महानगरीय जाणिवांचा कोलाहल
कवितेत शब्दबध्द करणारा कवी : सुशीलकुमार शिंदे
आजच्या कवी आणि कविता या सदरात ठाणे येथील भारतीय साहित्य अकादमीचा सन २०१६ चा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त कवी सुशीलकुमार शिंदे सहभागी होत आहे. त्यांची कविता लेखनामागची भूमिका आणि कवितांचा आस्वाद आपण घेऊया.
साहित्यिकाचा अनुभव हा त्याच्या साहित्यनिर्मितीचा गाभा असतो. प्रेरणा असतो.समाजात वावरत असताना कित्येक अनुभव त्याच्या मनात घर करून राहतात. कित्येक अनुभव त्याला अस्वस्थ करतात. समाजात भेटलेली काही माणसं लक्षात राहावी इतकी प्रभावित करून टाकतात. तसेच अनेक प्रसंग त्याला असे काही विलक्षण अनुभव देवून जातात की ते त्याच्या साहित्यकृतीचे एक अंग बनतात. साहित्यिकाच्या साहित्यकृतीत आवतीभोवतीचं वास्तव सतत डोकावत असतं. म्हणून तर साहित्यकृती ही समाजाचे एक प्रतिबिंब असते. असे म्हटले आते. समाजातली माणसं, समाजातले प्रश्न, समाजातील जीवन पद्धती, त्याजीवन पद्धतीतील संस्कार, त्याचे कुटुंब, त्यांचे संसार, त्यांची नाती, संसारातले सोहळे, रितीरिवाज, रूढी, परंपरा, माणसांचे एकमेकांशी असलेले संबंध, या सर्वांचे अवलोकन साहित्यिक करत असतो. त्याचप्रमाणे मानवी मनातली आंदोलने तो त्याच्या शरीर आणि मनाच्या पातळीवर अनुभवत आणि टिपत राहतो. त्यातून त्याच्या मनात सतत मंथन आणि चिंतन सुरु असते. तो शोधक दृष्टीने या सर्व घटितांककडे पाहत असतो. समाजातील अशी माणसं, त्यांची जीवनपद्धती कलावंताला नेहमी आव्हान करीत असते. कलावंत अर्थात साहित्यिक त्याच्या साहित्यकृतीत कळत नकळत त्यांना साकार करत असतो.
उघड्या डोळ्यांनी, कानांनी पाहिलेली, अनुभवलेली तिथल्या जगाची सुखदुःखं हा साहित्यिकाच्या अनुभवाचा फार मोठा भाग होतो. कारण काही अनुभव हे त्याच्या जगण्याशी संबंधीत असतात. काही घटनेत तो स्वतः सहभागी झालेला असतो. काही वेळा समाजाच्या समस्यांना तोंड फोडण्याचा प्रयत्न करण्याचा मोह साहित्यिकाला होणे हे स्वाभाविक आहे. समाजजीवनाला साहित्यात स्थान नसेल तर वाचकाला किंवा प्रेक्षकांना ती साहित्यकृती आपली वाटत नाही. तिच्याशी वाचक मनाचे नाते कधी जुळत नाही. आपण जे वाचतो आहे ते सगळे उपरे, खोटे, न पटणारे आहे. असे त्याला वाटत राहते. मग असे साहित्य पुन्हा वाचायची इच्छा त्याला होत नाही. त्याच्या सभोवती वावरणारी माणसं असतात. त्यांच्या जगण्याच्या कथा, व्यथा वाचकाच्या परिचयाच्या असतात. म्हणूनच साहित्यकृतीमध्ये जीवनातली सगळी संभाव्यता अपेक्षित असते. हे जीवन खरे मानवी जीवन असते. समाज जीवन असते. समाजाचा साहित्यावर जो परिणाम घडतो तो साहित्यिकाला नेहमी प्रेरणा देत असतो.
प्रचलित प्रश्नांना सामोरे जाण्याचा प्रयत्न लेखक,कवीकडून होत असतो. कारण असे जीवन तो जवळून न्याहाळत असतो. अनेक सामाजिक घटना,प्रसंग साहित्यिकाला चिंतन करायला भाग पाडतात. तेव्हा त्याच्यातील संवेदनशील कलावंत जागा होतो. त्याला प्रेरणा देतो. साहित्याची बीजं समाजात रुजलेली असतात. थोडक्यात समाजाचा साहित्यावर निश्चित परिणाम होतो. अशी साहित्यकृती आणि असे साहित्यिक शाश्वत मूल्यांचा अविष्कार करणारे ठरतात. खरे म्हणजे शाश्वत आणि वास्तव दर्शन देणारे साहित्य काळाच्या ओघात टिकते. ते केवळत्यांच्या साहित्यमूल्यांमुळे नव्हे तर त्यातून प्रकट होणाऱ्या सामाजिक मुल्यांमुळे. त्यामुळे साहित्यिक हा परिस्थितीचा दास नसून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व लाभलेला प्राणी आहे. हे विसरून चालणार नाही. साहित्यिक हा शेवटी माणूस आहे. त्यामुळे तो समाजाची जबाबदारी ओळखून वागतो. कोणत्याही साहित्यकृतीत सामाज अपरिहार्यपणे डोकावत असतो. पण कलावंताच्या भोवतालचे तत्कालीन समाजजीवन किंवा जीवनपद्धती जशीच्यातशी साहित्यात चित्रित होत नसते. प्रमुख्याने प्रदेश, भाषा, संस्कृती यांचा महत्त्वाचा भाग असतो.
