स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शारिरीक, बौद्धिक, अतिश्रमामुळे महिला वर्गाचं स्त्रीत्व हरवल्याचे अनेक उदाहरणं जगभरात वाढताना दिसतात. त्यातच पीसीओडी या आजारानेही डोके वर काढले आहे. या आजाराविषयी आपण जाणून घेणे आवश्यक आहे.
पूर्वी प्रसूती तंत्र विषयी काळजी घेणारे तज्ञ आज स्त्रियांमध्ये होणाऱ्या विविध आजारापैकी पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज अर्थात पीसीओडी या आजारावर लक्ष केंद्रित करीत आहेत. एवढ्या भीषण प्रमाणात बीजांड ग्रंथीचा शोथ याचे प्रमाण तरुण मुलींमध्ये वाढलेले आहे. या आजारामध्ये हार्मोनचे असंतुलन, मासिक पाळीच्या विकृती, वजन वाढणे, अंगावर केस उगवणे, पाळीच्या वेळी ओटीपोट दुखणे, पोट फुगणे, चेहरा अथवा त्वचा काळवंडणे, सुरकुत्या पडणे, चिडचिडेपणा वाढणे, नैराश्य आदींचा सामना करावा लागतो. यासारख्या विकारासोबत हजारात सातशे या मोठ्या संख्येने तरुण मुलींमध्ये सापडणारे लक्षण म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज होय.
स्त्री बीज दर महिन्याला बिजांड मधून फुटून बाहेर पडते. शरीरात वयात आल्यापासून मेनोपॉजपर्यंत गर्भाशयाच्या दोन्ही बाजूस असणार्या ओव्हरी मधून एका बीजांडातून बीज बाहेर पडते. पाळीच्या साधारणतः बाराव्या ते पंधराव्या दिवसापर्यंत ते फुटून गर्भधारण क्षम बीज तयार होते. काही कारणामुळे स्त्रीबीज नैसर्गिकरित्या ओव्हरी मधून बाहेर न पडता कोशतच साचून राहते. असे चक्र वारंवार घडत असल्यास खूप सारे बीजांड ओव्हरीमध्ये साचतात. त्याला पीसीओडी असे निदान सोनोग्राफी द्वारे करण्यात येते.
महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात “रजस्वला परिचर्या“ या नियमांचं पालन न करता फास्ट, पुढचं, अति प्रमाणात सेवन, दिवसा झोपणे, व्यायामाचा अभाव, सतत बैठक, शिळे अन्न खाणे, वाहनाचा प्रवास, मलमुत्राचा वेग रोखणे, अतिचिंता, वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट यासारख्या अनेक कारणांमुळे शरीराचे संतुलन बिघडून हार्मोनल डिस्टर्बमुळे बिजांड ग्रंथीला सूज येते.
पर्यायाने अपत्यप्राप्ती होण्यास अडचणी येऊ शकतात. पीसीओडीच्या आजारांमध्ये लक्षणे अत्यंत संथपणे येऊ लागतात. ओटीपोट जड वाटणे, पोट सुटणे, आळस, अति झोप येणे, शरीराच्या ठराविक अवयवावर चरबी वाढणे, उलटी, मळमळ, डोकं दुखणं, हिमोग्लोबिनची कमतरता, तोंडात लाळ जास्तच सूटणे, मुंग्या येणे, चिडचिडेपणा, अंगावर अधिक रक्तस्त्रव यासोबत महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीत अनियमित व कमी प्रमाणात अंगावर जाते. हार्मोनचे संतुलन बिघडल्यामुळे स्तनातून दुधाचा स्राव अवेळी होणे. यासारख्या अनेक लक्षणांचा समुच्चय या आजारात आढळतो .
निदान
रुग्णाच्या शारीरिक मानसिक लक्षणावरून विकृतीचे निदान करता येते. मासिक पाळीचा संबंधी प्रश्न उत्तरातून तपासणी करता येते. सोनोग्राफी, रक्ताच्या तपासण्यांवरून पीसीओडी आजारावर शिक्कामोर्तब होते.
चिकित्सा
तरुण मुलींमध्ये आढळणाऱ्या या आजारात वेळीच आयुर्वेदिक उपचार केल्यास यातून १००% बाहेर पडता येते. आधुनिक शास्त्र सुद्धा याला लाइफस्टाइल डिसोर्डर असे नाव देते. आयुर्वेदानुसार जीवनशैलीचे व्यवस्थापन, तणाव निवारण व सकस आहार-विहाराची योजना केल्यास अत्यंत कमी वेळात स्त्रीची मासिक पाळी नियमित होते. नैसर्गिक मासिक स्त्रव होतो. दरमहा स्त्री बीजांड फुटण्यास मदत होते.
कुबेराक्ष वटी, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा यासारख्या वातानियमन औषधांसोबत गरजेनुसार बस्ती, शिरोधारा, नस्य हे पंचकर्म उपचार खूप उपयोगी ठरतात. ओटीपोटावर किंवा बेंबीच्या भोवती गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने कोमट तेलाने मसाज करणे, शिवाय पूर्वी भारतीय स्त्रिया करत असलेला दळणे, कांडणे, पिंगा घालणे, फुगडी खेळणे यासारख्या हालचालीच्या व्यायामाने शरीराचे चक्र सुरळीत राहते. बरेचदा या गोष्टीकडे सहज म्हणून दुर्लक्ष केल्यास भविष्यात शस्त्रकर्म करून त्या गाठी काढाव्या लागतात. त्यातून वंध्यत्वाचा शाप स्त्रीच्या माथी लागतो. म्हणून वेळीच पालकांच्या मदतीने तज्ञ आयुर्वेद वैद्याचा सल्ला घेऊन जीवनशैलीचे व्यवस्थापन, पंचकर्म, औषधी उपचाराने पीसीओडीवर सहज मात करता येते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!