७८ वर्षांचा तरुण
कर्तृत्व आणि कर्तबगारीला कसलेच बंधन नसते. अगदी वयाचेही. हे सिद्ध करतात अशोक सूटा. वयाच्या ७८व्या वर्षी चक्क दुसरे स्टार्टअप कंपनी मोठी करण्याचे स्वप्नं ते पहात आहेत. त्यांच्या या प्रयत्नात सामान्य गुंतवणूकदारही विश्वास ठेवत आहेत. शेअर बाजारात नुकतीच लिस्ट झालेली ‘हॅप्पीएस्ट माईंड्स’ या कंपनीसाठी यंदा सर्वाधिक भागधारकांचे अर्ज आले आहेत. यावर्षी कंपनीला सामान्य शेअर्स विकून ७०२ कोटी रुपये उभे करायचे होते. पण त्या करता तब्ब्ल १०५ लाख कोटी रुपयांचे अर्ज आले आहेत. म्हणजे गरजे पेक्षा तब्बल १५१ पट अधिक. यातूनच कंपनी व त्यांच्या प्रोमोटर्स वरचा विश्वास कळून येतो. जाणून घेऊया या चिरतरुण सिरीयल उद्योजकाबद्दल…
- प्रा. डॉ. प्रसाद जोशी
(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
स्वातंत्र्यपूर्व उत्तर पश्चिम सीमांत प्रांत म्हणजे आजचा पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा. या प्रांतात अशोक सूटा यांचा जन्म नोव्हेंबर १९४२ मध्ये झाला. वयाच्या ५व्या वर्षीच त्यांना फाळणीच्या वेदना अनुभवाव्या लागल्या. त्या भयावह वातावरणात आणि आक्रोश, हुंदक्यांच्या स्वरात अशोक सूटा यांनी परिवारासोबत भारतामध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. घरातून ते बाहेर निघत नाही तोच त्यांच्या घराची राख रांगोळी झाली. अगदी त्यांच्या डोळ्या देखत. आपला जीव मुठीत घेऊन ते सर्व भारतात आले. प्रारंभी दिल्लीला आणि मग लखनौ येथे त्यांनी वास्तव्य केले. अशोक सांगतात की, तुमच्याकडे आधीचं सर्वस्व गमावूनही पुन्हा स्वतःच विश्व निर्माण करता आलं पाहिजे. ही शिकवण आम्हाला या फाळणीमुळे मिळाली. याच गुणाचा त्यांना आयुष्यात खूप फायदा झाला.
अशोक हे ६ भावंडांपैकी ४थे. ३ मुलींच्या पाठीवरचे हे आपत्य. वडील डॉक्टर व ते ही सैन्यातील. त्यामुळे सतत बदली होत असत. म्हणजे १२ वर्षात १२ शाळा बदलाव्या लागल्या. पण यामुळे नवी शहरं, नवी माणसं
नव्या पद्धती व नव्या संस्कृती पाहायला मिळाल्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ‘चेंज मॅनेजमेण्ट’ आपोआपच अंगवळणी पडलं. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला कसे जुळवून घ्यायचे याचे ज्ञान आपोआपच येत गेले.
शालेय अभ्यासात हुशार असल्याने बोर्ड परीक्षेत उत्तम मार्क्स मिळाले. त्याकाळातील सर्वात जास्त डिमांड असलेले क्षेत्र म्हणजेच इंजिनीअरिंग. उत्तर भारतातील सर्वोत्तम म्हणून रुरकी येथील कॉलेजमध्ये त्यांना सिव्हिल इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. पण पहिले वर्ष सरता सरता त्यातील ड्रॉइंग्जस व आकृत्यांमुळे फारसा रस वाटत नव्हता. म्हणून दुसऱ्याच वर्षाला इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग ला प्रवेश घेतला. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मध्ये गणिताचा भाग जास्त असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता कारण गणित हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय.