कवी सुशीलकुमार शिंदे यांनी पुणे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर मधून २०१० मध्ये बी.एस्सी. (अॅग्री.)शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, पुणे येथून कृषी व्यवसाय व्यवस्थापनात पी.जी.डी.बी.एम.चे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या ‘वाणिज्य व संशोधन केंद्रातील सहकार व ग्रामीण विकास’ या विषयावर सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पी.एचडीचा अभ्यास करीत आहेत. गोदरेज समुहामध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन (विपणन संवादक ) पदावर सहा वर्षे काम केल्यानंतर पुणे येथे ‘डयू डेलीजन्स’ आणि ‘पिपल पर्सेप्शन’च्या संदर्भात काम करणा-या ‘ द स्ट्रेलेमा ’ या संस्थेत सध्या दोन वर्षापासून कार्यरत आहेत.कवी सुशीलकुमार शिंदे यांचा ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय…!’ हा पहिलाच काव्यसंग्रह २०१६ मध्ये प्रकाशित झालेला आहे. या पहिल्याच काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. विशेष म्हणजे दिल्ली येथील भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०१६ प्राप्त झाला.
त्याचप्रमाणे त्यांच्या या काव्यसंग्रहाला बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेचा अभिरुचि गौरव पुरस्कर, कडा येथील साहित्य ज्योती मंचचा साहित्य ज्योति पुरस्कर, गुणीजन सहित्य सम्मेलन औरंगाबादचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, पुणे येथील कलारंग साहित्यभूषण पुरस्कार, हातकणंगले(कोल्हापूर)येथील स्फूर्ती साहित्य मंडळाचा श्रीशब्द पुरस्कार, इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराचा कवयित्री इंदिरा संत राज्यपुरस्कार, नाशिक येथील चैत्र संवाद पुरस्कार, पुणे येथील महाराष्ट्र राज्य कामगर परिषदेचा गदिमा पुरस्कार, पालखेड (नाशिक) येथील कादवा प्रतिष्ठानचा कादवा साहित्य पुरस्कार, नाशिकच्या नारायण सुर्वे वाचनालयाचा कविवर्य नारायण सुर्वे काव्यपुरस्कार, येथील पंढरी भूषण पुरस्कार, अकोला येथील अंकुर साहित्य पुरस्कार, कोपरगाव येथील बी.जी.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, मुंबई येथील एकता सांस्कृतिक अकादमीचा एकता वाङ्मय पुरस्कार, कणकावली येथील आवणओल प्रतिष्ठानचा कविवर्य वसंत सावंत काव्यपुरस्कार यासह अनेक राज्यपुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे साहित्य अकादमीच्या ‘एकविसाव्या शतकातील कविता’ या ग्रंथात त्यांच्या दोन कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे.
कवी सुशीलकुमार शिंदे यांची कविता ही नागर अर्थात शहरी जीवनातील अनेक अंगांना स्पर्श करणारी कविता आहे. त्यांचा कवितेला वास्तवाचं भान आहे. त्यांची कविता तिथल्या नागर संस्कृतीतील वास्तवाच्या भयावकतेला आपल्या कवेत घेऊ पाहते. शहरी संस्कृतीच्या झगमगाटापलीकडील अंधारमय विश्वात जीवन जगणा-या जिवंत माणसांच्या विदाराकतेचे दर्शन घडवताना दिसते. विशेष म्हणजे त्यांची कविता शहराच्या आसाभोवतीच्या परिघातील घटनांना केंद्रीभूत धरून भाष्य करतांना दिसते. त्यांनी अनुभवलेल्या, काहीशा पाहिलेल्या, ऐकलेल्या माणसांच्या व्यथा, वेदना त्यांची कविता घेऊन येतांना दिसते. त्यांची कविता सामान्यांच्या प्रश्नावर प्रखरतेने प्रकाश टाकते. तशीच ती नागरी जीवनातल्या सामान्य माणसांच्या मर्यादाही अधोरेखित करते. त्यांच्या दैनदिन जीवनातील संघर्ष, आटापिटा मांडीत येते. तसेच अंधा-या जगतातातील लुकलुकणा-या विचार प्रवाहाला प्रवाहित करते. तिथल्या भेसूर जगाचे उष्ण श्वास टिपताना दिसते. त्या जगातील बिन चेह-यांच्या माणसांचे चेहरे वाचतांना दिसते. अशा दिवसागणिक कूस बदलणा–या शहरातील निमुटपणे अन्याय सहन करणा-या , मुके राहण्याचा गुन्हा करणा-या माणसांच्या दु:खाचा कढ शब्दातून व्यक्त करतांना दिसते. खरं म्हणजे ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय…! ’ हे त्यांच्या काव्यसंग्रहाचं शीर्षकच खूप काही सांगून जाते. ते शीर्षक त्यांच्या कवितेचा हुंकार, उद्गार घेऊन येतांना दिसते. महानगरीय जीवनाकडे माणूस म्हणून बघण्याची एक वेगळी दृष्टी वाचकांना देते. त्यापाठोपाठ त्यांची कविता वाचकांच्या डोळ्यात झणझणीत आंजन घालून जाते.
