शेती, माती आणि शेतक-याच्या जीवन संघर्षाची क्रांतिकारी कविता लिहिणारा कवी
मराठी साहित्यविश्व हे दिवसेंदिवस अधिकाधिक समृध्द होत आहे. त्याच्या समृद्धतेची कारणं ही शिक्षणाशी जोडली जातात. कारण शिक्षणाचा जसजसा प्रसार होत गेला, तसी साहित्यक्षेत्रात साहित्यनिर्मिती करणा-यांची संख्या वाढत गेली. विचारांच्या दिशा व्यापक होत गेल्या. जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. कामाची कार्यक्षेत्रे विस्तारत गेली. याचाही साहित्य लेखनावर परिणाम झाला. काव्यलेखनाचा हेतू काळानुसार बदलत गेला. त्यानुसार कविता बदलत आली. वास्तववादी विचारांना प्रधान्य देऊ लागली. मानवी मनाचा व मानवी जीवनाचा शोध कवितेने घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण कविता अधिक समाजाभिमुख होत गेली. आधुनिक ग्रामीण कविता नव्या संवेदना घेऊन आली. ती अधिकाधिक आत्मनिष्ठ होत जाऊन आत्माविष्कार करू लागली. साठोत्तरी काळात गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील ग्रामनिष्ठ जाणीवा व्यक्त करण्याच्या प्रेरणेतून ग्रामीण आणि दलित साहित्य वेगाने लिहिलं जाऊ लागलं. आपली वाटणारी भाषा, स्वतःच्या अनुभवांची, जगण्यातील सुख-दुःखाच्या काळाची, आपुलकीची भावना कवितेतून व्यक्त होऊ लागली. ग्रामीण कवितेच्या प्रवाहाने ग्रामीण साहित्यात चैतन्य आले. ज्या गोष्टींना साहित्याने स्पर्श केला नव्हता. ते विषय कवितेतून चर्चिले गेले. ग्रामीण जीवनाकडे मनोरंजन म्हणून पाहणारी कविता मागे पडली. प्रस्तापित समाज व्यस्थेतील स्वार्थांध व अहंकारी प्रवृत्तीने ग्रामीण म्हणून छळ करणा-या आर्थिक, राजकीय, सामाजिक, मनोप्रवृत्तीशी केलेला विद्रोह आधिक व्यापक होत गेला. हळूहळू खेडी बदलत गेली. तिथलं जीवन बदलत गेलं. त्या बदलांचे इष्टअनिष्ट परिणाम अनुभवत पुढचीपिढी वेगाने लिहिती झाली. याच पिढीचा प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील ,दिंडोरी तालुक्यातील, चिंचखेड सारख्या खेड्यात वास्तव्य करणारा कवी युवा कवी संदीप जगताप आपल्या ‘ भुईभोग ’ या काव्यसंग्रहाच्या रूपाने ग्रामीण कवितेच्या क्षितिजावर तळपतो आहे.दि.२३ ऑगष्ट १९८४ साली त्यांचा जन्म झाला. मराठी विषयात एम.ए; बी.एडपर्यंत शिक्षण घेतलं.अर्धवेळ शिक्षक आणि अर्धवेळ शेती अशी आयुष्याची कसरत करत आयुष्याला, तसेच येणा-या सर्व परिस्थितीला सकारात्मकतेने सामोरे जाणारे हाडाचे शेतकरी असलेले कवी संदीप जगताप. यांच्या ‘ भूईभोग ’काव्यसंग्रहाला पुणे येथील यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, अहमदनगरचा संजीवनी खोजे राज्यपुरस्कार, आकोल्याचा लोककवी विठ्ठलराव वाघ ‘ तिफन ’ साहित्य पुरस्कार, शेवगावचा दहिवल गुरुजी साहित्य पुरस्कार, संगमनेरचा लोकशाहीर अनंत फांदी साहित्य पुरस्कार, जळगावचा दलूभाई जैन साहित्य पुरस्कार, अकोला येथील किशोर मिरगे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. दूरदर्शनच्या सर्वच मराठी वाहिन्यांवर त्याचे कविता,शेती व शेतकरी यासंदर्भात कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.