इंजिनीअरिंग पूर्ण होताच त्यांना बर्मा शेल या ऑइल कंपनी मध्ये कोलकाता येथे जॉब लागला. बर्मा शेल ही कंपनी विविध प्रकारचे इंजिन ऑइल व इतर पदार्थ यांची विक्री करत असे. काही वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना यात काही आव्हानात्मक वाटत नव्हतं. कारण त्याकाळात मुळातच ऑईलचा तुटवडा असे. त्यामुळे ग्राहकच तुमची वाट पहात. ग्राहक आपल्यापर्यंत खेचून आणणे किंवा टिकवून ठेवणे या करता कुठलेच प्रयत्न करावे लागत नव्हते. म्हणून त्यांनी नवी संधी शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केले. लवकरच म्हणजे १९६५ साली त्यांना डीसीएम श्रीराम ग्रुप मध्ये नोकरी मिळाली. त्याकाळातील ती सर्वोत्तम भारतीय कंपनी होती. भारतात त्या काळात दोन उद्योग समूहच आपल्या मॅनेजर्सला ट्रेन करण्यासाठी नावाजलेल्या होत्या. एक म्हणजे हिंदुस्थान लिव्हर (आजची हिंदुस्थान युनिलिव्हर) व DCM श्रीराम ग्रुप. यांचे ट्रैनिंग प्रोग्रॅम जणू एखाद्या एमबीए कॉलेज प्रमाणे होते. या कंपनीत अशोक यांना व्यवस्थापनातले अनेक धडे शिकायला मिळाले.
सुमारे ८ वर्ष वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये काम केल्यानंतर अशोक यांना स्वतःला अजून काही व्यवस्थापन कौशल्य शिकण्यासाठी आशियाई इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट (मनिला, फिलिपाईन्स) येथे एमबीएला प्रवेश घेतला. अर्थात श्रीराम ग्रुप त्यांना सोडायला तयार नव्हता. म्हणून एमबीए नंतर पुन्हा ह्याच समुहात येईल या ग्वाहीवर त्यांना मुक्त करण्यात आले. आणि खरोखर एमबीए नंतर त्यांनी पुन्हा त्याच ग्रुप मध्ये कार्यभार सांभाळला.
श्रीराम समूहाच्या इलेक्ट्रिक डिव्हिजनमध्ये उषा फॅन्ससाठी अशोक हे काम करीत होते. मात्र, कंपनीचा रेफ्रिजरेशनचा व्यवसाय तेव्हा अतिशय तोट्यात चालला होता. म्हणूनच चेअरमन चरत राम यांनी अशोक यांना श्रीराम रेफ्रिजरेशन डिव्हिजनची जबाबदारी दिली. लवकरच त्यांनी रेफ्रिजरेशनला नफ्यात आणले. आव्हान पूर्ण झाल्याने आता पुढे काय करावे हे सूचत नव्हते. म्हणून त्यांनी संशोधनाकरिता दीर्घ सुट्टी घेतली. याचदरम्यान त्यांचे एक मित्र आनंद कोका यांनी अशोक सूट यांचे नाव अझीम प्रेमजी यांना सुचवले. विप्रो समूह तेव्हा विस्तार करत होता. त्यासाठी अशोक यांचा अझीम प्रेमजी यांनी ८ महिने पाठ पुरावा केला. पण श्रीराम ग्रुपच्या मानाने विप्रो एक छोटा उद्योग होता. त्यातही त्यांना केवळ खाद्य तेलाचाच अनुभव होता. विप्रोचे आयटी क्षेत्रात वर्षाकाठी केवळ ७ कोटी रुपये एवढेच उत्पन्न होते. आलेली संधी ही लोभस नसली तरी आव्हानात्मक म्हणूनच त्यांनी १९८४ साली विप्रोच्या आयटी उद्योगाची जबाबदारी स्विकारली. विप्रोला देखील हा नवा व्यवसाय उभा करण्यासाठी एका कुशल नेतृत्वाची गरज होती.