विचारांनी निर्माण झालेल्या माणसांच्या समूहाला कधीच संपवता येत नाही आणि उजेड मिळणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्या गुलाम नाही. असा प्रखर आशावाद त्यांची कविता वाचकांच्या मनात विचार पेरून जाते. म्हणूनच कवी शिंदे यांची कविता अंधारातून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या माणसाच्या मनाचं प्रतिनिधीत्व करतांना दिसते. त्यांच्या कवितेची भाषा रोखठोक आहे, बिनधास्त आहे. त्यामुळे ती वाचकाच्या मनात घर करते. यांच्या कवितेत मानवी स्थितीगतीचे चित्रण होताना दिसते. महाकाय पसरलेल्या शहराच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या वेळेला, वेग वेगळ्या माणसांचं जग वावरत असतं. अशा वेगळ्या जगातल्या माणसांच्या जगण्यातला आटापिटा मांडताना त्यांची कविता दिसते. त्यांची कविता कॉस्मोपॉलिटन शहरातल्या संमिश्र जीवनशैलीतील माणसांची भाषा घेऊन येते. तिथल्या जीवनाची आणि जगण्याची लय घेऊन येते. कागदाला खाज, उजेड फिरणार्या मशाली, सहानुभूतीची खुरटे बेटे, दुःख पिऊन गब्बर झालेला बाप, गांडीत साचलेली शहराची घाण, आगलावे आभाळ, जागतिकीकरणाची शेपूट, रक्ताळलेले शब्द, अबॉर्शन झालेल्या कविता, समुद्राचं आयघालेपण, डुलक्या घेणारे शहर, अंग चोरून उभी असलेली फूटपाथ, सुस्तावलेला रस्ता, डांबर मिसळलेलं रक्त, वाळवी लागलेला गावगाडा, गुहेच्या अंधारलेल्या भिंती, गदगदून येणा-या चित्रलिपी, दिलखेच इमारतीचा कळस, लेकुरवाळा डोंगर, लवल्या पायापुरता उजेड पाडणारी माणसं, बिनबुडाची सरकारं, रिव्होल्यूशन आणि इवोल्युशनच्या गप्पा, प्रेतांचे बाय फर्गेशन, सूर्य बीज डोळ्यात साठवलेली माणसं, शहर आत्महत्या करायचं म्हणतंय, प्रॉफिट नावाचं झाड, गारठून गेलेले शहर, मोतीबिंदू झालेल्या शहर, पोक्या झालेला डोंगर, आदिम वर्षाची घुसमट, कपाळावर कमॉडिटीचा शिक्का, बुरसटलेल्या झेंडा, परंपरेचा चिरेबंदी दरवाजा, कूस बदलणारी शहरं, बीन चेहऱ्याची माणसं, अनसिव्हीलाईज्ड ह्यूमीनिटी, यातील आशयगर्भ प्रतिमांनी शहरीजीवनातील वास्तव अधिक परिणामकारकरित्या अधोरेखित करण्याचा कवी सुशीलकुमार शिंदे यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. कवी आणि कवितेच्या भूमिकेबद्दल आपले विचार मांडताना कवी सुशीलकुमार शिंदे लिहितात –
कागदाला येते खाज, म्हणून थोडीच लिहितो कोणी ?
काळीज चिरताना गप्प बसवत नाही हेच खरं.
सळसळणाऱ्या रक्तातून उमटत जाते रसायन
कधीच गिळता येत नाही माणसांच्या झुंडीना.
ते खुडतील स्वप्ने किंवा जाळतील घरे
किंवा एखादा हंगाम त्यांनी बळकावलाही असेल
पण युगावर मालकी असणाऱ्यांनी
याची फार तमा बाळगू नये
अंधारून आल्यात दाही दिशा
म्हणून तू घाबरू नकोस,
उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही
कुणाच्याच गुलाम नाहीत.
