धकाधकीची जीवनशैली आणि बदलती आहार पद्धती यामुळे २१व्या शतकात वंध्यत्वाचे प्रमाण वाढते आहे. आयुर्वेदातील योग्य उपचार पद्धतीद्वारे वंध्यत्व दूर करता येते. ही उपचार पद्धती जाणून घेणे आवश्यक आहे.
संतान सुख प्राप्तीमध्ये अडचण असलेल्या रुग्णांवर आयुर्वेद चिकित्सेचे यशस्वी उपचार केले जातात. यात केवळ पॅथॉलॉजिकल रिपोर्टवर अवलंबून न रहाता रुग्णाची शारीरिक तपासणी करून मनोबल योग्य असणे गरजेचे असते. पुरुष रुग्णांमध्ये Semen Analysis मध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही तसेच स्त्री रुग्णांमध्ये रिपोर्ट नॉर्मल असल्यावर ही म्हणजे Unexplained Infertility अशा केसमध्ये रुग्णाचा वैयक्तिक इतिहास, त्याची मनस्थिती याबाबत प्रश्न उत्तराने स्थिती जाणून घ्यावे लागते. त्यावर मार्गदर्शन व समस्येचे मूळ कारण सापडल्यास त्यावर उपचार करावे लागतात.
शुक्राद गर्भ प्रसदज:॥
शुक्रच्या प्रसाद भागापासून गर्भाची उत्पत्ती होते.
एकविसाव्या शतकात पुरुष वंध्यत्व मध्ये Premature Ejaculation, Erectile Dysfunction (ध्वजभंग) या सारखेही प्रचंड वेगाने वाढणारी समस्या मानली जाते. जो पुरुष अनुकूल प्रिय पत्नीसोबत मैथुन करण्यास असमर्थ असतो. त्यास नपुंसक अथवा “क्लैब्य” असे संबोधले जाते. शरीर सहवासाची प्रबल इच्छा असून सोबत अनुकूल वातावरण, पत्नीचा सहवास असताना लिंगशैथिल्य आल्यामुळे मैथुन कर्मास पुरुष समर्थ होऊ शकत नाही. हे वंध्यत्वाचे एक कारण सापडते.
समाजमनात असा पुरुष म्हणजे सावली, पाने, फुले नसणारा निरुपयोगी वृक्ष अशी उपमा दिली जाते. शुक्र धातूमध्ये दोष उत्पन्न झाल्याने नपुंसकता येते. याची बरीच कारणे आढळून येतात. शरीरावर असलेली अतिरिक्त चरबी (ओबेसिटी) हार्मोनचे आजार, सतत भीती, मानसिक तणाव, स्पर्धेच्या आयुष्यामुळे जीवनशैली योग्य पद्धतीची नसणे, अति घट्ट कपड्यांचा वापर आदी कारणांमुळे समस्या मूळ धरू लागते.
शरीराच्या गरजांचा विचार न करता केवळ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रात्री जागरण, अवेळी जेवण, प्रचंड मानसिक तणाव, पुरेशी झोप न होणे यामुळे शरीराचे संतुलन करणारे हार्मोन्स यात बिघाड होतो. आहारामध्ये तिखट, खारट, क्षार युक्त पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे, जास्त प्रमाणात पाणी पिणे, दही मांस याचं अतिरिक्त भक्षण, विरुद्ध आहार या गोष्टीमुळे अपथ्य होतं. सतत चिंता, उपवास यामुळे शरीरातील रस रक्तदीसप्त धातूंचा शेवटचा शुक्रधातू याचे व्यवस्थित पोषण होत नाही.
पत्नीवर अविश्वास, सतत मनावर दडपण, कुठली तरी भीती वा संशय, पत्नीच्या शरीराची नैसर्गिक अवस्था न विचारात घेता अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवणे, अति प्रमाणात मैथुन या कारणांमुळे शुक्रधातू दृष्टी होते. सततचा प्रवास, मानसिक चिंता, कोरडे पदार्थ खाणे या कारणामुळे वृद्धावस्था लवकर येते. पर्यायाने शरीर इंद्रिय क्षीण होऊन बळ हानी होते. पुरुष दुर्बल बनत जातो. त्यावेळी रसायन वाजीकरण चिकित्सा करण्याचा सल्ला दिला जातो. अयोग्य आहार, अति प्रमाणात शरीर संबंध, जननेंद्रियाला मार लागणे, अति प्रमाणात जिम सारखे व्यायामाचा अतिरेक, वेग अवरोध, नियमित मद्यपान, धूम्रपान यासारखी व्यसने, ओबेसिटी, क्षयरोगचा इतिहास, डिप्रेशन या कारणांमुळे मानसिक क्लैब्य दिसून येते .
अशा रुग्णांमध्ये केवळ रिपोर्टवर भर न देता त्याची मनस्थिती समजून घ्यावी. त्याला आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत करावी. सुयोग्य जीवनशैली व तणाव व्यवस्थापन ही गुरुकिल्ली ठरते. चिकित्सा करताना रुग्णास स्नेहपान केल्यानंतर वमन विरेचन बस्ती या सारखे शरीर शुद्धी उपक्रम केले जातात. तणाव निवारण करण्यासाठी शिरोधारा केल्यास उत्तम लाभ मिळतो.
पंचकर्माने शरीरशुद्धी झाल्यानंतर रसायन वाजीकरण उपक्रम केले जाते. रुग्णाच्या आहारामध्ये दूध, तूप, खजूर, मांस, कांदा, लसूण, बदाम, बेदाणे, गायीचे तुप, खडीसाखर, गहू, उडीद, हंगामी फळे यांचा मुबलक वापर करावा. गरजेनुसार बकऱ्याचे अंडकोष (बस्तांड किंवा कोंबडीचे अंड्याचा वापर आहारात वाढवावा.
प्राणायाम, सूर्यनमस्कार, पद्मासन, वज्रासन या गोष्टीमुळे जनन इंद्रियांना मिळणारा रक्तपुरवठा वाढतो. भुजंगासन, सर्वांगासन, हलासन, सूर्यनमस्कार, प्राणायाम, कपालभाती, ध्यानमुद्रा, बंध याचा तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने अवलंब करावा. लैंगिक दौर्बल्य क्षमता कमी झाली म्हणून रुग्णाने डगमगून न जाता आत्मविश्वासाने आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्यावा. मैथुन विधी नवरा-बायको दोघांनी एकमेकाला सहकार्य कसे करावे, नैसर्गिक शरीर संबंध याबाबत योग्य माहिती अत्यावश्यक घ्यावी. रुग्णाच्या गरजेनुसार विशिष्ट पोझिशन व सेक्स टेक्निकचे व्यायाम सांगितले जातात. मनोकुल समजुतदार पत्नीचे सहकार्य व स्वतःमध्ये आत्मविश्वास याने ”नपुंसक“ लेबल लागलेला पुरुष सुदृढ संततीचा पालक होतो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!