आयटी क्षेत्रातला अनुभव नसला तरी आपल्या व्यवस्थापन कौशल्यांमुळे त्यांनी विप्रोला प्रगती पथावर अग्रेसर बनवले. एकेकाळी तर भारतात आयटी क्षेत्रातील २ नंबरची कंपनी म्हणून चक्क इन्फोसिसला देखील मागे टाकले होते. अवघ्या १४ वर्षातच कंपनीची उलाढाल २२२० कोटींवर नेऊन ठेवली. कंपनी यशोशिखरावर असतानाच त्यांनी राजीनामा दिला. अर्थात कारण अस्पष्ट. विप्रोमध्ये त्यांनी कामासोबत तेथील माणसांनाही मनापासून जवळ केले होते. सर्वांनाच ते आपलेसे वाटू लागले होते. म्हणूनच अशोक यांच्यापाठोपाठ काही जणही बाहेर पडले.
१९९९ साली विप्रो सोडल्यानंतर अशोक यांनी मोठा निर्णय घेतला स्वतःची आयटी कंपनी स्थापन करण्याचा. वयाच्या ५८ व्या वर्षी हे धाडस जगाला फारसं रुचणार नव्हतं. पण आत्मविश्वास आणि जिद्दीने त्यांनी हे धाडस केलंच. १९९९ ते २००० हा काळ डॉट कॉम बूम म्हणून ओळखला जात होता. आयटी क्षेत्रात एक कृत्रिम फुगवटा निर्माण झाला आहे असं अनेकांचं मत होतं. लवकरच हा फुगा फुटणार असे अंदाज बांधले जात होते. प्रदीर्घ अनुभव आणि मार्केटचा संपूर्ण अभ्यास या जोरावर त्यांनी हा जगावेगळा निर्णय घेण्याचं ठरवलं. या निर्णयात त्यांच्यासोबत विप्रो तून बाहेर पडलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील ह्यात त्यांना सहकार्य केले. ‘माइंड ट्री’ या नावाने १९९९ मध्ये कंपनीची स्थापना झाली.
आतापर्यंत भारतातील आयटी इंडस्ट्री ही साधारण दीड दशकांहून अधिक जुनी झाली होती. तितकीच ती प्रगल्भही झाली होती. त्यामुळे आता माइंड ट्री ला प्रस्थापित असलेल्या स्पर्धकांसोबत प्रवेश करायचा होता. तज्ज्ञांच्या मते भारताच्या आयटी इंडस्ट्री मध्ये आता नवीन येणाऱ्यांना फारसा स्कोप राहिला नव्हता. माइंड ट्री सोबत सुरु झालेल्या आयटी कंपनी पैकी बहुतांशी कंपन्या आज अस्तित्वात नाहीत किंवा त्यांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पण माइंड ट्री चा विस्तार हा खरंच एखाद्या वटवृक्षाप्रमाणे होत आहे. या विस्तारात अशोक यांनी विप्रोतील कारकिर्दीमुळे निर्माण झालेल्या आयटी क्षेत्रातील वर्चस्वाचा कधीही गैरफायदा घेतला नाही. विशेषतः विप्रो कंपनीचे कुठलेही क्लायंट्स त्यांनी तोडले नाहीत. संपूर्णपणे नैतिकता सांभाळून त्यांनी माइंड ट्री ला मोठे केले.