शेतकरी म्हणजे या मातीवरचा भूदेव. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा अन्नदाता. कृमी कीटक अन् सर्वांचाच पोशिंदा. अशा पोशिंद्याच्या जीवनातील अनेक बारीकसारीक गोष्टींवर विचार करणारे, चिंतन करणारे कवी म्हणजे संदीप जगताप. मातीतल्या काळीज कळा कळत नकळत त्यांच्या शब्दात सहजपणे येतात. आज स्वातंत्र्यात शेतक-यांचे एवढे हाल होतात. त्या शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांचं मन बेचैन होतं. त्या बेचैनीतून जळजळते शब्द लाव्हा होऊन बाहेर पडतात. कविता होऊन कागदावर येतात. शेतकऱ्यांचा धर्म शेती पिकविणं. त्याला सन्मानाने बळीराजा म्हटलं जातं. परंतु आज राज्यशासन आणि इथली व्यवस्था त्याची सोयिस्कररित्या फसवणूक करते. त्याच्या शेतमालाला घामाचे दाम देत नाही. तो वर्षानुवर्षे शेतात राबतोय. सगळ्यांच्या पोटाची भूक भागवतोय. तरी त्याच्या आयुष्याची माती होते. सर्व स्थरावर त्याची लुट होते. शासन त्याचा छळ करतं. निसर्गही त्याला छ्ळवत राहतो. मातीचा कुठलाच गुन्हा नसतो. एक दाणा पेरला तर ती हजार दाणे कणसाला देते. तरी कुणबी सुखी का नाही ? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. सहाजिकच तो कर्जाच्या खाईत लोटला जातो. कर्जाच्या ओझ्याखाली सोईस्कररित्या गाडला जातो. मातीत राबणारा बाप उन्हाने करपून जातो. तण खुरपून माईचं मनही करपून जातं. कोसळणाऱ्या बाजारभावाची संक्रांत, लुटून जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे थवे, बोगस खतं, बोगस औषधं, बोगस बियाणं , बँका, सोसायट्यांमधून होणारी लूट, उत्पादन खर्चातील सततची वाढ, बेमोसमी पाऊस, विजेचे भारनियमन, या सर्व परिस्थितींचा मुकाबला, सततचा संघर्ष करून शेतकरी थकून जातो. मरून जातो. सरून जातो. म्हणून तर संदीप जगतापांची कविता अधिक विखारी बनते.
तुला जगायचं असेल तर जिंदगीतलं तण निंदायला शिक
हक्काचं हिसकावून घे. हात पसरून कोणाकडे नको मागू भीक
प्रत्येकापुढं वाकून वाकून तुझ्या कमरेला पडला बाक
पण तुझं वाकणं थांबत नाही
लई झालं तर आजचं उद्यावर
त्यापेक्षा तुझं मरण जास्त काळ लांबत नाही .
म्हणून तू आता ऊठ …. चांगला पेटून ऊठ
हातातल्या रूमण्याचीच तलवार कर
तुझ्या टाळूवरचं लोणी खाणार्यावर
बिनधास्त डोळे झाकून वार कर !!
ती शब्दाशब्दातून आग ओकते.पोटापुरतं पिकवा असा निर्धार करण्याची भाषा करते. शेतक-याच्या कर्जमुक्तीच्या, शेतीमालाला किमानभाव मिळविण्याच्या शासनाबरोबरच्या दीर्घकाळ चालणा-या लढाईत, अर्जुनासारखं हातबल व्हायचं नाही. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यायची भाषा करते. कष्ट करून इथला कुणबी वाकला आहे. अर्ज ,विनंत्या करून ,याला त्याला आदराने लवून भजून नमस्कार करून, प्रत्येकाच्या पुढं याचक होऊन वाकून वाकून कमरेत वाक पडला आहे. यातून हाती काही येईल असं वाटत नाही. फक्त आजचं मरण उद्यावर जाईल. याची जाणीव करून देते. तसा आधार देते,धीर देते. कर्जाच्या ओझ्याखाली हतबल होताना आपण मारायचं नाही. मागं सरायचं नाही. हक्कांसाठी , न्यायासाठी लढावं लागतं. जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोच. वेळ आलीच तर हातात नांगराचा फाळ घेऊन वार करायचा. असा संदेशवजा आदेश त्यांची कविता देतांना दिसते.
तुला आता किती वेळेस समजावून सांगू … भगवंताचा अर्थ
तुला आता किती वेळेस समजावून सांगून … गीतेचा गीतार्थ
ऐन युद्धाच्या वेळेस तुझं अर्जुनासारख अवसान जातं गळून
तू कसा जिंकणार आहेस हा पोटाचा लढा … हे युद्ध टाळून
तुला लढावं लागल एका हातात नांगर दुसऱ्या हातात विळा घेऊन
तुला जिंकावंच लागेल हे युद्ध मातीला रक्ताचा टिळा देऊन …!!