कवी का लिहितो ? त्याला अभिव्यक्त का व्हावंसं वाटतं? या सा-याच प्रश्नांची उत्तरं त्यांची कविता देतांना दिसते. निर्जीव,संवेदनाहीन कागदाला खाज येते म्हणून कुणी कागदावर लिहित नाही.एखादी घटना, प्रसंग काळजाला भिडते. त्यातून काळीज कळवळतं. रक्त सळसळतं. त्यामुळे कवी शब्दातून अभिव्यक्त होत असतो. अलीकडे लेखन स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. कलावंतावर, त्यांच्या साहित्यकृतीवर बंधनं लादली गेल्याच्या घटना आपण अनुभवल्या आहेत. त्यामुळे एखादा हंगाम ते बळकवतील. घरे जाळतील. स्वप्ने खुडतील. परंतु विचारवंत, साहित्यिक,कवी यांनी आपल्या विचार आणि लेखन स्वातंत्र्यावर मर्यादा घालू नये. संत तुकारामांची गाथा बुडविली तरी त्यांचे विचार अर्थात अभंग, अक्षरवाङ्मय आजही चिरंतन आहेत. सॉक्रेटीस,गालिलिओ यांच्या बाबतीत असेच झाले. परंतु त्यांचे विचार मारले गेले नाही. म्हणून युगावर मालकी असणा-यांनी याची काळजी करू नये. कितीही अंधारून येवू द्या. कारण उजेड पेरणा-या मशाली कधीच कुणाच्या गुलाम होत नाही. असा खंबीर विश्वास देत त्यांची कविता सर्वांना आश्वस्थ करतांना दिसते. काळाच्या ओघात जगभरात अनेक विचारवंत,साहित्यिक प्रखरपणे विचार मांडत असतात. ते विचार न पटणा-या सनातनी वृत्तीच्या व्यक्तींना मानवणा-या नसतात. हे सांगताना कवी सुशीलकुमार शिंदे आपल्या कवितेतून लिहितात-
भर चौकात एका साहित्यिकाला
गोळ्या घालून निघृण मारणा-या माझ्या प्रिय मित्रा
तुझ्या अंगणात तू पाहिलेत का कधी रक्ताळलेले शब्द?
तुला एव्हाना समजलेच असेल की
पाण्यात बुडवून मारता येत नाही शब्दांना.
शब्दांना कधीच देता येत नाही धमकी
किंवा कापता येत नाही शब्दांचे हात.
जास्त वळवळ करतात म्हणून
शब्दांची उपटता येत नाही जीभ.
तू काल ज्याला मारलंस
त्याच्याच रक्तातून तयार झाल्यात सहस्र लेखण्या
तुका वाण्यासारखा विद्रोही आकांत पेरण्यासाठी.
मध्यंतरी दाभोळकर,पानसरे आणि गुलबर्गी यांच्या हत्या केल्या गेल्या. म्हणून त्यांचे विचार मेले नाहीत.संपले नाहीत. कारण शब्दांना कधीच आंधळे किंवा ठार बहिरे करता येत नाही. डांबून बंधिस्त करून ठेवता येत नाही. जेवढे बंधने घातली जातात, तेव्हढे शब्द अर्थात विचार प्रवाहित होतात. निर्भीडपणे माणसांच्या मनात विचारांचा प्रकाश युगानुयुगे पेरीत जातात. माणसं मारल्याने त्यांचे विचार कधीच मारत नसतात. तसेच मरणाच्या भीतीला विचारवंत भिक घालत नसतात. याउलट त्यांचे कार्य आणि विचार अधिक उजळून निघतात. हे खंबीरपणे कवी शिंदे यांची कविता सांगून जाते. मुंबई ,मद्रास, सुरतसारख्या समुद्राच्याकाठावर वसलेल्या शहरांचे विदारक वास्तव मांडतांना कवी शिंदे लिहितात-
समुद्राच्या काठावर वर्षानुवर्षे डुलक्या घेणारे
हे निवांत शहर किती सहजपणे
पेलत राहते कोलाहल जगण्याचा.
लाटांचा भडीमार अस्वस्थ करतो
गदागदा हलवतो आतून-बाहेरून
गरीबाच्या भाकरीचा प्रश्न सोडवताना
रात्रभर राबत राहते हे शहर
उपसत राहते गटारे
उपसत राहते कचऱ्याचे ढिगारे
अविश्रांतपणे.
देशातल्या सगळ्याच शहरांची स्थिती थोड्याफार फरकाने सारखीच आहे. शहरे माणसांना दोन गटात विभागतात.गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण करतात. गरिबांचं जगणं सुसाह्य करतात.त्यासाठी ही शहरे रात्रंदिवस राबताना दिसतात. जगण्यासाठी मिळेल ते काम बिनबोभाटपणे करत राहतात.या शहरात धर्मांधतेचे, विषमतेचे विष मोठ्याप्रमाणात वाढत जाते. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात. गरीब गरीबच राहतो. समुद्राप्रमाणे गरीब श्रीमंतीची भरती-ओहटी येत राहते. परंतु सर्वांना पोटाशी घेऊन ही शहरे सर्वांचा उदरनिर्वाह् करताना दिसतात. मुंबईसारख्या शहराची मोठ्यावेगाने वाढ होते आहे. डोंगर दूर सारून शहरे वाढत असल्याचे पाहून कवी सुशीलकुमार शिंदे लिहितात-
उघड्यावर राहणारी लेकरं पाहून
डोंगर झाला बाप
आणि जमेल तसा घेत राहिला सामावून
दाटीवाटीनं राहणाऱ्या माणसांना.
पायथ्याशी आलेले लोक चढत राहिले
अंगावर निर्धास्तपणे
लेकुरवाळा डोंगर पोखरून गेला आतून बाहेरून.
पहिला टिकाव पडला तेव्हाच झुगारून टाकायला हवा होता डाव
माणूस नावाच्या जातीचा,
पण डोंगर गप्प. टिकावामागे टिकाव पडत गेले
पोकल्यान् आणि जेसीबी
उकरून काढत राहिली माती, झाडे आणि बरंच काही…
आता डोंगर बोलत नाही झाडांसोबत
पाखरे कधीच झालेत स्थलांतरित
पोक्या झालेला डोंगर पाहतोय वाट
विरघळून जाण्याची.