सुरुवातीला अशोक आणि त्यांचे आठ मित्र यांनी मिळून साधारण दीड दशलक्ष डॉलर्स गुंतवून कंपनीची सुरुवात केली. त्याच सोबत त्यांना व्ही जी सिद्धार्थ व वॉल्टन सॉफ्टवेअर या गुंतवणूकदारांकडून ९ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. सुटा व त्यांचे मित्र यांच्याकडे साधारण ७५ % मालकी हक्क होते. २००१ पर्यंत अजून पंधरा दशलक्ष डॉलरची गुंतवणूक मिळाल्यामुळे कंपनीचे व्हॅल्युएशन आता ८० दशलक्ष डॉलर्स इतकी झाली. कंपनीची घोडदौड सुरू होती. विस्तार वाढतच होता. म्हणूनच २००७ साली त्यांनी भांडवल बाजारातून शेअर्स विकून पैसा उभा करण्याचे ठरवलं. साधारण २०० कोटी रुपये उभे करण्यात आले. पण यामुळे कंपनीच्या मालिकेतील या दहा मित्रांचा भाग आता केवळ ३५ टक्के इतका उरला होता.
२००८ साली आलेल्या जागतिक मंदीचा परिणाम माइंड ट्री वरही झाला. यातून सावरण्यासाठी क्योसेरा वायरलेस कंपनी विकत घेण्याचे कंपनीने ठरवले. यातून मोबाईल हँडसेट उत्पादन क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग सपशेल फसला. त्यामुळे कंपनीला फार मोठे नुकसान सोसावे लागले. २००९ मधील फसलेल्या या प्रयोगाची संपूर्ण जबाबदारी सुटा यांनी स्वीकारली. २०११ मध्ये त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. या सोबतच स्वतः कडचे ११ टक्के शेअर्स त्यांनी व्ही जी सिद्धार्थ यांना विकले. अतिशय जिव्हाळ्याची, स्वतःची निर्मिती सुटा यांना सोडावी लागली. पाकिस्तान सोडताना ज्या वेदना झाल्या तशाच ही कंपनी सोडताना झाल्याचे ते सांगतात.
माइंड इंट्री ने आजवर अनेक आव्हाने हसत हसत पेलली. पण आता कुठेतरी पायाच हलला होता. सुटा यांच्यानंतर कंपनी फारशी सावरु शकली नाही. त्यामुळेच सिद्धार्थ यांनी एल अँड टी इन्फोटेकला शेअर्स विकले. याद्वारे माइंड इंट्री दुसऱ्या कंपनीच्या आधीन झाली. वयाच्या ६९ व्या वर्षी सुटा यांनी पुन्हा विश्व निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. स्वतःच्या हिंमतीवर त्यांनी नवी आयटी कंपनी स्थापन केली ‘हॅप्पीएस्ट माईंडस’. उत्कृष्ट आणि माणुसकीवर आधारित असे कल्चर या कंपनीत निर्माण करण्यात आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने हॅपीएस्ट अशी ही कंपनी आहे.
चढ-उतार पाहून सुटा यांनी कधीही हार मानली नाही. सर्वस्व नाहीसं झाल्यानंतरही ते पुन्हा उभे राहिले. स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास, चिकाटी आणि सतत आव्हान पेलण्याची उर्मी मनात असल्याने त्यांनी जनमानसाचा देखील विश्वास संपादन केला. याचाच प्रत्यय त्यांच्या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओच्या वेळेला आला. माइंड ट्रीला अपेक्षित असलेल्या २०० कोटी गुंतवणुकीच्या बदल्यात २० हजार कोटीची गुंतवणूक मिळाली तर हॅप्पीएस्ट माईंडला ७०० कोटी अपेक्षित असताना एक लाख पाच हजार कोटी रुपये प्राप्त झाले. ही केवळ आयटी क्षेत्राची किमया नसून आयटी कंपन्या चालवणाऱ्या त्या किमयगाराची आहे. या वयातही न थांबता, न थकता सतत लढत आहेत आणि स्वतःशीच स्पर्धा करत आहेत.
Age is just a number, if we don’t mind, it doesn’t matter..
Tres Inspirant ????
Bataille avec la vie
Thanks
वयाचे बंधन कधीच नसते..
मोलाची माहिती. आभारी आहोत सर..