आयुष्याच्या वाटचालीत जीवन संघर्ष ठरलेला असतो.तो प्रत्येक कृमी किटकाला करावाच लागतो. जीवनाच्या कुरुक्षेत्रावर अनेकदा महाभारत घडत असतं. प्रत्येकाला अर्जुन होऊन लढावं लागतं; पण प्रत्येकवेळी सोबतीला सारथी म्हणून श्रीकृष्ण असेलच असं नाही. तेव्हा महाभारतातील अर्जुन आपला होऊ द्यायचा नाही. आपलं आवसान गळू द्यायचं नाही. कारण गीतेचा अर्थ आपण कधीच विसरायचा नाही. हे सत्तेचं युध्द नाही. हे पोटाचं युध्द आहे. हातात नांगर,विळा घेऊन लढावेच लागेल. आणि विजय मिळवावाच लागेल. त्यासाठी मातीला रक्ताचा टिळा लावायची वेळ आली तरी मागं हाटून चालणार नाही. हरलास तर उपाशी मरावं लागेल.म्हणजे कुणब्याचं मरण अटळ आहे. उपाशी मरायचं की लढून मरायचं. फरक तो काय एवढाच. कोणतीही क्रांती नुसत्या शब्दातून होत नसते. त्यासाठी रक्त सांडावेच लागते. याची जाणीव त्यांची कविता प्रकर्षाने करून देते. संदीप जगताप हे प्रयोगशील विचारांचे कवी आहे. त्यांच्या खालील कवितेतून अधिक स्पष्ट होते. असे मला वाटते.
फक्त एकदाच एकत्र या सगळ्या कुणब्याच्या पोरांनो
आणि ठराव करा स्वतःच्या पोटापुरतं पिकवायचं वर्षभर
बाजारात विकायचं नाही काही
मग बघू इथल्या किडयामाकोड्यांची सरणं कशी जळत नाही
आणि तुम्ही पिकवलेल्या मालाची किंमत … तुमच्या घामाएवढी ठरत नाही….?
आपल्या घामाची किंमत आपण ठरवू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून लढा, संघर्ष करावा लागेल. असे सांगताना एक वेगळा पर्याय कवी देण्याचा इथं प्रयत्न करतो. हे विसरून चालणार नाही. त्यासाठी गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने जावे लागेल. किमान एखादे वर्ष फक्त आपल्या पोटापुरतेच पिकविण्याचा प्रयोग करावा लागेल. म्हणजे शेतक-याच्या शेतमालाची किंमत त्यांच्या घामाएवढी ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते लिहितात-
आता आमच्या डोक्यात पुस्तकं पेटवतायत मशाली
उडीद कुळीद पेरला वावरात तरी क्रांतीचीच उगवतात गाणी
आता आमचा जथ्था निघालय
भुकेचं बॅनर खांद्यावर घेऊन दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला
फास घेऊन मरण्यापेक्षा लढता – लढता सरणावर जायला….
शिक्षणाने माणूस विकसित झाला. विचार करता झाला. पुस्तकातून सारेच इझम त्याला कळू लागलेत. कास्तकारांची सर्वस्थरावर होणारी लूट.यातून विद्रोह, संघर्ष आणि क्रांतीच जन्म घेते. विद्रोहाच्या कंठातून क्रांतीचीच गाणी जन्म घेतात. शेतक-यांनी भुकेचे बॅनर खांद्यावर लावून फास घेऊन मरण्यापेक्षा लढता लढता फासावर जाण्याची भाषा त्यांची कविता करते. शेतकरी आणि त्याच्या भोवतालचं वास्तव अत्यंत भयावह आहे. याच दहाकातेतून त्यांच्या कवितेतून विद्रोह भडकून पेटून उठतो.त्याचं बरोबर कवी संदीप जगताप यांची कविता त्यांच्या विचारांची प्रगल्भता सहजपणे सूचित करून जाते. ’ अतिथी देवो भव ’ या विचाराने दारात आलेल्या भिक्षुकाला कवी संदीप जगताप आपल्या कवितेतून शेतक-यांच्या मनाचं मोठेपण आणि औदर्य अधोरेखित करतात. मातीखालच्या दाण्याला उगवण्यासाठी ओल आणि पिकाला घामाएवढं मोल मिळण्याची शेतक-याला दुवा दिल्याबिगर जावू नकोस. असे सांगायला विसरत नाही. कारण अनेक भटके,फिरस्ते,दरवेशी यांचं संपूर्ण जीवन शेतक-यावर आवलंबून आहे. याची जाणीव त्यांची कविता करून देते.
