पुरुष वंध्यत्व
आज आपण पुरुष वंध्यत्वाबाबत जाणून घेणार आहोत. खरे तर या विषयाबाबत फारशी कुणीही चर्चा करत नाही. उघडपणे किंवा दबक्या आवाजातही. हा विषय महत्त्वाचा असला तरी तो दुर्लक्षितच आहे. म्हणूनच त्यावर टाकलेला हा प्रकाश…

मो. 9822649544
यथा पयसि सर्पिस्तु गुडश्चेक्षौ रसो यथा ।
शरीरेषु तथा शुक्रं नृणां विद्यात् भिषग्वरः ।।
…सुश्रुत शारीरस्थान
पुर्नरुत्पादन करण्याची क्षमता असलेला शुक्र हा सातवा धातू संपूर्ण शरीरात प्रत्येक पेशी मध्ये असतो. अन अपत्यता समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक जोडप्यांमध्ये काही तरी उणीव असल्याचा न्यूनगंड वाढीस लागलेला असतो. प्रजनन क्षमतेचा थेट संबंध पुरुषत्वाशी असतो, अशी सर्वसामान्य समजूत झालेली असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था पुरुषांची झालेली असते. त्यावेळेस रुग्ण विविध तपासण्या, अफाट आर्थिक नुकसान, औषधोपचार व वारंवार येणारे अपयश याला कंटाळून आयुर्वेद तज्ञाकडे येतो. त्यावेळी जगण्याची उमेद त्या जोडप्यांमध्ये निर्माण करणे पहिले कर्तव्य असते.
सकारात्मक आचार-विचार, जीवनशैली याचा परिणाम काय असतो, हे समजून सांगितल्यानंतर पुढील उपचारांची व गरजेनुसार तपासणी करण्याची दिशा ठरवली जाते. पुरुष रुग्णाची तपासणी करताना रुग्णाचा आरोग्य इतिहास घेतला जातो. पुरुष रुग्णाची शारीरिक वाढ व्यवस्थित झालेली आहे का? याबाबत शारिरीक तपासणी केल्यावर लैंगिक क्षमता याविषयी प्रश्न-उत्तरे करून त्याबाबत परीक्षण केले जाते.
पुरुषांमध्ये वीर्य तपासणी (semen analysis) ही कमी त्रासाची अत्यंत स्वस्त व गरजेनुसार वारंवार करता येणारी तपासणी असते. म्हणून स्त्रियांच्या दृष्टीने विविध अवघड व गुंतागुंतीच्या तपासणी करण्यापूर्वी पुरुषाची धातू तपासणी करणे आवश्यक पहिली पायरी मानली जाते.
चार दिवस ब्रह्मचर्यपालन केल्यानंतर पॅथॉलॉजी लॅब मध्ये तपासणी केल्यानंतर शुक्रजंतूंची गुणवत्ता आणि एकूण संख्या (क्वान्टिटी व कॉलिटी) याबाबत रिपोर्ट तपासला जातो. त्यानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाते. आयुर्वेद सिद्धांतानुसार शुक्र हे स्फटिकाप्रमाणे मधुर, चवीष्ट, विशिष्ट गंध असलेल, घन स्वरूपातलं असे भौतिक वर्णन केलेले आढळते.










