रज:क्षीणता
वंश सातत्य टिकून राहण्यासाठी निसर्गाने स्त्रीच्या शरीरात आर्तव वह आणि स्तन्य वह या दोन विशेष स्त्रोतसची योजना केलेली असते. यामुळेच स्त्री शरीर हे मासिक पाळी, गर्भिणी, मेनोपॉज या अवस्थेतून जात असते. आज-काल स्वतःच्या आरोग्याबाबत हेळसांड किंबहुना इतर कारणांमुळे दुर्लक्ष होत आहे.

मो. 9822649544
स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, वारंवार होणारे गर्भपात, गर्भाशयात गाठी, हार्मोनचे असंतुलन परिणामी मुलींमध्ये पीसीओडी, वंध्यत्व अशा तक्रारींचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढताना आढळते. दर महिन्याला निसर्गाला अपेक्षित गर्भधारणा न झाल्यामुळे मल स्वरूप निरुपयोगी ठरलेले रज गर्भाशयातील धमन्या द्वारे अपान वायूच्या प्रेरणेने योनी मुखावाटे बाहेर टाकले जाते.
हे किंचित काळपट रंगाचे, विशिष्ट गंध असलेले रज: स्त्रव असते. लक्षाच्या रंगाप्रमाणे असणारे, रक्तवर्ण, धुतल्यावर कपड्यावर न डाग न राहणारे असावे. साधारणतः तीन ते पाच दिवसापर्यंत २० ते ८० मिली इतक्या प्रमाणात मासिक पाळीचा स्त्राव होणे आवश्यक असते.
वंध्यत्वाचे उपचार करताना मासिक पाळीचे लक्षण व त्याबाबत पूर्ण इतिहास घेणे खूप आवश्यक असते. बर्याच रुग्णांमध्ये प्रजक्षीणता म्हणजे पाळीच्या प्रमाण अल्प आढळते. त्यावेळेस त्याची प्रमुख चिकित्सा करावी लागते.

काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा अभाव किंवा गर्भाशय आकाराने खूप लहान असणे हे तपासणी मध्ये आढळून येतात. योनी मार्गाचा अभाव, योनी मार्गाचा संकोच, योनी मार्गात पडदा असणे या कारणामुळे सुद्धा पाळी अत्यंत कमी अथवा येत नाही.
वारंवार उपवास, डाएटच्या नावाखाली कमी जेवण घेणे, सलाड, कच्च्या भाज्या याचं अतिरेकी सेवन, फास्ट फूड खाण्याचे प्रमाण जास्त असणे, अधिक प्रमाणात जीम किंवा व्यायाम, अत्याधिक शरीरसंबंधाची क्रिया, सतत मानसिक चिंता, दिवस राहू नये म्हणून घेण्यात येणाऱ्या Oral contraceptives pillsचे दीर्घकालीन सेवन, पाळी लांबवण्यासाठी गोळ्या वारंवार घेणे या कारणामुळे पाळीमध्ये विकृती निर्माण होते.
रक्त कमी असणे, ट्यूबर्क्युलोसिस इन्फेक्शन, मधुमेहासारख्या आजारामुळे येणारा थकवा या गोष्टीमुळे दर महा येणाऱ्या पाळीचा स्राव कमी होतो. थायरॉईड हार्मोन्सचा बिघाड, पीसीओडी यासारख्या आजारामुळे सुद्धा पाळी अनियमित होते अथवा नैसर्गिक प्रमाणात फ्लो होत नाही.
रज:क्षिणतते त्याचे कारण शोधून त्यानुसार औषध उपचार सुचवले जातात. कोणत्या कारणामुळे रजक्षीणता आली हे शोधून त्यानुसार उपचारांची दिशा निश्चित होते. स्त्रीच्या आहारात दूध, अंडी, गोडांबी, बदाम-पिस्ते, गव्हाचे पदार्थ, अंजीर, उंबर, लसूण, मांसरस, तीळ, उडीद, दही, ताक, दूध-शतावरी अशा प्रकारचा आहार व हंगामी फळे याचा समतोल असावा.