तू आता दारात आलास तुला काहीतरी दिलं पाहिजे
नाहीतर मला शाप लागल
बळीचा रिवाज मोडण्याचं माझ्या माथ्यावर पाप लागल….
पण एवढं साल सांभाळून घे बाबा …!
या सालानं खूप काढली अंगावरची साल म्हणून हे पाच रुपये घे
आणि जाताजाता मातीखालच्या दाण्याला ओल मिळण्याची
आणि पिकणाऱ्या पिकाला घामाएवढं मोल मिळण्याची मनापासून दुवा दे…!!
शेती सा-यांची माता आहे. सर्वांना सांभाळणारी आहे. सा-यांना सामावून घेणारी आहे. शेतकरी त्याच तत्वाने आयुष्य जगतो. दोघांचा धर्म एकच आहे. दारात आलेल्याला खाली हात जावू देऊ नये. असा शेतक-याचा रिवाज आहे. म्हणून तो दरवाजावर आलेल्याला नाराज करून परत पाठवीत नाही. त्याचा हिरमोड करत नाही. त्याच्यात तो देव पाहतो. त्याला देवस्वरूपात पाहतो. खरं म्हणजे शेतकरी सर्वांनाच सांभाळतो. हे सांगतांना त्यांची कविता अतिशय सूचकतेने आणि उपहासाने सांगून जाते. असं असूनही सारेच कसे शेतक-यांच्या मुळावर उठतात.असा प्रश्न त्यांची कविता करतांना दिसते. त्या संदर्भात ‘तणा’च्या प्रतिमेचा चपखल वापरकरून व्यवस्थेतील व शासन यंत्रणेतील सा-याच चाकरमान्यांचा हिशीब चुकता करतात. जगतापांची प्रतिमा सृष्टी त्यांच्या जगण्यातील, व्यवहारातील असल्याने ते तिचा सुंदर वापर करतांना दिसतात.त्यामुळे त्यांची कविता वाचक आणि रसिकांच्या मनाचा तळ ढवळून काढते.
पिकाच्या मुळावर उठलेलं तण
आम्ही चिमटून घेतो खुरपून घेतो सूर्य मावळेपर्यंत
आमच्या कष्टाला अंत नाही
पण आमच्या घामावर समाजातलं किती तण पोसतंय
याची कुणालाच कशी खंत नाही…?
कुणबी सा-या जगाचा पोशिंदा. कधीतरी त्याचा टाहो या व्यवस्थेला ऐकावा लागेल. त्यासाठी कुणब्याला लढावं लागेल. त्याच्या घामाला रक्ताची किंमत मिळेल. तेव्हा पुन्हा त्याच्या जीवनात बळीचं राज्य येईल. असा आशावाद कविता मांडते. शेतक-याच्या आयुष्यात ओले,कोरडे दुष्काळ ठरलेलेच असतात. त्यामुळे त्याची स्वप्नं कधीकधी कांद्यासारखी चाळीतच सडून जातात. याचं विदारक चित्र रेखाटताना कवी संदीप जगताप लिहितात-
काळजातली उडून जाते ओल भेगाळते भुई
दुबार पेरणी करूनही काहीच उगवत नाही…
वाट पहात कित्येक दिस मी तसाच पडून राहतो
आशेचा पालव कांद्यासारखा चाळीमध्ये सडून जातो …
श्रावणातले सारे रंग जीव तोडून सुकतात
कोरडं आभाळ पाहून पाहून डोळे माझे थकतात…
काळजातील ओल, भेगाळलेली भुई, आशेचा पालव, कांद्याची चाळ, श्रावणातले रंग, कोरडे आभाळ या सा-या प्रतिमांमधून मानवी जीवनाचं किती मोठं आवकाश त्यांची कविता व्यापून जाते. ख-या कवितेची ताकद,सामर्थ्य इथं असतं. यासाठी कवीचं जगणं, त्याची निरीक्षणं, त्याचं आवलोकन, त्याची चिंतनशीलता यातून कवीची स्वत:ची एक प्रतिमासृष्टी उभी राहते. त्यावरच कवी प्रतिसृष्टी उभी करतो. म्हणून कवी जगताप यांना कविता लिहितांना शब्द,प्रतिमांसाठी अडून बसावे लागत नाही. त्यामुळे अशी कविता सहजपणे लिहिली जाते. ती सर्वांना संमोहित करून जाते. कविता ऐकून, वाचून संपते तरी तिचे प्रतिध्वनी दीर्घकाळ वाचकांच्या मनपटलावर निनादत राहतात. हे उत्तम कवितेचे लक्षण मानले जाते.