शहरांच्या विस्तारीकराणामुळे डोंगर पोखरले जात आहे. तिथली झाडे,पक्षी,पशु,कीटक यांच्या जीवनमानवर मोठा परिणाम होत आहे. हे निसर्गावर मानवी अतिक्रमण होताना पाहून कवीचे संवेदनशील मन हळहळते. उघड्या माणसांची डोंगाराने किव करून आश्रय दिला. त्यामुळे डोंगर आडचणीत अडचणीत येतो. त्याला पोखरण्यासाठी मोठीमोठी अत्याधुनिक यंत्रे कार्यरत आहेत. निसर्ग आणि पर्यावरण यांचा समतोल बिघडतो आहे. डोंगर कुशीतले पक्षी स्थलांतरीत होतात. आश्रयदाता बाप बनलेला डोंगर आता विरघळून जाण्याची वाट पाहतोय. डोंगराच्या रूपकातून बापाच्या वाताहातीची कथा आणि व्यथा कवी शिंदे यांची कविता मांडून जाते. शरीरातील रक्त वाहिन्यांप्रमाणे शहरातील रस्ते रात्रंदीवस चालूच असतात. रस्त्याच्या प्रतिमेतून मानवी प्रवृत्तीचे अत्यंत मार्मिक शब्दात शिंदे वर्णन करतात-
काळ्याशार धुरांचे लोळ
अंगावर घेवून सुस्तावलेला रस्ता
हल्ली दचकूनच उठतो साखरझोपेतून.
रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभी असलेली फूटपाथ
किती बेमालूमपणे सहन करत राहते
अंगाखाद्यावरचा कुरकुरणारा संसार.
रस्त्यावर उघड्यानागड्यानं फिरणारा मनोरुग्ण
विचारत फिरतोय प्रश्न
चकचकीत दिसणाऱ्या डांबरात कोणाचं मिसळलंय रक्त
दिवसभर वर्दळीत राहणारा रस्ता
टोलनाक्याच्या डिव्हायडरवर एकांतात बसून
मांडत राहतो हिशोब रस्त्यावर टिपलेल्या माणसांचा.
आज शहरातील रस्त्यांवर माणसांसह वाहनांची मोठी गर्दी असते. महानगरातल्या रस्त्यांच्या कडेला अनेकांचे संसार उघड्यावर मांडलेले असतात. रस्त्याच्या कामावर अनेकांनी घाम गाळलेला असतो. त्यांच्या कष्टातून रस्ता तयार होतो. रस्त्याच्या चकाकण्यात कामगारांचे रक्त सांडलेले असते. प्रवाशी वाहनांचे अपघात होऊन रक्त आणि जीव मिसळलेले असतात. याचा हिशोब रस्ता टोलनाक्यावर बसून करीत असल्याची जाणीव कवी सुशीलकुमार शिंदे यांची कविता करून देते. शहरी संस्कृतीच्या संकुचित वृत्तीचे स्पष्टीकरण देतांना शिंदे लिहितात-
स्मशानाच्या घाटावर
किती ऐटीत आम्ही करतोय बायफर्गेशन
प्रेत जाळण्यासाठी किंवा गाडण्यासाठी
जातीनिहाय किंवा धर्मनिहाय.
माणूसही मेला तरी कुठे सोडतो जातीचा अभिमान
धर्माचा अट्टाहास…माजोरडी श्रीमंती
मी पाहिलीत ईर्षा, द्वेष आणि अहंकार
स्मशानाच्या काठावरसुद्धा घेऊन जाणारी माणसं,
नाहीतर प्रेत इतकं जड लागलंच नसतं.
शहरांचे विस्तारीकरण होऊनही माणसं मनाने संकुचीतच राहतात. तसे नसते तर जातीनिहाय किंवा धर्मनिहाय बायफर्गेशन झाले नसते. माणूस मेल्यावर इर्षा,द्वेष,मत्सर संपला पाहिजे. फुले,आंबेडकर,छत्रपती शाहू महारांजांच्या महाराष्ट्रात माणूस मरतो, तरी जातीचा आभिमान मात्र जात नसल्याची खंत कवी सुशीलकुमार शिंदे यांची कविता मांडताना दिसते.शहरांच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे ग्रामीण भागातील माणसे पोटापाण्यासाठी शहरांकडे धाव घेतात. त्यामुळे मजूर,कामगार यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत जाते. या शोषणाबद्दल कवी सुशीलकुमार शिंदे लिहितात-
शोषण वाढत गेले दिवसागणीक,
पण आम्ही काहीच बोललो नाही प्रत्येक क्षणी
दोन पायावर उभे राहून हलवत राहिलो शेपूट
दोन घासांच्या आशेने.
ते म्हणाले,फॅक्टरी शहराबाहेर काढू
आम्ही मात्र शांत.
