वंध्यत्व
वंध्यत्वाविषयी आपल्याकडे फारशी जनजागृती नाही. किंबहुना याविषयी न बोलणेच अनेक जण पसंत करतात. पण, हे का होते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. वंध्यत्वाची वैद्यकीय चिकीत्सा करणारा हा लेख..
मानवाच्या प्रगतीचा वेग प्रचंड वाढलेला असताना त्याच वेगामुळे निर्माण झालेली स्पर्धा मोठा परिणाम करणारी ठरते आहे. त्यातूनच येणारा मानसिक तणाव, सुरक्षितता, जीवनात सतत भीतीचे, नकारात्मक वातावरण, बाह्य वातावरणातील प्रदूषण तसेच शरीराचं पोषण करणाऱ्या आहारामध्ये हायब्रीड अन्नपदार्थांचे सेवन या सर्वांचा परिपाक म्हणून सकस अशी कोणतीही गोष्ट शरीर आणि मनास मिळत नाही. अर्थात हे आपल्याला मान्य करावे लागेल.
रोज रोज नवनवीन विषाणूजन्य जीवाणूचे आजार या संकटांमध्ये भर घालू लागले आहेत. याशिवाय जीवनशैलीत सतत बदल होत आहेत. परिणामी, असे बदलजन्य आजाराचे पण स्वरूप उग्र होताना दिसते आहे. यापूर्वी एखाद्या शहरात फारच तुरळक प्रमाणात संतती न होणाऱ्या जोडप्यांची संख्या असायची. त्यावेळेस दत्तक विधान करून वंशसातत्य टिकवण्याचा मोठा सोहळा समाजात केला जायचा. आजकाल मात्र संतती प्राप्तीसाठी झगडणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढताना दिसते आहे.
लग्नास एक वर्ष पूर्ण झालेले असताना नवरा-बायको एकत्र राहात असतील, नैसर्गिक शरीर संबंध होऊन एक वर्षाच्या आत जर गोड बातमी मिळत नसल्यास तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घेऊन योग्य ते उपचाराची पावले उचलणे गरजेचे असते. व्यवहारांमध्ये बऱ्याच वेळा लैंगिक संबंध याबाबत अज्ञान, किंबहुना पॉर्नसाईटवर अथवा मित्रांकडे नातेवाईकांकडे ऐकलेली माहिती याचे मायाजाळ असते. त्यामुळे कुठेतरी मनात अवास्तव भीतीदायक, स्वप्नरंजक असे चित्र निर्माण करते. याऊलट वास्तवात ते सहज, सुलभ, आनंददायी व नैसर्गिक पद्धतीने व्हायला हवे, याचा आपण विचार करतच नाही. हेच या मूळ समस्येचे कारण आहे.
लग्नानंतर गोड बातमी मिळण्यास उशीर होत असल्यास बऱ्याचदा भारतीय समाज रचनेमध्ये स्त्रियांना किंवा नवविवाहित स्त्रीला याबाबत काही प्रश्न विचारले जातात. अथवा अनाहूत सल्लेपण देण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी सहाजिकच त्या स्त्री मध्ये कुठेतरी आत्मविश्वास कमी होऊन न्यूनगंडाची भावना निर्माण व्हायला लागते. बराच वेळा पतीचे सहकार्य असल्यास त्यातून मार्ग लवकर निघू शकतो. अन्यथा घटस्फोटापर्यंत कुटुंब कलह होऊ शकतात. असे व्यवहारात अनेक ठिकाणी घडताना दिसते.
अशा प्राथमिक अवस्थेत तरुण जोडप्याने तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा. समुपदेशन करून घ्यावे. नैसर्गिक, वास्तवज्ञान त्याचे महत्त्व समजून घ्यावे. गरजेनुसार आवश्यक तपासण्या, औषधे, उपचार, पंचकर्म करून रसायन वाजीकरण चिकित्सा घेतल्यानंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करावे. Pregnancy should be CHOICE, not a CHANCE या थीम ने इच्छित गुण संतती प्राप्ती करून घेता येते, असं आयुर्वेद सांगते. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गर्भधान संस्कार, गर्भसंस्कार याचे एक प्रतिक होते.
होणारे बाळ आपल्या दोघांचे आहे, आपल्या दोघांचे असणार आहे, हे स्वीकारूनच उभय पती-पत्नी यांनी एकमेकाला समजून घेऊन सहकार्य करावे. सामंजस्यातून संतती प्राप्ती करून घेता येते. आयुष्याला परिपूर्णता देणारे वंशसातत्य अपत्यप्राप्तीची सुख घेण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असते. कधी जन्मजात नशिबाने येणारी शारीरिक विकृती किंवा जीवनशैलीमुळे शरिरात होणारे विकृत बदल यामुळेही संततीप्राप्तीसाठी अडथळा निर्माण होतो.
संतती निर्माण होण्यामध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून आयुर्वेद उपचाराने सु संतती प्राप्त करून घेता येते. त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते. नवविवाहित दाम्पत्याच्या लग्नास एक वर्ष पूर्ण झाल्यावर गोड बातमी कधी येणार, असा समाजात विचारल्या जाणाऱ्या खोचक प्रश्नावर डगमगून जाऊ नये. निराश न होता त्या दाम्पत्याने एकमेकांच्या सहकार्याने तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
वैद्याने उभयतांची शारिरीक तपासणी व मनस्थितीचे अवलोकन केल्यावर सुचवल्याप्रमाणे जीवनशैलीत आवश्यक ते बदल करावेत. प्राकृत विज्ञान याबाबत अवगत होऊन जीवनशैली व्यवस्थापन गरजेनुसार औषधी उपचार, पंचकर्म चिकित्सा करून शरीरशुद्धी करून घ्यावी. रसायन वाजीकरण उपचारानंतर निश्चितच नैसर्गिक पद्धतीने संतती प्राप्त करून घेता येते. असा शेकडो रुग्णांचा अनुभव व्यवहारात आढळतो. त्यामुळे न डगमगता मार्गदर्शन घ्यावे.
उबदार उभयतांपैकी कोणा एकामध्ये शारीरिक उणीव, कमतरता असल्यास त्या पार्टनरला समजून घ्यायला हवे. त्याला सहकार्य केल्यास वंध्यत्व हा शाप न होता आयुर्वेदिक उपचाराने संततीप्राप्तीचे वरदान नक्कीच ठरु शकतो. म्हणून वेळीच उपचार घ्या, सकारात्मक राहा, भविष्य सातत्याचा आनंद आपल्या सोबत संपूर्ण कुटुंब समाज यामध्ये साजरा करावा.