कवी जगतापांची कविता शेती, मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यातील प्रतीकं आणि प्रतिमा घेऊन येते. त्यामुळे ती अधिक उत्कटपणे शेतकरी वर्गाच्या जीवनाशी एकनिष्ठ होतांना दिसते. त्यांची कविता व्यवस्थेच्या दांभिकपणावर हल्ला चढवून भांडाफोड करते. कवी संदीप जगताप यांची कविता भोवतालच्या सर्वसामान्य माणसांच्या दुःखाची गाथा बनते. त्यांच्या कवितेत माती खालचे गाणे, भेगाळली माती, पोटाची खळगी, ओलिताची आरोळी, जिंदगीची माती, भेगाळली भुई, पोळलेली पावलं, मरणाची घाई, भुकेचे वळ, कर्जाचा राहू, रूमण्याची तलवार, अशा शेतीमातीतील शब्दांच्या योजक्तेमुळे अधिक प्रभावी आणि समृध्द होत जातांना दिसते. ‘मातीखाली गेल्याशिवाय कुठल्याच दाण्याचं झाड होत नाही’. ‘आभाळाच्या पोटी गर्भ राहिल्याशिवाय मातीतल्या जीवाचे भूईभोग सरत नाही’.‘थोडी मिळाली ओल जर रात्रीतून तरारून तण येतं वर’ ‘ कर्ज म्हणजे स्वस्तात मिळणारं इख. आणि रक्तावर वाढणारं बांडगुळासारखं पीक’ अशा सहज कृषीवलाच्या जीवनातील प्रचलित शब्दातून जीवनाचं तत्वज्ञान कवी संदीप जगताप समर्थपणे सांगून जातात.
लोकशाही देशात निवडणुका आल्या ती घोषणांचा पाऊस सुरू होतो. गल्लीबोळातून बांधामेरावरून, वाडीवस्तीतून, कार्यकर्ते जमाकरून राजकारणी पुढारी शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गोष्टी करतात. त्यांच्या प्रश्नांना आश्वासनांची खैरात करतात. अशा ढोंगी नाटकी, नौटंकी करून आश्वासनं देणाऱ्या राजकारण्यांचा, सत्ताधीशांचा शेतकऱ्यांना वीट येतो. राजकारण्यांची दांभिकता, कोरडेपणाची चीड येते. तेव्हा कवी संदीप जगताप यांची कविता प्रती आव्हान करायला मागेपुढे पाहत नाही. ते लिहितात –
पण तू आता माईक सोड …. स्टेजवरून खाली ये…!
पांढरे कपडे काढून फेक …. माझ्याबरोबर चल वावरात
मातीमध्ये जिंदगीची माती करणं … काय असतं
तेव्हा तुला खऱ्या अर्थाने कळेल
तुझे थंड रगत बघ मग कसं घासलेट होऊन जळल.
युगानुयुगं इथल्या मातीत शेतीत काबाडकष्ट करणा-या कास्तकर, कुणब्यच्या आयुष्याची कशी वाताहत लागते. याचे विदारक वास्तव चित्र जगताप रेखाटून जातात. शेतकऱ्याच्या वाट्याला गर्भाचं उदर नसलेली नापीक रेती आल्याने त्या रेतीत कुठलंच पिक पिकत नाही. तेव्हा त्याच्या आयुष्याची वाताहत होते. शेतकऱ्यांच्या आयुष्याची हतबलता आणि नामुष्की कवी संदीप जगतापांच्या कवितेतून खूप काही सांगून जाते. त्यामुळे त्यांच्या कविता वाचक,रसिकांच्या मनाचा तळ अगदी ढवळून काढतात. आणि कवीसह कवितेला काळजात घर करून देतात.
खरिपाचा,रब्बीचा एकामागे एक वाया जातोय हंगाम
नांगरलं ,वखरलं, पेरलं ,पाणी भरलं पण उपयोग होत नाही
नापीक मातीच्या उदरात बी त्यात श्वास जागत नाही
गुडघे टेकले त्याचे नांगर खोल लागत नाही
त्याच्या वाट्यावर गर्भाचं उदर नसलेली नापीक रेती
शेतकरी असूनही फुलत नाही शेती.