मग ते म्हणाले, माणसाला फॅक्टरीतून कमी करू
कुणालाच उमजेना वेदना उपाशी पोटांची
रोज ते वाढवत राहिले अत्याचार
फिरवत राहिले बुलडोझर स्वप्नपूर्तिसाठी
आमच्या घामाचा चिकदा झाला,
त्यांनी ओढून घेतले कातडे डोळ्यांवर
आम्ही मात्र शांत.
असा हा शोषणाचा पाढा सुरु झाला की तो थांबायचे नाव घेत नाही. सामान्य माणूस म्हणून महानगरात जगतांना कळत न कळत गुलामीचे बळी होण्याशिवाय पर्याय नसतो. कारण अन्यायाविरुध्द आवाज काढला तर अन्याय अत्याचार आणि उपासमारीला सामोरे जावे लागणार. माणसांची यंत्रे बनलेल्या निर्जीव मनाला कसे कळणार जिवंत माणसाचं मन. ही सामान्य माणसांची शोकांतिका शिंदे यांची कविता मांडताना दिसते.
कापडाची, कागदाची किंवा कशाचीही असो गिरणी
कामगारांच्या घामावर तरारून फुगायचे
प्रॉफिट नावाचे भलेमोठे झाड.
आता माणसापेक्षा जमिनीलाच मिळतो भाव
तेव्हा राबणाऱ्या माणसाच्या बुडाखाली अडकलेल्या
जमिनीखाली कराव्याच लागणार होत्या
हातातून काढून घेतले काम
तशी बुडाखालची सरकत गेली जमीन
मग डोक्यावर असलेला पालापाचोळा विकून
त्यांनी धरली शहराबाहेरची वाट
मुंबईतल्या आकाशाला गवसणी घालणा-या पंचतारांकित इमारती सामान्य माणसांच्या घामातून,रक्तातून उभ्या राहतात.तिथल्या गिरण्या,कारखाने कामगारांच्या घामावर चालतात. गिरण्या बंद करून हजारो माणसं एका रातीत बेकार होतात.तेव्हा उभ्या आयुष्याचा पालापाचोळा विकून खाणारी पोटं डोक्यावर घेऊन शहराबाहेरची वाट धरावी लागते. असे सततचे विस्तापित आयुष्य जगणा-या मजूर,कामगारांच्या जगण्याची संवेदना शिंदे यांची कविता जागवितांना दिसते. पाखरांच्या थव्याप्रमाणे माणसं उठत जातात. बसत जातात.तिथल्या मातीचे रंग धारण केले जातात. कळपात सामील होऊन झेंडे हातात घेतले जातात. पुढे झेंड्यांचे रंग मुखवट्यांना लावले जातात. त्यावर प्रखर शब्दात भाष्य करतांना कवी सुशीलकुमार शिंदे लिहितात-
रंगीबेरंगी मुखवटे… मुखवट्यांच्या जगात
माणूस म्हणून जगताना फारच करावी लागते नौटंकी
म्हणून तो आता माणूस म्हणून नव्हे
मुखवटा म्हणून जगतोय सुखात
माणसाचा निर्घृण खून होत असताना,
शेवटी मुखवट्यांचाच असतो आधार.
अशा या आयुष्याच्या साठमारीत परंपरेचे चिरेबंदी दरवाजे शोधून बुरसटलेल्या विचारांचे झेंडे हातात घेऊन फडकत राहतात. त्या झेंड्यांचे रंग मनात भिनले जातात. तेच रंग मुखवटे म्हणून वापरतांना स्वत:चे अस्तित्व हरवून बसतात. हळूहळू आतून-बाहेरून कातडीवर घेतलेले स्टँड बदलत राहतात. पाठोपाठ मुखवटे बदलणे जमू लागते.
आणि पुढे सगळे जगणेच मुखवट्यांचे होऊन जाते. आयुष्याचे संदर्भ बदलत जातात.शेवटी जगण्यासाठी मुखवट्याचाच आधार मिळतो. अशा मानवी मुखवट्याच्या आतील माणूसपणाचा खून होत असल्याची खंत शिंदे यांची कविता करतांना दिसते. त्याचबरोबर शहरात आलेल्या माणसांच्या मानसिकतेवर भाष्य करतांना कवी सुशीलकुमार शिंदे लिहितात-
दिसेल जागा तिथे पसर
बांध झोपडी सांग हक्क…
गटारीच्या कठड्याला, डोंगराच्या बुडाला
समुद्राच्या काठाला, झाडांच्या खोडालाही
सारता येते मागे
तू राहा निश्चिंत
फुटपाथच्या पथारीवर, पुलाखाली ओसरीवर
बस स्टैंड, रेल्वे स्टेशन
शासकीय भूखंड, मोक्याची जागा
घाबरू नको मार डल्ला, दिसेल जागा तिथे पसर.
घाबरू नको, ओरडत रहा –
माझी जागा, माझं घरटं
निवडणुकीच्या मुहूर्तावर तेच येतील तुझ्याकडे
तेच म्हणतील, बदलू कागद
तेच म्हणतील, बदलू कायदे
म्हणून म्हणतो, निश्चिंत रहा, दिसेल जागा तिथे पसर .
