवितेत प्रशासकीय व्यवहारातील शब्द कळत-नकळत येताना दिसतात. निर्मल ग्राम अभियान, स्वच्छ सुंदर गाव, तंटामुक्ती, जलभूमी अभियान, कुटुंब कल्याण, आरोग्य अभियान, माहितीचा अधिकार कायद्याचे शिबिर, दरसाल दर शेकडा, ग्रामपंचायत पर्यावरण समृद्ध गाव, कुऱ्हाड बंदी, अभियान, विषाणू जिवाणू कोरम, सभा, वडिलोपार्जित, साहेब, उतारा, सातबारा, दारिद्र्य रेषा, घरकुल, लाभार्थी याद्या, बेघर, हिस्सा, शिवारफेरी, ठराव, कोरम, तहकूब, बरखास्त, महासभा, नमूद, अक्षेपाधीन, क्षमापन, खुलासा, माती परीक्षण, हगणदारी, निवडणूक यासारखे शासकीय परीभाषेतील शब्द आल्याने त्यांची कविता समजण्यास सहज सोपी झाली आहे. तसेच अजेंडा, सर्व्हे, ट्रॅक्टर, ऑफिस, ग्लोबल, रेशनकार्ड,शेषण कार्ड, बॅनर, ऑडिट, युनिफॉर्म, बॅलन्स शीट, सोफासेट, इस्टेट, स्कूल, बस, टीव्ही, अनवांटेड सेवन टी टू , इगो, लोकल, कॉर्नर, गॅलरी, मॉलिश, ग्लेजस्टाईल, बॉडी, स्किन, स्पेशल रिपोर्ट,कोर्ट,मेजरमेंट बुक,व्हायरस, त्याचप्रमाणे अनेक सरकारी दप्तरातले इंग्रजी शब्द त्यांनी जसेच्या तसे वापरल्याने कवितेच्या आशयाला अधिक बळकटी आली आहे.
थोडक्यात ग्रामीण समाजव्यवस्था,शेतीमातीतला माणूस, कास्तकर, कुणबी, काबाडकष्ट करणारी माय, माऊली यासर्वांची शोकांतिका, परवड प्रभावीपणे कवी रावसाहेब कुवर यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यांच्यामागे निष्क्रिय शासकीय धोरण व कुचकामी शासकीय यंत्रणा असल्याचे सुतोवाच त्यांची कविता जागोजागी करतांना दिसते. यापुढेही त्यांच्या कवितेने सामाजिक बांधिलकीतून शेती,माती आणि तिथल्या प्रश्नांवर अधिक सजगपणे लिहित राहावे. तसेच त्यांची कविता अधिकधिक प्रगल्भ होत जावी. अशी शुभेच्छा देऊन थांबतो.
प्रा. लक्ष्मण महाडिक – मो- 9422757523
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22