दिवस-रात्र शेतकरी काबाडकष्ट करतो. पाऊस पडला की मातीत बी रुजण्याची आशा धरतो. परंतु जेव्हा पावसाऐवजी आभाळातून कुठली सर कोसळत नाही. तेव्हा शेतकऱ्यांचं जिवाचा जळणं सुरू होतं. पोटाची भूक थांबत नाही. भूकेचा जोर वाढत जातो. कर्ज वाढत जातात. त्यातून कर्जबाजारीपणा वाढतो. लेकीबाळींच्या अंगावरलं किडूकमिडूक विकलं जातं. कधीकधी घरातली दुभतीजनावरं विकली जातात. शेतात राबणारे बैल विकले जातात. जमिनीला सेज लागतं. ही शेतकऱ्यांची होणारी वाताहत कवी संदीप जगतापांच्या कवितेत मातीतल्या बियासारखी टरारून उगवून वर येते. ते व्यक्त करतांना कवी संदीप जगताप लिहितात-
देताना नांगराला रुते मातीमध्ये फाळ
आली कडकून भूईवर आभाळाचा जाळ
झाडावरचं पानुट नाही हलत वाऱ्यानं
सारा शिवार पेटतो भरदुपारी उन्हानं
जीता देह जाळायला इथं पेटलं सरण
मुक्याच होतंया माझ्या जीवाचं जळणं
डोळे लागले नभाला नाही येत वेडी सर
जाळ भुकेचा जाळतो हळूहळू माझं घर.
भूक आणि भुकेचा जाळ काय असतो. तो फक्त शेती मातीत राबणा-यालाच माहित असतो. उन्हापेक्षाही दुष्काळाच्या झळा काय असतात. हे शेतक-यापेक्षा दुसरा कुणीच सांगू शकत नाही. चोहोबाजूंनी होरपळलेले शेतकरी आपल्या मुलांना मात्र शेतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. कारण आपल्या आयुष्याची माती झाली . मुलांच्या आयुष्याची माती होऊ नये. त्यासाठी कवी जगतापांची कविता ‘ कुठं तरी मास्तर व्ह्य ’ नोकर हो. चाकर व्हो. असा सल्ला देतांना दिसते. ही व्यवस्थेविरुद्धची शरणागता आहे. मातीतून नवसृजन निर्माण करण्याच्या शेतक-याच्या मानसिकतेला व्यक्त करतांना कवी संदीप जगताप लिहितात-
बाप म्हणतो, “ नोकरी मिळेल तेवढं पोटतिडकीनं शिकावं
गावात आता राहिले काय…?
जिंदगीचं होणार नाही सोनं शीव ओलांडून गेल्याशिवाय….
कित्येक वर्षे शेतामधे मी करत आलोय काम
पोरा आता वावरात राहिला नाही राम …
शेताबांधावर असाच जर घालत बसला आट्यापाट्या
जिंदगीत तुझ्या साऱ्या उगवून येतील काट्या-कुट्या…
कुठेतरी कारकुनी कर ! नाही तर शाळेत एखाद्या मास्तर
भेगांनी जिंदगी फाटू लागली की, मातीचं देता येत नाही अस्तर.
पोरा कुठतरी व्हय मास्तर.
प्रत्येक हंगामाच्या आरंभी उराशी अनेक स्वप्न पाहिले जातात. त्याच्या नोंदी कुठे तरी काळजात केल्या जातात. परंतु काळजातल्या नोंदी पाण्या पावसाअभावी काळजातच गोठून जातात. स्वप्नांची सारी राख आयुष्यावर पसरून जाते. जगण्याची ओल शोधत फिरावे लागते. त्यातून सुटका नाही. अशा निराशेच्या अवस्थेत जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी पायाखाली ओल शोधल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हे सगळेच बेभरवशाचे दिवस हातांच्या बोटांवर मोजता मोजता बोटे गळून पडतात. पोटातील भूकमात्र मागे हटत नाही. शेतीमातीत राबणा-या ग्रामीण स्त्रीचं आयुष्य शेती सारखंच झालं आहे. बालपणात मनात रंगवलेली स्वप्न संसारात पडल्यावर त्या स्वप्नांचे रंग उडून जातात. बहरलेल्या झाडांची पानगळ होते. मग निष्पर्ण झाडाचं जीवन वाट्याला येतं. अशा स्त्रीमनाची व्यथा कवितेतून रेखाटताना संदीप जगताप लिहितात-
‘पान झडल्या बाभळी फक्त उरल्या मेराला
पाणकळा येता दारी छिद्र पडतं कुडाला .