शहरी जीवनात अस्तित्वासाठी लढण्याची तयारी असावीच लागते. निवा-यासाठी जागा हवीच असते. जागेसाठी काहीही करण्याची तयारी करावीच लागते. नसलेल्या जागेवर हक्क सांगण्याची आणि जागेसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. परंतु लोकशाहीत निवडणुका अशांना उश:प ठरतात. नव्याने वसलेल्या झोपडपट्ट्यांना कायदे बदलून शासकीय मान्यता दिल्या जातात. मतदारांचे महत्व ओळखले जाते. म्हणून काही झाले तरी जागा सोडायची नाही. या विचारधारेशी आग्रही राहण्याचा संदेश त्यांची कविता देतांना दिसते. त्याचबरोबर शहरांचे महत्व विशद करतांना कवी शंदे लिहितात –
हे शहर जगते अनामिक ओढीने
उग्र दर्प पचवून घेते अमानुष लाचारीने
आणि तरीही टिकून आहे स्वप्न…
चकचकीत रस्ते उंचचउंच इमारती
मोकळेढाकळे फुटपाथ आणि शिस्तबद्ध वाहतूक…
कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली
या शहराने भाड्याने ठेवलीत स्वप्ने, आशा आणि आकांक्षा.
गाड्यांच्या धुराड्याने अशा शहरांना मोतीबिंदू झालेला असतो. तरी ही शहरे सर्वांना स्वप्न दाखवत राहतात. सर्वांना सांभाळत राहतात. कच-याच्या ढिगाखाली ही शहरे स्वप्नं भाड्याने ठेवत असतात. वायू,आवाज आणि पाण्याचं प्रदूषणं ही शहरं सहजपणे स्वीकारतात. कधीकधी झोपडपट्ट्या उठविण्यासाठी अचानक आगी लावल्या जातात. सिलेंडरचे स्फोट घडवून आणले जातात. या सगळ्या गोष्टींना ही शहरं सहजपणे सामोरी जातात. हे सांगताना कवी सुशीलकुमार शिंदे यांची कविता इथल्या जगण्याच्या समस्त जाणीवा शब्दबद्ध करतांना दिसते. तसेच शहरांचे सिमेंटच्या जंगलात किती सहजपणे रुपांतर झाल्याचे सांगताना कवी शिंदे लिहितात-
कूस बदलणारी शहरं
पटापट बदलत गेली
साथीच्या रोगाची लागण व्हावी
तशी बदलत राहिले नकाशे
आणि आत्म्याने टाकून द्यावी कात,
पण थोडाही बदलू नये गुणधर्म
तशी अजून विषारी होत गेली शहरं
मातीलाही माती गिळण्याची लागावी भूक
तशीच माणसाला लुटत राहिली
मारत राहिली गिळत राहिली
किती सहज शहरांचं जंगलात रूपांतर झालं…
कवी सुशीलकुमार शिंदे यांची कविता महानगराचे विविध अन्वयार्थ शोधतांना दिसते. झगमगत्या शहरातून जिवंत माणसांचे कळप एकाएकी कसे परागंदा होतात. भांडवलशाहीच्या पुढे नतमस्तक होतात. शहराचे नकाशे आणि माणसांचे आयष्य कॅलेंडरच्या पानाबरोबर बदलत जाते. ही शहरे म्हणजे माणसं मारण्याचं नवीन यंत्र असल्याची खंत त्यांची कविता मांडते. तसेच मातीच माणसांना गिळत जाते. मातीचे हे एक वेगळे व्यवहार्य रूप कवी सुशीलकुमार शिंदे यांची कविता अधोरेखित करांना दिसते.
चळवळींचा गाभण राहिलेला इतिहास
शोधत राहतो बापाचे गाळलेले नाव
तेव्हा माझाही शोध सुरू असतोच
मीही घेतो हुंगून मूठभर रक्ताळलेली माती,
लालसर मातीत दिसतो मला
समुद्राच्या त्सुनामी लाटांसारख्या शहराच्या सीमा रोज सरकतात. त्यांच्या कवेत शेकडो खेडी,तिथली शेती,माणसं मातीखाली गाडली जावून नामशेष होत आहे. तरी शहरांची भूक भागत नाही. या शहरांनी कित्येकांना गिळंकृत केले आहे. भविष्यात या खेड्यात पूर्वी सुखाने राबणारा सर्वसामान्य मुलाच्या बापाचा इतिहास लिहिला जाईल.त्याच्या चरित्रग्रंथाच्या पानोपानी तेव्हा बैलासोबत नांगर हाकणारा, दाण्यासोबत मातीत गाडून घेणारा, कवडीमोलानं बाजारात नागडा झालेला बाप पानापातून डोकवत राहील. असे हृदयद्रावक चित्र त्यांची कविता वाचकांच्या काळजावर कोरून जाते. शहरालगतच्या खेड्यांची, माणसांची झालेली वाताहत मांडून जाते. कवी शिंदे यांच्या कवितेला भविष्यातील घटितांची चाहूल लागते. या संदर्भात कवी शिंदे लिहितात-
जनावरांच्या जंगलात
काळोख व्यालेली रात्र चाल करून येत आहे अंगावर
तू ओळखून ये प्रस्थानखुणा
जमलंच तर आटपून घे तुझे माणसांबरचे प्रेम
आता इथून निघायलाच हवं ….दूर दूर कोठेतरी
खुणावतेय प्रकाशवेल
पहाटेला सुरू झाल्यात प्रसववेदना
नव्या युगाचा सूर्य व्यापून घेतोय आभाळ
म्हणून म्हणतो वेडे
आता इथून निघायलाच हवं…!