असं कसं जीवघेणं आठवांच जग बाई
सालामागं सालं जाता सल कमी होत नाही.
कुणब्याच्या आयुष्यात येणारे आरिष्ट, संकटं काही निसर्गनिर्मित आहे, तर काही मानवनिर्मित आहे. पण या दोन्ही संकटांचा सामना त्याला करावाच लागतो. पिकाच्या उत्पन्नापेक्षाही उत्पादन खर्च वाढत जातो. त्याच्या आयुष्याची वाताहत होते. शेतकरी वादळात मोडून पडणा-या झाडासारखा मोडून पडतो. त्याच्या या उद्ध्वस्त जीवनाचं सुंदर चित्र कवितेतून शब्दबद्ध करताना कवी जगताप लिहितात-
ऐन पोट-यात गहू त्याला तांबेरा वेढतो
दाणे भरता कणसावर पाऊस पडतो .
त्याने लावल्यात काही आता दराखाच्या बागा
नवं कर्ज काढायला नाही उताऱ्यात जागा.
सा-या जिंदगीचं त्याच्या असं माळरान होतं
मरणाच्या आधी मढं त्याचं स्मशानात जातं.
कर्जबाजारीपणामुळे महाराष्ट्रात आणि एकूण देशातच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे. आत्महत्यांच्या मागची नेमकी कारणं म्हणजे निसर्गाची अवकृपा, अवेळी पडणारा, कोसळणारा पाऊस. बाजारपेठेत कोसळणारे शेतमालाचे भाव, खतांच्या वारेमाप वाढणाऱ्या किंमती, बोगस खते, बियाणे आणि बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट. ह्या सगळ्या प्रश्नांचं ओझं फक्त त्याच्या एकट्याच्या खांद्यावर पडतं. त्यात त्याचा जीव गुदमरतो. बँका सोसायट्यांचे तगादे,वसुली मोहिमा,जप्त्या, सुरु होतात. इज्जतीचे पंचनामे होतात. आब्रूचे धिंडवडे निघतात.धुईसारखी निराशा मनात पसरत जाते. मित्र तुटतात. नाती दुरावतात. यामुळे शेतकरी हवालदिल होतो. एकांतात तो जीवनाचा खूप विचार करतो. अनवधानाने तो मृत्यूला जवळ करतो. याचं हृदयद्रावक व विदारक चित्र कवी संदीप जगताप आपल्या कवितेत शब्दबद्ध करतात. ते लिहितात –
पोटपाणी पोरंसोरं नव्हते त्याला असं नाही
त्याच्या पोटात होतं म्हणे दुसरंच सलत काही
चूल विझून गेली म्हणताना राखीत निखारा होता
पण पायाखालच्या भुईला तळातून पोखर होता
म्हणून मुक्या मुक्या त्याचा जीव झाला मुका
देह मातीवर ठेवून झाला स्वर्गवासी तुका.
कवी संदीप जगतापांची कविताही शेतकऱ्यांच्या संघर्षाला बळ देणारी. ऊर्जा देणारी आहे. तशीच प्रेरणा देणारी आहे. नुसताच पाठिंबा दाखवून पाठ दाखवणारी नाही. तर अन्यायाविरुध्द उभी ठाकणारी आहे. रणमैदानात उभी राहून वार करणारी आहे . कास्तकारांची हिंमत वाढवणारी आहे. शेतक-यांच्या चळवळीला पोषक अशीच आहे.कवीच्या विचारांचे बिंब कवितेच्या पानापानातून दिसते. त्यामुळेच की काय त्यांनी स्वत:ला शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहून घेतले आहे. आज ते शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांची कविता शेतकऱ्यांच्या कुंडलीत येणाऱ्या सगळ्या ग्रहांची, नक्षत्रांची चिरफाड करून टाकते. त्यांची कविता व्यवस्थेवर घणाघाती हल्ला चढवते. स्वतःपुरते पिकवा मग बघा यांची काय अवस्था होते. असा इशाराही देते.