जगण्याच्या सा-या प्रस्तानखुणा ओळखून आयुष्याची वाटचाल करता आली पाहिजे.हे वास्तवदर्शी सुतोवाच त्यांची कविता करतांना दिसते. ही शहरं श्वापदांची जंगलं बनली आहे. त्यामुळे स्थलांतर केले पाहिजे. इथली यंत्र माणसांचे रक्त पीत आहे. जर जगायचे असेल तर जागा सोडून शहराबाहेर पडायला पाहिजे. असा निर्वाणीचा सल्ला देवून त्यांची कविता शोषक वर्गाच्या कौर्याची सीमा आणि शोषितांच्या मर्यादा अधोरेखित करून जाते.जातीधर्माच्या बेगडी आणि तकलादूपणाचा बुरखा फाडताना कवी शिंदे लिहितात-
इथले मंदिर-मस्जिद-चर्च किंवा गिरिजाघर
डोक्यावर छत धरत नाही … पोटाला अन्न देत नाही
अंगावर कपडा देत नाही
तरीही ही अफूची गोळी….लोकांना झिंगवते कशी?
लोक दंगल करतात … लोक विटंबना करतात
बलात्कार करतात;
हा अधम रक्तपात पाहून
शहर हळूहळू दुबळे बनत चाललंय.
थोडक्यात कवी शिंदे यांची कविता शहराच्या आरसपानी चित्रातून विकृत आणि बीभत्स शहरी संस्कृतीचं भयावह चित्र शब्दबध्द करताना दिसते. यांच्या संपूर्ण कवितांमध्ये नव्याने विस्तारित होणा-या महानगराचे दर्शन ठळकपणे होते. ते दर्शन घडवत असतानाच महानगराचे टोकाचे होणारे विघटन आणि राक्षसी स्वरूपामुळे महानगरवरील पराकोटीचा ताण याची जाणीव त्यांची कविता करून देते. त्यांच्या कवितेला आधुनिकता आणि मानवतेचे वावडे नाही. तर त्यांची कविता त्यातून साकार होत जाते. शहराच्या विस्तारीकरणात शहरी माणसांचं हरवलेलं माणूसपण, माणसांच्या जगण्यासाठी चाललेला अट्टाहास, त्यासाठी काहीही करायची तयारी अशा विविध मानसिक स्तरावरील या जगताचे दर्शन त्यांची कविता घडवताना दिसते. महानगरीय संवेदना शिंदे यांच्या कवितेतून सहजपणे वाचकांना जाणवतात. त्यांच्या कवितेत महानगरीय माणसांच्या जाणिवांचा कोलाहल, त्यांच्या व्यथा, वेदना, दैनंदिन संघर्ष, वर्गीय ताण तणाव, पेचप्रसंग, शब्दबध्द करताना त्यांची कविता दिसते. त्यांच्या कवितेत महानगरातल्या महाकाय भौतिक जगाचे, मानवी समूहाचे चित्र रेखाटण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो. कवी शिंदे यांच्या कवितामधून महानगरीय अनेक भावसंवेदना साकार होताना दिसतात. खरं तर त्यांची कविता म्हणजे महानगरीय जीवनातील घटकांच्या बारीकसारीख मानसिकतेचा अभ्यास करणारी कविता आहे.
महानगराच्या चमकणा-या विश्वामध्ये राहणाऱ्या आणि अंधारात आयुष्य चाचपडणारी माणसं, अंधाराच्या मदतीने जगणारी माणसं, अंधाराचा कोलाहल पचवून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारी माणसं, अशा विविध जाणिवेतून त्यांची कविता येतांना दिसते. त्यांच्या कवितेत स्त्री आणि श्रमजीवी कामगारांच्या वेदना भरलेल्या दिसतात. तिथल्या फूटपाथवरच्या माणसांच्या संवेदना घेऊन त्यांची कविता येते. तशीच त्यांची कविता वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जातांना दिसते. डोंगर नष्ट करून, झोपडपट्ट्या उठवून उंच इमारती उभ्या राहतात. आयुष्याची वाताहात होणा-या विस्तापित जगाची संवेदना शब्दबद्ध करतांना त्यांची कविता दिसते. नगराच्या आश्रयाला आलेल्या,सातत्याने विस्थापितांचे जिणं जगणा-या माणसांच्या आयुष्याचा कोलाहल त्यांची कविता मांडतांना दिसते. शहराच्या आधाराने बेवारसपणे जगणाऱ्या माणसांची कैफियत त्यांची कविता मांडून जाते. जागतिकीकरणाचा महानगरीय जीवनावर दूरगामी परिणाम होतो. याची जाणीव कवी शिंदे यांची कविता प्रखरतेने करून देते. कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या कवितेच्या पुढील प्रवासाला खूप सा-या शुभेच्छा.