कवी संदीप जगताप यांची कविता ही शेती मातीला शापमुक्त करू पाहणा-या कास्तकरांची कविता आहे. पिढ्यानपिढ्या जगाचा पोशिंदा असलेल्या कुणबटांची कविता आहे. लोकशाहीतील झुंडशाहीवर तसेच समाजव्यवस्थेतील सनातनी प्रवृत्तीवर प्रखरपणे वार करणारी कविता आहे. संदीप जगतापांची कविता ही शेती, माती आणि तिच्याशी निगडित असणाऱ्या सा-या शोषितांच्या दुःखाची कविता आहे. त्यांची कविता ही तमाम अन्यायग्रस्त शेतकरी बांधवांच्या उद्वेगाची कविता आहे. अन्याच्याविरुध्द पेटून उठणा-या उद्रेकाची कविता आहे. शेतकऱ्यांच्या मनात क्रांतीचं,संघर्षाचं बीज रुजावं. ते स्फुल्लिंग होऊन उतरावं. यासाठी पिकांच्या मुळांवर सुरुंगाची दारू खत म्हणून घालण्याची गोष्ट करते. म्हणजे शेतकरी ख-या अर्थाने पेटून उठतील. शेतक-यांना सालोसाल लुटणा-या लुटारूंच्या टोळ्यांचा नाश होईल. असे स्वप्न त्यांची कविता पाहते. शेतक-यांनी एकजूट झालं पाहिजे. वेळप्रसंगी मातीला रक्ताचा टिळा लावून लढण्यासाठी हातात वेळा घेतला पाहिजे. नांगराच्या फाळाचं शस्त्र केलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर उलटलेलं सारं तण मुळापासून उच्चाटन करता येईल. असा आशावाद जागवताना दिसते.
कवी संदीप जगताप यांची अतिशय गाजलेली ‘ इन्स्पेक्शन ’ ही कविता आहे. नाशिक साहित्य संमेलनात कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवोदितांच्या कवी संमेलनात या कवितेला चार वेळा वन्समोर मिळाला होता. विशेष म्हणजे कविता ऐकून कविवर्य विठ्ठल वाघ तासभर रडत होते. कवी संदीप जगताप यांची ‘ इन्स्पेक्शन ’ कविता म्हणजे इथल्या व्यवस्थेचं नितळ पारदर्शक असं प्रतिबिंब. शिक्षक आणि विद्यार्थ्याचा संवाद. वर्तमानकालीन शिक्षण व्यवस्थेचा पंचनामा. शालेय शिक्षण देतांना जीवन शिक्षणाची शिक्षकांकडून चालू असलेली वाताहत, शालेय शिक्षणातून हरवत चाललेला जीवनाचा गृहपाठ, शिक्षण व्यवस्थेतील बेगडीपणा, नाटकीपणा , भ्रष्टपणा, मानवी जीवनमूल्ये, नीतिमूल्ये आणि राष्ट्रीय मूल्यांचं होणारं अवमूल्यन, या आणि इतर अनेक गोष्टींचे पोलखोल करत जाते . ही कविता म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं अत्यंत मार्मिक आणि उपहासात्मक केलेलं उत्तम निरीक्षण तर आहेच पण तितक्याच ताकदीने केलेलं परीक्षण सुध्दा आहे. तापलेल्या इस्त्रीनं गेंड्यासारख्या व्यवस्थेच्या कातडीवरच्या सा-या घड्या सरळ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कवी संदीप जगताप यांची कविता करताना दिसते. शेवटी कवी हा प्रतीकं आणि प्रतिमांमधून बोलत असतो. बोलता बोलता कान टोचून, डोळ्यात अंजनही घालत असतो. ‘ इन्स्पेक्शन ’ कविता त्यांच्या आवाजात ऐकतांना रसिकांना ती वेगळयाच भावविश्वात घेऊन जाते. कवी संदीप जगताप यांच्या कवितेच्या पुढील समृध्द वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा.
व्वा… कवी संदीप जगताप यांच्या कविते विषयी अफलातून आणि काळजातून लिहिलंय सर…
अत्युत्तम
खुपच छान मांडणी सर ????????????????
एका मातीत ज्यांची नाळ जोडली गेली अशा या एका कुणब्याची कविता लिहिणा-या कविने भूईचे भोग आपल्या शब्दांत मांडणा-या कविचा परिचय अतिशय सह्रदय पणे करून दिला आहे .
खूप सुंदर सर
भारतीय संस्कृतीमध्ये शेतकरी किती महत्वाचा आहे सर्व जगाला पोहोचणारा तो फक्त शेतकरीच आहे त्याच्या अंगातील रक्त कसं जळतय तरीपण सर्वांच्या जीवनाची काळजी शेतकरी घेतो स्वतःचं आयुष्य दुसऱ्यासाठी अर्पण करून देतो अशा शेतकऱ्यांच्या जीवनातील व्यथा नि कथा अतिशय सहजतेने आपण बांधल्या धन्यवाद